नागी शिवा, बंडीपूर राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर वसलेल्या लोक्केरे या खेड्यात तिच्या कुटुंबासोबत राहते. ती कुरुबा गौडा या समुदायाची आहे आणि घरकामगार म्हणून काम करते.
सहा महिन्यांच्या काळात, कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्याघ्र अभयारण्याच्या सीमेवरील आपल्या रोजच्या दिनचर्येतील छायाचित्रे तिने काढली - झाडं, शेतं, पिकं, प्राणी आणि तिचं कुटुंब. कॅमेरा वापरण्याची ही तिची पहिलीच वेळ होती (Fujifilm FinePix S8630). वन्यजीवांसोबतचं आयुष्य या विषयावरच्या एका मोठ्या सांघिक छायाचित्र प्रकल्पाचा भाग असलेला हा तिचा चित्रबंध एकूण सहा चित्रबंधांच्या मालिकेतील दुसरा आहे. (या मालिकेतील पहिला, जयाम्माला बिबट्या दिसला तेव्हा , ८ मार्च २०१७ रोजी प्रसिद्ध झाला.)

“माझ्या माणसांचे फोटो काढायला मला आवडतं. आम्ही कसं जगतो, कोणत्या समस्यांना तोंड देतो हे इतरांना कळायला हवं,” नागी शिवा, ३३, म्हणते. “मला आणखीही फोटो काढायला आवडेल पण मला फारसा वेळ मिळत नाही. घराकडे परतणाऱ्या माझ्या गायींचे फोटो मला काढायचेत. पावसानंतर सगळं हिरवंगार झालंय. मला चरणाऱ्या शेळ्या-मेंढ्या किंवा तळ्यातल्या पाणी पिणाऱ्या पक्ष्यांचे फोटो काढायला आवडतं.”

एकांडं झाड : “या झाडाला म्हणतात जगला गंती मारा (कळलाव्या झाड). कुणीच हे झाड आपल्या अंगणात किवा शेतात लावत नाही कारण लोकांचा विश्वास आहे की हे झाड त्यांच्या घरात भांडणं लावील. याचं हे नाव फार पूर्वीपासून आहे. आम्ही याचा वापर करत नाही; फक्त जळणासाठी याचं लाकूड वापरतो.

शेतात काम करताना : “माझ्या गावाजवळ, शेंगा खुडणाऱ्या बायांचा हा फोटो. या फोटोतील सगळी माणसं माझ्या माहितीतील आहेत. हा फोटो मी सकाळी सातच्या सुमारास काढला, तेवढ्यासाठीच मी तिथे गेले होते. पुरूषच नव्हे तर बायादेखील सकाळी शेतात कामाला जातात. मीसुद्धा शेतात काम करत असे पण आता मला इतर काम मिळालं आहे. जंगलाजवळच्या शेतात आम्ही कष्ट करतो.”

गौरी रुद्रेश्वर : “हा आहे आमचा प्रदेश, इथे टेकड्या आहेत, जंगल आहे आणि आम्ही इथे राहतो. ही गौरी रुद्रेश्वर मंदिराची टेकडी आहे; व्याघ्रप्रकल्पाच्या खंदकाच्या पलीकडे ती आहे. टेकडीमध्ये एक मूर्ती आहे आणि शिखरापर्यंत पोचणारी एक गुहा आहे. कुणी आत जाऊ शकत नाही पण तिथे एक चिंचोळी वाट आहे आणि आत साप आहेत. शिखरावर एक मंदिर आहे आणि आपण तिथपर्यंत चढून जाऊ शकतो. हत्ती आणि वाघ तिथपर्यंत येतात पण आम्हीही तिथे जातो. आम्ही तिथे पूजा-प्रार्थना करतो. ही जागा लोक्केरेपासून, म्हणजेच माझ्या गावापासून एखादा किमी लांब असेल.”

घरासमोर (माझा) भाऊ, बैल घेऊन : “रेड्डी नावाच्या बंगळुरूमधील एका माणसाचं हे घर आहे. आम्ही त्याला ओळखतो, त्याच्या परिवाराने गावच्या शाळेला पैशाची मदत केलेली आहे. ते मुलांना वह्या आणि शिष्यवृत्त्या देतात. मी पूर्वी त्या घराची देखभाल करत असे. त्या घरासमोरून माझा भाऊ त्याचे बैल आपल्या घरी आणत आहे. तो आपल्या गायी शेतात चरतो. हे बैल त्याचे स्वत:चे आहेत. आता आमच्या गावाजवळच्या काही लोकांनी अशी मोठी घरे बांधली आहेत.”

बैल: हा बैल माझ्या भावाचा आहे. गुरं शेतकऱ्यांना शेतीकामात खूप मदत करतात. शेतात ती खूपच कष्ट करतात, म्हणूनच आम्ही त्यांची पूजा करतो. या बैलाचं नाव ‘बसव’ ठेवलंय.”

जेवण घेऊन जाणारी बाई : “ही माझी बहीण. शेतात काम करणाऱ्या तिच्या नवऱ्यासाठी ती जेवण घेऊन चालली आहे.”

जंगलातील वणवा : “ मला माहीत नाही कुणी जंगलात आग पेटवली. जंगलात गेलेल्या कुणीतरी पेटवली असेल, विडी पेटवून आगकाडी टाकली असेल किंवा आपोआपही लागली असेल. जंगलात गुरे चारायला नेणाऱ्या कुणी तरी हे केलं असेल. लोक्केरेच्या जवळच पेटलाय हा वणवा, वनविभागाची माणसं विझवायचा प्रयत्न करताहेत, रात्री ११ पर्यंत त्यांचे प्रयत्न सुरु होते.”

मोर : “या सुंदर मोरासारखे कितीतरी सुंदर पक्षी आणि प्राणी आमच्या जंगलात आहेत. हा फोटो मी माझ्या कामाच्या जागेजवळ घेतला. तिथे एक टेकडी आहे आणि तो एका खडकावर उभा होता; अगदी शांतपणे आणि व्यवस्थित.”

नांगरणीः “आम्ही शेती करतो आणि पीक काढतो. आम्ही जंगलाजवळ राहतो पण तरी आम्ही शेती करतो. आम्ही नाचणी, ज्वारी आणि कांदा पिकवतो. इथे फारसं पाणी नाही बहुतेक जण शेतासाठी पावसावर अवलंबून राहतात.”

मेंढरांची चारणी: “आमच्या उपजीविकेसाठी आम्ही गुरे आणि शेळ्या-मेंढ्यांवर अवलंबून असतो. लोक शेळ्या-मेंढ्या पाळतात. आम्हाला (त्यांच्यापासून) लोकर मिळते. कधी कधी गरज पडली तर आम्ही एखाद दुसरी शेळी किंवा मेंढी विकतो. माझ्या गावातील अनेकजण अशा उत्पन्नावर अवलंबून आहेत. प्रत्येकाकडे साधारण ५० शेळ्या-मेंढ्या असतात. आमच्याकडे २५ शेळ्या आहेत पण मेंढ्या नाहीत. त्यांना चारायला आमच्याकडे मेंढपाळ नाहीत, माझी आई म्हातारी झाली आहे त्या कामासाठी. मेंढरांना एकटं सोडता येत नाही, सोबत राहावं लागतं नाहीतर ती परतच येणार नाहीत, कुणी खाऊनही टाकतील. शेळ्या हरवल्या तरी परत येतात. या फोटोत माझा भाचा त्यांना चारतोय. यातील मेंढ्या माझ्या बहिणीच्या आहेत आणि शेळ्या माझ्या.

घाणेरीचं कोरीवकाम : “हा माझा मेव्हणा आहे. तो घाणेरीवर काम करतोय. [घाणेरी नावाच्या या फुलझाडाने या राष्ट्रीय उद्यानातील फार मोठी जागा व्यापलेली आहे.] त्याचे नाव बसव आहे आणि तो अपंग आहे. आमचा एक स्वयंसहायता गट आहे ज्यात ९ स्त्रिया आणि एकच पुरुष आहे, बसव हा तो एकटा पुरुष. आम्ही या गटाला ‘लंटाना संघम्’ असं नाव दिलंय्. आम्हाला लंटानापासून फर्निचर आणि इतर वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण मिळालेलं आहे. मला रु. १५० मजुरी मिळत असे. पण काम फार आणि त्या मानाने फायदा कमी म्हणून मी ते काम सोडलं आणि घरकाम करू लागले.

प्रशिक्षण : “ इथे माझी बहीण गुड्डेकेरे गावातील जेनु कुरुबा आदिवासी मुलींना लंटानावरील प्रक्रिया शिकवत आहे. पुरुष जंगलातून लाकूड आणतात आणि स्त्रिया त्यावर प्रक्रिया करतात.
कर्नाटकातील मंगला गावातील मरिअम्मा चॅरीटेबल ट्रस्टच्या समन्वयाने हे काम जारेड मार्गुलीस यांनी पार पाडले. फुलब्राईट नेहरू स्टुडंट रिसर्च ग्रांट (२०१५-१६), अमेरिकेच्या बाल्टिमोर काऊंटी येथील मेरिलँड विद्यापीठाची ग्रॅज्युएट स्टुडंट रिसर्च ग्रांट आणि मरिअम्मा चॅरीटेबल ट्रस्टच्या सहकार्याने हे काम पूर्ण झाले. भाषांतरासाठी बी.आर. राजीव यांचे अमूल्य सहकार्य मिळाले. ‘पारी’च्या सामाईक सृजनशीलतेच्या धोरणानुसार या छायाचित्रांचे हक्क छायाचित्रकारांकडेच आहेत. त्यांची पुनर्छपाई किंवा इतर कारणासाठी ‘पारी’शी संपर्क साधावा.
संबंधित कहाण्याः
जयाम्माला बिबट्या दिसला तेव्हा
Home with the harvest in Bandipur
बंडीपूरचा प्रिन्स जेव्हा समोर उभा ठाकतो
'That is where the leopard and tiger attack'
'This calf went missing after I took this photo'
अनुवादः छाया देव