३० नोव्हेंबर २०१८. दिल्लीतल्या किसान मुक्ती मोर्चा मध्ये सहभाग घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी बोलावं म्हणून मी दिल्लीच्या निझामुद्दिन रेल्वे स्थानकावर आलो होतो. काही अंतरावर मला काही गडी, बाया आणि लहानग्यांचा घोळका दिसला. डोक्यावर पोती आणि खांद्यावर पिशव्या घेऊन ते स्टेशनमधून बाहेर पडत होते.
मला वाटलं की हे मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले शेतकरी असावेत. नंतर माझ्या ध्यानात आलं की ते कामाच्या शोधात आलेले छत्तीसगडचे मजूर होते. “आम्ही हरयाणाच्या जिंदाल पॉवर भट्ट्यावर काम करायला चाललोय,” २७ वर्षीय इतवारा जोल्हे सांगते. रायगड तालुक्याच्या खरसिया तालुक्यातल्या छोटे मुदपूर गावची ती रहिवासी. तिचा नवरा शंकर म्हणतो की दिल्लीच्या सीमेपाशी कुठे तरी आहे पण नक्की कुठे ते तोही सांगू शकला नाही.
इतवारा, शंकर आणि त्यांच्यासोबतची दोन कुटुंबं एक तर वीज प्रकल्पामध्ये किंवा जवळपासच्या वीटभट्ट्यांमध्ये काम शोधतील. या जोडप्याने सांगितलं की ते गेल्या तीन वर्षांपासून कामासाठी दिल्ली-हरयाणाला येतायत. यंदा छत्तीसगड विधान सभेच्या निवडणुकांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान करून ते इथे आलेत.


डावीकडेः रायगड जिल्ह्यातले इतवारा जोल्हे आणि तिचा नवरा शंकर यांना वीज प्रकल्पावर काम मिळेल अशी आशा आहे. उजवीकडेः स्थलांतरितांची अख्खी कुटुंबं आबालवृद्धांसह कामाच्या शोधात रस्त्यावर संसार थाटून आहेत
ते सतनामी या अनुसूचित जातीचे आहेत. “आम्ही भूमीहीन मजूर आहोत. आम्ही कापण्या होईपर्यंत शेतात मजुरी करतो [कमाई, दिवसाला सुमारे १५० रुपये]. त्यानंतर आम्ही कामासाठी गाव सोडतो,” शंकर सांगतो.
त्यांच्यासोबत रायगड जिल्ह्याच्या सारनगड तालुक्याच्या गोंडा गावातले अजय आणि दिव्या धारिया आहेत. अजय गेल्या काही वर्षांपासून वीटभट्टीवर कामाला येतोय पण दोन वर्षांपूर्वी लग्न होऊन आलेली दिव्या मात्र पहिल्यांदाच त्याच्या सोबत आलीये.


डावीकडेः महाराष्ट्राच्या जळगावमधले राजेंद्र शिंदे आणि सोनाली भूमीहीन मजूर आहेत. गावी दुष्काळ असल्याने ते मुलंबाळं आणि इतर कुटुंबांसोबत दिल्लीला आले आहेत
नंतर एका पुलावर रस्त्याच्या कडेला मला सुमारे ५० कुटुंबं दिसली. सकाळी सकाळी बाया भाकरी टाकत होत्या. “आमच्या भागात दुष्काळ पडलाय, रानात कामं नाहीत त्यामुळे कामाच्या शोधात आम्ही इथे आलोय,” महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातून आलेल्या पार्वती सांगतात. “आम्हाला इथे येऊन थोडे दिवस झालेत आणि आम्ही शहरात बांधकामावर काम शोधतोय.”
तुम्ही इथे, पुलावर राहणार? मी विचारलं. “नाही. बांधकामावर, काम मिळेल तिथे,” त्यांनी सांगितलं.
त्यानंतर माझी भेट झाली, नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या सुभाष बबनडोरेंशी. “आमचं दोन एकर रान आहे, पण दुष्काळ पडलाय. आम्हाला इथे येऊन १०-१२ दिवस झालेत. काम शोधतोय,” सुभाष सांगतात. या आधी कधी दिल्लीला आलायत, मी विचारलं. “कधीच नाही. पहिल्यांदाच आलोय.”


‘पूर्वी आम्ही मुंबईला जायचो, पण पहिल्यांदाच आम्ही इथे दिल्लीला आलोय, बरं काम मिळेल असं वाटलं म्हणून,’ महाराष्ट्रातून आलेल्या लक्ष्मीबाई खरात (डावीकडे) सांगतात
सुभाष यांच्या पलिकडे बसलेल्या लक्ष्मीबाई खरातांशी बोलण्याचा मी प्रयत्न करतो. इथे आलेल्या इतर स्थलांतरित कामगारांप्रमाणे त्यांना देखील हिंदी बोलता येत नव्हतं. त्यांच्या गावच्या एकांच्या मदतीने मी त्यांच्याशी संवाद साधला. “पूर्वी आम्ही मुंबईला जायचो, पण पहिल्यांदाच आम्ही इथे दिल्लीला आलोय, बरं काम मिळेल असं वाटलं म्हणून,’” लक्ष्मीबाई सांगतात.
जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळच्या राजेंद्र शिंदेशीही माझं बोलणं झालं. राजेंद्र आणि त्यांची पत्नी सोनालीदेखील भूमीहीन मजूर आहेत, गावी दुष्काळ असल्याने ते दिल्लीला आले आहेत. माझ्याशी बोलता बोलता राजेंद्रने सोनालीकडे हसून पाहिलं, तिनेही लाजून नवऱ्याकडे हसरा कटाक्ष टाकला. या परक्या, निर्दय शहरात एकमेकांकडे प्रेमळ नजरा लागलेल्या या दोघांना तसंच तिथे सोडून मी पुढे निघालो.
अनुवादः मेधा काळे