“हा कोविड-१९ गेला नाही तर माझ्या शेतातलं भाताचं हे शेवटचं पीक असेल,” अब्दुल रेहमान सांगतात. मध्य काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातल्या नागबल गावात आपल्या शेतात दिवसभर राबून थकले भागलेले रहमान आपल्या पत्नीने, हलीमाने स्टीलच्या पेल्यात ओतून दिलेलं पाणी पीत होते.
दहा वर्षांनंतर ते आपल्या कुटुंबाची ही एकराहूनही कमी असलेली जमीन कसत होते. “मी स्वतः इथं काम करायचं थांबवलं कारण स्थलांतर करून आलेले कामगार [मुख्यतः बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेले] कमी पैशात जास्त काम करायचे,” ते सांगतात. “पण आता, जर ‘बाहेरचे’ कामगार जर आले नाहीत, तर मला भातशेती सोडून द्यावी लागेल,” पूर्वी सरकारी नोकरदार असलेले ६२ वर्षीय रेहमान म्हणतात.
“तब्बल १५ वर्षांनी मी भातकापणीच्या वेळी रानात आलेय. आता तर भाताचं पीक कसं काढायचं हेही विसरल्यागत झालंय,” ६० वर्षांच्या हलीमा म्हणतात. गेल्या साली कापणीच्या काळात त्या दोन किलोमीटरवरच्या आपल्या घरून आपले शौहर रेहमान आणि मुलगा, २९ वर्षीय अली मोहम्मद यांच्यासाठी जेवण घेऊन यायच्या. अली एरवी रेती उत्खनन किंवा बांधकामावर रोजंदारीवर मिळेल कसं काम करतो.
मध्य काश्मिरात स्थलांतरित कामगारांना एक कनाल भात काढणीसाठी १००० रुपये मजुरी दिली जाते (८ कनाल मिळून एक एकर होतो), ४-५ जणांचा गट मिळून दिवसाला ४-५ कनाल भात काढतात. स्थानिक कामगारांना अधिक मजुरी हवी आहे – ८००० रुपये रोज. इथले चार कामगार मिळून दिवसाला १ कनाल भात काढतात (अगदी क्वचित, १-५ किंवा २). म्हणजे एका कनलमागे ३२०० रुपये मजुरी द्यावी लागते.
मार्चमध्ये टाळेबंदी लागली – तसंही ५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद १७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीर बंदच होतं. आणि तेव्हाच सगळ्या परप्रांतीयांना २४ तासांच्या आत काश्मीर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. याचा परिणाम म्हणजे कामं करण्यासाठी बाहेरचे स्थलांतरित कामगारच नाहीयेत. काही जण मागे राहिले होते आणि त्यांना एप्रिल-मे महिन्यात भाताच्या पेरणी आणि लावणीची कामं केली होती. पण जास्त कष्टाचं काम खरं तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काढणीच्या काळात असतं असं इथले स्थानिक शेतकरी सांगतात.
नगबलहून दोन किलोमीटरवर असलेल्या दरेंद गावी इश्तियाक अहमद राथेर यांची ७ कनाल शेती आहे. “यंदा एक कनाल भात काढायला इथले मजूर ३,२०० रुपये मागतायत. आम्हाला हे परवडत नाही. आणि आता आम्हाला कामाला असेच कामगार मिळतायत ज्यांना भात काढायचा बिलकुल अनुभव नाहीये. पण काय करणार, पुढच्या पेरणीसाठी आम्हाला भात काढून शेतं मोकळी करून घ्यायलाच लागणार. हेच काम बाहेरून आलेले कामगार १००० रुपयांत करत होते,” इश्तियाक उकलून सांगतात.

‘हा कोविड-१९ गेला नाही तर माझ्या शेतातलं भाताचं हे शेवटचं पीक असेल,’ मध्य काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातल्या नागबल गावात आपल्या शेतात दिवसभर राबून थकले भागलेले अब्दुल रहमान आपल्या पत्नीने, हलीमाने स्टीलच्या पेल्यात ओतून दिलेलं पाणी पिता पिता म्हणतात
अहमद राथेर आणि इतर काही शेतकऱ्यांनी रबीमध्ये आपल्या शेतात मोहरी, मटार आणि इतरही काही पिकं घेतली आहेत. पण गंदरबलमधल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची सारी भिस्त भातावरच आहे, खास करून शालिमार-३, शालिमार-४ आणि शालिमार-५ या तीन वाणांवर, कृषी संचालक सैद अल्ताफ ऐजाझ अंद्राबी सांगतात.
काश्मीरमध्ये जवळपास १.४१ हेक्टर क्षेत्रावर भाताचं पीक घेतलं जातं – म्हणजे पिकाखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या (४.९६ लाख एकर) २८ टक्के जमिनीवर असं कृषी संचलनालयाच्या आकडेवारीवरून दिसतं. “भात हेच इथलं मुख्य अन्न आहे, आणि इथल्या भाताची गोड चव तुम्हाला बाहेर कुठेच मिळणार नाही,” अंद्राबी सांगतात. सुजलाम काश्मीर खोऱ्यात भाताचं पीक हेक्टरी ६७ क्विंटलपर्यंत येतं. या पिकामुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि बहुतेक शेतकरी कुटुंब घरी खाण्यासाठी, खास करून कडाक्याच्या थंडीमध्ये वापरण्यासाठी भात पिकवतात.
पण यंदाच्या वर्षी, रेहमान आणि राथेर यांच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलाय. टाळेबंदीमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वीटभट्ट्या, रेती उत्खनन आणि बांधकामावर रोजगार – दिवसाला ६०० रुपये रोजावर मिळालेला नाही. आणि आता पीककाढणीच्या काळात त्यांना परवडत नसूनही स्थानिक मजुरांना मजुरी द्यायला लागलीये.
मध्य काश्मीरच्या बडगम जिल्ह्यातल्या कारिपोरा गावचे ३८ वर्षीय रियाझ अहमद मीर यांचाही असाच संघर्ष सुरू आहे. रेती खणायचं काम टाळेबंदीमुळे गेलं. त्यांना आपल्या १२ कनाल जमिनीतून चांगला भात निघेल अशी आशा होती. “माझ्या जमिनीकडून फार आशा ठेवल्या होत्या मी. पण [सप्टेंबरच्या सुरुवातीच्या] अवकाळी पावसाने बहुतेक पिकाचं नुकसान झालं,” काही आठवड्यांपूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं. “बाहेरचे कामगार इथे असायला पाहिजे होते. त्यांनी चपळाईने भात काढला असता आणि काही तरी माल हाती लागला असता.”
आणि दरेंद गावात, त्यांच्या चार कनाल शेतात काम कऱणारे ५५ वर्षांचे अब्दुल हमीद पर्रा देखील हीच आशा बाळगून होतेः “असं पहिल्यांदाच झालं असेल की काश्मीरच्या शेतांमध्ये बाहेरने आलेले मजूर नाहीयेत.” (कमी संख्येत का असेना, गेल्या वर्षीदेखील हे मजूर कामं करत होते.) “कर्फ्यू असोत, टाळेबंदी, हरताळ लागो, सगळ्या परिस्थितीत आम्ही काम केलंय, पण हा कोविडचा काळा काही तरी वेगळाच आहे. येणाऱ्या काळात तरी आमच्या शेतात काम करायला स्थलांतरित कामगार येतील अशी आशा आहे.”
कोण जाणो, या आशा खऱ्याही ठरतील. गेल्या दोन आठवड्यांमध्ये इतर राज्यांमधनं मजूर कामासाठी काश्मीर खोऱ्यात येऊ लागले आहेत.

कुशल मजुरांचा तुटवडा असल्यामुळे मध्य काश्मिरातल्या गंदरबलमधली अनेक शेतकरी कुटुंबं अनेक वर्षांच्या खंडानंतर पिकं काढणीच्या काळात शेतात राबत होती

बडगम जिल्ह्याच्या कारिपोरा गावचे रियाझ अहमद मीर रानात साचलेलं पाणी काढून टाकत होते. त्यांना टाळेबंदीमुळे रेती खणण्याचं काम मिळालं नाही पण आपल्या १२ कनाल शेतातून चांगलं पीक येईल या आशेवर ते होते. ‘अवकाळी पावसाने माझ्या पिकाचं नुकसान केलं,’ त्यांनी मला सांगितलं. ‘बाहेरून आलेले कामगार इथे पाहिजे होते, मला थोडा तरी माल वाचवता आला असता...’

बडगम जिल्ह्याच्या गुडसाथू भागातल्या ६० वर्षांच्या रफीका बानो, त्यांच्या १२ कनाल भातशेतीत तण काढतायत, जेणेकरून पीक जोमाने वाढेल

बडगम जिल्ह्याच्या गुडसाथू भागातल्या ६२ वर्षांच्या या एक शेतकरी (त्यांचं नावही रफीका) रानातलं गवत काढून जनावरांसाठी भारा बांधतायत

गंदरबल जिल्ह्याच्या दरेंद गावचे इश्तियाक अहमद राथेर अल्युमिनियनच्या ड्रमवर भात झोडपतायत. ‘माझी सात कनाल जमीन आहे, गेली १५ वर्षं मी शेती करतोय,’ ते सांगतात. ‘कामाला स्थलांतिरत कामगार नाहीत, त्यांच्याशिवाय काम करणं आम्हाला फार ज़ड जातंय, आम्ही आमची शेती त्यांच्या भरोशावर सोडून दिली होती’

गंदरबल जिल्ह्याच्या दरेंद गावातले अब्दुल हमीद पर्रा, वय ५५ त्यांच्या चार कनाल शेतात भाताच्या पेंड्या रचून ठेवतायतः ‘असं पहिल्यांदाच झालं असेल की काश्मीरच्या शेतांमध्ये बाहेरने आलेले मजूर नाहीयेत. कर्फ्यू असोत, टाळेबंदी, हरताळ लागो, सगळ्या परिस्थितीत आम्ही काम केलंय, पण हा कोविडचा काळ काही तरी वेगळाच आहे. भविष्यात तरी आमच्या शेतात काम करायला स्थलांतरित कामगार येतील अशी आशा आहे.’

गंदरबलच्या दरेंद गावात काश्मिरी शेतकरी खुल्या रानात तयार भाताचे भारे सुकवतायत

गंदरबलच्या दरेंद गावात एक काश्मिरी तरुणी (जिने नाव सांगितलं नाही) भात झोडण्यासाठी भारे डोक्यावर घेऊन चाललीये

श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर गंदरबल जिल्ह्याच्या गुंद भागात निसवलेला भात
अनुवादः मेधा काळे