बिरसिंग भाग १ या चार गावातली ही एक प्रसन्न सकाळ आहे. वसंताची चाहूल लागलीये. पण तिशीची शाहिदा खातून मात्र या प्रसन्न हवेचा आनंद घेऊ शकत नाहीये. तिला ताप आलाय आणि चारवरच्या रिव्हराइन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्हरांड्यात ती डॉक्टरांची वाट बघत बसलीये.
आसाममध्ये ब्रह्मपुत्राच्या फिरत्या बेटांवर म्हणजेच चार बेटांवर असणाऱ्या २,२५१ वस्त्यांपैकी एक म्हणजे बिरसिंग. इतर चारप्रमाणे हे बेट गाळ साचून तयार झालेलं नाही. फकीरगंज गावाचा भाग असलेला हा प्रदेश नदीचं पात्र बदललं आणि मूळ भूभागापासून विलग झाला. त्यामुळे इथली जमीन इतर चारसारखी भुसभुशीत किंवा अस्थायी नाहीये. गेली अनेक वर्षं ती अखंड राहिली आहे.
२०११ सालच्या जनगणनेनुसार बिरसिंग चारमध्ये तीन गावं आहेत – बिरसिंग भाग १ (लोकसंख्या ५,५४८), बिरसिंग भाग २ (लोकसंख्या २,३८६) आणि बिरसिंग भाग ३ (लोकसंख्या ३,११७).

आसामच्या बिरसिंगमधल्या सौरऊर्जेने उजळलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर शाहिदा खातून. ‘आता इथे गरोदर बायांची बाळंतपणं होऊ शकतील,’ हुश्श करत ती म्हणते
प्राथमिक आरोग्य केंद्रात थांबलेल्या शाहिदा आणि इतर काही जणींच्या गप्पा सुरू आहेत. त्यांच्या गप्पांचा मुख्य विषय म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये बसवण्यात आलेले सोलर पॅनल आणि १८ खोल्यांच्या या आरोग्य केंद्रावर टाकण्यात आलेले पत्रे. आसाम ऊर्जा विकास मंडळाने बसवलेल्या २० पॅनल आणि १६ बॅटऱ्यांच्या मदतीने ५ किलोवॅट वीज निर्माण होऊ शकते.
दशकानुदशकं अंधारात काढलेल्या चार रहिवाशांसाठी सौर ऊर्जेमुळे आरोग्य सेवेचा दर्जा सुधारला आहे. “दवाखान्यात वीज आलीये आणि नळाला पाणी,” सोलर पॅनलकडे बोट दाखवत शाहिदा म्हणते. “आता इथे गरोदर बायांच्या तपासण्या आणि बाळंतपणं होऊ शकतील.”
भौगोलिकदृष्ट्या विजनवासात असलेल्या बिरसिंगसारख्या ठिकाणी दवाखान्यात बाळंतपण होणं किती महत्त्वाचं आहे हे शाहिदाला माहितीये. ती सांगते, “माझी बाळंतपणं दाई आणि शेजारणींनी केलीयेत. दोन्ही वेळा मला चिंता लागून राहिली होती, त्यांना जमेल का अशी शंका मनात असायची. पण काही पर्याय नव्हता, आणि त्यांनीही मला धीर दिला की सगळं नीट होईल म्हणून...”
या आरोग्य केंद्रात सौर ऊर्जा आली नव्हती तोपर्यंत गरोदर बायांच्या तब्येतीत काही गुंतागुंत झाली तर त्यांना नदीपल्याडच्या धुबरीमधल्या सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात नेलं जायचं. आता रात्रीच्या वेळी नेहमीची बोट सेवा बंद असते त्यामुळे बोटीचं भाडं काही कमी नसतं – २००० ते ३००० रुपये – त्यात दवाखान्याचा खर्च.
बिरसिंगचं प्राथमिक आरोग्य केंद्र दुपारी बंद होतं आणि त्यानंतर काही गुंतागुंत उद्भवली तर लोकांना अजूनही धुबरीलाच पळावं लागतं. तरीही सौर ऊर्जा आल्यापासून या आरोग्य केंद्राचा कायापालट झाला आहे. “सोलर पॅनल जानेवारी २०१७ मध्ये लावले गेले आणि फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आमच्याकडे १८ बाळंतपणं झाली,” डॉ. जवाहरलाल सरकार सांगतात. २०१४ साली फकीरगंजमधून उपविभागीय आरोग्य अधिकारी (साथरोग) या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते आता आरोग्य केंद्राचे प्रमुख म्हणून काम करतायत. “चारवर आमच्या १० आशा कार्यकर्त्या आहेत आणि सगळ्या जणी प्रत्येक बाळंतपण दवाखान्यातच व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात.”

डावीकडेः सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या आणि विजेच्या व्यवस्थेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा सुधारली आहे. उजवीकडेः चारवरच्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानांच्या छतावर सोलर पॅनल लावले आहेत
शाहिदानी डॉ. सरकारांची भेट घेतली आणि तिचं काम झाल्यानंतर मी आणि ती बाजारातून तिच्या घराकडे निघालो. दिवसा या बाजारात चिटपाखरूही नसतं, चहाच्या काही टपऱ्या आणि औषधाची थोडी दुकानं काय ती सुर असतात. बहुतेक दुकानं संध्याकाळी उघडतात. दिवसभर धुबरीत रिक्षा ओढायचं, काहीबाही विकायचं आणि बांबूचं काम आटपून लोक आपापली दुकानं उघडतात. शाहिदाचा नवरा शाहजमाल शेख, धुबरी शहरात रिक्षा ओढतो आणि त्याचं चारवरच्या बाजारात छोटं किराणामालाचं दुकान आहे.
बिरसिंगमधल्या अनेक घरांवर सौर पॅनल लावलेले आहेत. काहींना सरकारी योजनेत ३,६०० रुपयांना एक सोलर पॅनल आणि बॅटरीचा संच अनुदानित किंमतीवर मिळाला आहे. यावर १.५ वॉटचे दोन सीएफएल किंवा एलईडी दिवे लागू शकतात. काहींनी बाजारात २०,००० रुपयांना मिळणारा सौर ऊर्जा संचही घेतला आहे. त्याच्यावर एका वेळी चार बल्ब आणि टीव्ही किंवा एक पंखा चालू शकतात. “धुबरीत थोडी फार कामं करून कमाई होते त्यातून आम्ही अशा सौर पॅनलसारख्या गरजा भागवू शकतो,” बाजारात छोटी खानावळ चालवणारे ताराचांद अली सांगतात.
पंचायत सदस्य असणारे अस्मत अली, वय ६२ यांच्या अंदाजानुसार बिरसिंगमधल्या किमान निम्म्या घरांवर तरी सौर पॅनल लागलेले आहेत. “आता रात्रीदेखील मुलं निवांत अभ्यास करू शकतात,” ते म्हणतात. “पूर्वी फक्त रॉकेलवर दिवे लागायचे, त्यामुळे त्यांना फारसा अभ्यास करता यायचा नाही.”
चार वर्षांपूर्वी, आसाम ऊर्जा विकास मंडळाने (आऊविमं) बिरसिंगच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या इमारतीवर देखील ४ किलोवॉटची सौरयंत्रणा बसवली आहे. अपारंपिरक व अक्षय ऊर्जा खात्यासाठी राज्यस्तरीय संस्था म्हणून आऊविमं काम करतं. मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार नवीन सौर पॅनल किमान २५ वर्षं टिकतं अर्थात मोडतोड केली नाही तर. बॅटऱ्यांची देखभाल करावी लागते आणि गरज पडेल तेव्हा धुबरीहून देखभाल दुरुस्तीसाठी माणसं बोलावता येतात.

डॉ. सरकार यांनी दोन वर्षं सातत्याने धुबरीमधल्या आरोग्य खात्याच्या पायऱ्या झिजवल्या तेव्हा कुठे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीवर सौर पॅनल बसवली गेली
चार बेटांवर केवळ युनायटेड बँकेचं मायक्रो एटीएम आहे. तेही सौर ऊर्जेवर चालतं. बँकेचे उद्यम विकास प्रतिनिधी मोहम्मद अहमद अली रोज धुबरीहून काही प्रमाणात रोकड घेऊन येतात आणि दुपारी परत जातात. “दैनंदिन व्यवहार सौर ऊर्जेवर सुरळित चालू आहेत,” ते म्हणतात.
शाहिदा, ताराचांद आणि चारवरच्या इतरांसाठी मात्र २०१४ साली बांधून झालेलं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणं म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासारखं होतं. सुरुवातीला ते साशंक होते कारण सरकारी कर्मचारी चारवर येऊन काम करण्यास नाखुश असतात. त्यात शाहिदा सांगतात की बिरसिंगचे लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात जायला फारसे उत्सुक नव्हते कारण आपलं दुखणं काय आहे ते डॉक्टरला कसं सांगायचं तेच त्यांना माहित नव्हतं. २०१४ पासून डॉ. सरकार चारवर काम करतायत. आणि जेव्हापासून शासनाने त्यांना सेवेत रुजू करून घेतलंय तेव्हापासून खूपच फरक पडलाय. आरोग्य केंद्रातले कर्मचारी नियमितपणे दवाखान्यात येतायत ना, आणि प्राथमिक आरोग्य सेवा, औषधं आणि बाळंतपणाच्या सुरक्षित सेवा देतायत ना याकडे त्यांनी जातीने लक्ष पुरवलं.
सलग दोन वर्षं डॉ. सरकार यांनी धुबरीतल्या आरोग्य विभागाच्या पायऱ्या झिजवल्या तेव्हा कुठे प्राथमिक आरोग्य केंद्रावर सौर पॅनल बसले – आणि मग नळाला पाणी आणि वीज आली. “रोज सरासरी ६५ रुग्ण दवाखान्यात येतात,” प्राथमिक आरोग्य केंद्रात सामुदायिक आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या सामीमातुल कोब्रा खातून सांगतात. “ताप, त्वचेचे आजार आणि पोटाची दुखणी इथे कायम आढळून येतात.”

बिरसिंगच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट होण्याआधी इथल्या रहिवाशांना काही आणीबाणी आली तर नदीच्या पलिकडे धुबरीला जावं लागत असे, दवाखान्याच्या खर्चात प्रवासखर्चाची भर
प्राथमिक आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट, एएनएम आणि लॅब टेक्निशियन आहेत. ते सगळे धुबरीला राहतात आणि धुबरीहून मोटर लावलेल्या देशी बोटींनी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बिरसिंगच्या दवाखान्यात पोचतात. दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी सुरू असते.
“चारवर लोकांना काम करावंसं वाटत नाही कारण ही गावं एकदम विजनवासात गेल्यासारखी असतात,” डॉ. सरकार सांगतात. “पण मी निवृत्त झाल्यानंतर जेव्हा मला सेवा देण्याची विनंती करण्यात आली तेव्हा मला जणू काही वरदान मिळाल्यासारखं वाटलं. ज्यांना खरोखरच गरज होती त्यांना माझी सेवा देण्याची संधी मला मिळत होती. आरोग्य सेवांमध्ये खास करून चारवरती माता आरोग्यामध्ये किती सुधारणा करण्याची गरज आहे हे मी जाणतो.”
आसाम मानव विकास अहवाल २०१४ नुसार चारवरती एकूण जननदर सर्वात जास्त म्हणजे २.८ इतका आहे. या अहवालात असंही म्हटलंय की कमी वयात होणारी लग्नं हीदेखील इथली मोठी समस्या आहे – २५.३ टक्के बायांची लग्नं १५-१९ या वयोगटात झाली आहेत. राज्याच्या विशेष भौगोलिक क्षेत्रांमध्ये (यात चार, चहाचे मळे, डोंगराळ भाग आणि सीमाक्षेत्रांचा समावेश होतो) चारवरच हे प्रमाण सर्वात जास्त आहे. या अहवालानुसार, १५-१९ वयोगटातील विवाहित महिलांचं प्रमाण धुबरी जिल्ह्यात सर्वात जास्त – २९.२ टक्के इतकं आहे.
बिरसिंगला अजून बरंच पुढे जायचंय, पण निदान आता सूर्य अस्ताला गेल्यानंतर चारवरच्या रहिवाशांच्या आयुष्यात भरून राहिलेला मिट्ट काळोख तरी दूर होतोय. अजूनही अनेक जण ४० रुपये लिटर दराने रॉकेल विकत घेऊन दिवे पाजळत असले तरी अंधार फिटून पहाट होण्याचे संकेत तरी निश्चितच मिळतायत.
अनुवादः मेधा काळे