एका मैत्रिणीच्या लग्नात चित्राने मुथुराजाला पाहिलं आणि पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. तोही. फरक इतकाच की अंध असल्याने तो तिला पाहू शकला नाही. या स्थळाला तिच्या घरच्यांनी विरोधच केला. एका अंध व्यक्तीशी लग्न करून ती आपलं आयुष्य वाया घालवतीये असं त्यांचं म्हणणं होतं. तिला दोघांसाठी कमवावं लागेल असा इशारा देत त्यांनी तिला या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
त्यांचं लग्न झालं आणि महिना उलटला. चित्राच्या कुटुंबाचे सगळे कयास चुकीचे ठरले. मुथुराजाच तिची सगळी काळजी घेऊ लागला कारण तिला हृदयविकार असल्याचं निदान झालं होतं. आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आलेत. आणि काही तर अगदी निष्ठुर म्हणावे असे. पण तमिळ नाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या सोलनकुरुनी गावात राहणारे २५ वर्षीय एम. चित्रा आणि २८ वर्षीय डी. मुथुराजा धैर्याने आणि उमेदीने आयुष्याला सामोरे जातायत. ही आहे या दोघांची प्रेम कहाणी.
*****
चित्रा १० वर्षांची असताना तिचे वडील घरातून निघून गेले. तिघी मुली, हबकून गेलेली त्यांची आई आणि कर्जाचा डोंगर मागे ठेवून. सावकारांच्या तगाद्याला वैतागून तिच्या आईने अखेर मुलींचं नाव शाळेतून कमी केलं आणि शेजारच्या आंध्र प्रदेशात पळ काढला. तिथे त्या सगळ्या जणी कापसाचे धागे तयार करणाऱ्या कारखान्यात काम करायला लागल्या.
दोन वर्षांनी त्या तमिळ नाडूत परत आल्या. आणि मग ऊसाच्या फडात कामाला जायला लागल्या. चित्राचं वय होतं १२ वर्षं. ती ऊसात वाळलेलं पाचट गोळा करायला जायची. १० काकऱ्यांचे तिला ५० रुपये मिळायचे. हे काम खूप कष्टाचं होतं. तिच्या हातांना कापायचं, पाठ भरून यायची. तरीसुद्धा तिच्या वडलांनी करून ठेवलेलं कर्ज फिटत नव्हतं. मग तिला आणि तिच्या मोठ्या बहिणीला एका सूतगिरणीत कामाला पाठवण्यात आलं. तिथे तिला दिवसाला ३० रुपये मजुरी मिळायची. तीन वर्षांच्या काळात ती वाढून दिवसाला ५० रुपये इतकी झाली होती. एवढ्या काळात तिने हे कर्ज फेडलं. किती कर्ज होतं किंवा व्याज किती होतं ते काही आता तिला आठवत नाही. पण त्या कर्जाने आपलं कंबरडं मोडल्याचा अनुभव मात्र ती विसरलेली नाही.


चित्रा रोजावर एका शेतात १-२ किलो मोगरा तोडते (डावीकडे). ती निंबोळ्या गोळा करते आणि सुकवून बाजारात विकते
एक कर्ज फेडलं गेलं आणि लगेच दुसरं काढावं लागलं – तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न करायचं होतं. चित्रा आणि तिची धाकटी बहीण परत कामाला जायला लागल्या, एका कापडगिरणीत. सुमंगली योजनेखाली त्यांना काम मिळालं होतं. मुलींना आपल्या लग्नासाठी पैसा जमा करता यावा यासाठी खाजगी कापड गिरण्यांनी ही योजना सुरू केली होती आणि तिच्यावरून बराच वादंगही झाला होता. गरीब आणि बिकट आर्थिक स्थितीतल्या कुटुंबांमधल्या मुलींना तीन वर्षांसाठी कामावर घेतलं जायचं आणि त्यांच्या कुटुंबांना काम संपल्यावर एकरकमी पैसे देण्याचा वायदा केला जायचा. चित्रा तेव्हा वर्षाला १८,००० रुपये कमवत होती आणि अजूनही किशोरवयात होती. कर्ज फेडण्यासाठी तिची सगळी धडपड सुरू होती. २०१६ सालापर्यंत तिने घर चालवलं. तेव्हा, वयाच्या २० व्या वर्षी तिला मुथुराजा भेटला.
*****
चित्रा भेटण्याच्या तीन वर्षं आधी मुथुराजाचे दोन्ही डोळे पूर्णच विझून गेले. ती वेळ आणि तारीख त्याच्या मनावर अमिट कोरली गेली आहे. १३ जानेवारी २०१३, संध्याकाळचे ७ वाजले होते. पोंगलच्या आदला दिवस होता. आपल्याला काहीही दिसत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या जिवाची घोलमेल वाढायला लागली.
त्यानंतरची काही वर्षं त्याच्यासाठी भयंकर होती. तो बहुतकरून घरीच असायचा – खूप संतापलेला, चिडलेला आणि रडवेला. त्याच्या मनात आयुष्य संपवायचे विचार यायचे. पण त्यातून तो तरला. चित्रा भेटली तेव्हा तो २३ वर्षांचा होता, अंध. “एखाद्या प्रेतासारखं” असल्याची भावना त्याच्या मनात असायची. तिनेच आपल्याला नवसंजीवनी दिल्याचं तो सांगतो.
दृष्टी पूर्ण गेली त्या आधी मुथुराजाच्या दृष्टीवर विपरित परिणाम करणाऱ्या काही दुर्दैवी घटना घडल्या होत्या. तो आणि त्याची बहीण सात वर्षांचे असताना मदुराईतल्या त्यांच्या शेतात गुलाबाची रोपं लावत होते. तेव्हा ते फुलांची शेती करत. एकच चूक पुरेशी होती – त्याने जमिनीतून उपटून घेतलेलं रोप त्याच्या बहिणीने नीट पकडलं नाही – दांडा त्याच्या चेहऱ्यावर आपटला आणि काटे डोळ्यात घुसले.
सहा शस्त्रक्रियांनंतर त्याच्या डाव्या डोळ्याला थोडंफार दिसू लागलं. घरच्यांनी तीन सेंट (०.०३ एकर) जमीन विकली आणि कर्ज काढलं. काही दिवसांनी त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि चांगल्या डोळ्याला मार लागला. त्यानंतर मात्र शाळा आणि अभ्यास करणं मुथुराजासाठी कठीण होत गेलं. त्याला फळा आणि त्यावरची पांढरी अक्षरं स्पष्ट दिसायची नाहीत. तरीही, शिक्षकांच्या मदतीने त्याने कशीबशी दहावी पूर्ण केली.
२०१३ साली, जानेवारी महिन्यातल्या त्या दिवशी घरासमोरच्या रस्त्यावरच्या एका लोखंडी खांबाला मुथुराजाचं डोकं जोरात आपटलं आणि त्याचं जग पूर्णपणे अंधारात गेलं. चित्रा भेटली त्यानंतरच त्याचं आयुष्य प्रकाशाने आणि प्रेमाने उजळून निघालं.

मोगऱ्याच्या मळ्यातलं चित्राचं दिवसभराचं काम संपल्यानंतर ती आणि मुथुराजा आपल्या घरी चालत निघाले आहेत, मदुराईच्या तिरुपरनकुंद्रम तालुक्यातल्या सोलनकुरुनी गावी ते राहतात
*****
२०१७ साली त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर महिनाभरातच चित्राला श्वासाला त्रास होऊ लागला. मदुराईच्या अण्णानगर भागात असलेल्या सरकारी दवाखान्यात ते गेले. अनेक तपासण्यांनंतर त्यांच्या लक्षात आलं की चित्राचं हृदय कमजोर आहे. डॉक्टर तर म्हणाले की ती इतके वर्ष जगली हेच आश्चर्य आहे. (काय दुखणं आहे ते नेमकेपणाने चित्राला सांगता येत नाही – सगळी कागदपत्रं दवाखान्यात आहेत.) आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या कुटुंबाने कसलीही मदत करायला चक्क नकार दिला.
तिच्या उपचारासाठी मुथुराजाने ३०,००० रुपयांचं कर्ज काढलं, तेही अतिरेकी व्याजाने. तिची ओपन हार्ट शस्त्रक्रिया झाली आणि तीन महिने ती रुग्णालयात होती. तिथून ती घरी परतली, तिला बरं वाटायला लागलं पण मुथुराजाला कानाची एक शस्त्रक्रिया करावी लागली. हताशेतून त्यांनी जीव देण्याचाही विचार केला होता. पण नवा अंकुर त्यांना तसं करू देईना. चित्राला दिवस गेले होते. चित्राच्या हृदयावर याचा ताण येणार नाही ना याची मुथुराजाला काळजी वाटत होती, पण डॉक्टरांनी बाळ होऊ द्यावं असा सल्ला दिला. अनेक महिने तणावाखाली गेले, देवाचा धावा केला आणि अखेर त्यांचा मुलगा जन्माला आला. आता चार वर्षांचा असलेला विशांत राजा म्हणजे त्यांचं भविष्य, आशा आणि आयुष्यातला आनंद आहे.
*****
या दोघांसाठी रोजचं जगणं आजही कष्टाचं आहे. चित्रा तिच्या तब्येतीमुळे काहीही जड उचलू शकत नाही. दोन गल्ल्या सोडून असलेल्या हापशावर ते पाणी भरतात आणि मुथुराजा पाण्याने भरलेला घडा खांद्यावर घेतो. एक हात चित्राच्या खांद्यावर ठेवून ते घरी परत येतात. तीच त्याची नजर, त्याचा मार्ग बनते. चित्रा रानातून आणि जवळच्या जंगलांमधून निंबोळ्या गोळ्या करून आणते, त्या सुकवते आणि ३० रुपये माप या भावाने विकते. एरवी ती तुत्या वेचून विकते, त्याचे मापाला ६० रुपये मिळतात. जवळच्याच एका शेतात ती मोगरा तोडायला जाते, त्याचे तिला रोजाने २५-५० रुपये मिळतात.
चित्राला दिवसाला साधारणपणे १०० रुपये मिळतात आणि ते सगळे घरखर्चावर जातात. मुथुराजाला दर महिन्याला तमिळ नाडू शासनाच्या भिन्नक्षम व्यक्ती निर्वाह भत्ता (Differently Abled Pension Scheme) योजनेखाली दर महिन्याला १,००० रुपये मिळतात. त्यातून ते चित्राची औषधं विकत घेतात. “माझं आयुष्य या औषधांवर सुरू आहे. ती घेतली नाहीत, तर मला खूप त्रास होतो,” चित्रा सांगते.
कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे निंबोळ्या किंवा तुत्या गोळा करणं अशक्य झालं. कमाई घटली आणि चित्राने औषधं थांबवली. तिची तब्येत ढासळलीये – श्वास घ्यायला आणि चालायला तिला त्रास होतोय. चहापुरत्या दुधासाठीही पैसे नसल्याने तिचा मुलगा कोरा चहाच पितो. “पण मला असाच आवडतो,” विशांत म्हणतो. आपले आई-बाबा, त्यांचं आयुष्य, त्यांनी काय गमावलंय आणि मुख्य म्हणजे त्यांचं प्रेम जणू काही त्याला समजलंय.


२०१७ साली चित्राच्या आजाराचं निदान झालं तेव्हाचे छातीचे एक्सरे. इतक्यातच डॉक्टरांनी तिच्या हृदयाला आणखी काही विकार असल्याचं निदान केलं आहे. तिला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, पण तिला ती परवडणारी नाही


वयाच्या १० व्या वर्षापासून चित्राने अंगमेहनतीचं काम केलं आहे, शेतमजूर आणि गिरणी कामगार म्हणून

चित्रा आपल्या मुलाकडे, चार वर्षांच्या विशांत राजाकडे पाहतीये. अनेक महिने तणावाखाली काढल्यावर आणि देवाचा धावा केल्यानंतर तो जन्मला

त्यांचा मुलगा हेच त्यांचं जग आहे, मुथुराजा सांगतो. तो नसता तर त्याने आणि चित्राने आपलं आयुष्य संपवलं असतं

गाऊन आणि नाचून विशांत आपल्या आई-वडलांचं मन रमवतो. त्याच्या अवतीभोवती दिसणारा त्यांचा संसार

चित्रा जवळच सासऱ्यांच्या घरी शौचाला जाते कारण त्यांच्या भाड्याच्या घरात संडास नाही

चित्रा आणि मुथुराजाच्या घराचे सिमेंटचे पत्रे जोराच्या वाऱ्याने आणि मुसळधार पावसात उडून गेले. त्यांच्या नातेवाइकांनी नवे पत्रे टाकण्यासाठी त्यांना मदत केली

मुथुराजा, चित्रा आणि विशांत दोन गल्ल्या सोडून असलेल्या हापशावर दररोज पाणी भरण्यासाठी चालत जातात

चित्राला हृदयाच्या त्रासामुळे जड वस्तू उचलता येत नाहीत, त्यामुळे मुथुराजा पाण्याचा हंडा उचलून घेतो आणि ती त्याला वाट दाखवते

आपल्या पडझडत्या घरात चित्राने दवाखान्याची सगळी बिलं नीट जपून ठेवली आहेत

मुथुराजाच्या कुटुंबाचा एक जुना फोटो – मागच्या ओळीत एकदम उजवीकडे, निळ्या सदऱ्यात दिसतो तो मुथुराजा

चित्रा आणि मुथुराजाच्या आयुष्यात अनेक निष्ठुर असे चढउतार आले आहेत, पण त्या सगळ्यांचा सामना करतानाही त्यांनी उमेद सोडलेली नाही
अपर्णा कार्तिकेयन यांनी वार्ताहराच्या सहाय्याने या कहाणीचं शब्दांकन केलं आहे.