“जोवर आकाशात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत हे काम असंच चालू राहणार,” वसई किल्ल्यावर दगड घडवता घडवता तुकाराम पवार म्हणतात. “कित्येक मरतील, कित्येक जगतील, त्याची मोजदाद कशी करणार? केलेलं काम कधी मोजू नये, आपण फक्त आपलं काम करत रहायचं.”
पालघर जिल्ह्यातल्या १६ व्या शतकात बांधलेल्या वसईच्या किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचं काम करणाऱ्या अनेक पाथरवटांपैकी एक आहेत पवार. किल्ल्याच्या आवारात आजूबाजूला मोठाल्या पत्थरांचा ढीग, त्यात मांडी घालून जमिनीवर बसलेले पवार. छिन्नी आणि हातोड्यानी तालात एकेक चिरा घडवतायत.

तुकाराम पवार, वसईच्या किल्ल्यावर काम करणारे पाथरवटः ‘केलेलं काम कधी मोजू नये, आपण फक्त आपलं काम करत रहायचं’
ते आणि त्यांचे साथीदार बालेकिल्ल्याच्या भिंती मजबूत करण्याचं काम करतायत. खरं तर गुजरातच्या सुलतान बहादूर शहाने किल्ल्याचा हा भाग बांधायला सुरुवात केली (नंतर पोर्तुगिजांनी त्याचं एका चर्चमध्ये रुपांतर केलं). निखळलेले चिरे घडवून आणि चुना वापरून ते भिंत होती तशी परत बांधतायत.
१०९ एकरावर पसरलेल्या वसईच्या किल्ल्याचं जीर्णोद्धाराचं काम २०१२ साली भारतीय पुरातत्त्व खात्याने हाती घेतलं. इथे काम करणारे १५ कामगार अहमदनगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमधून आले आहेत.

पत्थर फोडायचे, घडवायचे आणि चिरे तयार करायचेः किल्ल्याच्या भिंतीपाशी मोकळ्या आवारात काम सुरूच आहे
यातल्या बहुतेकांनी दुष्काळामुळे वसईची वाट धरलीये.
“अहो, पाऊस पाणी नसेल तर त्या शेताचं काय करायचंय?” पन्नाशीचे पवार विचारतात. जामखेड तालुक्यात त्यांची स्वतःची २ एकर जमीन आहे. ते कामानिमित्त वर्षाचे सहा महिने बाहेर असतात तेव्हा त्यांची बायको आणि मुलं शेती पाहतात.
अहमदनगर जिल्ह्यात तशीही पाण्याची टंचाई. त्यात आहे नाही ते पाणी उसानी ओरपलंय. अगदी चांगलं पाऊसमान असणाऱ्या वर्षांमध्येही जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. गावातले मुकादम पवार आणि इतर पाथरवटांना कामावर घेतात आणि ऐतिहासिक वास्तूंमध्ये जिथे पुरातत्त्व खात्याचं काम चालू आहे तिथे त्यांना पाठवतात. यातले बहुतेक जण शेतकरी आहेत पण परिस्थितीमुळे त्यांना शेती सोडावी लागली आहे. पवारांनी याआधीही पुरातत्त्व खात्याच्या प्रकल्पांवर काम केलंय. घारापुरीची लेणी आणि उत्तर प्रदेशातला झाशीचा किल्ला ही त्यातली दोन कामं.
वसई किल्ल्यावर काम करणाऱ्या पाथरवटांना दिवसाला ६०० रुपये रोजगार मिळतो आणि महिन्याची कमाई सुमारे १५,००० पर्यंत होते. यातले निम्मे तर औषध पाणी आणि जेवणावर खर्च होतात. उरलेले पैसे ते घरी पाठवून देतात.
या रोजगारासाठी त्यांना दिवसाचे आठ तास अंग मोडून काढणारं काम करावं लागतं. तासभर जेवणाची सुटी असते. भाजून काढणाऱ्या उन्हात त्यांचा हातोडा चालू असतो आणि दगडाच्या बारीक चुऱ्यामुळे हातापायाला कायम भेगा पडलेल्या असतात. “दगड फोडणं सोपं काम नाहीये,” लक्ष्मण शेटिबा डुकरे सांगतात. “दगड पोळणारे, भुई तापलेली, वर सूर्य आग ओकतोय.”

दगड फोडण्याचं काम चालू असताना झावळ्या आणि प्लास्टिकच्या छताचा उन्हापासून तेवढाच आडोसा, उजवीकडेः जामखेड तालुक्यातल्या एक कामगाराची घोटभर पाण्याची विश्रांती
किल्ल्याच्या कोपऱ्यावर झावळ्यांच्या आडोशाला डुकरे बसले आहेत, जामखेडच्या लोकांपेक्षा जरा दूर. त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या दगडू गोविंद डुकरे आहे. दोघं जण वडार समाजाचे आहेत. दगड घडवणं आणि मूर्ती घडवण्यात ते माहिर आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या भिंगार तालुक्यातल्या वडारवाडीहून ते इथे आलेत. ते वेगवेगळ्या साइटवर काम करतात पण त्यांचं मुख्य काम वसईच्या किल्ल्यावरच आहे.
“अशा पद्धतीचं काम करणारे लोक आज काल मिळत नाहीत,” पुरातत्त्व खात्याचे संवर्धन सहाय्यक असणारे कैलास शिंदे सांगतात. वसई किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचं काम त्यांच्याकडे आहे. “या व्यवसायातल्या फक्त वडारांकडेच अशी कला आहे. या वास्तू घडवणारेही त्यांचेच पूर्वज असणार आणि आज त्यांचा जीर्णोद्धार करणारे हातही त्यांचेच आहेत.”

लक्ष्मण डुकरे आणि त्यांचा पुतण्या दगडू डुकरेः ‘माझ्या बापाला ही वडाराची जिंदगानी कुणी दिली?’ ते विचारतात.
वसईच्या किल्ल्यावर काम करणारे सगळे पाथरवट वडार आहेत. महाराष्ट्रात येण्याआधी त्यांनी ओदिशाहून आंध्रप्रदेश आणि मग दक्षिणेतल्या इतर राज्यांत प्रवेश केला असं अभ्यास सांगतात. (या समाजाचं ‘वडार’ हे नाव ओड्र देश यापासून आलं आहे असं मानलं जातं.) “हजारो वर्षांपूर्वी आमची माणसं इथं (महाराष्ट्रात) आली. आम्ही इथंच जन्मलो आणि मोठे झालो. आम्ही इथलंच आहोत,” साहेबराव नागू मस्के सांगतात. साठीतले साहेबराव किल्ल्यावर काम करणाऱ्या सगळ्यात म्हाताऱ्या पाथरवटांपैकी एक.

साठीतले साहेबराव मस्के किल्ल्यावर काम करणाऱ्या सगळ्यात म्हाताऱ्या पाथरवटांपैकी एक .
चाळिशीचे दगडू सांगतात की त्यांच्या कुटुंबाची थोडीफार शेतजमीन होती. पण आता मात्र दगडाचं काम हाच त्यांचा आणि त्यांच्या चुलत्यांचा व्यवसाय आहे. लक्ष्मण आणि दगडू यांच्या बायकादेखील अहमदनगरमधल्या त्यांच्या गावाजवळ रस्ते अंथरण्यासाठी खडी फोडायचं काम करतात.
वसईच्या किल्ल्यावर काम करणाऱ्या डुकरेंसारख्या इतर कामगारांना स्थानिक मुकादम कामावर पाठवतात. “ते जिथे काम आहे असं सांगतील तिथे आम्ही (आमच्या पैशाने) जातो,” लक्ष्मण सांगतात. “तिथे आम्ही एक दोन दिवस राहतो, चहा पावावर दिवस काढतो. जर काम मिळालं तर ठीकच नाही तर मुस्काटात मारल्यासारखं आम्ही वडारवाडीला वापस येतो.”
वडार असण्याबद्दल लक्ष्मण डुकरेंच्या मनात मिश्र भावना आहेत. त्यांच्या पूर्वजांबद्दल, ज्यांनी इतक्या सुंदर वास्तू उभ्या केल्या, सुंदर नक्षीकाम आणि मूर्ती घडवल्या त्यांच्याबद्दल मनात आदर आणि अचंबाही आहे. त्यांना ते “देवाची माणसं” म्हणतात. असं असूनही त्यांच्या समाजाच्या दारिद्र्याबद्दल बोलताना त्यांच्या मनात अपार दुःखही आहे. “माझ्या बापाला ही वडाराची जिंदगानी कुणी दिली? या जातीत जन्म घ्यायचा आन् हा धंदा करायचा? तो जर का शिकला असता आणि नोकरी केली असती, तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी काही तरी असती...”
लक्ष्मण डुकरेंचं वय आज ६६ वर्षांचं आहे. त्यांनी त्यांच्या वडलांकडून आणि आजोबांकडून हे काम शिकून घेतलं. ५० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांनीही त्यांच्या आज्या-पणज्याकडूनच ही कला घेतली. “एकदा का मुलगा १०-११ वर्षांचा झाला की त्याच्या हातात छोटी हातोडी देतात आणि ती कशी चालवायची हे त्याला शिकवलं जातात,” ते सांगतात. “अहो, त्याची बोटं तुटतात, पण मग हळूहळू काही महिन्यात तो हे काम शिकतो आणि मोठ्या माणसांसारखं तोही कामाला लागतो.”

या कामाला लागणारी अवजारं, कठीण दगड घडवताना दिवसभर हवेत उडणारा दगडाचा चुरा आणि धूळ
पण या कामात नवी मुलं काही फारशी येत नाहीत – इतर काहीच काम मिळालं नाही तर काही तरुण मुलं वसईच्या किल्ल्यावर कामासाठी येतात. “माझी मुलं काही हे दगडाचं काम करत नाहीत,” पवार सांगतात. त्यांचा थोरला मुलगा अभियंता असून पुण्यात कामाला आहे. “मी हे काम केलं म्हणून त्यांना शाळा शिकवू शकलो.”
बऱ्याच पाथरवटांची मुलं त्यांच्या पिढीजाद धंद्याहून दूर गेली आहेत. पण जुनी पिढी मात्र आजही छिन्नी हातोड्याचे घाव घालत आहे. पण त्यांच्या कामाविषयी त्यांच्या मनात एपार दुःख आहे. “काहीही बदलणार नाहीये,” लक्ष्मण म्हणतात. “अहो, आमच्या लाकडं सरणावर चढली. बदलायचे दिवस गेले आता.”

लक्ष्मण डुकरे जरा काम थांबवतात. ‘काहीही बदलणार नाहीये,’ ते म्हणतात
किल्ल्याशेजारच्या तात्पुरत्या शेडमध्ये डुकरेंचा मुक्काम असतो. दिवसभराच्या मेहनतीमुळे अंग दुखू लागतं आणि त्यामुळे झोप येईनाशी झाल्यावर मात्र डुकरे रात्री दारूचा आसरा घेतात. “आमचे खांदे भरून येतात, पाठ आंबून जाते, गुडघे दुखतात...” ते सांगतात. “खूप दुखायला लागलं तर आम्ही गोळ्या घेतो. सहन होईना झालं तर डॉक्टरकडे जातो. नाही तर अर्धी क्वार्टर घेतली की झालं...”
पवारही तेच करतात. “दिवस कलला की आमचं अंग दुखायला लागतं.” ते म्हणतात. “मग काय, अर्धी क्वार्टर पोटात टाकायची आणि आडवं व्हायचं...” आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत तोच छिन्नी हातोडा, तीच धूळ आणि डोक्यावरचं तेच ऊन.