बैदेही आणि तिचा नवरा गेल्या दशकभराहून अधिक काळ तेलंगणात संगारेड्डी जिल्ह्यामधल्या वीटभट्टीवर काम करतायत. गुम्माडिडाला तालुक्यात डोमाडुगू गावात ही वीटभट्टी आहे. ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्यातल्या कुरुमपुरी पंचायतीतून दर वर्षी ते इथे येतात. ‘‘शेठकडून २० हजार रुपये उचल घेतली होती आम्ही,’’ बैदेही सांगते. वीटभट्टीचा मालक त्यांना जेवणासाठी दिवसाला ६० रुपये देतो. “शेठला सांगा ना, निदान ८० रुपये तरी द्या. झोपी जाताना पोट अर्धं तरी भरू दे बाबा.”
२०१७ मध्ये तेलंगणातल्या रंगारेड्डी, संगारेड्डी आणि याडद्री भुवनगिरी जिल्ह्यातल्या वीटभट्ट्यांना मी भेट दिली होती, तेव्हा बैदेहीच्या कुटुंबाला भेटलो होतो.
यापूर्वी अनेक वर्षं मी स्थलांतराचा अभ्यास करत होतो, त्याचं रिपोर्टिंग करत होतो. कालाहांडी (आता त्याचं विभाजन होऊन नुआपाडा जिल्हा तयार झालाय) आणि त्याच्या लगतचा बोलंगिर (किंवा बालंगिर, आता याचंही विभाजन झालंय आणि सोनेपूर हा जिल्हा तयार झालाय, पण त्याला आता सुवर्णपूर म्हणतात) या जिल्ह्यांतून होणाऱ्या स्थलांतराचा हा अभ्यास होता. १९९० च्या दरम्यान मला या भागातून चार प्रकारे स्थलांतर होतंय, असं दिसून आलं होतं.
एक, (आता छत्तीसगडची राजधानी असलेल्या) रायपूर शहरात रोजंदारीवर मजुरी, रिक्षा ओढण्यासाठी, हॉटेलमध्ये साफसफाईचं काम किंवा इतर कोणत्याही प्रकारची मजुरी करण्यासाठी लोक स्थलांतर करत. दुसरं, काही जण शेतीसाठी बारगड, संबलपूर अशा सिंचनाच्या चांगल्या सोयी असलेल्या ठिकाणी जात. तिसरं, दिल्ली, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये तरुण बांधकाम मजूर म्हणून काम करण्यासाठी जात असत आणि चौथं, काही कुटुंबं आंध्र प्रदेशात (नंतर ओडिशाच्या किनारपट्टीवरही) वीटभट्टीवर काम करण्यासाठी स्थलांतर करत असत.

बैदेही (मागे) , तिचा नवरा आणि नातलग तेलंगणातल्या वीटभट्टीवर दशकभराहून अधिक काळ काम करत आहेत. या वेळी त्यांनी एका मुलाला आपल्यासोबत आणलंय. इतर दोघांना मागे ठेवलंय , कारण ती शाळेत जातात
या स्थलांतराला सुरुवात झाली ती १९६० च्या दशकाच्या मध्यापासून. कालाहांडी आणि बालंगिर या जिल्ह्यांमध्ये त्या वेळी दुष्काळासारखी परिस्थिती होती. नंतर ८० आणि ९० च्या दशकात दुष्काळ, पिकांचं नुकसान, कर्ज अशा वेगवेगळ्या कारणांनी स्थलांतर होत राहिलं. हे ओडिया स्थलांतरित इथे काम करून पैसे कमावण्यासाठी इतके हातघाईवर झालेले असतात की वीटभट्ट्यांचे मालक त्यांची निकड लक्षात घेऊन स्थानिक मजुरांपेक्षा त्यांना कमी मजुरी देतात. त्यांचं शोषण असंच चालू राहातं. नवरा, बायको आणि आणखी एक प्रौढ व्यक्ती हे एक ‘युनिट’ मानलं जातं. एका युनिटला २० हजार ते ८० हजार रुपये उचल दिली जाते.
या पैशाच्या बदल्यात ही कुटुंबं मग वीटभट्टीवर येतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरिपाची पिकं निघाली की ओडिशामध्ये स्थानिक सण असतो. तो झाल्यानंतर इथली कुटुंबं स्थलांतराची तयारी करायला सुरुवात करतात. डिसेंबर-जानेवारीपर्यंत ठेकेदार मजुरांना वीटभट्टयांवर घेऊन जातात. जूनपर्यंत ते तिथे काम करतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला गावी परत येतात. स्वतःचा छोटासा शेतीचा तुकडा कसतात किंवा दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जातात.
हे मजूर जी उचल घेतात, त्यातून आपली आधीची कर्जं फेडतात किंवा मग कुटुंबातलं एखादं लग्न, बैलांची खरेदी, दवाखान्याची बिलं किंवा अशा इतर खर्चासाठी वापरतात. वीटभट्टीवर काम करण्यासाठी एका कुटुंबातले कितीही जण स्थलांतरित झाले असले तरी एका युनिटला दिवसाला भत्ता मिळतो तो ६० रुपये. त्या मोसमातलं काम संपतं तेव्हा आधी दिलेली उचल, रोजचा भत्ता आणि बनवलेल्या विटा या सगळ्याचा हिशोब केला जातो.
प्रत्येक तीन व्यक्तींच्या युनिटला दर १००० विटांचे २२० ते ३५० रुपये मिळतात. साधारण पाच महिन्यांच्या या मोसमात एक युनिट एक लाख ते चार लाख विटा बनवतं. युनिटमधल्या तीन व्यक्ती सोडून त्या कुटुंबात त्यांना आणखी किती जणांची मदत मिळते, यावर हा आकडा अवलंबून असतो. या विटांचे त्यांना मिळतात २० हजार ते जास्तीत जास्त एक लाख ४० हजार रुपये. त्यातून उचल आणि भत्ता वजा केला की अनेक कुटुंबांच्या डोक्यावर हंगाम संपता संपता नवं कर्ज चढतं.

बनिता चिंदा आणि तिचा नवरा नेत्रा, रंगारेड्डी जिल्ह्यातल्या कोंगरा कालन गावातल्या वीटभट्टीवर गेली तीन वर्षं काम करतायत. ओडिशामधल्या नुआपाडा जिल्ह्यातल्या बोदन तालुक्यात किरेझोला नावाचं गाव आहे. या गावाच्या सरगीमुंडा पाड्यावर चुकोटिया-भुंजिया या आदिवासी जमातीतलं हे कुटुंब राहातं. सात वर्षांची पिंक ी, पाच वर्षांची लक्ष्मी आणि सात महिन्यांची कल्याण ी या आपल्या तीन मुलींसह बनिता आणि नेत्रा इथे आलेत. “ आमचा सरदार (ठेकेदार) आणि वीटभट्टीचा मालक एकत्र बसतील आणि आमचा इथल्या मजुरीचा दर ठरवती ल ,” नेत्रा सांगतो. “ मी , माझी बायको आणि माझा चुलत भाऊ , अशा तिघांनी मिळून ८० हजार रुपये उचल घेतलीये . त्यातल्या दहा हजार रुपयांचं सोनं घेतलं, १७ हजार बँकेत ठेवले. उरलेले आमच्या रोजच्या खर्चासाठी वापरणार आहोत ”

नेत्रानंद सबर (बसलेला) आणि रायबरी भोई (मूल कडेवर घेऊन मागे बसलेली) यांना मी भेटलो. संगारेड्डी जिल्ह्यातल्या जिन्नाराम तालुक्यातल्या अन्नाराम गावच्या वीटभट्टीत नुआपाडा जिल्ह्यातल्या माहुलकोट गावातून हे दोघं आले होते. “ गेली अठरा वर्षं आम्ही इथे वीटभट्टीत येतोय ,” भोई सांगते

रेमती धारुआ आणि तिचा नवरा कैलाश हे बालंगिर जिल्ह्यातल्या बेलपारा तालुक्यामधल्या पंडरिजोर गावातले शेतकरी आहेत. माझी त्यांची गाठ पडली ती संगारेड्डी जिल्ह्यातल्या अन्नाराम गावात. दुष्काळामुळे त्यांचं उभं पीक गेलं आणि मग मुलगी , जावई , नात (मध ्यभागी ) आणि धाकटा मुलगा हिमांशु यांना घेऊन ते इथे वीटभट्टीवर आले. हिमांशु दहावी झालाय आणि आता कॉलेजचा खर्च भागवण्यासाठी इथे काम करतोय

संगारेड्डी जिल्ह्यातल्या डोमाडुगु गावातली वीटभट्टी: स्थलांतरित मजूर सहा महिने स्वतःच बांधलेल्या तात्पुरत्या ‘ घरां’ मध्ये राहातात. त्यांची ही ‘ घरं’ भट्टीतल्या कच्च्या किंवा भाजलेल्या विटांची असतात. सहा महिन्यांनी गावाला जाण्यापूर्वी ही घरं ते काढून टाकतात. एकमेकांना चिकटून असलेली ही घरं म्हणजे जेमतेम आडोसा… पाण्याची सोय नसत े, अंघोळ करायला जागा नसते. ‘ घर ’ स्वच्छ ठेवायला या मजुरांना वेळ नसतो आणि अंगात तेवढी ताकदही


डावीकडे : संगारेड्डी जिल्ह्यातल्या अन्नाराम गावात: आपल्या झोपडीत एक मजूर आणि त्याची मुलगी. नुआपाडा जिल्ह्यातल्या सिनापाली तालुक्यातून हे कुटुंब इथे आलं होतं. उजवीकडे: संगारेड्डी जिल्ह्यातल्या डोमाडुगु गावात: सिनापाली तालुक्यातून आलेला एक मजूर आपल्या छोट्याशा घरात पाणी भरताना. या घराचं छत इतकं खाली आहे की त्याला नीट उभंही राहाता येत नाही


डावीकडे: वीटभट्टी मजुरांची काही मुलं तेलंगणामधल्या स्थानिक सरकारी शाळांमध्ये किंवा अंगणवाड्यांमध्ये जातात. पण तिथल्या शिक्षकांना उडिया येत नाही , त्यामुळे त्यांना शिकणं कठीण जातं. शिवाय ही मुलं बरेचदा आपल्या आई-वडिलांना मदत करायला वीटभट्टीवर जातात किंवा मग आपलं इथलं घर राखतात. वीटभट्टीजवळच्या प्राथमिक शाळेत जाणारा नुआपाडा जिल्ह्यातल्या सरगीमुंडा गावातून आलेला सहा वर्षांचा नवीन सांगतो , “ मी इथे शाळेत जातो , पण माझ्या गावातली शाळा मला जास्त आवडते. ”
उजवीकडे: संगारेड्डी जिल्ह्यातल्या डोमाडुगु गावात: वीटभट्टीवर अ ख्खं कुटुंबच काम करतं. साधारणपणे नवरा-बायको आपल्या मुलांना घेऊन इथे येतात. गावात घरी मुलांकडे बघायला कोणी नसतं आणि शिवाय इथे वीटभट्टीवरच्या कामात मुलं मदत करतात. सकाळी सगळे लवकर कामाला सुरुवात करत ात . दहा किंवा अकरा वाजता विश्रांती घेत ात आणि पुन्हा संध्याकाळी तीन किंवा चार वाजता कामाला सुरुवात कर तात, ते रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत

रंगारेड्डी जिल्ह्यातल्या इब्राहिमपटनम तालुक्यातल्या कोंगरा कालन गावातल्या वीटभट्टीवर: स्त्रिया, मुलं आणि वृद्ध यांच्यासाठी हे स्थलांतर खूप कठीण असतं. स्वतः कुपोषित असूनही स्त्रिया वीटभट्टीवर खूप वेळ काम करतात

रंगारेड्डी जिल्ह्यातल्या कोंगरा कालन गावातल्या वीटभट्टीवर: साधारणपणे पुरुष विटा तयार करतात आणि स्त्रिया विटांसाठी गारा तयार करतात आणि विटा सुकवतात

२००१ मध्ये मी आंध्र प्रदेशातल्या वीटभट्ट्यांना भेट दिली होत ी, तेव्हा बहुसंख्य स्थलांतरित मजूर अनुसूचित जातींचे होते. २०१७ मध्ये तेलंगणातल्या वीटभट्ट्यांना भेट दिली , तेव्हा मी पाहिलं की बरेच मजूर अनुसूचित जमातींचेही आहेत… त्यांच ्या वनाधारित उपजीविका कमी झाल्याच्या आणि त्यांच्या डोक्यावरच ा कर्जाच ा बोज ा वाढल्याच्या या खुणा होत्या

तीन व्यक्तींच्या एका युनिटला १००० विटांमागे २२० ते ३५० रुपये मिळतात. वीटभट्टी मालक किंवा ठेकेदार यांच्याबरोबर काय बोलणी झाली आहेत , त्यावर हे अवलंबून असतं. एक युनिट एक लाख ते चार लाख विटा बनवू शकतं. त्यांना मदतीचे हात आणखी किती मिळतात , यावर हा आकडा अवलंबून असतो

नुआपाडा जिल्ह्यातल्या कुरुमपुरी पंचायतीतून आलेले मजूर संगारेड्डी जिल्ह्यातल्या अन्नाराम गावातल्या वीटभट्टीवर. मीही त्यांच्याच जिल्ह्यातला आहे , हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. एक आजोबा म्हणाले , “ ओडिया बोलणा ऱ्या व्यक्तीला मी कित्तीतरी दिवसांनी भेटतोय… खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून !”

डिसेंबर-जानेवारीमध्ये ठेकेदार या मजुरांना वीटभट्टीत नेतात. साधारण जूनपर्यंत ते तिथे काम करतात आणि पावसाळा सुरू होताहोता आपल्या गावी परततात. तिथे ते स्वतःचा छोटासा शेतीचा तुकडा कसतात किंवा शेतमजूर म्हणून काम करतात
अनुवाद: वैशाली रोडे