उत्तर मुंबईतल्या मढ बेटांवरचं डोंगरपाडा गावठाण. ४०-४५ कोळ्यांची इथे घरं आहेत. त्यांचं सगळ्यांचं मिळून एक खळं आहे (मासळी सुकवायची जागा). मढ बेटावर अशी बरीच खळी आहेत.
प्रत्येक कोळी कुटुंबाकडे ५-१० मजूर कामाला आहेत, यातले बहुतेक उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, काही महाराष्ट्रातले आणि काही इतर राज्यातून मजुरीसाठी स्थलांतर करून आले आहेत. हे कामगार दर वर्षी सप्टेंबर ते जून या काळात मुंबईला येतात आणि कोळ्यांबरोबर हंगामी स्वरुपाचं काम करतात, या आठ महिन्यात त्यांची ६५-७०,००० रुपयांची कमाई होते.
स्थलांतरित पुरुष कामगार कोळ्यांनी दिलेल्या खोल्यांमध्ये एकत्र राहतात – शक्यतो ४-५ जण एका खोलीत. इथल्या बहुतेक मजुर बाया आंध्र प्रदेशातून आल्या आहेत. त्या शक्यतो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर येतात, सोबत लहानगी मुलंही असतात. त्यांना मालकांच्या जमिनीवर वेगळी जागा दिली जाते, महिन्याचं भाडं सुमारे ७०० रुपये असतं.

रंगम्मा ( ती फक्त तिचं पहिलं नावच वापरणं पसंत करते ) आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातल्या मांत्रिकी गावची आहे . तेलुगुसोबत ती मराठी आणि हिंदी उत्तम बोलते . ती, तिचा नवरा आणि इतर नातेवाईक गेली २० वर्षं मढ बेटावर कामासाठी येतायत . फक्त तिचा मुलगा गावी राहतो , तो शिक्षक आहे . ‘ पाऊसच नाही ,’ ती हिंदीत सांगते , ‘ त्यामुळे शेती पिकत नाही . मग आम्ही मजुरीसाठी इथे येतो'

सुरेश रजक उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातल्या धरमपूर गावचे रहिवासी. ते सात वर्षं डोंबिवलीच्या एका रंगाच्या कारखान्यात कामाला होते, काही महिन्यांपूर्वीच ते मढला आले आहेत. ‘माझ्या गावातले लोक इथे किती तरी वर्षं येतायत,’ ते सांगतात. ‘इथलं काम आणि पैसा, दोन्हीही बरं आहे'

ग्यानचंद मौर्य (डावीकडे) हादेखील धरमपूरचा. तो आधी मध्य मुंबईतल्या सात रस्ता परिसरात एका लाकडाच्या दुकानात कामाला होता. २०१६ मध्ये तो डोंगरपाड्याला आला. धरमपूरचे इतरही काही जण मढला आले आहेत – सुबेदार गौतम (मध्यभागी) गेले पाच वर्षं मढला येतायत, धीरज विश्वकर्मा (उजवीकडे) २० वर्षांचा आहे, त्याचं शिक्षण अजून सुरू आहे. तो अधून-मधून परीक्षा द्यायला जौनपूरला जाऊन येतो

‘नाखवा मोठमोठ्या बोटींवर मासे पकडायला रात्रभर दर्यावर असतात,’ सुरेश सांगतात. ‘पहाटे ३.३०-४.०० वाजता आम्हाला बिनतारी वॉकीवर बोटी परतायला लागल्याचा निरोप येतो. मग आम्ही लहान नावांमधनं गावलेली मासळी घेऊन किनाऱ्यावर येतो. आमच्या गावच्या कोणालाच मच्छिमारीच्या मोठ्या बोटींवर जायला आवडत नाही. खोल समुद्रात आम्हाला कसं तरीच व्हायला लागतं. ते काम नाखव्यानंच केलेलं बेस'

एकदा का मासळी आली की रंगम्माचं निवडायचं काम सुरू होतं. ती मला तिची पाटी दाखवते, ‘बघ, यात छोटी, मोठी सगळ्या तऱ्हेची मासळी, कोळंबी आहे, अगदी कचराही आहे. आता ते सगळं निवडायचं.’ दुपारपर्यंत खाली पसरलेल्या जवळ्यामुळे सगळी जमीनच गुलाबी दिसायला लागलेली असते

लता कोळी (डावीकडे) आणि रेश्मा कोळी (मध्यभागी) खळ्याच्या मालकिणी. कोळी लोक त्यांच्या कामगारांना नोकर म्हणतात. त्यातलीच एक मरिअप्पा भारती (उजवीकडे), मांत्रिकीची रहिवासी. ‘आमच्या घरच्यांनी १० मजूर लावलेत. आमचं आणि त्यांचं काम सारखंच असतं,’ रेश्मा सांगतात. कोळ्यांकडे आता या कामासाठी पुरेशी माणसं नाहीत त्यामुळे मजूर लावावे लागतात. त्यांची बरीचशी मुलं आता इतर व्यवसाय करू लागली आहेत

एकदा का बायांनी – आणि काही पुरुष कामगारांनी – मासळी निवडली की मासे आणि कोळंबी बर्फात घालून मालाडच्या मासळी बाजारात विकायला पाठवली जाते. काही मासळी उन्हात सुकायला ठेवली जाते. दुपारनंतर मासळी पलटतात म्हणजे सगळीकडून ती नीट सुकते

मांत्रिकी गावचाच रहिवासी असणारा दनेर गंडल, विकायला जाणारी ताजी किंवा सुकवायची, सगळी मासळी स्वच्छ धुऊन घेतो

काही कामगार बोंबिल सुकवतायत. दोन माशांचे जबडे एकमेकांत अडकवून ते बांबूंच्या वलंडीवर अडकवले जातात. त्यांची दिशा पूर्व पश्चिम अशी असते जेणेकरून दोन्ही बाजूच्या माशांना पुरेसं ऊन लागावं

वलंडीवर प्लास्टिकच्या काळ्या पिशव्या बांधल्या जातात. या पिशव्या कावळेच आहेत असा भास निर्माण करून कावळ्यांना फसवायला. ही युक्ती कधी कधी चालते

दिवसभराचं निवडण्याचं आणि सुकवण्याचं काम झालं तरी इतरही काही कामं असतातच, जसं माशाची जाळी दुरुस्त करावी लागतात. ५१ वर्षांचे डॉमिनिक कोळी या खळ्यावरचे सगळ्यात ज्येष्ठ आणि आदरणीय कोळी आहेत. त्यांच्या हाताखाली ६ कामगार आहेत आणि त्यांच्यासोबत ते स्वतः ही सगळी कामं करतात – बोटीवर जाणं, मासेमारी, मासळी सुकवणं आणि जाळी दुरुस्त करणं. त्यांनी आणि इतर काही कोळ्यांनी एका दिवसासाठी अब्दुल रज्जाक सोलकरांना बोलवून घेतलंय. ते जाळी विणतात. सोलकर रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातले. ‘माझे वडील जाळी विणायचे, आता मीही तेच करतो,’ ते सांगतात. ‘आज मी इथे काम करतोय, उद्या कुठे तरी वेगळीकडे असेन.’

खळ्यावर हे सगळं काम चालू असताना इतरही काही जण त्यांच्या त्यांच्या कामात व्यग्र आहेत – भुकेलेले कावळे, कुत्री आणि बगळे दिवसभर खळ्याभोवती घिरट्या घालतायत. माशाचा घमघमाट आणि पटकन एखादा तुकडा तोंडात पडण्याची आशा त्यांना खळ्याकडे खेचून आणत असावी!