गोळीबार, जो झालाच नाही. पण विविध मथळ्यांखालची ही बातमी – पोलिसांकडून शेतकऱ्याची गोळी घालून हत्या – समाजमाध्यमांवर प्रचंड गाजत होती. तीही बहादुर शाह जफर मार्गावर संबंधित शेतकरी “मारला गेला” त्याच्या काही क्षणात. गोळीबारात असा कोणता मृत्यू झालाच नाही. पण तो झाला ही अफवा पसरली आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या प्रसिद्ध आयटीओ जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलनातल्या फुटीर गटांमध्ये गोंधळ, हल्लकल्लोळ उडाला. आणि याच अफवेने कदाचित लाल किल्ला आणि इतर ठिकाणी झालेल्या हिंसेला खतपाणी मिळालं.
अशी बातमी पसरली की ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याला पोलिसांनी अगदी नजरेच्या टप्प्यात असताना गोळी घालून ठार मारलं. आणि अर्थातच समाजमाध्यमांना ही बातमी पसरवण्याआधी त्याची सत्यता तपासण्याची कसलीही गरज भासली नाही. आणि लवकरच, काही वृत्तवाहिन्यांनी देखील ही बातमी द्यायला सुरुवात केली. प्रत्यक्षात घटनास्थळी लोक या ‘गोलीकांडा’चा आणि तथाकथित पोलिसी अत्याचाराचा निषेध करत होते. आणि आयटीओपाशी पोचलेले आंदोलक मात्र इथेतिथे विखुरले होते.
खरं तर मारला गेलेला, नवनीत सिंग, वय ४५ ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात मारला गेला – कुणीही एकही गोळी झाडली नव्हती. पण हे स्पष्टीकरण येईपर्यंत ही बातमी आणि लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराने प्रत्यक्षात आंदोलक शेतकऱ्यांचा जो भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघाला तो मात्र झाकोळून गेला. सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत रेटून पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने आंदोलन करत आहेत.
फार वेगळ्या रितीने सुरू झालेल्या दिवसाची हे दुर्दैवच.
भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन सुरू झाला तोच ऊबदार सूर्यकिरणांनी, निराशा आणि थंडीच्या कडाक्यानंतर, सुखद. देशाच्या राजधानीच्या वेशीवर गेले दोन महिने आंदोलन करणारे शेतकरी ठरवलेल्या मार्गावर शांततापूर्ण ट्रॅक्टर मोर्चा काढून इतिहास घडवणार होते. दुपारच्या सुमारास राजपथावरची शासकीय परेड संपल्यानंतर सिंघु, टिक्री आणि गाझीपूर या सीमांवरून तीन परेड सुरू होणार होत्या.
या तिन्ही परेड म्हणजे देशाच्या नागरिकांनी साजरा केलेला प्रजासत्ताक दिनाचा सर्वात मोठा, भव्य सोहळा असणार होत्या – आणि तशा त्या झाल्याही. पण संध्याकाळ होईपर्यंत लोकांचं लक्ष आणि उत्सुकता विपरित दिशेलाच गेली होती.

प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी भारतीय किसान युनियनचे योगेश प्रताप सिंग चिल्ला सीमेवर शेतकऱ्यांच्या एका गटाला संबोधित करतायत (वरच्या रांगेत). दुपारचं जेवण झाल्यानंतर हा गट ट्रॅक्टर घेऊन निघाला (खाली, डावीकडे). भारतीय किसान युनियनचे भानु प्रताप सिंग यांनी शेतमालाच्या किंमतींबद्दल पारीशी संवाद साधला
दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या चिल्ला सीमेवर (गाझीपूरच्या जवळ) जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो. प्रवेशाच्या ठिकाणचे बॅरिकेड नेहमीपेक्षा जरा वेगळे होतेः इंधनाचे टँकर आणि डीटीसी बस, पिवळ्या रंगात रंगवलेल्या हलत्या लोखंडी बॅरिकेडशेजारी उभे होते. चिल्ला सीमेपाशी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा एक मोठा तळ उभारण्यात आला होता, जिथे शेतकऱ्यांच्या गटाला त्यांच्या नेत्यांकडून पोलिसांच्या सहकार्याने ठरवण्यात आलेल्या मार्गानेच जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.
इथल्या आंदोलकांनी त्यांच्या तळावर पहाटे ४ वाजता रांधण्यात आलेला साधा डाळ भात खाल्ला होता. दुपार झाली तसं शेतकऱ्यांचे गट ट्रॅक्टरवर स्वार झाले, ‘भारतमाता की जय, जय जवान, जय किसान’ च्या घोषणा एका दमात सुरू होत्या. स्थानिक भागात लोकप्रिय असलेल्या घोषणा मागे वाजत होत्या. पोलिसांची एक लांबलचक रांग आणि पांढऱ्या रंगाचे ड्रोन कॅमेरे चिल्ला-दिल्ली-नॉयडा डायरेक्ट फ्लायओव्हर-दादरी-चिल्ला या ठरवलेल्या मार्गाने जायला लागले.
शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.
या कायद्यांमुळे मोठ्या कॉर्पोरेट समूहांना शेतकरी आणि शेतीचं क्षेत्र अधिकाधिक व्यापता येईल आणि ज्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्यांच्या उपजीविका मोठ्या प्रमाणावर मोडकळीस येतील असं चित्र सगळ्या शेतकऱ्यांना दिसतंय. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.
चिल्लाच्या ट्रॅक्टर परेडमध्ये अनुचित असं काहीच घडलं नाही. इथला मोर्चा झटपट संपला, एका तासाच्या आत सगळे आपल्या मुक्कामी परत आले. त्यानंतर आम्ही इथून ४० किलोमीटरवर असलेल्या सिंघुच्या दिशेने जायला लागलो. तिथे मुख्य परेड होणार होती. रस्त्यात असतानाच तिथल्या आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला कळवलं की शेतकऱ्यांचे काही गट सिंघुहून दिल्लीला, आयटीओच्या दिशेने निघाले आहेत. काहीतरी विचित्र घडत होतं. आम्ही आमची दिशा बदलून त्यांच्या मागावर जायला लागलो. आउटर रिंग रोडवरून जात असताना दिल्लीचे असंख्य नागरिक रस्त्याच्या कडेला उभे राहून शेतकऱ्यांच्या गटांना हात हलवत अभिवादन करत होते. ट्रॅक्टरवरच्या, दुचाकीवर आणि कारमधल्याही. मजनू का टिलाजवळ मरून रंगाच्या वस्त्रातले भिक्षुदेखील जोरजोरात हात हलवताना दिसत होते. कारमध्ये आपल्या कुटुंबासोबत बसलेली एक बाई ट्रॅफिक सिग्नलपाशी ट्रॅक्टरवरच्या लोकांना खिडकीतून पाण्याच्या बाटल्या देत होती.
देशासाठी अन्न पिकवायला मदत करणारी ट्रॅक्टरची ही मोठाली चाकं आज देशाच्या राजधानीच्या रस्त्यावर रोरावत चालली होती – कोण जाणे, देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच. दमदार, मार्मिक आणि प्रतीकात्मक चाल होती ती.

चिल्लाचा ट्रॅक्टर मोर्चा आपला ठरलेला मार्ग - चिल्ला-दिल्ली-नॉयडा डायरेक्ट फ्लायओव्हर-दादरी-चिल्ला - पूर्ण करून तासाभरात परतला

आयटीओ जंक्शनपाशी, गाझीपूर, सिंघु आणि लाल किल्ल्याहून आलेले ट्रॅक्टर एकत्र यायला लागले
आणि अचानक, सगळा रागरंगच बदलायला लागला. आंदोलकांचे काही गट फुटलेत आणि कुठलीही पूर्वसूचना न देता लाल किल्ल्याकडे जातायत असं आमच्या कानावर आलं. आणि लवकरच या ऐतिहासिक स्थळावर संघर्ष पेटल्याच्या, धार्मिक ध्वज फडकावल्याच्या अफवा पसरायला लागल्या. आणि त्यानंतर जी काही कसरत करण्यात आली त्याचा परिणाम म्हणजे लोकांचं लक्ष मूळ मुद्दे आणि मुख्य ट्रॅक्टर परेडवरून विचलित करण्यात आलं.
“इथून लांबच रहा,” लाल किल्ल्यातून बाहेर पडलेल्या सहकाऱ्याने आम्हाला ३.१५ वाजता फोन करून सांगितलं होतं. त्याला मार लागला होता. अनेक अफवांमुळे संतप्त झाल्यामुळे असेल कदाचित, काही आंदोलक मोकाट सुटले होते आणि त्याच्या कॅमेऱ्याची अतिशय महागडी लेन्स फोडण्यात आली होती. आम्ही आयटीओच्या दिशेने जात राहिलो, जिथे गाझीपूर, सिंघु आणि लाल किल्ल्यावरून येणारे काही ट्रॅक्टर एकत्र येत होते. आणि थोड्याच वेळात, पोलिस मुख्यालयाच्या आसपासचा परिसर ट्रॅक्टर आणि लोकांनी गजबजून गेला.
पंजाबच्या गुरुदासपूरचे तिघं जण प्रचंड गुश्शात होतेः “मी २२ जानेवारीला सिंघुला आलोय. आज, प्रजासत्ताक दिनाला, पहाटे ४ वाजल्यापासून आम्ही जागे आहोत. या मोर्चात तब्बल २ लाख ट्रॅक्टर आहेत. आम्ही देखील आमच्या प्रजासत्ताकाचा सोहळा साजरा करतोय. या कायद्यांचा फायदा केवळ कॉर्पोरेट कंपन्यांना होणार आहे, शेतकऱ्यांना नाही.” त्यांना खरंच असं वाटत होतं की ते व्यापक आणि वैध अशा परेडचाच हिस्सा होते हे दिसत होतं – शांततापूर्ण मोर्चा जो ठरवलेल्या मार्गांनी जाऊन परतला. इतर ठिकाणी देखील आंदोलकांमध्ये असाच गोंधळ दिसून येत होता.
पण इतर काही आंदोलक होते, जे दिल्लीत शिरले होते, आणि ज्यांचा बिलकुल गोंधळ उडालेला नव्हता. ते इथे काय करायला आलेत आणि ते काय करतायत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. खोडा घालणं, खोड्या काढणं आणि धुडगूस घालणं हेच त्यांना करायचं होतं. आपल्या कृतीमुळे राजधानीच्या सीमेवरच्या लाखो शेतकऱ्यांच्या विलक्षण शिस्तबद्ध अशा परेडला गालबोट लागेल याची त्यांनी पूर्ण कल्पना होती. “हो, लाल किल्ल्यावर तो झेंडा फडकला ते चांगलंच झालं. आम्हाला स्वतःच तो तिथे फडकवायचा होता” – ते स्वतः त्या पताका घेऊन निघाले होते ते त्यांनी मला दाखवलं.

वर डावीकडेः ‘या कायद्यांचा फायदा फक्त कॉर्पोरेट कंपन्यांना होणार आहे,’ गुरदासपूरहून आलेले तिघं जण म्हणतात. वर उजवीकडेः रणजित सिंग (मध्यभागी) म्हणतात, ‘आजच्या प्रजासत्ताक दिनाची इतिहासात नोंद होईल.’ खालच्या रांगेतः आयटीओचा परिसर ट्रॅक्टर आणि आंदोलकांनी गजबजून गेला होता, पवनदीप सिंग (केशरी रंगात) त्यातलाच एक
“सरकार हिंदु राष्ट्राच्या गप्पा करतं, जसं काही या देशात दुसऱ्या कुणाचंही अस्तित्व नाहीच. आज लाल किल्ल्यावर फडकलेला झेंडा या कल्पनेला दिलेलं आव्हान आहे,” २६ वर्षांचा पवनदीप सिंग ठामपणे सांगतो.
काहींच्या मनातला गोंधळ आणि इतरांच्या मनातली कृतक बांधिलकी यामुळे नुसती हुल्लड माजली.
“आजच्या प्रजासत्ताक दिनाची इतिहासात नोंद होईल. येणाऱ्या काळात या ट्रॅक्टर मोर्चाची आठवण निघेल,” ४५ वर्षीय रणजित सिंग आम्हाला सांगतात.
आणि याच सुमारास नवनीत सिंगचा ट्रॅक्टर पलटी झाला, आणि अफवांचं पेव फुटलं. त्याचा मृतदेह झाकला गेला आणि काही आंदोलक जमिनीवर बसून शोक व्यक्त करू लागले. पोलिस काही मीटर अंतरावरून लक्ष ठेवून होते.
आणखी एका तरुणाला, पंजाबच्या बिलासपूरच्या २० वर्षीय रवनीत सिंगला पायाला गोळी लागल्याची अफवा पसरली होती. नवनीत सिंगचा मृतदेह होता तिथे शेजारीच एका वयस्क मित्राच्या मांडीवर तो झोपला होता आणि त्याच्या जखमेची कुणी तरी मलमपट्टी करत होतं. तिथल्या प्रसार माध्यमाच्या लोकांना त्याने स्पष्ट सांगितलं की त्याला कोणतीही गोळी लागलेली नाही. आयटीओजवळ पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला तेव्हा उडालेल्या गोंधळात त्याच्या पायाला लागलं असं तो स्पष्ट सांगत होता. मात्र त्याचा आवाज एका मध्यवयीन आंदोलकाच्या आवाजात पुरता विरून गेला. जर खरं काय घडतंय ते पूर्ण दाखवायचं नसेल तर आम्हाला त्रास देऊ नका आणि मागे व्हा असं त्यांनी सगळ्या कॅमेरावाल्यांना बजावलं होतं.
आयटीओजवळ विशीतल्या तरुण शेतकऱ्यांचा आणखी एक गट आपल्या ट्रॅक्टरवर होता आणि आता पुढे काय करायचं याच्या सूचना आपल्या गटनेत्याकडून मिळण्याची वाट पाहत होता. आमच्याशी बोलायला ते थोडी खळखळ करत होते, आम्ही ‘आयबी’ची लोकं आहोत का असा त्यांचा प्रश्न होता. जेव्हा आम्ही स्पष्ट केलं, की नाही, आम्ही इंटलिजन्स ब्यूरोची माणसं नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलिसांनी ट्रॅक्टर मोर्चातल्या कुणावर तरी गोळीबार केल्याचं त्यांच्या कानावर आलंय आणि ते चुकीचं होतं. आतापर्यंत हे आंदोलन शांततापूर्ण होतं पण ही तर चिथावणी होती, असं त्यांनी सांगितलं.

आयटीओपाशी ट्रॅक्टर पलटी होऊन नवनीत सिंग मरण पावला, त्याचा शोक व्यक्त करण्यासाठी लोक जमा झाले

श्रीमती अंटिल (डावीकडे) आग्रही होत्या की सरकारला हार मानावीच लागेल. अजय कुमार सिवाच (एकदम उजवीकडे) म्हणतातः ‘मी दोन्ही आहे, जवान आणि किसान, पण मी कायम एक किसानच असेन’
“सरकारने शेतकऱ्यांना मारणं योग्य नाही, त्यापेक्षा त्यांनी आपल्या कायद्यांचा अंत करावा,” त्यांनी आम्हाला सांगितलं, पुढे अभिमानाने ते म्हणतात, “या देशाच्या इतिहासातलं कदाचित हे सर्वात जास्त काळ सुरू असलेलं आंदोलन असेल.”
आम्ही पुढे जायला लागलो कारण आम्हाला नवनीत सिंगच्या मृत्यूचं कारण पडताळून पहायचं होतं आणि इतर आंदोलकांशीही बोलायचं होतं. तिथे आमची भेट ४५ वर्षीय अजय कुमार सिवच यांच्याशी झालं. मूळचे उत्तराखंडच्या बाजपूरचे असलेले सिवाच पूर्वी लष्करात होते आणि आता उत्तर प्रदेशच्या मीरतमध्ये स्थायिक झाले आहेत.
सिवाच म्हणतात, “जर या देशातली शेतीच बंद पडली, तर सरकारही बंद पडेल. मला पेन्शन मिळते आणि आता मी गहू आणि उसाची शेती करतोय. मी जवळपास २० वर्षं लष्करात होतो. जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि लडाखमधे मी सेवेत होतो, त्यानंतर मी शेतीकडे वळलोय. मी दोन्ही आहे, जवान आणि किसान, पण मी कायमच एक किसान असेन. आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, खरं तर सगळ्यांसाठीच. दिल्लीतल्या आंदोलनात भाग घेण्यासाठी आम्ही आमच्या गावातल्या लोकांकडून ६०,००० रुपये गोळा केले आहेत.”
हरयाणाच्या सोनिपतहून आलेल्या ४८ वर्षीय श्रीमती अंटिल यांच्या गडद हिरव्या पगडीने आमचं लक्ष वेधून घेतलं. मका, काकडी, बटाटा आणि गाजराची शेती करणाऱ्या श्रीमती गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत आणि सिंघु ते आपलं घर अशा त्यांच्या चकरा सुरू आहेत. “मी सिंघुला आले की माझा १० वर्षांचा मुलगा आणि १७ वर्षांच्या मुलीचं सगळं माझे पती पाहतात. आज प्रजासत्ताक दिनी पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेश एकत्र आलेत. जे काही सुरू आहे ना त्यातून सगळ्यांचं नुकसानच होणार आहे. जवळपास २०० शेतकऱ्यांचे जीव गेलेत, सरकारला आता माघार घ्यावीच लागेल. या सगळ्या कृषी कायद्यांचा फायदा केवळ अंबानी आणि अदानींना होणार आहे, आम्हाला नाही.”
दिवस ढळला, सूर्य मावळतीला गेला आणि आयटीओपाशी आलेले काही ट्रॅक्टर जिथून निघाले त्या सीमांपाशी परत निघाले. राजधानीने आज नागरिकांची प्रजासत्ताक साजरा करणारी भव्य परेडही पाहिली आणि एक दुःखद, दुष्ट आणि घातक तमाशाही.
अनुवादः मेधा काळे