हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
विटा, कोळसा आणि दगड
त्या फक्त अनवाणीच नाहीयेत, त्यांच्या डोक्यावर गरम विटा आहेत. फळीवरती उभे असलेले हे सगळे ओरिसातून स्थलांतर करून आंध्र प्रदेशातल्या वीट भट्ट्यांवर कामाला आलेले आहेत. बाहेरचं तापमान ४९ डिग्री इतकं भाजून काढणारं आहे. भट्टीत त्याहूनही जास्त उष्मा आहे. तिथे जास्त करून बायाच काम करतात.
दिवसाच्या कामाचे प्रत्येक बाईला १० ते १२ रुपये मिळतात. पुरुषांना मिळणाऱ्या तुटपुंज्या १५-२० रुपयांपेक्षाही कमी. ठेकेदार अशा स्थलांतरित कामगारांची संपूर्ण कुटुंबं उचल देऊन इथे घेऊन येतात. कर्जाच्या विळख्यामुळे या कामगारांना ठेकेदारांपासून सुटका करून घेता येत नाही. बहुतेक वेळा ते वेठबिगारीत ढकलले जातात. इथे येणाऱ्यांपैकी ९० टक्के भूमीहीन किंवा सीमांत शेतकरी आहेत.
किमान वेतन कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन होत असूनही यांच्यापैकी कुणालाही त्याबाबत दाद मात्र मागता येत नाही. स्थलांतरित कामगारांसाठीच्या कालबाह्य कायद्यांचं कोणतंही संरक्षण या कामगारांना मिळत नाही. उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशच्या श्रम विभागावर उडिया कामगारांना सहाय्य करण्याचं कसलंही बंधन हे या कायद्याअंतर्गत नाही. आणि ओरिसातल्या श्रम अधिकाऱ्यांना आंध्र प्रदेशमध्ये कसलेच अधिकार नाहीत. वीट भट्टीत वेठीने काम करणाऱ्या अनेक स्त्रिया आणि तरुण मुली लैंगिक शोषणालाही बळी पडण्याचा धोका असतो.
झारखंडच्या गोड्डामधल्या उघड्या खाणींजवळच्या चिखल आणि राड्यातून वाट काढत जाणारी ही एकटी स्त्री कामगार. या भागातल्या इतर अनेक स्त्रियांप्रमाणे हीदेखील ढिगाऱ्यांमधून टाकाऊ कोळसा गोळा करते, जो घरोघरी इंधन म्हणून वापरला जातो. यातनं तिची थोडी फार कमाई होते. तिच्यासारखे लोक नसते, तर हा कोळसा या ढिगाऱ्यांमध्ये असाच वाया गेला असता. तिच्या या कामामुळे देशाची इंधन बचत होतीये – पण कायद्याने मात्र तिचं काम गुन्हा ठरतं.


कौलं तयार करणारी ही स्त्री छत्तीसगडच्या सरगुजाची रहिवासी आहे. कर्ज फेडता न आल्यामुळे तिच्या कुटुंबाला अक्षरशः घरावरची कौलं विकावी लागली. कर्जाचा हप्ता चुकवण्यासाठी विकता येईल अशी एकच गोष्ट त्यांच्याकडे होती – घरावरची कौलं. त्यांनी ती विकली. आणि आता जुनी कौले उतरवून घर शाकरण्यासाठी नवी कौलं ती तयार करतीये.
तमिळ नाडूच्या पुडुकोट्टईच्या या दगड फोडणाऱ्या बाईची कथा अनोखी आहे. १९९१ मध्ये तिथल्या दगडखाणींमध्ये वेठबिगार म्हणून काम करणाऱ्या तब्बल ४००० गरीब स्त्रियांनी त्या खाणींचा ताबा घेतला. तत्कालीन प्रशासनाच्या काही मूलगामी हालचालींमुळे हे घडू शकलं. आणि या नवसाक्षर स्त्रियांच्या संघटित कृतीमुळे हे प्रत्यक्षात आलं. खाणीत काम करणाऱ्या स्त्रियांची कुटुंबं विलक्षणरित्या सुधारली. या नव्या मालकांच्या चोख कामामुळे सरकारनेही भरपूर नफा कमवला. मात्र या भागात याआधी भरपूर बेकायदा खाणकाम करणाऱ्या ठेकेदारांनी या सर्व प्रक्रियेवर घाला घातला. खूप नुकसान झालं. तरीही चांगल्या आयुष्याच्या आशेने अनेक स्त्रियांनी आपला संघर्ष तसाच चालू ठेवला आहे.


मागे सूर्य मावळतोय, त्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या गोड्डा इथल्या खुल्या खाणींजवळच्या ढिगाऱ्यांजवळून परतणाऱ्या या स्त्रिया. दिवसभरात जेवढा जमेल तेवढा टाकाऊ कोळसा गोळा करून पाऊस यायच्या आत या निघाल्या आहेत. एकदा का पाऊस आला की त्या इथल्या चिखल आणि रॅडीत अडकल्या म्हणून समजाच. दगड आणी कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या बाया किती या आकड्यांना काही अर्थ नाही. कारण त्यामध्ये अनधिकृत खाणींमध्ये आणि आसपास धोकादायक कामं करणाऱ्या अनेक स्त्रिया गणल्याच गेल्या नाहीयेत. टाकाऊ कोळशांच्या ढिगाऱ्यांमधून परतणाऱ्या या स्त्रियांसारख्याच अनेकींची गणनाच नाही. दिवसभराच्या कामानंतर १० रुपयाची कमाई झाली तरी नशीब!
असं असतानाच खाणींमधले स्फोट, विषारी वायू, दगडाची बारीक धूळ आणि हवेतल्या इतर प्रदूषणकारी घटकांचा मोठा धोका या स्त्रियांना असतो. कधी कधी १२० टनाचे डंपर ट्रक खाणींच्या कडांपाशी थांबतात आणि खोदून काढलेली माती टाकतात. या मातीतला मिळेल तो टाकाऊ कोळसा गोळा करण्यासाठी धडपडणाऱ्या काही गरीब स्त्रिया मग अशा मातीच्या ढिगाऱ्यांखाली दबण्याचाही फार मोठा धोका निर्माण होतो.
