तमिळ नाडूच्या नादुमुदलैकुलम गावातल्या बायांना दर २०११ च्या जनगणनेची आकडेवारी दाखवली तर त्या नाराज होणार हे नक्की. या आकडेवारीप्रमाणे ग्रामीण भागातल्या बायांचा कामातील सहभागाचा दर ३०.०२ टक्के असा आहे. पुरुषांची स्थिती बरी – ५३.०३ टक्के. पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र एकदमच निराळी आहे. मदुराई जिल्ह्यातल्या या गावातली एक अन् एक बाई घरात आणि रानात राबत असते. घरकामाला तर कसलाच मोबदला नाही. आणि शेतमजुरीसाठी बायांना गड्यांपेक्षा निम्मी मजुरी दिली जाते. या विषमतेत अजून भर घालण्यासाठी या ‘अबला’ स्त्रियांना रानात जास्त कष्टाचं काम दिलं जातं. गडी रान तयार करतात. परंपरेने या कामासाठी जास्त पैसा मिळत आला आहे. आणि आता यातही यंत्रांचा वापर वाढला आहे. पण लावणी आणि खुरपणीचं ८०% काम – दोन्हीचा पाठीवर आणि पायावर प्रचंड ताण येतो - बायाच करतात.

पोदुमणी आपले पती सी जयबल (शेतकरी आणि जलतरण शिक्षक) यांच्यासोबत ३.५ एकर रान कसते आणि इतरांच्या रानात मजुरी करते. या दुसऱ्या कामातून थोडी वरकमाई होते. सध्याचा दर चार तासाला १०० रुपये (सकाळी ८ ते १२) असा आहे. पोदुमणीची सकाळ म्हणजे सावळा गोंधळ असतो. पहाटे ५ वाजता उठून ती स्वयंपाक करते, घर आवरते आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचे डबे भरते. मग ती रानात जाण्यासाठी तलावाच्या कंबरभर पाण्यातला ‘शॉर्ट कट’ घेते. मग ती स्वतःच्या रानात पाणी द्यायचं, लावणी, खुरपणी आणि कापणीलाही मदत करते. उशीरानेच कसेबसे दोन घास पोटात टाकून ती गोठ्यात गायी आणि बकऱ्यांचं सगळं पाहते. मग रात्रीचा स्वयंपाक. ती बोलते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू असतं. तिच्या नवऱ्याने तिच्या कष्टांची दखल घेतली की हे हसू खुलत जातं. दोघांची फार इच्छा आहे की त्यांच्या मुलानं एखाद्या ‘ऑफिसमध्ये’ काम करावं, रानात नको. “मी कधी शाळेत गेले नाही,” ती सांगते. तिचे डोळे भरून येतात. पोदुमणी नजर फिरवते.

लोगामणी इलावरसन तिच्या मुलीला, शोभनाला भरवतीये. ती सांबार-भाताचा छोटा घास हातात घेते. चार वर्षांची लेक खूश होऊन तोंडाचा आ करते. असं हाताने भरवून घ्यायची वेळ तशी दुर्मिळच. तिच्या आईकडे त्यासाठी वेळच नसतो. लोगामणीला थोरली दोन मुलं आहेत. आणि तिला झेपेल त्याहून खूप जास्त काम – स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या रानात. लेकरं शाळेत गेली की सकाळी ८ वाजता ती घर सोडते. ते परत आले की तीही परतते. तान्ही असताना ती त्यांना सोबत घेऊन रानात जायची. “दोन झाडाला झोळी बांधून त्यात त्यांना निजवायचं. आणि साधारण आठ महिन्याचे झाले की मग शेताच्या कडेला ते खेळत बसायचे.” अगदी बाळंत होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत इथे बाया काम करतात. आणि बाळंत झाल्यावर महिन्याभराच्या आत असंच चित्र सर्रास दिसतं. “आमच्यासाठी सरकारी दवाखाने, लेकरांसाठी सरकारी शाळा. ते खाजगी वगैरे आम्हाला परवडत नाही हो,” जागेपणीचा तास अन तास काम करणारी २९ वर्षांची लोगामणी सांगते.

“मी १४ ची होते आणि तो तिशीचा. मला तेव्हा जरा कळत असतं तर...,” नागवल्ली थिरुनावकरसु आपल्या लग्नाबद्दल बोलते तेव्हा तिच्या आवाजतली खंत लपत नाही. वीस वर्षानंतर आज तीन मुलं, दुभत्या गायी आणि शेतमजूर म्हणून दिवसभर काम करण्यात ती बुडून गेलीये. तिचा नवरा ट्रक चालवतो, दिवसाला १५० रुपये कमवतो. त्याच्या कामामुळे त्याला २५ किलोमीटरवर मदुराई शहरात जावं लागतं. तिला शेतजुरीतून दिवसाला १०० रुपये मिळतात. आणि मनरेगात काही काम मिळालं तर दिवसाला १४० रुपये. त्यांच्या दोघांच्या कमाईतून रोजचा घरखर्च कसा बसा निघतो. “माझ्या मुलींचं मात्र याहून बरं काही तरी व्हायला पाहिजे,” ती ठामपणे सांगते. “त्यांनी शिकलंच पाहिजे. आणि लवकर लग्न तर नक्कीच नाही.” तिची थोरली मुलगी बीए, इंग्रजीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तिने शिक्षिका व्हायचं ठरवलंय आणि नागवल्लीला तिचा फार अभिमान आहे. धाकटी मुलगी वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतीये. सर्वात धाकटा आठवीत शिकतोय. “तो एकटाच आहे ज्याला आम्हाला रानात काडीची मदत करावी वाटत नाही. पोरी येतात. किमान मी विचारल्यावर तरी येतात...”

ओचम्मा गोपाल गावातल्या मोठ्या जमीनमालकांपैकी एक. त्यांच्या १५ एकर रानात काम करणाऱ्या बायांवर त्यांचं बारीक लक्ष असतं. त्यांना गावात मान आहे, त्या जाणत्या आहेत आणि त्या दिवसाला १०० रुपये मजुरी देतात. पण गावातल्या बायांना मात्र जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा रोजगार हमीचं काम करायचं असतं. तिथे दिवसाला ४० रुपये जास्त मिळतात. आणि त्या सांगतात, तिकडचे सुपरवायझर काही दिवसभर बांधावर उभं राहून सूचना करत नाहीत.

कन्नम्मल चिन्नथेवर, वय ७०. एक सुंदरशी निळी साडी आणि सोन्याची वजनदार कानातली परिधान केल्यानंतरच त्यांनी मला त्यांचं छायाचित्र काढण्याची परवानगी दिली. दिपारचे ३ वाजून गेले होते आणि शेतात काबडकष्ट करून त्या नुकत्याच परतल्या होत्या. त्या इथल्या भागात नेसतात तशा साडी नेसल्यायत, चोळीशिवाय. त्यांची पाठ ताठ आहे आणि त्वचा जराशी सुरकुतायला लागलीये. डोळे अंधुकसे आणि जोरानं बोललं तरच त्यांना आपलं म्हणणं ऐकू जातं. पण त्या हसतात आणि मान हलवून प्रतिक्रिया देतात. त्यांचा मुलगा जयबल मला सांगतो, त्यांना पैशाची ददात नाही तरी त्या कामाला जातात. “तिच्याकडे तिचं सोनं आहे आणि ती दुसऱ्यांना व्याजाने पैसे देते. ती काही माझ्यावर अवलंबून नाहीये,” ते हसून सांगतात.

इकडे बाया रानातल्या कामात गढून गेल्यायत, आणि पुरुषही काही रिकामे बसले नाहीयेत. दुपारी लिंबाच्या सावलीत म्हातारी मंडळी डाव खेळतायत. “ते माझे वडील,” उजवीकडे बसलेल्या एका गृहस्थाकडे बोट दाखवून जयबल मला सांगतात. त्यांचे केस अगदी त्यांच्या पांढऱ्या फेक धोतरासारखे. त्यांच्यामागे काही तरणी मुलं त्यांचा डाव पाहतायत. २०११ च्या जनगणनेवर जर का विश्वास ठेवायचा असेल तर, “राष्ट्रीय स्तरावर स्त्रियांचा कामातील सहभाग २५.५१% असून पुरुषांसाठी हा आकडा ५३.२६% आहे. ग्रामीण भागात बायांचा कामातील सहभाग दर ३०.०२% तर पुरुषांसाठी ५३.०३% आहे. शहरी भागात हाच दर स्त्री-पुरुषांसाठी अनुक्रमे १५.४४% आणि ५३.७६% असा आहे.”
नादुमुदलैकुलमच्या बायांना जनगणनेनुसार “काम” म्हणजे काय हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल नाही का...
हा लेख ‘ग्रामीण तमिळ नाडूतील हरवत चाललेल्या जीविका’ या मालिकेतील आहे आणि त्यासाठी भारतीय प्रतिष्ठान मीडिया अवॉर्ड्स २०१५ चे सहाय्य लाभले आहे.
अनुवादः मेधा काळे