जंगलातल्या घुबडाचं हलक्या आवाजातलं घुमणं असो किंवा
चार वेगवेगळ्या साळुंक्यांची साद, त्यांना झटक्यात ओळखू येते. आणि स्थलांतर करून
येणाऱ्या वुली नेक करकोच्यांना कोणत्या तळ्यांवर उतरायला आवडतं हेही त्यांना पक्कं
माहित आहे.
बी. सिद्दन शाळा पूर्ण करू शकले नाहीत. पण तमिळ नाडूतल्या नीलगिरीमधल्या आपल्या घराच्या भोवताली असलेल्या पक्ष्यांबद्दलचं त्यांचं ज्ञान एखाद्या पक्षीतज्ज्ञाला लाजवेल.
“आमच्या बोक्कापुरम गावात सिद्दन नाव असलेले आम्ही तिघं होतो. त्यातला नेमका कोणता सिद्दन हे ओळखायला लोक म्हणून लागले ‘तो नाही का, कुरुवी सिद्दन – सारखा पक्ष्यांच्या मागे धावणारा पोरगा’,” हसत आणि अगदी अभिमानाने सिद्दन आम्हाला सांगतात.
कागदोपत्री त्यांचं नाव बी. सिद्दन असलं तरी मुदुमलईच्या सभोवती असलेल्या गावांमध्ये आणि जंगलांमध्ये मात्र ते ओळखले जातात, कुरुवी सिद्दन म्हणून. कुरुवी म्हणजे ‘पॅसरीफॉर्म’ या प्रकारचे पक्षी. पक्ष्यांच्या सगळ्या प्रजातींचा विचार केला तर जवळ जवळ निम्मे पक्षी याच प्रकारात मोडतात.
“तुम्ही पश्चिम घाटांमध्ये कधीही जा, तुम्हाला चार पाच पक्ष्यांचे आवाज तरी नक्कीच ऐकू येणार. तुम्ही फक्त इतकंच करायचं, शांत ऐकायचं आणि समजून घ्यायचं,” २८ वर्षीय विजया सुरेश म्हणते. नीलगिरीच्या पायथ्याशी असलेल्या अनइकट्टी गावात त्या शिक्षिका आहेत. मुदुमलई व्याघ्र प्रकल्पाच्य आसपास राहणाऱ्या अनेकांसाठी मार्गदर्शक असणाऱ्या सिद्दन यांच्याकडून पक्ष्यांबद्दल मी खूप काही शिकले असं ती सांगते. या परिसरातले किमान १५० पक्षी विजया ओळखू शकते.


डावीकडेः नीलगिरी जिल्ह्याच्या शोलूर शहराजवळच्या बोक्कापुरम गावातल्या बांबूच्या जंगलात बी. सिद्दन पक्ष्यांच्या शोधात. उजवीकडेः विजया सुरेश किमान १५० पक्षी ओळखू शकते.


डावीकडेः पांढऱ्या मानेचा करकोचा दर हिवाळ्यात स्थलांतर करून पश्चिम घाटात येतो. सिंगाराजवळ तो आढळतो. बोक्कापुरममध्ये दिसणारा पहाडी सातभाई (उजवीकडे)
सिद्दन बोक्कापुरमचे रहिवासी आहेत. हे गाव तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातल्या मुदुमलई व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतं. ते गेली २५ वर्षं जंगलात वाटाड्या आणि मार्गदर्शक म्हणून काम करतायत. ते पक्षी निरीक्षक आहेत आणि शेतकरीसुद्धा. ४६ वर्षीय सिद्दन देशभरातल्या किमान ८०० हून अधिक प्रकारच्या पक्ष्यांची नावं सांगू शकतात आणि त्यांच्याबद्दल भरपूर वेळ बोलू शकतात. तमिळ नाडूमध्ये अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट असणाऱ्या इरुलार (इरुला म्हणूनही ओळखले जातात) समुदायाचे सिद्दन मुदुमलईच्या परिसरात असलेल्या शाळांमध्ये मुलांबरोबर गप्पा मारतात, त्यांना जंगलात फिरायला घेऊन जातात आणि सादरीकरणाद्वारे आपल्याकडचं ज्ञान मुलांना देऊ करतात.
सुरुवातीला त्यांना पक्षी इतके का आवडतात ते मुलांना समजायचं नाही. “पण हळूहळू त्यांना एखादा पक्षी दिसला की ते माझ्याकडे येऊन त्याचा रंग, आकार आणि त्याची साद अशा गोष्टी मला सांगायला लागले,” सिद्दन सांगतात.
अडतीस वर्षांचे राजेश मोयार गावातल्या शाळेचे विद्यार्थी. पक्षीवेड्या सिद्दन यांच्याबरोबरचा वेळ त्यांच्या आजही लक्षात आहे. “बांबूच्या गळून पडलेल्या पानांवरून चालू नको असं ते मला सांगायचे. का तर, नाइटसारखे पक्षी झाडांवरच्या घरट्यात नाही तर अशा पानांमध्ये त्यांची अंडी घालतात, म्हणून. सुरुवातीला मला फक्त या अशा सगळ्या गोष्टी ऐकायला आवडायचं. त्यानंतर मात्र मी हळू हळू पक्ष्यांच्या दुनियेत रमू लागलो.”
नीलगिरी जिल्ह्यात अनेक आदिवासी समुदाय राहतात – तोडा, कोटा, इरुला, कट्टुनायकन आणि पनिया. सिद्दन सांगतात, “माझ्या वस्तीत राहणाऱ्या आदिवासी मुलांना पक्ष्यांबद्दल रस वाटतोय असं दिसलं की मी त्यांना एखादं जुनं घरटं द्यायचो किंवा एखाद्या नव्या पिलाची काळजी घ्यायची जबाबदारी द्यायचो.”
शाळांसोबत त्यांचं काम सुरू झालं २०१४ साली. मसिनागुडी इको नॅचरलिस्ट क्लबने त्यांना बोक्कापुरमच्या सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत पक्ष्यांविषयी बोलण्यासाठी बोलावलं होतं. “त्यानंतर जवळच्या गावांमधल्या किती तरी शाळा मला बोलवू लागल्या,” ते सांगतात.
‘आमच्या बोक्कापुरम गावात सिद्दन नाव
असलेले आम्ही तिघं होतो. त्यातला नेमका कोणता सिद्दन हे ओळखायला लोक म्हणून लागले
‘तो नाही का, कुरुवी सिद्दन – सारखा पक्ष्यांच्या मागे धावणारा पोरगा’,’
‘आमच्या बोक्कापुरम गावात सिद्दन नाव असलेले आम्ही
तिघं होतो. त्यातला नेमका कोणता सिद्दन हे ओळखायला लोक म्हणून लागले ‘तो नाही का,
कुरुवी सिद्दन – सारखा पक्ष्यांच्या मागे धावणारा पोरगा’,’
*****
सिद्दन यांना आठवीत असताना शाळा सोडून आपल्या आईवडलांसोबत शेतात काम करावं लागलं. एकविसाव्या वर्षी त्यांना वन खात्याने बंगल्यांमध्ये राखणदार म्हणून कामावर घेतलं. गावात किंवा शेतात हत्तींची कीही हालचाल दिसली तर लोकांना सतर्क करणे, स्वयंपाकघरात मदत आणि जंगलात तळ उभारण्यासाठी मदत करणे अशी त्यांची कामं होती.
हे काम सुरू केल्यानंतर दोनच वर्षांत त्यांनी ते सोडलं. “तेव्हा माझा पगार होता ६०० रुपये. आणि तो देखील पाच पाच महिने मिळायचा नाही. सोडावं लागली नोकरी,” ते सांगतात. “माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या नसत्या तर मी वनखात्याबरोबर काम केलं असतं. मला ते काम फार आवडलं होतं. मला जंगल सोडवेना त्यामुळे मी फॉरेस्ट गाइड झालो.”
नव्वदचं दशक सरत आलं तेव्हा वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना या भागात पक्ष्यांची गणना करणाऱ्या काही निसर्गसेवकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचं काम एकच, तिथून हत्तींचे कळप जात असतील तर या लोकांना इशारा करायचा. कारण ते म्हणतात, “पक्षीवेड्यांचं लक्ष फक्त पक्ष्यांवर असतं. आपल्या आजूबाजूला काय धोका येऊन ठेपलाय याच्याकडे त्यांचं सुतराम लक्ष नसतं.”


डावीकडेः बांबूच्या बनात पक्ष्यांचा वेध घेणारे सिद्दन. उजवीकडेः नीलगिरीच्या मुदुमलई अभयारण्याच्या जवळच असलेल्या त्यांच्या घराजवळून जात असलेला हत्तींचा कळप
त्या दिवशी त्यांना एक अवचित दृश्य पहायला मिळालं. “मोठीमोठी माणसं एक छोटासा पक्षी दिसला तर चक्क जमिनीवर लोळत होती. ते कोणता पक्षी पाहतायत ते मी जरा नीट पाहिलं तर तो एक पांढऱ्या चोचीचा गोमेट होता.” त्यानंतर सिद्दन यांचं पक्षीप्रेम वाढतच गेलं. त्यांनी तमिळ आणि कन्नडमध्ये या पक्ष्यांना काय म्हणतात ती सगळी नावं शिकून घेतली. काही वर्षांनंतर या भागातले ज्येष्ठ पक्षी निरीक्षक कुट्टप्पन सुदेसन आणि डॅनिएल यांनी सिद्दन यांना स्वतःसोबत घेतलं आणि प्रशिक्षण दिलं.
मुंबईच्या उत्तरेपासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत पसरलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा हा प्रदेश म्हणजे पश्चिम घाट. २०१७ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने प्रकाशित झालेल्या फॉरेस्ट गार्डियन्स इन द वेस्टर्न घाट्स या एका शोधनिबंधानुसार या परिसरात पक्ष्यांच्या ५०८ प्रजाती आढळून येतात. यातल्या किमान १६ प्रजाती फक्त याच परिसरात आढळून येतात. यामध्ये रुफस ब्रेस्टेड लाफिंगथ्रश, नीलगिरीतला रानपारवा, पांढऱ्या पोटाचा शॉर्टविंग आणि रुंद शेपटीचा ग्रासबर्ड, रुफस बॅबलर आणि राखाडी डोक्याचा बुलबुल यांचा समावेश होतो.
अनेक वर्षं तासंतास जंगलात घालवलेले सिद्दन म्हणतात की नेहमी आढळणाऱ्या प्रजाती आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. “यंदाच्या मोसमात मला राखाडी डोक्याचा बुलबुल पहायला मिळालेला नाही. पूर्वी ते अगदी सहज दिसायचे. पण आता मात्र दुर्मिळ होत चालले आहेत.”
*****
जंगलात अचानक ताम्रमुखी टिटवीची शीळ घुमते. इशाराच देत असतो तो कसला तरी.
“हाच इशारा ऐकून वीरप्पन इतकी वर्षं लपून राहू शकला होता,” एन. सिवन दबक्या आवाजात सांगतात. ते सिद्दन यांचे मित्र असून पक्षी तज्ज्ञ आहेत. वन्यप्राण्यांची शिकार, चंदनचोरी आणि इतरही अनेक गुन्ह्यांसाठी वीरप्पनचा शोध सुरू होता पण स्थानिकांच्या मते “या आलकाटी पारवई [लोकांना इशारा देणारा पक्षी]ची शीळ ऐकूनच” तो सत्यमंगलमच्या जंगलात पोलिसांपासून इतका काळा लपून राहू शकला.


डावीकडेः पारवई म्हणजे माळटिटवी आलकाटीची शीळ म्हणजे शिकारी प्राणी आजूबाजूला असल्याचा इतर पशुपक्ष्यांना दिलेला इशाराच. उजवीकडेः एन. सिवन सांगतात की या पक्ष्याच्या ओरडण्याने लोक येत असल्याचं शिकाऱ्यांनाही समजतं


बोक्कापुरमच्या बांबू बनात पडलेल्या लेंड्यांवरून सिद्दन घुबडाचा शोध घेत आहेत
“जंगलात बाहेरचं कुणी किंवा शिकारी दिसले तर टिटव्या जोरजोरात ओरडू लागतात. त्यानंतर झुडपांच्या टोकावर बसून रानभाई शिकारी प्राण्याचा पाठलाग करतात आणि तो जसजसा पुढे जातो तसं ओरडू लागतात,” एन. सिवन सांगतात. एखादा जरी पक्षी दिसला तरी ते त्यांच्याकडच्या वहीत त्याची नोंद करतात. “एक वर्षभर आमचं असं प्रशिक्षण सुरू होतं,” पन्नाशीचे सिवन सांगतात. पक्ष्यांची नावं लक्षात ठेवायला त्यांना जड गेलं पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. “आमच्यासाठी हे पक्षी महत्त्वाचे आहेत. मला जमेल हे माहितीये,” ते म्हणतात.
नव्वदच्याच दशकात सिद्दन आणि सिवन यांना बोक्कापुरमजवळच्या एका खाजगी रिसॉर्टमध्ये ट्रेकिंगसाठी वाटाड्याचं काम मिळालं. आणि मग जगभरातल्या पक्षीप्रेमींशी त्यांचा संपर्क येऊ लागला आणि त्यांचा सहवासही मिळाला.
*****
सिद्दन कधी मसिनागुडीच्या बाजारपेठेतून चालत जात असतात तेव्हा त्यांना अनेक तरुण मुलं “हॅलो सर!” म्हणून हाक मारतात. त्यांचे बहुतेक विद्यार्थी आदिवासी आणि दलित असून मुदुमलईच्या आसपास राहणारे आहेत.


डावीकडेः सिद्दन आपल्या घरच्यांसोबत बोक्कापुरममध्ये आपल्या घराबाहेर कट्ट्यावर बसले आहेत. त्यांची सर्वात धाकटी मुलगी अनुश्री हिलासुद्धा पक्ष्यांबद्दल रस आहे. ती म्हणते, ‘मला बुलबुल पक्ष्याचं घरटं दिसलं तेव्हा मला इतकं भारी वाटलं.’ उजवीकडेः एस. राजकुमार, वय ३३ बी. सिद्दन यांना घरी भेटायला आले आहेत
“आमच्या चौघांच्या कुटुंबात आमची आई ही एकटीच कमावणारी व्यक्ती होती. मला कोटागिरीत शाळेत पाठवणं तिला काही परवडणारं नव्हतं,” राजकुमार सांगतात. इरुला असलेले राजकुमार सिद्दन यांचेच विद्यार्थी आहेत. मग त्यांना शाळा सोडावी लागली. ते बफर क्षेत्रात पायी फिरत रहायचे.
एक दिवस सिद्दन यांनी त्यांना एका सफारीवर सोबत यायला सांगितलं. “त्यांना काम करत असताना पाहिलं मी आणि मला या क्षेत्राची जबरदस्त ओढ निर्माण झाली. मग हळूहळू मी पण ट्रेकिंग आणि सफारीसोबत वाटाड्या म्हणून जाऊ लागलो,” राजकुमार सांगतात.
*****
या भागात दारूची समस्या जटिल होत चालली आहे. (वाचाः नीलगिरीतलं वारसा हक्काचं कुपोषण ). सिद्दन म्हणतात आदिवासींच्या तरुण पिढ्या त्यांच्या व्यवसायात आल्या तर बाटलीपासून नक्कीच दूर राहू शकतील. “दारूचं व्यसन लागण्याचं [एक] कारण म्हणजे जेव्हा मुलांची शाळा सुटते तेव्हा त्यांना करण्यासाठी दुसरं काहीही नसतं. नोकरीच्या चांगल्या संधी नसतात. मग काय ते प्यायला लागतात.”


डावीकडेः बी. सिद्दन आपल्याकडचा पक्षी आणि वन्यजीवांवरचा पुस्तकांचा संग्रह दाखवतात. उजवीकडेः गुडलुर तालुक्यातल्या सिंगारा गावामध्ये कुंपणाच्या तारेवर बसलेला कोतवाल पक्षी
सिद्दन यांचं आता एकच ध्येय आहे. गावातल्या स्थानिक तरुणांना जंगलामध्ये रमवायचं. जेणेकरून ते नशेच्या आहारी जाणार नाहीत. “मी थोडासा ‘ड्राँगोसारखा आहे,” दूरच्या कोतवाल पक्ष्याकडे निर्देश करत ते म्हणतात. “ते आकाराने अगदी छोटेसे असतात, पण शिकारी पक्ष्यांशी भांडण करण्याचं धाडस फक्त कोतवालच करू शकतो.”