“एखाद्या शेतकऱ्याकडची ५०० ची नोट कायम मळालेली आणि चुरगळलेली असते. किमान ती घड्या घातलेली तरी असतेच,” पी उमेश सांगतात. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त ताडीमर्री मंडलात त्यांचा खतविक्रीचा धंदा आहे.
अगदी आता आतापर्यंत उमेश यांनी त्याच्या गिऱ्हाइकांकडे म्हणजेच ताडीमर्री गावातल्या खतं आणि बियाणं विकत घ्यायला येणाऱ्या शेतकऱ्यांकडे ५०० ची कोरी करकरीत नोट जवळजवळ कधीही पाहिलेली नाही. त्यामुळेच जेव्हा २३ नोव्हेंबर रोजी एका शेतकऱ्याने त्याच्या खताचे उसने फेडण्यासाठी ५०० रुपयांच्या कोऱ्या नोटा दिल्या तेव्हा त्यांना एकदम शंका आली. त्या नोटा २०१४ साली छापलेल्या होत्या.
“जर का या नोटा दोन वर्षं चलनात आहेत तर त्या इतक्या कोऱ्या असणं अशक्य आहे,” त्यांनी अर्थ लावला. उमेश यांना पहिली शंका आली की त्या नकली नोटा असाव्यात. ताडीमर्रीमध्ये ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीआधी नकली नोटा क्वचित कधी तरी निघायच्या तरीही त्यांच्या दुकानात येणाऱ्या काही जणांनी त्यांना अशा नोटा दिलेल्या होत्या. म्हणून मग उमेश यांनी त्या कोऱ्या करकरीत नोटा त्याच्या नोटा मोजण्याच्या यंत्रात टाकल्या. त्या नकली नव्हत्या.

२३ नोव्हेंबर रोजी एका शेतकऱ्याने त्याच्या खताचे उसने फेडण्यासाठी ५०० रुपयांच्या चार कोऱ्या नोटा दिल्या तेव्हा खतविक्रेते पी उमेश यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
त्यांना आणखी एक धक्का बसला. त्यांच्या लक्षात आलं की या नोटांचे क्रमांक ओळीत होते – जणू काही त्या आताच बँकेतून काढल्या असाव्यात. मग त्यांनी असा निष्कर्ष काढला की दडवून ठेवलेला, न वापरलेला पैसा आता बाहेर निघाला असणार. ताडीमर्री मंडळातल्या ११ गावातल्या शेतकऱ्यांकडून पिकं विकत घेण्यासाठी अनंतपूर किंवा आसपासच्या जिल्ह्यातल्या किंवा तमिळ नाडूच्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचा वापर होत असणार असा त्यांना संशय आहे. ताडीमर्रीची लोकसंख्या ३२,३८५ आहे, हे पूर्णपणे ग्रामीण मंडळ आहे आणि साक्षरतेची पातळी बरीच कमी आहे.
उमेशसारख्या काहींचा अपवाद वगळता ताडीमर्रीतल्या बहुतेकांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. उमेश जुन्या नोटा स्वीकारतायत (आणि त्याचं वैध उत्पन्न म्हणून त्यांच्या बँक खात्यात जमा करतायत) म्हणून इथले शेतकरी त्यांच्याकडची खताची उसनवारी पटापट फेडून टाकतायत.
दरम्यान, खताच्या दुकानापासून हाकेच्या अंतरावर असलेली ताडीमर्रीतली दारूच्या दुकानांचा धंदाही तेजीत आहे – कारण ही दुकानंदेखील, अधिकृत असोत किंवा अनधिकृत, जुन्या नोटा स्वीकारतायत.
“हे बघा, आम्हाला पन्नासाची नोट परत मिळालीये,” नशेत असलेले चिना गंगम्मा आम्हाला नोट दाखवतात. आताच त्यांनी – इतर ८ बेरोजगार शेतमजुरांमध्ये मिळून - दारू विकत घेण्यासाठी त्यांच्याकडची १००० ची नोट मोडलीये. पाचशे रुपयाची नोट वापरायची असेल तर किमान ४०० रुपयाची दारू विकत घ्यायलाच लागते.
ताडीमर्रीतल्या अनेकांसाठी जुन्या नोटा बदलण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे चक्क दारू विकत घ्यायची. “मी रोज [काम संपल्यानंतर] एक क्वार्टर प्यायचो,” शेतात नांगरटीसाठी ट्रॅक्टर चालवणारे नागभूषणम सांगतात. इथे देशी दारुची एक क्वार्टर रु. ६०-८० ला मिळते. नागभूषणम सध्या त्यांच्या रोजच्या कोट्यापेक्षा चार-पाच पट जास्त पितायत. त्यांना रोज ५०० रुपये रोजगार मिळतो – पण सध्या त्यांना काम नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडची सगळी कमाई जुन्या नोटांमध्ये आहे. आणि ती ते या दारूच्या दुकानात खर्च करतात.
नागभूषणम यांच्याप्रमाणेच ताडीमर्रीतल्या शेतमजुरांना सध्या काम मिळणं मुश्किल झालं आहे. अनंतपूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे भुईमुगाचं पीक फारसं आलेलं नाही. अनेक शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत आणि शेतमजुरांचे कामाचे दिवसही कमी झाले आहेत.
ताडीमर्री मंडळातले शेतकरी दिवाळीनंतर, नोव्हेंबरच्या सुमारास भुईमुगाची काढणी करतात आणि डिसेंबरपर्यंत विक्री करतात. शेतात मजुरी करणाऱ्यांना रोज किंवा आठवड्याला मजुरी देण्याची पद्धत इथे नाही. शेतमजुरांचा पगार पिकाची काढणी झाल्यानंतरच दिला जातो. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम हाती लागते.
याच काळात शेतकरी एकमेकांकडून २ टक्के महिना व्याजाने घेतलेले हातउसने पैसेदेखील फेडत असतात. “आता जर का आम्ही पैसे परत केले नाहीत तर त्याच्यावरचं व्याज वाढत जाणार,” टी ब्रह्मानंद रेड्डी सांगतात. ते शेतकरी आहेत आणि त्यांची ताडीमर्रीत १६ एकर जमीन आहे.
रेड्डींनी त्यांचा भुईमूग नोटाबंदीनंतर एका आठवड्यानी विकला आणि त्यांना इतर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये पैसे दिले. त्यांनी हे पैसे त्यांच्या खात्यातही भरले पण आता मजुरांना द्यायला आणि कर्जं फेडण्यासाठी त्यांना नव्या नोटांमध्ये मोठी रक्कम लागणार आहे – आणि आता ताडीमर्री मंडळातल्या तीनही बँकांमध्ये नव्या नोटांचा तुटवडा आहे.

ताडीमर्रीतल्या एका बँकेबाहेर जमलेले शेतकरीः टी ब्रह्मानंद रेड्डींसारख्या इतर शेतकऱ्यांनाही मजुरांचे पगार करायला आणि कर्जं चुकवायला नव्या नोटांमध्ये मोठी रक्कम लागणार आहे – आणि इथल्या बँकांमध्ये या नोटांचा तुटवडा आहे
रेड्डी आणि इतर शेतकरी पीक काढणीच्या काळात प्रत्येक शेतमजुराला २०० रुपये रोज देतात. कधी कधी कामाप्रमाणे आणि मजुरांच्या उपलब्धतेप्रमाणे हा दर ४५० रुपये रोज इतका वाढू शकतो.
त्यामुळे आता काम कमी झालंय आणि चलनात असलेल्या वैध नोटा जवळ जवळ गायबच आहेत त्यामुळे मजुरांचे हाल होत आहेत. “आम्हाला जवळ जवळ महिनाभर मजुरी मिळालेली नाही,” शेतमजूर असलेले, आणि त्या दिवशी काहीही काम न मिळालेले नारायण स्वामी तक्रार मांडतात.
“मग, अधून मधून एखादा नेशत असणारा [किंवा हातघाईला आलेला] मजूर पैसे मागू लागला की आम्ही त्याला आमचं नाक वाचवण्यासाठी ५०० आणि १००० च्या नोटांमध्ये मजुरी देऊन टाकतो,” २२ एकराचे मालक असणारे, भुईमुगाची शेती करणारे व्ही सुधाकर सांगतात.
बहुतेक शेतमजुरांना काम शोधायचं सोडून बँकांपुढच्या लांबच्या लांब रांगांमध्ये उभं राहण परवडणारं नाही. अनेकांचं तर बँकेत खातंही नाहीये. मग ज्यांना काहीही काम मिळत नाही ते त्यांच्याकडच्या काही ५०० आणि १००० च्या नोटा घेतात आणि त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी पोचतात, जिथे अजूनही या नोटा स्वीकारल्या जात आहेतः ते म्हणजे गावातलं दारूचं दुकान.

ताडीमर्रीतल्या स्टेट बँक ऑफ इंडियासमोरच्या वेटोळ्या आणि लांबच लांब रांगा - बहुतेक शेतमजुरांना काम शोधायचं सोडून बँकांपुढच्या रांगांमध्ये उभं राहणं परवडणारं नाही. अनेकांचं तर बँकेत खातंही नाहीये
“[रानातल्या अंगमेहनतीच्या कामामुळे] वेदना जाणवू नयेत यासाठी आम्हाला पिणं भाग आहे,” स्वामी सांगतात, सकाळी १० वाजताच त्यांनी काही घोट रिचवलेले आहेत. अनेकदा, शेतकरीच मजुरांना ही दारूची सवय लावतात – जास्त वेगाने काम व्हावं यासाठी हे करावंच लागतं असं त्यांना वाटतं.
“आम्ही त्यांना रोज ३०-४० रुपये देतो, त्यांची मजुरी सोडून [ती हंगामाच्या शेवटी दिली जाते], जेणेकरून त्यांना रोजचा एक पेग [दारूचा] मारता यावा,” सुधाकर सांगतात. या परस्पर सांमजस्यामुळे मजुराचा त्याच्या मालकावर विश्वास जडतो आणि पगार मिळत नसला तरी तो दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर हजर राहतो.
दरम्यान, ताडीमर्रीतले मजूर, जे एरवी दिवसभराच्या कामानंतर दारू प्यायचे ते आता काम मिळालं नाही की दिवसभरात कधीही दारुच्या दुकानाच्या दिशेने जाऊ लागले आहेत – आणि त्यांच्याकडच्या बाकी ५०० रुपयाच्या नोटा या कामी खर्च होतायत.
अनुवाद - मेधा काळे