ते इथवर आले. त्यांनी मोर्चा काढला. त्यांनी घोषणाही दिल्या. देशाच्या संसदेच्या अगदी उंबऱ्यावर. राजकीय नेत्यांना येऊन त्यांचं म्हणणं ऐकायला त्यांनी भाग पाडलं. आणि मग, ते परतले. ताठ मानेने.
पण हे सोपं नव्हतं. ३० नोव्हेंबरच्या सकाळी तारा देवी जाग्या झाल्या तेव्हा त्यांची हाडं कुरकुरत होती. “खुल्या मैदानात [रामलीला मैदान] जमिनीवर झोपल्यामुळे माझं सगळं अंग ताठरलंय,” त्या म्हणतात. आणि त्या आधी त्यांनी वाराणसी ते दिल्ली असा १४ तासांचा प्रवास केलाय. “माझे गरम कपडे फाटलेत. आणि माझ्यापाशी जाड कांबळदेखील नाही,” त्या म्हणतात. सकाळी ८ वाजता स्वयंसेवकांनी नाश्त्यासाठी दिलेली खिचडी खाल्ल्यानंतर त्यांनी सर्वात जास्त मागणी असलेला स्टॉल गाठला – डॉक्टरांचा. सेवाभावी डॉक्टरांचा हा गट येणाऱ्या प्रत्येकाच्या दुखण्यावर इलाज करतोय.
मध्य दिल्लीतल्या रामलीला मैदानातल्या हजारो
शेतकऱ्यांपैकी अनेकांनी डॉक्टरांकडून तपासून गोळ्या औषधं घेतली आहेत. २८
नोव्हेंबरच्या रात्री जेव्हा तिथे उभारलेल्या मंडपात वीज नव्हती, काही शेतकऱ्यांनी
दोन मोटरसायकल तिथे उभ्या केल्या आणि त्याचे दिवे सुरू ठेवून उजेड केला. “यातल्या
बहुतेकांना सर्दी, खोकला आणि अंगदुखीचा त्रास होतोय,” समोरच्या शेतकऱ्यावरून नजरही
न हटवता डॉ. के के मित्तल सांगतात. “त्यांच्या खुल्या रानांमधून ते दिल्लीच्या या
प्रदूषित हवेमध्ये आलेत.”



स्वयंसेवकांनी दिलेला नाश्ता केल्यानंतर तारा देवींनी (डावीकडे) रामलीला मैदानात डॉक्टरांच्या स्टॉलवर जाऊन डॉ. मित्तल यांच्याकडून औषधं घेतली
तारा देवी सांगतात की त्यांचे हात पाय दुखतायत, पोट दुखतंय आणि मळमळल्यासारखं होतंय. डॉ. मित्तल त्यांच्याकडची औषधं पाहतात आणि त्यांना काही गोळ्या देतात. “मला दिवसभर ठीक वाटायला पाहिजे ना,” त्या म्हणतात.
दरम्यान, अजून काही शेतकरी रामलीला मैदानात
पोचतात, काहींनी ढोलावर ताल धरलाय, काही गाणी गातायत तर काही पारंपरिक नृत्य
करतायत. आतापर्यंत ५०,००० जण दाखल झालेत, संयोजक सांगतात. वातावरणात वेगळीच धुंदी
आहे.
देशातल्या १५०-२०० शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय
किसान संघर्ष समन्वय समितीने देशभरातल्या शेतकऱ्यांना संसदेवर मोर्चा नेण्यासाठी
संघटित केलंय, त्यांची मागणी आहे की देशाच्या शेतीवरील अरिष्टावर चर्चा करण्यासाठी
संसदेचं २१ दिवसांचं एक विशेष सत्र आयोजित करण्यात यावं. १९९५ ते २०१५ या काळात या
अरिष्टाचा परिणाम म्हणून ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
देशाच्या १०० हून अधिक जिल्ह्यातून आपल्या
रंगीबेरंगी पेहरावात शेतकरी इथे दाखल झालेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लाल
टी-शर्ट घातलेत, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या हातात पिवळे झेंडे आहेत तर मध्य
प्रदेशहून आलेल्यांच्या अंगी जांभळे टी-शर्ट दिसतायत, तमिळ नाडूच्या शेतकऱ्यांचे
हिरवे कपडे वेगळेच. रामलीला मैदान म्हणजे जणू आशेचं एक इंद्रधनुष्य वाटावं.


राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींची अंमल बजावणी आणि कर्जमुक्ती ही त्यांची प्रमुख मागणी असली तरी प्रत्येक प्रदेशातल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्राधान्यक्रम वेगळे आहेत
पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी गटांची समस्या म्हणजे सिंचनाच्या सुविधांचा अभाव, पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि अन्याय्य कृषी विमा धोरण. राज्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांची मागणी आहे पूर्वापार कसत असलेल्या जमिनीचे अधिकार त्यांना देणाऱ्या वन हक्क कायद्याची अंमलबजावणी.
पंजाबहून आलेल्या शेतकऱ्यांसाठी भात आणि गव्हासाठी
किमान हमीभाव ही महत्त्वाची मागणी आहे. पतियाळा शहराच्या जवळच राहणारे जिलतार सिंग
म्हणतात की डिझेलचे, खतं आणि कीटकनाशकांच्या किंमती वाढल्याने शेतीतला खर्च वाढला
आहे पण त्या मानाने शेतमालाला मिळणारा भाव काही वाढलेला नाही. “गेल्या २० वर्षांत
देशातल्या बाकी लोकांचं जीवनमान जसं सुधारलं, त्या वेगाने शेतकऱ्याचं जगणं बदललंय
का?” रामलीला मैदानापासून चार किलोमीटर अतरावर संसद मार्गच्या दिशेने शेतकऱ्यांचे
जथ्थे निघत असताना ते विचारतात. “मोदी सरकारने कर्जमाफीचा वायदा केला, पण ते काही
झालं नाही. पंजाबमधलं काँग्रेस सरकारही ते करत नाहीये.”

आंदोलकांनी उभारलेल्या झेंडे आणि फलकांमुळे बॅरिकेड आणि पोलिसांच्या मधोमध रस्त्याची एक बाजू झाकून गेलीये. काही शेतकरी स्त्रिया आत्महत्या केलेल्या आपल्या पतीचे फोटो घेऊन आल्या आहेत. घोषणाबाजी जोरात चालू आहे, पुन्हा पुन्हा घोषणा दुमदुमतायत. दुपारचे १२ वाजलेत, शेतकरी संसद मार्गावर पोचतात. तिथे सर्वांना संबोधित करण्यासाठी शेतकरी नेत्यांसाठी मंच उभारण्यात आला आहे.
काही शेतकरी तिथेच सतरंज्यांवर बसलेत तर काहींनी खाली पेपर टाकून बसकण मारलीये. जे सकाळी पोचलेत त्यांनी सोबत पेपरात चटणी-भाकर गुंडाळून आणलीये. जे आदल्या दिवसापासून दिल्लीत आहेत, ते आसपासच्या ठेल्यावरच्या खाण्याचा आस्वाद घ्यायला गेलेत.
दुपारच्या ४ वाजेपर्यंत भाषणं होतात. देशभरातले अनेक नावाजलेले शेतकरी नेते आंदोलकांना संबोधित करतात. जसजशी दुपार कलू लागते, तसं विरोधी पक्षातले अनेक राजकीय नेते मंचावर यायला लागतात. नोंद घ्यावी असे काही म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे शरद यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. सर्व जण कृषी संकटाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून सध्याच्या सरकारवर टीकेची झोड उठवतात आणि या खुल्या मंचावरून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवतात.


मु. संसद मार्गः दिल्लीवारी सार्थकी लागली अशीच काही शेतकऱ्यांची भावना आहे. बिहारच्या कौशल्या देवी मोर्चाची सांगता झाल्यावर आइसक्रीमचा आनंद लुटतायत
काही शेतकरी जिवाचा कान करून भाषणं ऐकतायत, तर काही जण तीन दिवसांच्या थकव्यानंतर जरा आराम करतायत. संध्याकाळपर्यंत सगळे कार्यक्रम उरकतात. शेतकरी आपापली बोचकी आणि बॅगा उचलून लोंबकळत आपापल्या मुक्कामी जाण्यासाठी तयार होतात.
“बस्स? इतकंच?” मोर्चात आलेले काही वार्ताहर
विचारतात. पण शेतकऱ्यांच्या मते मात्र ही दिल्लीवारी सार्थकी लागली आहे.
बिहारमधल्या नउवा गावच्या सरपंच असणाऱ्या कौशल्या देवी मोर्चातून मनात नवी उमेद
घेऊन परत जाणार आहेत. “राजकारण्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय, पत्रकारांनी आमच्या
मोर्चाच्या बातम्या सुदूर पोचवल्यात आणि इतके सारे शेतकरी इथपर्यंत आलेत,” मोर्चा
संपल्यावर आइस्क्रीमचा आनंद घेत त्या म्हणतात. “तुम्ही एकटेच हाल काढत नाही आहात
तर तुमचं दुःख भोगणारे तुमच्यासारखे हजारो आहेत हे पाहूनदेखील मनाला उभारी येते.”
अनुवादः मेधा काळे