सकाळचे ११ वाजलेत. किल्लाबंदर गावात शिरता शिरताच जी विहीर आहे तिथे सुमारे २० मुली आणि बाया जमल्या आहेत. “विहिरीच्या तळाला कोपऱ्यात थोडंफार पाणी आहे [उन्हाळा आहे]. एक कळशी भरायला अर्धा तास लागतो,” किल्लाबंदरची रहिवासी असणारी नीलम मानभात सांगते. मुंबई शहराच्या उत्तरेला वसईच्या किल्ल्याला लागून असणारं किल्लाबंदर मच्छिमारांचं गाव आहे.
विहिरीपाशी गोळा झालेल्या मुली आणि बायांसाठी तास न् तास पाण्याच्या रांगेत घालवणं नित्याचंच झालं आहे. काही तर अगदी चार वर्षाच्या चिमुकल्या आहेत. सार्वजनिक जागेवरची विहीर हाच काय तो गावाच्या जवळ असणारा पाण्याचा स्रोत. बायांच्या सांगण्याप्रमाणे, नगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा पुरेसाही नाही आणि भरवशाचा तर नाहीच. किल्लाबंदरची बरीच कुटुंबं याच विहीरीवर अवलंबून असल्यामुळे तिचं पाणीही पुरेनासं झालंय, खास करून उन्हाळ्यात. या मुली आणि बायांना विहिरीचा तळ अक्षरशः खरवडून पाणी भरावं लागतं.
पालघर जिल्ह्यातला वसई तालुका ६०० चौ.कि.मी च्या क्षेत्रावर पसरला आहे आणि या वसई शहराची लोकसंख्या सुमारे १३ लाख आहे (जनगणना, २०१३). खरं तर वसई विरार नगरपालिकेने या दोन्ही शहरांना आणि शंभरहून अधिक गाव-पाड्यांना पुरेसा पाणी पुरवठा केला पाहिजे. पण तसं होत नाही.
ते अजूनही पाण्यासाठी विहिरी आणि टँकरवर अवलंबून आहेत, आणि पालघरचं पाणी मात्र मुंबई महानगराला वळवण्यात आलं आहे ही बाब किल्लाबंदरवासीयांना काही रुचलेली नाही. “तिला काही हे असं सगळं करावं लागत नाय,” प्रिया घाट्या माझ्याकडे बोट दाखवत दुसऱ्या एका बाईला म्हणते. मग माझ्याकडे होरा वळवत ती मला विचारते, “तुझ्याकडे मशीन असणार (कपडे धुवायला). तुला हे सगळं कशाला करायला लागेल? पाणी आम्हाला नाय, तुम्हाला मिळतं.”
१०९ एकरावर पसरलेल्या वसई किल्ल्यात आणि आसपासच्या परिसरात ७५ हून अधिक विहिरी आहेत. “यातल्या बहुतेक सगळ्या बंद आहेत,” भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संवर्धन सहाय्यक म्हणून काम करणारे कैलाश शिंदे सांगतात. “फक्त ५-६ विहिरी चालू आहेत.”

शिल्पा अलिबाग (डावीकडे) आणि जोसेफीन मस्तान (उजवीकडे) वसई किल्ल्याच्या बालेकिल्ला परिसरातल्या विहिरीवर कपडे धुतायत. ढीगभर कपडे, साबुचुरा आणि विहिरीतून पाणी काढण्यासाठी वरून अर्धा भाग कापलेले दोरी बांधलेले प्लास्टिकचे कॅन असं सगळं घेऊन त्या येतात. “आम्ही रोज आमची बाकीची कामं आटपली की इथे येतो... हो, अगदी रोज. आम्हाला काय त्यातनं सुट्टी नाय!” शिल्पा बोलते, हसत हसत.

जवळच्याच एका विहिरीवरही बाया आणि छोट्या मुली या प्लास्टिकच्या कॅननी पाणी शेंदतायत आणि स्टीलच्या किंवा तांब्याच्या कळश्यांमध्ये भरतायत. ही विहीर १६ व्या शतकात किल्ल्याची उभारणी झाली त्याच काळात बांधलेली आहे.

“ही विहीर ४०० वर्षं जुनी आहे. काही दुरुस्ती करायची असली तर आम्हीच पैसे गोळा करतो,” विहिरीपासच्या बस स्टॉपवर थांबलेली, माशाच्या पाटीवर बसलेली रेजिना जंगली सांगते. “गावात जागोजागी नळ आहेत, पण त्यांचा काय उपयोग नाय. नळाला (नगरपालिकेकडून) एक आड एक दिवस फक्त दीड तास पाणी येतं. आणि गावातल्या टाकीत पुरेसं पाणी आहे का हे बघण्याची काय ते तसदी घेत नाहीत,” नीलम मानभात पुस्ती जोडते.

त्यामुळे रोज घरासाठी लागणारं पाणी भरण्यात तास ने तास जातात. काही बाया तर त्यांना त्यांच्या वाट्याचं पाणी मिळावं रात्रीच्या अंधारात विहिरीवर येतात – आणि मग पाण्याचे जड हंडे डोक्यावर घेऊन घरी जातात. विविध आकाराच्या हंडे आणि कळश्यांमध्ये साधारणपणे ५ ते १५ लिटर पाणी मावतं, मोठ्या कॅन्समध्ये ५० लिटरपर्यंत पाणी मावू शकतं.

“आम्ही मध्यरात्री २ वाजताच उठून पाणी भरतो. तेव्हा जास्त गर्दी नसते. काय करणार? आम्हाला पाणी लागणारच ना,” सुनीता मोझेस इटुर (डावीकडे) सांगते. “तुला पाणी मिळालं तर मला मिळायचं नाय, काहींना मिळतं, काहींना नाय. नगरपालिकेच्या पाण्याचा काय भरवसा नाय. किती वर्षं झाली आमच्याकडे नळजोड आलाय, पाणी काय अजून येईना.”
अनिता आणि प्रिसिला पक्या तशा नशीबवान म्हणायच्या. कारण त्यांच्या घरी नळाचं पाणी येतं. “आम्हाला फक्त पिण्यासाठीच [विहिरीचं] पाणी वापरावं लागतं,” प्रिसिला सांगते. “आम्ही काय नगरपालिकेचं पाणी पीत नाय.” तेवढं पाणी विहिरीवरनं भरायचं म्हणजेदेखील कष्टाचंच आहे. “पाणी इतकं कमी आहे की दोन हंडे भरायला तासभर लागतो,” हाताने हंड्याचा आकार दाखवत ती सांगते.
विहिरीवर दिवस रात्र पाणी भरलं जात असल्यामुळे विहीर भरायला आणि पाणी जमिनीत मुरायला वेळच मिळत नाही. अनेकदा गढूळ आणि माती, खडे असणारं पाणीही भरलं जातं. त्यामुळे मग हंड्यात भरताना मुली पाण गाळून भरतात (उजवीकडे).

जवळच्याच दुसऱ्या एका विहिरीपाशी बाया कपडे धुतायत. यावेळचा उन्हाळा खूपच कडक असल्याने विहिरीचं पाणी लवकर आटलं. लहान लहान मुली आयांना पाणी भरायला तर मदत करतातच पण घरकामातही हातभार लावतात. “ती तर अडीच वर्षाची असल्यापासून कपडे धुऊ लागलीये,” आपली मुलगी नेरिसाबद्दल बोलणाऱ्या प्रिया घाट्याच्या आवाजातला अभिमान लपत नाही. “बघ, ती तिचे कपड कसे धुतीये. या जुलैत चार पूर्ण होणार ती.”

इथे नेरिसा एकटीच नाहीये. पाण्याची गरज इतकी आहे की घरातल्या अगदी लहानग्यांना – बहुतेक वेळा मुलींनाच – रोजच हे कष्ट सोसावे लागतात.

चौथीतली वेनेसा आणि तिची मैत्रीण सानिया रोज सकाळी किल्लाबंदरच्या विहिरीवर जातात. “मी सात वाजता उठते,” ११ वर्षाची सानिया भिमावाघरी सांगते. “१०-१०.३० पर्यंत पाणी भरते आणि मग दुपारी शाळेत जाते.” सानियाच्या घरी तिचे आई-वडील, मोठी बहीण आणि धाकटे तिघं भाऊ आहेत. तिचे आई वडील कामासाठी बाहेर जातात – आई कपडे विकते तर वडील मच्छिमार आहेत. मग तिच्याहून वर्षानेच मोठी असलेली तिची बहीण सगळा स्वयंपाक उरकते आणि सानिया पाणी भरण्याचं काम करते. किल्लाबंदरच्या अगदी आतल्या बाजूला असणारं घर आणि किल्ल्यावरची विहीर अशा असंख्य खेपा तिला कराव्या लागतात. तिला एका वेळी दोनच हंडे आणता येतात, त्यामुळे मग या खेपा वाढतात. वरच्या छायाचित्रातल्या हातगाड्या काही जणांनी खास पाण्यासाठी भाड्याने घेतल्या आहेत. त्यात सानियाच्या घरचे मात्र नाहीयेत.

काही कुटुंबं दिवसाला लागतं त्यापेक्षा जास्त पाणी भरून ठेवतात. मोठ्या निळ्या कॅन्समध्ये (याला बोलीभाषेत ‘कॅण्ड’ असा शब्द पडला आहे.) या कॅन्सवर प्रत्येक कुटुंबाच्या नावाची आद्याक्षरं रंगवलेली असतात. रिक्षा येईपर्यंत हे कॅन विहिरीपाशी आरामात ठेवलेले असतात.

“आता भूक लागलीये. त्यामुळे आम्ही घरी जाऊन काही तरी खाऊ. नंतर पाण्याला परत येऊ,” वेनेसा मला सांगते आणि तिच्या घराच्या दिशेने एका अरुंद बोळात धूम ठोकते. मी सानियाच्या पाठोपाठ तिच्या घरी जाते. तिचं घर पहिल्या मजल्यावर आहे. सानिया जवळ जवळ पळतच जिने चढून जाते, तेही डोक्यावरच्या हंड्यांमधलं थेंबभरही पाणी न सांडता.
फोटोः संयुक्ता शास्त्री
अनुवादः मेधा काळे