बिहारच्या उत्तरेकडच्या सहरसा जिल्ह्याच्या सखल भागातल्या रहिवासी सातत्याने येणाऱ्या पुराशी ताळमेळ साधत शेती करत आहेत – उन्हाळ्यात येणाऱ्या भाताचं वाण गरमा धान घेऊन. हे वाण पूर्वापारपणे सखल भागांमध्ये, नद्यांच्या खोऱ्यात जिथे पावसाळ्याचं पाणी साचून राहतं आणि त्याचा निचरा होत नाही अशा भागात घेतलं जातं.
बांध बंदिस्ती करून पुराचं पाणी साचलेल्या जमिनीची उत्पादकता वाढावी या उद्देशाने शेतकऱ्यांनी उन्हाळी भाताच्या या वाणाला पसंती दिली कारण त्याचा उतारा जास्त पडतो. गरमा धान फेब्रुवारीत पेरतात आणि मे महिन्यामध्ये पीक कापणीला येतं. रानात काही नसतं तेव्हा घरात खायला दाणा आणि हातात पैसा दोन्हीची बेगमी होते.

४५ वर्षीय लक्ष्मी उन्हाळ्यात विनोदजींच्या शेतात काम करतायत. एक आठवडाभर त्यांनी पाणी साचलेल्या भागातून जलपर्णी काढून टाकायचं काम केलंय. अर्ध्या दिवसाच्या कामासाठी त्यांना ६० रुपये मजुरी मिळालीये. त्या सांगतात की कधी कधी तर त्यांना हे सगळं निष्फळ वाटतं कारण महिन्याभरातच सगळी मेहनत पाण्यात जाते

सहरसाचा बराच भाग कायमच पाण्याखाली असतो, त्यामुळे वर्षभर तिथे जलपर्णी मोकाट वाढते

पाऊस, नद्या आणि पुराबद्दल विनोद यादव आमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलले. हे सगळं येणार आणि जाणार, ते म्हणतात, आपला दिवसाचं नियोजन पाण्याच्या भोवती ठरवायचं
या फिल्मचं चित्रीकरण जुलै ते सप्टेंबर २०१५ दरम्यान करण्यात आलं. सायंतनी पालचौधुरीच्या २०१५ पारी फेलोशिपअंतर्गत ही फिल्म तयार करण्यात आली.
कॅमेरा व संकलन संबित दत्तचौधुरी याने केलं आहे. स्वयंभू छायाचित्रकार असलेला संबित गेल्या दोन वर्षांत शेती, सामुदायिक आरोग्य आणि शिक्षणविषयक कामामध्ये सहभागी झाला आहे.
अनुवादः मेधा काळे