चमनी मीना यांना आपलं वय नीटसं आठवत नाही, पण अन्नाला पूर्वी चांगली चव होती, हे मात्र त्यांना चांगलंच आठवतं: "सगळी चव बदलली आता. आता पूर्वीसारखा स्वाद येत नाही. देशी बीच राहिलं नाहीये. वेगवेगळं वाण मिळणं तर मुश्किलच होऊन बसलंय."
राजस्थानमधील उदयपूर शहराच्या वेशीला लागून असलेल्या घाटी गावात राहणाऱ्या चमनीबाई, ज्यांच्या मते त्यांचं वय ८० च्या दरम्यान असावं, लहान असल्यापासून बी साठवतायत. चमनीबाईंना त्यांनी त्यांच्या नवऱ्यासोबत मिळून घर कसं बांधलं आणि शेती कशी सुरु केली, निव्वळ उदरनिर्वाहासाठी किती कष्ट उपसावे लागायचे, हे आठवतं. तरी, त्या म्हणतात, त्यांच्या तरुणपणी जीवन आणि जेवण दोन्हीही चांगले होतं.

गावरान मोहरीचं बी
कित्येक वर्षं चमनीबाई आणि त्यांचे कुटुंबीय डझनभर स्थानिक वाण जतन करीत आले आहेत. त्यांनी आपलं ज्ञान आता आपल्या सुनांकडे सोपवलं आहे. "बायका बी चांगलं जपू शकतात," त्या म्हणतात. "आम्ही त्यांची निगा राखतो, आणि त्या कशा रुजवायच्या, हे पण आम्हाला ठाऊक असतं. ही सगळी प्रक्रिया तपशीलाशी निगडित आहे."

चमनीबाई शेतकऱ्याला बी किती महत्त्वाचं आहे, ते समजावून सांगतायत

कुळथाचं गावरान बी
त्यांचं लग्न झालं तेंव्हा चमनीबाईच्या सुना, चंपाबाई आणि डॉलीबाई, यांना बियाण्याचं जतन आणि संवर्धन कसं करायचं ते माहित नव्हतं. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी आपल्या सासूकडे पाहून त्यांचं पारंपरिक ज्ञान आणि कौशल्य हस्तगत केलंय. आता, दशकभरानंतर त्या आपण शिकलेलं सारं काही मला दाखवायला उत्सुक होत्या.

चमनीबाई त्यांच्या दोन्ही सुनांसोबत
ह्या कुटुंबात धान्य साठवण्याकरिता मातीची मोठी भांडी वापरली जातात. स्थानिक, नैसर्गिक वस्तूंपासून बनविलेली ही भांडी धान्य थंड ठेवतात.

घरी बनविलेल्या मातीच्या कणगीत बी एकसंध राहतं
बियाणं कोरडं राहावं म्हणून भांड्याला असलेलं मोठं छिद्र वाळलेल्या मक्याची कणसं लावून बुजवून टाकतात. कीड लागू नये म्हणून भांड्याला बाहेरून रॉकेल, कडुनिंब आणि राख यांचा लेप देण्यात येतो.

मक्याची वाळलेली कणसं बियांचं संरक्षण करतात

चांगल्या लाल भोपळ्याच्या बिया पुढील हंगामासाठी राखल्या जातात
मीना कुटुंबीयांकडे बिया असलेले मोठाले भोपळे जतन करून ठेवले जातात. कधीकधी, तर खास बांधून घेतलेल्या भिंतींमागे ‘कोठी’त बी साठवलं जातं. तिथे बी सुरक्षित राहतं.

पन्नालाल, एक स्थानिक कार्यकर्ते, या कुटुंबाच्या साठवणीची पद्धत पाहतायत
"मला आठवतं एकदा आमच्या गावात पूर आला होता," चमनीबाईं सांगतात. "१९७३ ची गोष्ट आहे, आणि गावातील सगळी घरं उद्ध्वस्त झाली होती. आमच्या सगळ्या सामानाची नासधूस झाली होती, पण मला सर्वांत जास्त काळजी होती ती बियांची. माझ्यासाठी ते मोलाचं होतं, अन् आजही माझ्याकडे ते बी आहे. बी शेतकऱ्याच्या जीवनाचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे."
काही वर्षांपूर्वी, या कुटुंबाने बीज संवर्धन आणि देवाणघेवाण करण्याचा उपक्रम चालू केला, ज्यामुळे त्यांना बीमोड होत चाललेलं वाण स्थानिक शेतकऱ्यांसोबत वाटता आलं. शेतकरी या उधारीची परतफेड दीडपट बी परत देऊन करत असत.

गावरान हिरवा मूग
चमनीबाईंचं कुटुंब स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी जैविक शेती करत असलं, तरी सध्या बाजारात काय विकलं जातं याचा दबाव मोठा आहे. "गावातले बरेच शेतकरी मला विचारतात की आम्ही सरकारने दिलेली मोफतची बी-बियाणं अन् कीटकनाशकं का घेत नाही म्हणून. ते मला मूर्खात काढतात. पण, ते पीक आणि हे सारखं नाहीच. आम्ही घरी ते कधीच खात नाही," त्यांचा मुलगा, केसाराम मीना म्हणतो.

चमनीबाईंचा मुलगा, केसाराम यांचा चेहरा आपल्या लहानशा शेताबद्दल सांगताना खुलतो .
कित्येक दशकं हे कुटुंब संमिश्र पीक घेत आलंय. आजही, ते दर तीन महिन्यांनी आपलं पीक बदलतात. पण, बाजारावर अधिकाधिक अवलंबून राहिल्याने त्याचा गावावर वाईट परिणाम होत आहे. कुटुंबांना त्यांच्या गरजा भागवण्या इतपत अन्न पिकवणंदेखील जमेनासं झालंय, आणि आपला आहार सकस व्हावा म्हणून बाजारात जावं लागतंय. चमनीबाई सांगतात की, त्या लहान असताना सारं काही त्यांच्या शेतातच पिकवलं जात असे. बाजारात फक्त त्यांना मीठ आणायला जावं लागायचं.

घरी खाण्यासाठी साठवून ठेवलेला गावरान मका
त्यांचे पती जिवंत असताना, त्या म्हणतात, बाहेरचं वातावरण फार वेगळं होतं. "पूर्वी चांगला पाऊस व्हायचा, म्हणून आम्हाला पाण्याची टंचाई कधीच जाणवली नाही. आता, ही एक समस्या झालीये. त्यात भर म्हणून गरमीदेखील वाढली आहे."
भारतातील बऱ्याच शेतकरी ह्या स्त्रिया आहेत, पण त्या त्यांच्या कामासाठी ओळखल्या जात नाहीत. ग्रामीण भारतात बियाण्याची कधी कधी "पुरुष" किंवा "स्त्री" – त्यांच्या आर्थिक मूल्यावरून – अशीही वर्गवारी केली जाते. पुरुष बीज जास्त फायदा मिळवून देणारं, जसं की कापूस, तंबाखू आणि कॉफी यांसारखी नगदी पिकं. भाज्या आणि काही डाळी स्त्री - बीज म्हणून ओळखल्या जातात, कारण त्या कुटुंबाचं पोषण करतात.

एक शेतकरी आपल्या कामावर : बऱ्याच स्त्रिया शेती करतात, पण त्यांच्या कामाची गणना होत नाही
पन्नालाल पटेल, एक शेतकरी आणि कार्यकर्ते, मेवाड प्रांतातील महिला शेतकऱ्यांसोबत बीज संरक्षण पद्धती आणि शेतीसमूहांवर काम करत आहेत. त्यांनी जैविक शेतीवर अवलंबून राहणं किती कठीण आहे, हे त्यांनी समजावून सांगितलंय. "आम्ही मेवाड प्रांतातील महिला गटांसोबत मिळून त्यांच्या पिकापासून बाजारात विकण्यासाठी मूल्यवर्धित वस्तू बनविल्या. पण, उत्पादन टिकवून ठेवणं कठीण होतं. पैशाचा वापर आणि पीक घेण्यात अडचणी येऊ लागल्या. व्यावसाय टिकवणं महिलांना कठीण जातं कारण त्यांना घरून नेहमी पाठिंबा मिळतोच असं नाही. त्या आपलं कुटुंब आणि अर्थार्जन एकाच वेळी सांभाळत असतात. स्थानिक बी ऱ्हास पावत चाललंय."

पन्नालाल पटेल यांच्याशी चर्चा करताना मीना कुटुंबीय
सुदैवाने, चमनीबाई यांची नातवंडं कुटुंबाची जैविक शेतीची परंपरा चालू ठेवण्यास इच्छुक आहेत. त्यांना आपल्या आजीच्या कामाचं आणि ज्ञानाचं मूल्य ठाऊक आहे पण अशाने प्रगती करणं कठीण होत चालल्याची ते कबुली देतात.

चमनीबाईंच्या कुटुंबाचं शेत, जिथे ते घरच्या वापरासाठी जैविक पीक आणि विकायला नगदी पिकांची लागवड करतात .
दरम्यान, जनुकीय संकरित बियाणं वापरण्यास राजस्थानमध्ये मोठं प्रोत्साहन दिलं जात आहे, ज्याचा बरेच कार्यकर्ते आणि शेतकरी विरोध करताहेत. आपल्याच स्वतःच्या शेतात काय पिकवायचं यासाठी झगडत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या आता आणखी वाढू शकतात. यातून शेतकऱ्यांना नव्या धोरणांचं वाट धरणं भाग पडू शकतं आणि त्यातून आपलं आणि आपल्या कुटुंबांचं पोट भरणं अवघड होत जाणार आहे.
अनुवादः कौशल काळू