गोंधळ, पसारा आणि विस्मयकार दृश्यं – कुप्पपुरम तलावाच्या काठावर असंख्य गोष्टी वाळत पडल्या आहेत. अगदी एक बँकसुद्धा.
तलावापासून अगदी ८-१० फुटावर असणारी दि कुट्टमंगलम सर्विस को-ऑपरेटिव्ह बँक अजूनही ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या तडाख्यातून सावरलेली नाही. ज्या तलावाचं पाणी बँकेत शिरलं होतं त्याच्याच काठावर आज असंख्य गोष्टी सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. काइनकारी पंचायतीची देखील तीच स्थिती आहे. कारण ओल्या झालेल्या वस्तू वाळवण्यासाठी दुसरी कोणती जागाच नाहीये. बँकेच्या खतावण्या, फाइली, करारनामे आणि महत्त्वाची कागदपत्रं सुकत आहेत.
आजूबाजूला नजर टाकली तर मनात एकच इच्छा येते ती म्हणजे बँकेचा सगळा दस्तावेज संगणकीकृत झाला असला म्हणजे बरंय. पण तिथेच संगणकही वाळताना आणि स्वच्छ केले जात असताना पाहिले की तीही आशा डळमळीत होते. आळप्पुळा जिल्ह्याचा कुट्टनाडचा खालचा भाग समुद्र सपाटीहून कमी उंचीवर आहे. ऑगस्ट महिन्यात पावसामुळे आलेला पूर आणि रोंरावत वाहणाऱ्या नद्यांमुळे हजारो लोकांना निवारा छावण्यांमध्ये हलवावं लागलं होतं. बहुतेक जण दोन आठवड्यांनी किंवा त्यानंतर काही काळाने पुराचा तडाखा बसलेल्या आपल्या घरांकडे परतले. अनेकांची घरं तेव्हाही पाण्याखालीच होती.
“आमच्या इमारतीचं पुढचं दार आहे, तिथपर्यंत पाणी चढलं होतं,” रोखपाल गिरीश कुमार एच. सांगतात. आणि त्यामुळे आतल्या सगळ्या गोष्टी पाण्याखाली गेल्या. बँकेची तिजोरी खालच्या भागात, जवळ जवळ तळघरात असल्याने अजूनच पंचाईत झाली. तिजोरीचं दार आता हलेनासंच झालंय – नशीब ते अर्धवट उघडलेलं आहे. आतमध्ये जुन्या ठेवणीच्या बिडाच्या दोन तिजोऱ्या आहेत. पाण्यात राहिल्यामुळे त्यांच्यावर गंज चढल्याच्या खुणा दिसत आहेत.
काइनकारी गावातल्या कालव्यांच्या चिंचोळ्या काठांवर लोकांनी वाळत टाकलेल्या सामानातूव जागा शोधत आम्ही निघालो होतो. फर्निचर, सतरंज्या, फ्रीज, शाळेची पुस्तकं, मुलांच्या घरच्या अभ्यासाच्या वह्या, गोधड्या आणि कपडे. कुठे बायबल तर कुठे भगवद्गीता – अगदी किसान क्रेडीट कार्डसुद्धा.
पण त्या सगळ्या गोंधळातही लोक हरलेले नाहीत. सगळे जण झालेली पडझड सावरून त्यातून आयुष्य मार्गी लावण्याच्या मागे आहेत. बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी तर सगळं मार्गावर आणण्यासाठी किती तरी तास खर्ची घातले असणार हे नक्की. तिजोरीच्या पातळीपर्यंत चढलेलं पाणी बाहेर काढायचं, अनेक खतावण्या आणि दस्त वाळवायचे आणि कार्यालयाची नव्याने मांडणी करायची. अर्थात, सध्या तरी त्यांना जितकं शक्य झालंय तितकंच त्यांनी केलंय. कारण हे साधं संकट नाहीये. अनेक फायली आणि खतावण्यांना बुरशीचा वास येतोय, डाग दिसायला लागलेत.
तरीही, पुराच्या काळातही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शक्य तितक्या सगळ्या गोष्टी वाचवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी आटापिटा करून करून ५.५ किलो सोनं, बरीचशी रोकड आणि अनेक घरं-जमिनींची कागदपत्रं आळप्पुळा गावातल्या त्यांच्या जिल्हा शाखेत हलवली. बँकेचे अध्यक्ष पी. जी. सनल कुमार यांनी माझे सहकारी (आणि पारी फेलो) व्ही. शशीकुमार यांना फोनवर सांगितलं की त्यांच्याकडच्या सगळ्या खात्यांची माहिती आणि महत्त्वाच्या सगळ्या कागदपत्रांच्या नोंदी बंगळुरू इथल्या सर्वरमध्ये सुरक्षित आहेत.
हे बाकी बरं झालं. कारण पुन्हा एकदा केरळमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे.

कुट्टमंगलम सर्विस को-ऑपरेटिव्ह बँकेचे रोखपाल पुरानंतरच्या वाताहतीनंतर स्वतः साफसफाईचं काम करत होते

लोखंडी मांडण्यांवर आजही असंख्य खतावण्या आणि फायली वाळत ठेवलेल्या आहेत

बँकेच्या तिजोरीतल्या या दोन लोखंडी तिजोऱ्या आजही पुराच्या खुणा अंगी वागवतायत

अनेक खतावण्यांवर बुरशीचे डाग दिसायला लागलेत



स्टीलच्या कपाटांमध्ये आणि मांडण्यांवर भरून ठेवलेली कागदपत्रं, फायली, पुस्तकं आणि नोंदी बँकेच्या बाहेर, तलावापासून काही फुटाच्या अंतरावर उन्हात वाळत ठेवली आहेत

बँकेपासून थोड्याच अंतरावर कालव्याच्या काठावर घरातलं सामान सुकतंय आणि काइनकारीचा एक रहिवासी शांतपणे तिथून नाव वल्हवत चाललाय

किसान क्रेडिट कार्ड ऊन खातंय. जवळच एका बायबलवर आणि भगवद्गीतेवरही तीच वेळ आलीये

समुद्र सपाटीच्या खाली असणाऱ्या या भागातल्या घरांमधलं सामानसुमान कालव्याच्या काठाने ठेवलंय, ते पाहत एक स्थानिक रहिवासी सायकलवर निघालाय
अनुवादः मेधा काळे