“तुम्हाला वाटेत फक्त गायी, गाढवं आणि काही कुत्रे भेटले असतील. हो की नाही?” ६२ वर्षांचे त्सेरिंग आंगचुक हसून विचारतात. २०१६ साली डिसेंबरमध्ये लडाखमधल्या लेहपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या स्नेमो गावी मी त्यांना भेटायला गेले होते.
सुमारे १,१०० लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावातली बहुतेक घरं हिवाळ्यामुळे बंद आहेत. तापमान उणे १३ अंशापर्यंत गोठत जातं त्यामुळे इथले रहिवासी कुटुंब कबिल्यासह चंदीगड, जम्मी, दिल्ली किंवा अगदी लेहमध्ये मुक्कामाला जातात. “मग काय माझ्यासारखे मोजके लोक मागे राहतात, सोबतीला ही जनावरं,” त्सेरिंग सांगतात. त्यांची पत्नी आणि तिघं मुलं परगावी गेली आहेत. त्सेरिंग आपल्या गायी आणि झ्झो (गायी आणि याकच्या संकरातून जन्मलेला प्राणी) सांभाळण्यासाठी मागे थांबले आहेत.
त्सेरिंग मला थोडा लडाखी चहा (गुड-गुड चहा) देतात आणि आपल्यासाठी लाकडी वाडग्यामध्ये थोडी चांग (जवापासून तयार केलेली स्थानिक बियर) ओतून घेतात. ते बसताच मांजरीची काही द्वाड पिल्लं उडी मारून त्यांच्या कुशीत येतात. हिवाळ्यात असं एकट्याने राहणं त्यांना आवडतं. कारण याच काळात ते एका अत्यंत आवडीच्या गोष्टीसाठी त्यांचा वेळ देऊ शकतात. आणि ते म्हणजे विणकाम.

लडाखच्या स्नेमो गावातल्या आपल्या घराबाहेर त्सेरिंग माग लावतात
लडाखच्या हिवाळा मला थेट स्नेमोत, माझ्या आजोळी घालवलेल्या बालपणीच्या सुट्ट्यांमध्ये घेऊन जातो. सगळे नातेवाईक एकत्र यायचे आणि बुखारीभोवती (शेकोटीसाठीचं धातूचं भांडं) बसून आम्ही निजण्याआधी आजीच्या गोष्टी ऐकायचो. सात वर्षांनंतर स्नेमोची चढण चढत असताना लडाखची गावं किती बदलून गेली आहेत ते नजरेला जाणवत होतं. कधी काळी माणसांनी फुलून गेलेले रस्ते आणि शेतं आता ओस पडलीयेत. गावं निर्मनुष्य झालीयेत, तीही केवळ हिवाळ्यापुरती नाही. लोक आता कायमसाठी लेह आणि इतर शहरांमध्ये वास्तव्याला निघून गेलेत. त्या दिवशी ती चढण चढून जात असता तिथला सगळा प्रदेश निर्जीव आणि भकास भासत होता.
त्सेरिंग आणि त्यांची पत्नी शेती करतात. लडाखमध्ये रोजच्या आहारात असलेलं जवाचं पीक घेतात. उन्हाळ्याचा सगळा वेळ त्यात जातो. जनावरंही सांभाळायची असतात.

डावीकडेः मागाच्या धडाला खाली पायपट्ट्या जोडतात. उजवीकडेः पट्ट्या जोडण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वस्तूंचा पट्टे आणि बटणं म्हणून कसा वापर केलाय ते त्सेरिंग दाखवतायत

लाकडी पायपट्ट्या आता मागाच्या धडाला नीट अडकल्या आहेत
शेतात काम नसतं तेव्हा त्सेरिंग कापड विणतात. ते अतिशय कुशल आणि सुप्रसिद्ध विणकर आहेत. इतर गावातले लोक त्यांची खासियत असणारं स्नाम्बू नावाचं लोकरी कापड विणून घेण्यासाठी त्यांना आपल्या गावी बोलावणं धाडतात. इथला पारंपरिक पोषाख म्हणजे गोंचा. तो शिवण्यासाठी या कापडाचा एक तागा लागतो. विणकाम हा कुटुंबाचा व्यवसाय आहे, ते सांगतात. “माझ्या वडलांनी मला विणकाम शिकवलं. तेव्हा ते फार कडक शिस्तीचे होते. मला अजून लक्षात आहे. बाकी मुलं बाहेर बर्फात खेळत असायची तेव्हा मी मागावर धाग्याच्या गाठी बांधत असायचो, दुखऱ्या, कधी कधी रक्ताळलेल्या बोटांनी. आज मला आमच्या घराण्याकडे असलेल्या या कौशल्याचं मोल समजतंय. आमची बरीचशी कमाई आज त्यातूनच होतीये.”
त्सेरिंग यांनी आपल्या मुलाला विणकाम करायला शिकवलंय. तिशीत असलेला त्यांचा मुलगाही कधी कधी विणकाम करतो, चांगलं विणतो पण आपल्या वडलांसारखं त्याला विणकामाचं वेड नाहीये. “आजकाल तुम्ही मुलांशी फार कडक वागू शकत नाही!” त्सेरिंग म्हणतात. “लेहच्या बाजारपेठेत हातातल्या फोनमध्ये डोकं खुपसून फिरणं त्यांना जास्त आवडतं.”
त्सेरिंग यांचे वडील ४० थू लांबीचा एक तागा विणण्याचे २० किंवा ३० रुपये घ्यायचे. आज त्सेरिंग ४० थू चा तागा विणण्यासाठी ८०० ते १००० रुपये घेतात. “मी माझ्या मुलाला सांगतो की त्याच्या पोराबाळांसाठी ही पैशाची खाण आहे. ‘संस्कृतीचं जतन’ हा आजकाल परवलीचा शब्द झाला आहे. माणसाचा विकास होण्यासाठी शाळा आणि शिक्षण नक्कीच गरजेचं आहे, पण पोटापाण्यासाठी, स्वतःची एक ओळख तयार करण्यासाठी मात्र तुमच्यापाशी कौशल्यंच पाहिजेत.”
ते मला त्यांचा पारंपरिक माग दाखवतात. त्याचे सगळे भाग या परिसरातल्या वस्तूंपासून तयार केले आहेत. स्थानिक लडाखी सुतार मागणीनुसार हे माग बनवतात. हा माग लाकडी आहे, सैन्याच्या जुन्या जाकिटांची बॉबिनसारखी बटनं पुलीचं काम करतात.

या मागाचे जवळपसा सगळे भाग वेगवेगळ्या वस्तूंपासून तयार केले आहेत. लाकडी बॉबिन पुली म्हणून वापरले आहेत

आतमध्ये दोऱ्याचं रीळ असलेला नावेच्या आकाराचा रुम्बु (उजवीकडे) आणि मागाशेजारी जमिनीवर पडलेली रिकामी रिळं म्हणजे पूरी
“मागाची (थांग्शा) चौकट (थिशा) आणि बाण्यासाठी आत रीळ असलेल्या नावेच्या आकाराच्या धोट्यासाठी (रुम्बु) इथल्याच लाकडाचा वापर केला जातो,” त्सेरिंग सांगतात. “बांबूसारखी पोकळ रिळं दिसतायत ना, (पूरी) तीदेखील इथल्या झऱ्यांच्या काठावर एक प्रकारचं गवत उगवतं चिक्कार, त्यापासून बनवलीयेत.”
दोन प्रकारची वीण असते. “साध्या विणीत कापडाची उलट आणि सुलट बाजू असते. पण एक जराशी क्लिष्ट वीण असते, ग्यालोग. त्या विणीचं कापड दोन्ही बाजूंनी वापरता येतं. पायपट्ट्यांच्या वापरानुसार या दोन विणीतला फरक ठरतो.”

त्सेरिंग ते विणत असलेलं कापड दाखवतात, शिवल्यानंतर कपड्याच्या बाहेरच्या बाजूचं कापड कसं असेल तेही ते दाखवतात
एक तागा एकूण ४० थू लांब असतो (एक थू म्हणजे कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचं, साधारण एक फूट) आणि त्याची रुंदी (सोर या प्रमाणात मोजली जाते, तीही हातावर) एक फुटाच्या आसपास भरते. रंग दिल्यावर कापड रुंदीला जरा आकसतं.
“मला बाकी काही व्यवधान नसलं तर मी एका दिवसात ४० थू तागा विणू शकतो. पण किती दिवसांत तागा पूर्ण करायचाय आणि रोज किती तास कामाला मिळतात त्यानुसार ३-४ दिवस देखील लागू शकतात,” त्सेरिंग सांगतात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात विणकामातून त्यांची जास्त कमाई होते कारण उन्हाळ्यात शेतीत त्यांचा बराच वेळ आणि शक्ती खर्च होते. वर्षभरात हंगामाप्रमाणे त्यांच्या मासिक उत्पन्नात रु. ३,००० ते रु. १०,००० असा फरक पडतो.

छोट्या मुलांच्या टाकून दिलेल्या जुन्या सायकलच्या चाकापासून त्यांनी हा चरखा तयार केलाय
त्सेरिंग विलो म्हणजेच वाळुंजीच्या फांदीवर पोतं टाकून बसतात. मातीच्या विटांचा पाठीला आधार घेतात. “मागावर काम करताना सगळ्यात अवघड काय आहे? दर वेळी जेव्हा ताण्याचा धागा – ३८४ धाग्यातला एक – तुटतो तेव्हा तो कुठे आणि कधी तुटला ते थोधून काढावं लागतं. आणि मग ते दुरुस्त करायचं. जर अगदी उत्कृष्ट कापड विणायचं असेल ना तर धाग्याच्या गाठी मारण्याची कला अवगत करणं फार गरजेचं आहे बरं.”

फिरस्ता विणकरः आपला फिरता माग खांद्यावर टाकून भटकंती करणं त्यांना मनापासून आवडतं
त्सेरिंग शक्यतो जिथे जातील तिथे आपला फिरता माग पाठीवर लादून घेऊन जातात. “माझा माग सोबत असला ना की प्रवासाला काही तरी अर्थ मिळतो. मी माझ्या मित्रमंडळींना, नातेवाइकांना अगदी तिऱ्हाइतांनाही भेटायला जातो. आणि तेव्हाच चार पैसेही मिळवतो. याहून फार क्लिष्ट आणि आधुनिक अशा मागावर लोक कापड विणतात ना, पण माझा हा फिरता माग माझा सगळ्यात लाडका आहे. एका जागी फार काळ बसलं की कंटाळून जायला होतं हो. विणकामाचं मला वेड आहे आणि हा माग मला फार प्रिय आहे. विणकाम माझं आयुष्य सार्थ करतं. माझ्या वाड-वडलांकडून मला हा वारसा मिळालाय आणि माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी मी हा वारसा ठेऊन जाणार आहे.”
अतिशय सघन असं तत्त्वज्ञान सांगणारा हा साधा माणूस डोंगरदऱ्यांमधल्या जगण्याचं प्रतीक आहे. निघता निघता माझ्या मनात फक्त इतकंच आलं की अशा तऱ्हेचं जीवन मात्र फार झपाट्याने लोप पावत चाललंय.