मायलापूरच्या बारक्याशा गल्लीत, छोट्याशा खोलीत कर्नाटक संगीताचे स्वर भरून राहिलेत. निळ्या रंगाच्या भिंतींवर हिंदू देवतांच्या तसबिरी लावल्या आहेत, फणसाच्या लाकडाची खोडं आणि चामडं जमिनीवर इतस्ततः पसरले आहेत. जेसुदास अँथनी आणि त्यांचा मुलगा एडविन जेसुदास त्यांच्या या खोलीत कामात मग्न आहेत, हातोड्या, खिळे, सूर जुळवण्यासाठी लाकडी खुट्टा आणि लाकडाला चमक आणण्यासाठी एरंडाचं तेल असा सगळा जामानिमा त्यांच्या आजूबाजूला आहे. मध्य चेन्नईच्या या जुन्या निवासी भागात मंदिरांचा घंटारव ऐकू येतोय.
हे निष्णात कारागीर कर्नाटक संगीतामध्ये साथीला वाजवला जाणारा मृंदगम तयार करतात. “माझ्या पणजोबांनी तंजावूरमध्ये मृदंगम तयार करायला सुरुवात केली,” चेन्नईपासून ३५० किमीवर असणाऱ्या शहराचा संदर्भ घेत एडविन सांगतो. त्याचे वडील किंचित नजर उचलतात, हसतात आणि परत चामड्याच्या दोन तुकड्यांना छोटी छिद्रं पाडायला लागतात. त्यानंतर ते ही दोन्ही पानं घेतात आणि चामड्याच्या बारीक पट्ट्यांच्या सहाय्याने पोकळ खोडाच्या दोन्ही बाजूला ताणून बांधतात. चामड्याच्या जाड पट्ट्या विणून मृदंगाच्या खोडाच्या दोन्ही बाजूला ताणून बांधल्या जातात. एक अख्खा मृदंग तयार करण्याची प्रक्रिया (ते एकाच वेळी अनेक मृदंगांवर काम करत असतात) सात दिवस चालते.


डावीकडेः जेसुदास अँथनी चामड्याच्या गोल पानांवर छिद्रं करतायत, वेताच्या बारीक पट्ट्या काढून त्यांच्या मदतीने ही पानं ताणून मृदंगाच्या खोडावर बांधली जातात. उजवीकडेः लाकडाचा खुट्टा आणि गोटा वापरून वाद्याचा सूर लावला जातो
इथून ५२० किमी अंतरावरच्या कामुती शहरातून मृदंगाची खोडं विकत घेतात, फणसाच्या वाळलेल्या लाकडापासून ती बनवलेली असतात कारण त्यातले तंतू आणि बारीक छिद्रांमुळे हवामान बदललं तरी वाद्याचा सूर उतरत नाही. गायीचं चामडं वेल्लोरच्या अंबूर शहरातून आणलं जातं.
मी त्यांना भेटायला गेले तेव्हा एडविन तंजावूर जिल्ह्यात कावेरीच्या पात्रात मिळालेल्या गोट्याचा चुरा करत होता. हा आणि तांदळाचा चुरा पाण्यात कालवून कप्पी मृदंगाच्या दोन्ही पानांना लावलं जातं. (कच्छी मृदंगामध्ये खोड जाड असतं आणि उजव्या बाजूला ध्वनी जास्त काळ टिकावा यासाठी वेताच्या पट्ट्या बसवलेल्या असतात.)



डावीकडेः जेसुदास तरुण असताना त्यांची कारागिरी आणि कलेच्या वारशाबद्दलचं वर्तमानपत्रातलं कात्रण. मध्यभागीः या कुटुंबाच्या कौशल्याबद्दलचं तमिळमधलं आणखी एक कात्रण भिंतीवर चिकटवलंय. उजवीकडेः त्यांच्या निष्णात कारागिरीबद्दल त्यांना पुरस्कार मिळाले आहेत
या वाद्याची जी उजवी बाजू असते त्याला तीन प्रकारचं चामडं लावलेलं असतं – बाहेरची चकती, आतली चकती आणि मध्यभागी असणारी काळी चकती. डावी बाजू, जिला थोप्पी म्हणतात, ती कायम उजव्या बाजूपेक्षा अर्ध्या इंचाने मोठी असते.
चौसष्ट वर्षांचे जेसुदास आणि ३१ वर्षीय एडविन दर वर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात साजऱ्या होणाऱ्या मरगळी संगीत सोहळ्यासाठी आठवड्याला ३ ते ७ मृदंग तयार करतात आणि एरवी वर्षभर आठवड्याला ३ ते ४. वाद्यांची दुरुस्ती चालूच असते. त्यांना प्रत्येक मृदंगासाठी रु. ७,००० ते रु. १०,००० मिळतात. दोघंही आठवड्याचे सातही दिवस काम करतात – जेसुदास सकाळी ९ ते रात्री ८ आणि एडविन कामावरून परत आल्यावर संध्याकाळी. (तो काय काम करतो याचे तपशील आपण देऊ नयेत अशी त्याची इच्छा आहे). त्यांची वाद्यं तयार करण्याची कार्यशाळा त्यांच्या घरापासून पायी १५ मिनिटं अंतरावर आहे.


डावीकडेः एडविन दिवसभर वेगळं काम करतो, मात्र संध्याकाळी आणि रविवारी तो वडलांसोबत वाद्यं तयार करण्याचं काम करतो. उजवीकडेः एडविनची पत्नी नँन्सी, वय २९, घरचं सगळं पाहते. मृदंग कसा करतात याचा थोडाफार अंदाज तिला आहे, मात्र हे काम घरच्या पुरुषांनीच करायचं असतं
“आम्ही हा वारसा पुढे नेतोय, जरी आम्ही दलित ख्रिश्चन असलो तरीही,” एडविन म्हणतो. त्याचे आजोबा, अँटनी सेबॅस्टियन एक विख्यात मृदंग कारागीर होते आणि त्यांच्या कलेसाठी कर्नाटक संगीतक्षेत्रातील कलाकारांनी त्यांचं कौतुक केलं असलं तरी एक व्यक्ती म्हणून मात्र त्यांना मान दिला गेला नाही, तो सांगतो. “माझे आजोबा मृदंग बनवायचे आणि विकायचे. पण ते जेव्हा मृदंग पोचवण्यासाठी त्यांच्या गिऱ्हाइकांच्या घरी जायचे, तिथे मात्र लोक त्यांचा स्पर्श टाळायचे आणि पैसे खाली, जमिनीवर ठेवायचे.” एडविनच्या मते, जातीची समस्या “५० वर्षांपूर्वी जितकी वाईट होती, तशी आता नाही,” पण जास्त काही तपशील दिले नाहीत तरी पुढे तो म्हणतो, की भेदभाव आजही कायम आहे.
तो वडलांच्या मदतीने तयार केलेल्या एका मृदंगाचा सूर लावतो तेव्हाच त्याची नाद-सुरांची जाण किती पक्की आहे ते लक्षात येतं. मात्र, एडविन सांगतो, की त्याची जात आणि धर्म यामुळे त्याला हे वाद्य वाजवायचं शिक्षण मिळू शकलं नाही. “सगळे उस्ताद मला सांगायचे की मला संगीताची चांगली जाण आहे. माझे हात वाद्य वाजवण्यासाठी अगदी योग्य आहेत, ते म्हणायचे. पण मी जेव्हा मला शिकवा असं त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी नकार दिला. आजही समाजातल्या भेदाच्या भिंती आहेतच...”


डावीकडेः कर्नाटक संगीत हे खास करून वरच्या जातीच्या हिंदूंचं क्षेत्र मानलं जातं आणि जेसुदास आणि एडविन जरी दलित ख्रिश्चन असले तरी त्यांच्या कार्यशाळेच्या भिंतींवर हिंदू देवदेवतांच्या तसबिरी आहेत. उजवीकडेः त्यांच्या घराचं दार मात्र त्यांच्या समाजाच्या प्रतिकांनी सजलेलं दिसतं
एडविनच्या कुटुंबाचे बहुतेक गिऱ्हाईक म्हणजे कर्नाटक संगीतक्षेत्रातले विख्यात कलाकार जे बहुतकरून वरच्या जातीतले हिंदू आहेत. त्यांच्या कार्यशाळेच्या भिंतींवरून हे लक्षात येतं, हिंदू देवदेवतांच्या तसबिरींनी या भिंती सजल्या आहेत. मृदंग तयार करणारे हे कारागीर मात्र मायलापूरच्या अवर लेडी ऑफ लाइट या लुझ चर्चचे अनुयायी आहेत. “माझे आजोबा आणि पणजोबा ख्रिश्चन होते हे मला माहित आहे. त्यांच्या आधी आमचं कुटुंब हिंदू होतं,” एडविन सांगतो.
आपल्याला मृदंग वाजवण्याचं प्रशिक्षण द्यायला उस्तादांनी नकार दिला असला तरी भविष्य वेगळं असेल अशी आशा एडविनच्या मनात जागृत आहे. “कदाचित मी हे वाद्य वाजवू शकणार नाही,” तो म्हणतो. “पण माझी मुलं आहेत ना. ते हे वाद्य वाजवणार, नक्की.”
अनुवादः मेधा काळे