चूक होऊन चालणार नाही, सिराज मोमीन पक्कं जाणतात. जरा जरी चूक झाली तरी मीटरमागे मिळणारे २८ रुपयेही हातचे जायचे. उभ्या म्हणजेच ताण्याच्या आणि आडव्या म्हणजेच बाण्याच्या धाग्यांची संख्या बदलता कामा नये. त्यामुळे ते अधून मधून भिंगातून वीण निरखत राहतात. आणि सहा तासांच्या त्यांच्या कामात एका मिनिटात ९० वेळा हातमागाच्या दोन पावड्या चालवतात – म्हणजेच दिवसातून ३२,४०० वेळा. त्यांच्या पायाच्या हालचालींमुळे माग उघडतो, आयताकृती चौकटीतल्या ३,५०० तारांची फणी पहायला मिळते (प्रत्येक मागामध्ये ही संख्या वेगवेगळी असते). पायाच्या संयत हालचालीतून धातूच्या रुळाला गुंडाळलेला उभा धागा या फणीतून पुढे जातो. आणि त्यातूनच, एका इंचात आडवे आणि उभे प्रत्येकी ८० धागे असणारं कापड विणलं जातं – एका तासात एक मीटर.
आता ७२ वर्षांचे असलेले सिराज गेल्या ५० वर्षांपासून, वयाच्या १५ व्या वर्षापासून हे काम करतायत. त्यांचा माग मात्र त्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे. शंभराहून जास्त वर्षं जुन्या सागाच्या लाकडापासून बनवलेला त्यांच्या कुटुंबातला हा पिढीजात माग. याच मागावर गेली ५७ वर्षं सिराज वस्त्रं विणतायत – हातमागावरचं काम कौशल्याचं काम आहे. धागा निरखत, हात आणि पायाची हालचाल तालात करत विणल्या जाणाऱ्या वस्त्रामध्ये उभे आणि आडवे धागे जितके हवे तितकेच राखणं हे साधं काम नाही.
सिराज यांच्या घरी सध्या दोनच हातमाग आहेत, दोन्ही सात फूट उंच. कधी काळी त्यांच्याकडे सात माग होते आणि त्यावर काम करण्यासाठी कामगार होते. “१९८० च्या दशकात खूप काम असायचं,” ते म्हणतात. तीस वर्षं झाली, त्यांनी दुसऱ्या गावातल्या खरीरदारांना १,००० रुपयांना एकेक माग विकून टाकला आणि काही काळाने कोल्हापूर शहरातल्या एका सामाजिक संस्थेला दोन माग दान देऊन टाकले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगकणंगले तालुक्यातल्या रेंदाळमध्ये (लोकसंख्या १९,६७४, जनगणना, २०११) सिराज यांचं कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून या मागावर बसून वस्त्र विणतंय. १९६२ साली आठवी पास झाल्यानंतर सिराज यांनी आपली आत्या, हलीमा यांच्याकडून विणकामाची कला आत्मसात केली. रेंदाळमधल्या काही मोजक्या विणकर स्त्रियांपैकी त्या एक. गावातल्या बाकी बाया बाण्यासाठी लागणारा धागा हाताने कातायचं काम करतात – काही वर्षांनंतर सिराज यांच्या पत्नी मैमुना देखील हेच काम करू लागल्या.


त्यांच्या कुटुंबातली विणकरांची सिराज मोमीन यांची तिसरी आणि अखेरची पिढी. आज वयाच्या ७२ व्या वर्षीही ते मेहनत घेऊन मागावर वस्त्रं विणतायत – विणकरांच्या रुळावर गुंडाळलेला ताण्याचा म्हणजेच उभा धागा (डावीकडे) आजही फणीतून विणला जातोय.
पण इतरत्र घडलं तसंच रेंदाळमध्येही हातमागांची जागा हळूहळू यंत्रमागांनी घेतली – ही यंत्रं न थकता, झटपट काम करतात आणि हातमागापेक्षा स्वस्तात कापड तयार करतात. रेंदाळच्या यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष, रावसाहेब तांबे म्हणतात, “हे असंच कापड यंत्रमागावर ३ रुपये मीटरपेक्षाही कमी खर्चात तयार होतं.” २००० साली रेंदाळमध्ये २,०००-३,००० यंत्रमाग होते. आज तीच संख्या ७,०००-७,५०० वर गेली असल्याचा त्यांचा अंदाज आहे.
सिराज यांना माहित आहे की आजकाल लोकांनाही स्वस्त कापड हवं आहे. “हेच कापड यंत्रमागावर विणलं असलं तर त्याला ४ रुपयांपेक्षा जास्त कुणी देणार नाही. आम्हाला २८ रुपये मिळतात,” ते सांगतात. विणकराचं कसब, कष्ट आणि कापडाची गुणवत्ता या सगळ्यामुळे हातमागावरच्या कापडाला जास्त भाव मिळतो. “हाताने विणलेल्या कापडाचं महत्त्व आणि मोल लोकांना कळत नाही,” सिराज पुढे म्हणतात. एक कामगार किमान आठ यंत्रमागांचं काम पाहू शकतो. विणकर मात्र एकाच हातमागावर प्रत्येक धागा निरखत काम करतो. त्यामुळेच हाताने विणलेलं प्रत्येक वस्त्र अनोखं, एकमेव असतं असं त्यांना वाटतं.
यंत्रमागांचा झपाटा आणि सरत्या काळाला अनुसरून रेंदाळच्या हातमाग विणकरांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. इथले विणकर पूर्वीपासून नऊवारी साड्या विणत आले आहेत. १९५०च्या दशकात ते चार तासात एक लुगडं विणायचे आणि नगाला १.२५ रुपये कमवायचे – १९६०च्या दशकात हाच दर २.५ रुपयांवर गेला. आज बाजाराच्या मागणीला अनुसरून सिराज शर्टाचं कापड विणतायत. “२० वर्षांपूर्वी हे काम सुरू झालंय, गावातल्या सहकारी संस्था बंद पडल्या तेव्हापासून,” ते म्हणतात.
सोलापूर शहरातलं पश्चिम महाराष्ट्र हातमाग विकास महामंडळ हे खरेदी करणारं महामंडळ आणि रेंदाळच्या विणकरांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या दोन संघटना होत्या - स्वयंचलित हातमाग सहकारी विणकर सोसायटी आणि हातमाग विणकर सहकारी सोसायटी. १९९७ साली या दोन्ही संघटना बंद पडल्या, सिराज सांगतात कारण हातमागावरच्या साड्यांची मागणी घटायला लागली होती.
कच्चा माल मिळावा आणि आपला माल विकता यावा यासाठी मग सिराज यांनी कर्नाटकातल्या बेळगाव (आता बेळगावी) जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यात कोगनोळी या गावात असलेल्या कर्नाटक हातमाग विकास महामंडळाच्या उपकेंद्रामध्ये नावनोंदणी केली. ६ नोव्हेंबर, १९९८ तारखेची नोंदणीची पावती ते मला दाखवतात. रेंदाळमधल्या एकोणतीस विणकरांनी नोंदणीसाठी एकत्र मिळून रु. २,००० डिपॉझिट भरलं होतं. आता मात्र त्यांच्या गावात हातमागावर काम करणारे चारच विणकर उरलेत – सिराज, बाबालाल मोमीन, बाळू परीट आणि वसंत तांबे. (पहाः मीटर आणि वारभर आयुष्य .) “काही वारले, काहींनी विणकाम सोडलं आणि बाकीच्यांनी माग विकून टाकले,” सिराज सांगतात.

मैमुना मोमीन, हाताने कांडीवर धागा गुंडाळतायत, त्या म्हणतात तरुण पिढीतलं कुणीही हे काम आता करणार नाही
सिराज यांच्या घरापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर एका कच्च्या रस्त्याने पुढे गेलं की एका शेडमध्ये ७० वर्षीय बाबालाल मोमीन गेली ५७ वर्षं मागावर विणतायत. १९६२ साली त्यांच्या वडलांकडून, खुतुबुद्दीन यांच्याकडून त्यांना २२ हातमाग मिळाले होते. यातले २१ माग त्यांना वेगवेगळ्या गावातल्या लोकांना त्यांनी प्रत्येकी १२०० रुपयांना विकावे लागले होते.
बाबालाल यांच्या शेडशेजारीत हाताने कापड विणण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू विखुरलेल्या दिसतायत, काही वापरात नसलेल्या आणि काही मोडून गेलेल्या. त्यात एक लाकडी रूळ आणि डबीदेखील पहायला मिळते. मागाच्या वरच्या भागात ही जोडून त्यातून विणत असलेल्या कापडावर नाजूक नक्षीकाम करता येतं. “त्यांचं आता मी काय करायचं सांगा? कोणतेच विणकर आता हे वापरत नाहीत बघा. येणारी पिढी तर ते चुलीलाच घालणार,” बाबालाल म्हणतात.
१९७० च्या सुमारास यंत्रमागांची संख्या वाढत होती आणि मग हातमागावर काम करणाऱ्या विणकरांना मागणी कमी व्हायला लागली, ते सांगतात. “पूर्वी आम्ही चारच तास काम केलं तरी पुरेसं कमवत होतो. आज आम्ही २० तास जरी काम केलं ना तरी पोटापुरता पैसा मिळायचा नाही,” ते म्हणतात.
बाबालाल इंचात ५० उभे-५० आडवे धागे असणारं कापड विणतात. केएचडीसीकडून त्यांना मीटरमागे १९ रुपये मिळतात. ते साधारण ४५ दिवसांत २५० मीटर कापड विणतात, ज्याचे त्यांना ४,७५० रुपये मिळतात. विणलेल्या कापडाची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते, जसं की एका इंचात किती उभे-आडवे धागे आहेत, कापडाचा प्रकार आणि त्याचा दर्जा, इत्यादी.
बाजाराच्या वाढत्या मागणीचा विचार करून हातमागाचं कापड जास्तीत जास्त स्वस्त व्हावं यासाठी सहकारी संस्थांनीही काही गोष्टींशी जुळवून घेतलं आहे. यातलाच एक भाग म्हणजे सूत आणि पॉलिस्टर एकत्र करणे. बाबालाल यांना केएचडीसीकडून जे सूत मिळतं त्यात ३५ टक्के सूत आणि ६५ टक्के पॉलिस्टर असतं. “आम्ही १० वर्षांपूर्वीच १०० टक्के सूत वापरणं थांबवलं कारण मग ते महाग पडतं,” ते सांगतात.
बाबालाल यांच्या पत्नी, रझिया वय ६८ म्हणतात की सरकार विणकरांसाठी काही करण्यात अपयशी ठरलंय. “दर काही वर्षांनी सरकारची लोकं येऊन आमची माहिती घेतात आणि हातमागावर खडूने काही तरी लिहून जातात [हातमागांच्या गणनेचा भाग]. कापडाला चांगला भाव पण द्यायचा नसेल तर या सगळ्याचा काय उपयोग?” रझिया आधी बाबालाल यांच्याबरोबर चरख्यासारख्या एका यंत्रावर कांड्या भरायचं काम करायच्या. पण वीसेक वर्षांपूर्वी असह्य पाठदुखीमुळे त्यांना हे काम सोडावं लागलं. सूत गुंडाळायचं आणि चरखा फिरवायचं काम अंगमेहनतीचं असतं आणि बहुतेक वेळा बायाच ते करतात. त्यातून पाठदुखी, खांद्यात वेदना आणि इतरही व्याधी जडतात.)
२००९-१० मध्ये नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकनॉमिक रीसर्च, नवी दिल्ली यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयासाठी तिसरी हातमाग गणना केली होती. त्यामध्ये त्यांना असं आढळून आलं होतं की ग्रामीण भागातल्या विणकर कुटुंबाची वर्षाची कमाई सरासरी रु. ३८,२६०, किंवा महिन्याला रु. ३,१३८ इतकी होती. या गणनेने असंही समोर आणलं की १९९५ साली ३४.७१ लाख असलेली विणकरांची संख्या २०१० साली २९.०९ इतकी घटली आहे.

अस्तंगत होत असलेल्या एका कलेचे अवशेष. वर डावीकडेः बाळू परीट यांच्या शेडमधलं एक जुनी लाकडी कांडी. आता यांच्या जागी प्लास्टिकच्या कांड्या आल्या ज्याच्यावर बाण्याचा धागा गुंडाळला जातो. वर उजवीकडेः बाण्याचा धागा मागाच्या फटक्यांमधून जातोय. खाली डावीकडेः बाळू यांच्या मागाशेजारच्या हाताने विणताना वापरात येणाऱ्या काही कांड्या. खाली उजवीकडेः धोटा इकडून तिकडे सोडण्यासाठी वापरण्यात येणारा लाकडी ठोकळा
या उरलेल्या विणकरांमधले एक आहेत, रेंदाळचे चौथे विणकर, ७६ वर्षीय बाळू परीट. हातमागाच्या कारखान्यात कामगार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. कधी काळी या गावात एकाहून अधिक माग असणारे असे अनेक कारखाने होते. बाळू यांनी १९६२ साली विणकर म्हणून काम करायला सुरुवात केली, त्या आधी त्यांनी हातमाग कसा चालवायचा याचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. “चार वर्षं मी सूत कातायचं आणि गुंडाळायचं काम करत होतो. हळू हळू मी माग वापरायला लागलो आणि तसं मी विणायला शिकलो,” ते सांगतात. “३०० कांड्या भरल्या की आम्हाला रुपया मिळायचा [१९५० च्या सुमारास],” हसत हसत ते सांगतात. आणि या कामाला त्यांना चार दिवस लागायचे.
१९६० साली, बाळू यांनी रेंदाळच्या एका विणकराकडून १,००० रुपयांना जुना माग विकत घेतला. “आजही मी तो माग वापरतोय बघा,” ते सांगतात. “रिकामं बसायचं नाही म्हणून मी काम करतो.” बाळूंच्या पत्नी, विमल, वय ६० गृहिणी आहेत. काही वर्षांपूर्वी त्या कमाईसाठी कपडे धुण्याची कामं करायच्या. चाळिशी पार केलेला त्यांचा मुलगा, कुमार कपड्याला इस्त्रीचं काम करतो.
सिराज आणि मौमिनांचा थोरला मुलगा, सरदार, वय ४३ कोल्हापूरच्या हुपरीमध्ये साखर कारखान्यात कामगार आहे आणि त्यांचा धाकटा मुलगा, सत्तार, वय ४१ रेंदाळमध्येच एका व्यापाऱ्याकडे काम करतो. त्यांची मुलगी, बीबीजान, वय ४१ लग्न होऊन स्वतःचा संसार सांभाळतीये. “हातमागाच्या कापडाला मागणीच नाहीये बाजारात. त्यामुळे आम्ही काही ही कला शिकून घेतली नाही,” सत्तार सांगतो.
बाबालाल यांच्या कुटुंबियांनीही विणकाम सोडून इतर कामधंदा सुरू केला आहे. त्यांचा थोरला मुलगा, मुनीर, वय ४१ याने रेंदाळमध्येच किराणामालाचं दुकान टाकलं आहे. मधला जमीर, वय ३९ शेतमजुरी करतो. आणि धाकट्या ३६ वर्षीय समीरने शेजारच्या गावात मटणाचं दुकान टाकलंय. आता हातमागावर केवळ बाबालालच काम करतात.
“कर्नाटकात [फक्त सीमा ओलांडा] आजही हजारो हातमाग आहेत. मग महाराष्ट्र सरकारला हातमाग उद्योग चालू ठेवता येत नाही, असं का?” बाबालाल संतापून सवाल करतात. हातमाग गणनेच्या आकडेवारीनुसार, २००९-१० मध्ये कर्नाटकात ३४,६०६ हातमाग होते तर महाराष्ट्रात केवळ ३,२५१. यातले रेंदाळमध्ये केवळ चार उरलेत. “आमच्याबरोबर हा धंदादेखील संपणार,” असं म्हणत बाबालाल मोमीन त्यांच्या मागावर परत काम सुरू करतात.

रेंदाळचा मावळता हातमाग उद्योगः मैमुना मोमीन चरख्यासारख्या यंत्रावर कांड्या भरतायत


बाबालाल मोमीन कामात मग्नः तुटलेला बाण्याचा-आडवा धागा शोधतायत (हातमागावर बाण्याचा म्हणजेच आडवा धागा नेहमीच तुटतो) आणि बारकाईने एकच आडवा धागा पाहतायत

‘आम्ही चौघं काय विरोध करणार?’ आपल्या अतिशय कुशल कामाला कमी भाव मिळतोय त्याबद्दल बाबालाल म्हणतात


बाळू परीट बाण्याचा धागा नीट पाहून घेतायत – जर असं नीट लक्ष ठेवलं नाही तर कापडाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो

त्यांच्या कुटुंबातले विणकाम शिकणारे बाळूच पहिले – आणि आता रेंदाळच्या विणकरांपैकी अखेरचे


चरख्यासारखं यंत्र आता क्वचितच वापरलं जातं, शंभर वर्षांहून जुन्या मागांचे लाकडी रूळ आणि इतर उपकरणं (उजवीकडे) आता रेंदाळमध्ये विनावापराची धूळ खात पडलीयेत, हातमाग तेजीत होते त्या गत दिवसांची आठवण करून देत
अनुवादः मेधा काळे