“मी दोन्ही हातात पाना घेऊनच मरतोय बघा,” शमशुद्दिन मुल्ला म्हणतात. “मरण आल्यावरच आम्ही रिटायर होतोय!”
हे जरा नाट्यमय वाटू शकतं पण खरंच शमशुद्दिन यांनी ७० हून अधिक वर्षं हातात पाना आणि इतर हत्यारं घेऊन कामं केलीयेत. हरतऱ्हेची इंजिनं दुरुस्त करायची कामं – पाण्याचे पंप, बोअरवेलच्या मोटरी, खोदकामाची बारकी यंत्रं, डिझेल इंजिन आणि इतरही किती तरी.
गप्प पडलेली किंवा बिघडलेली ही यंत्रं दुरुस्त करून पुन्हा चालू करण्याचं कसब त्यांच्याकडे असल्यामुळे कर्नाटकाच्या बेळगाव आणि महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये त्यांना भरपूर मागणी असते. “लोक मलाच बोलवतात,” त्यांच्या आवाजात अभिमान असतो.
शमशुद्दिन यांच्याकडे यंत्रात नक्की काय बिघाड झालाय हे हुडकून काढण्याचं खास कसब असल्याने शेतकरी आणि इतरही गिऱ्हाईक त्यांच्याकडे येतात. “मी लोकाला निस्तं हँडल फिरवायला सांगतो. यंत्रात काय बिघाड झालाय ते हुडकून काढायला तेवढंच बास होतंय,” ते सांगतात.
आणि मग खरं काम सुरू होतं. एखादं बिघडलेलं इंजिन सुरू करायला त्यांना आठ तास लागतात. “इंजिन खोलण्यापासून ते परत सगळं लावण्यापर्यंत सगळंच,” शमशुद्दिन सांगतात. “आजकाल, [इंजिनच्या] किटमध्ये सगळं सामान तयारच येतंय, त्यामुळे दुरुस्त करणं जरा सोपं झालंय.”
पण ही आठ तासाची सरासरी साधण्यासाठी असंख्य तासाचं काम आणि सराव कामी आलाय. आता वयाची ८३ वर्षं पूर्ण केलेल शमशुद्दिन गेल्या ७३ वर्षांत ५,००० हून जास्त इंजिन दुरुस्त केल्याचा अंदाज बांधतात – नदीतून पाणी उचलणारे पंप, तेलाचे घाणे, विहिरी आणि बांधकामावर दगडाच्या शिळा हलवणारी यंत्रं आणि इतरही किती तरी प्रकार.

शमशुद्दिन मुल्ला, वय ८३, बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या खास कौशल्यासाठी मानले जातात. त्यांना आम्ही भेटलो तेव्हा रणरणत्या उन्हाची कसलीही फिकीर न करता ते काम करत होते, मध्येच त्यांना कोल्हापूर शहरातल्या हार्डवेअर सामान विकणाऱ्यांचे फोन येत होते. ते म्हणतात, ‘दुकानदारानं माझ्याकडे आलेल्या गिऱ्हाइकाचं नुस्तं नाव सांगायचं आणि काय काय सामान लागतंय ते विचारून घ्यायचं’
ते म्हणतात, अनेक शेतकऱ्यांसाठी चांगला कुशल मेकॅनिक मिळणं मुश्किल असतं कारण कंपनीचे तंत्रज्ञ शक्यतो गावात जायला काचकुच करतात. “कंपनीच्या मेकॅनिकला बोलवायचं म्हणजे पैसे पण जास्त लागतात,” ते पुढे सांगतात. “त्यात पार आतल्या गावात पोचायला त्यांना लई टाइम लागतो.” त्यापरीस शमशुद्दिन आजारी इंजिनपाशी लवकर पोचतात. तरुण मेकॅनिकला काय बिघाड झालाय ते कळालं नाही किंवा दुरुस्ती जमली नाही तरी शेतकरी त्यांचाच सल्ला घेतात.
त्यामुळेच त्यांच्या गावी, बेळगावच्या चिकोडी तालुक्यातल्या बारवाड गावी त्यांना शामा मिस्त्री, एकदम तज्ज्ञ मेक्रनिक म्हणून ओळखलं जातं. इथेच लोक त्यांची सुन्न पडलेली इंजिनं घेऊन येतात आणि त्यात प्राण फुंकला जातो किंवा इथनंच शेतात, कारखान्यात जिथे कुठे बंद पडलेल्या, मोडलेल्या इंजिनला त्यांच्या स्पर्शाची गरज आहे तिथे शामा मिस्त्री पोचतात.
इंजिन तयार करणाऱ्या कंपन्या देखील शामा मिस्त्रींच्या कौशल्याची जाण ठेवून आहेत. किर्लोस्कर, यानमार आणि स्कोडासारख्या बड्या कंपन्यांची आणि अनेक स्थानिक कंपन्यांची इंजिन्स ते दुरुस्त करू शकतात. “त्यांच्या इंजिनात दुरुस्ती करण्यासाठी ते माझा सल्ला घेतात, आणि मी कायम त्यांना माझं मत सांगतो,” ते म्हणतात.
उदाहरणार्थ, पूर्वी इंजिनची हँडल मजबूत नसायची आणि बोजड असायची. “लोकांना सारखं सारखं हँडल फिरवून जखमा व्हायच्या, त्रास व्हायचा. मग मी काही कंपन्यांना हँडलमध्ये दुरुस्ती करायला सुचवलं. आता बऱ्याच कंपन्यांनी दोनऐवजी तीन गियर्स टाकलेत,” ते सांगतात. यामुळे हँडलचा तोल सुधारतो, वेळ आणि हालचाल नीट होते. ते सांगतात की कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही कंपन्या त्यांना स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा कंपनीच्या वर्धापनदिनासारख्या कार्यक्रमांना आवर्जून आमंत्रित करतात.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात शामा मिस्त्रींची फार धावपळ असते, महिन्याला ते जवळ जवळ १० इंजिनं दुरुस्त करतात – आणि प्रत्येक कामाचे त्यांना काय बिघाड झालाय त्याप्रमाणे रु. ५०० ते रु. २००० असा मेहनताना मिळतो. “पावसाळा सुरू होण्याआधी बरेच शेतकरी रानानी विहिरी खोदतात आणि तेव्हाच मोटरींची चिक्कार कामं असतात,” ते सांगतात. एरवी वर्षभर त्यांचं काम सुरूच असतं पण मागणी जराशी कमी असते.

वरच्या ओळीतः शमशुद्दिन म्हणतात की तरुण पिढीतल्या फार कुणाला काळ्याकुट्ट इंजिनमध्ये हात घालायचा नाहीये. ‘मी काय कधी हातमोजे घातले नाही, आणि आता कशापायी घालावे?’ ते विचारतात. खालच्या ओळीतः खोललेल्या इंजिनची आतली दुनिया (डावीकडे) आणि शमशुद्दिन यांनी सत्तर एक वर्षांपूर्वी विकत घेतलेली काही अवजारं (उजवीकडे). योग्य तीच हत्यारं, अवजारं वापरण्याबाबत ते फार आग्रही असतात आणि बहुतेक वेळा स्वतःकडची अवजारंच दुरुस्तीच्या कामासाठी घेऊन जातात
ते जेव्हा यंत्रं दुरुस्त करत नसतात तेव्हा ते आपल्या दोन एकर रानात काम करतात, ऊस काढतात. ते ७ किंवा ८ वर्षांचे असताना शेतकरी असणारे त्यांचे आई-वडील, जन्नत आणि अप्पालाल कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीहून बारवाडला स्थायिक झाले. घराला जरा हातभार लावण्यासाठी वयाच्या १० व्या वर्षी शमशुद्दिन यांनी बारवाडच्या एका मेकॅनिकच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. १० तास काम केल्यावर त्यांना दिवसाचा १ रुपया मिळत असे. घरच्या हलाखीमुळे ते पहिलीच्या पुढे शिकू शकले नाहीत. “मी जर का शिक्षण पूर्ण केलं असतं ना, तुम्हाला सांगतो, विमानच उडवलं असतं मी,” हसत हसत शामा मिस्त्री सांगतात.
१९५० चा काळ होता, त्यांच्या गावापासून सुमारे ३० किमीवर असणाऱ्या हातकणंगले गावी मालगाड्या थांबायच्या तिथे शामा मिस्त्री दर दोन आठवड्याला बैलगाडी जुंपून जायचे का तर इंजिनसाठी डिझेल खरेदी करायला. “तेव्हा डिझेलचा खर्च लिटरमागे एक रुपया यायचा, आणि मी दर खेपेला तीन बॅरल [एकूण ६०० लिटर] घेऊन यायचो.” त्या काळी त्यांना लोक ‘शामा ड्रायव्हर’ म्हणायचे, त्यांचं मुख्य काम म्हणजे इंजिनची देखभाल करणं होतं.
१९५८ साली, जवळच्या दूधगंगा नदीतून पाणी लिफ्ट करण्यासाठी १८ एचपीचं इंजिन बसवायला कोल्हापूर शहरातून काही मेकॅनिक बारवाडला आले होते. तेव्हा २२ वर्ष वय असणाऱ्या शमशुद्दिननी त्यांचं काम बारकाईनं पाहिलं आणि इंजिन कसं काम करतं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. “त्याला रोज दोन रुपयांचं कच्चं तेल लागायचं,” तेव्हाच्या आठवणी ते सांगतात. पुढल्याच वर्षी नदीचं पाणी वाढलं आणि इंजिन बंद पडलं. परत एकदा तंत्रज्ञांना बोलावलं गेलं आणि मग शमशुद्दिन यांनी आपलं कौशल्यं पारखून बघायची संधी सोडली नाही. पुन्हा १९६० मध्ये जेव्हा इंजिन परत पाण्यात गेलं (कालांतराने सुधारित इंजिन बसवण्यात आलं) तेव्हा त्यांनी स्वतः ते दुरुस्त केलं. “त्या दिवसापासून, माझं नाव ‘शामा ड्रायव्हर’ नाही ‘शामा मिस्त्री’ पडलं,” ते अगदी अभिमानाने सांगतात.
१९६२ साली एक घटना घडली आणि ज्यामुळे शमशुद्दिन यांची खात्री पटली की इंजिनच्या दुनियेचा जास्त सखोल वेध घ्यायला पाहिजे. बारवाडच्या एका शेतकऱ्याने त्यांना त्याच्या रानासाठी इंजिन आणण्याची कामगिरी सोपवली. “मी पार घुनकीला [५० किमी अंतरावर] कंपनीच्या गोडाउनला गेलो आणि ५,००० रुपयात इंजिन घेऊन आलो.” त्यानंतर पुढचे तीन दिवस, २० तास त्यांना ते इंजिन जोडायला लागले. “कंपनीच्या मेकॅनिकनी नंतर तपासणी करून निर्वाळा दिला की त्याची एकदम व्यवस्थित जुळणी केलेली आहे.”

बारवाडच्या आपल्या घरीः शमशुद्दिन आणि त्यांच्या पत्नी गुलशन, ज्या म्हणतात, ‘मला विचारलंत तर ती यंत्रं नीट करण्यापरीस रानातलं कामच बेस आहे’
हळू हळू एक निपुण मेकॅनिक म्हणून शमशुद्दिन यांची ख्याती वाढतच गेली. मधल्या काळात त्यांनी दुसऱ्या एका मेकॅनिकच्या हाताखाली पाच वर्षं काम केलं होतं, दिवसा २ रु. मजुरीवर. जेव्हा त्यांनी स्वतः इंजिन दुरुस्त करायला सुरुवात केली तेव्हा त्यांची कमाई दिवसा रु. ५ पर्यंत गेली. ते बेळगावच्या (आता बेळगावी) चिकोडी तालुक्यातल्या जवळपासच्या गावांमध्ये सायकलवर जायचे. आज त्यांचे गिऱ्हाइक त्यांच्याशी फोनवर संपर्क साधतात आणि त्यांना स्वतःच्या वाहनाने घेऊन जातात.
पण यंत्रं दुरुस्त करायची म्हणजे धोका आलाच. “एकदा [१९५० च्या सुमारास] काम करताना मला इजा झाली. अजूनही माझ्या पाठीवर वण आहेत. ते काही जायचे नाहीत,” शामा मिस्त्री सांगतात. काही महिन्यांपूर्वीच कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झालीये. “डॉक्टरांनी मस त्यांना सहा महिने आराम करा म्हणून सांगितलंय, पण मग इंजिन दुरुस्त कोण करणार हो,” त्यांच्या पत्नी गुलशन म्हणतात. “दोन महिने झाले नसतील, लोकांची बोलावणी सुरू, या अन् इंजिन दुरुस्त करून द्या.”
गुलशन यांनीही सत्तरी पार केलीये. घरच्या दोन एकर रानात ऊस काढायला त्या मदत करतात जो पुढे बाजारात विकायला जातो. “ते मला पण इंजिन कसं दुरुस्त करायचं ते शिकायला सांगतात, शिकवतात देखील. मला नाही बाई तसलं काम आवडत. ती यंत्रं नीट करण्यापरीस रानातलं कामच बेस आहे,” हसत हसत त्या म्हणतात.
त्यांच्या मुलांनी मात्र वडलांची कला आत्मसात केली नाही. (त्यांना दोघांनी लेकी नाहीत.) सर्वात थोरला मुल्ला, वय ५८ बारवाडला इलेक्ट्रिक मोटरचं दुकान चालवतो. पन्नाशी पार केलेला मधला इसाक रानाचं सारं पाहतो. त्यांचा धाकटा मुलगा, सिकंदर दहा वर्षांखाली वारला.
“मी कुठंकुठं फिरलो, लोकांचं काम पाहिलं आणि ही कला शिकलो,” शामा मिस्त्री काहीशा खेदाने म्हणतात. “आज इथं घरात सगळं ज्ञान आहे, पण कुणाला पण इंजिनला हात लावायची इच्छा नाही.”


मोठाली, अवजड इंजिन दुरुस्त करायची असतील तर शामा मिस्त्री थेट साइटवरच जातात. इथे, ते बेळगाव जिल्ह्याच्या गजबरवाडी गावात विहीर खोदताना दगडं उचलून टाकणारं डिझेल इंजिन दुरुस्त करतायत
घराबाहेर पण परिस्थिती फारशी वेगळी नाही. “कुणालाच इंजिनच्या काळ्याकुट्ट तेलात हात घाण करायचे नाहीत. तरण्या पोरांना हे ‘घाणीतलं’ काम वाटायलंय. आता तेलालाच हात लावायचा नाही तर इंजिन कसं काय दुरुस्त करणार?” ते हसत हसत विचारतात. “आताशा कसंय लोकाकडे पैका आलाय. त्यामुळे इंजिन जरा बिघडू द्या, ते आता नवीनच घेऊन यायलेत.”
तरीही, इतक्या वर्षांमध्ये शमशुद्दिन यांनी जवळच्या गावांमधले १०-१२ मेकॅनिक तयार केलेच. ते आता सहज इंजिन दुरुस्त करतात याचा त्यांना अभिमान आहे, अर्थात त्यांच्याइतकं कसब कुणाकडेच नाही आणि अधून मधून ते एखादा बिघाड शोधण्यासाठी त्यांचा सल्लाही घेतात.
तरुण पिढीला काय सल्ला द्याल असं विचारल्यावर शमशुद्दिन हसतात आणि म्हणतात, “तुम्हाला ना कशाचं तरी याड पाहिजे. तुम्ही काही बी करा, पर जीव लावून करा. मला यंत्रांचं लई वेड आहे आन् मी माझी सारी जिंदगी तेवढंच केलंय. अगदी लहानपणापासून मला यंत्रं खोलावीशी आणि दुरुस्त करावीशी वाटायची आणि मला तरी वाटतं की मी माझं स्वप्न पूर्ण केलंय.”
आणि हे सांगत असतानाच ते जाहीर करून टाकतात – “मी दोन्ही हातात पाना घेऊनच मरतोय बघा” – नंतर ते सांगतात की त्यांच्या तरुणपणी त्यांची गाठ एका ज्येष्ठ मेकॅनिकशी पडली होती आणि त्यांना इंजिन दुरुस्त करण्याचं असं काही वेडं होतं की शमशुद्दिन आजही ते विसरले नाहीयेत. त्यांचेच हे शब्द आहेत. “ते अशा कामासाठी अगदी शेकडो किलोमीटर प्रवास करायला तयार असायचे.” ते त्यांचे गुरू [त्यांचं नाव त्यांना नीटसं काही आठवत नाही] त्यांना हातात पाना असतानाच मरण येऊ दे असं एकदा म्हणाले होते. “मी त्यातनंच प्रेरणा घेतली आणि आज वयाची ८३ पार केली तरीही मी काम करतोय. मरण आल्यावरच आम्ही रिटायर होणार!” शामा मिस्त्री ठासून सांगतात.
अनुवादः मेधा काळे