गुलजार अहमद भट शांतपणे दल लेकच्या १५ नंबर घाटापाशी लाकडी बाकावर बसलाय. इतर शिकाराचालकांप्रमाणेच त्याच्याकडेही २ ऑगस्टपासून फारसं गिऱ्हाईक नाही. याच दिवशी जम्मू आणि काश्मीर सरकारने पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडून जाण्याची सूचना जारी केली. “आमचं सगळं भविष्यच डळमळीत झालंय. गेल्या १८ वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर बुकिंग [रद्द झालेलं] मी पाहिलं नाहीये,” ३२ वर्षीय गुलजार सांगतो.
१० ऑक्टोबर रोजी सरकारने ही सूचना मागे घेतली त्यानंतर शिकाऱ्यातून सफर करण्यासाठी मोजके लोक येऊ लागले आहेत. बहुतेक सगळे प्रवासी सहलींच्या मध्यस्थांमार्फत आले होते. त्यामुळे त्यांना भरपूर घासाघीस केली. “जर पर्यटक थेट आमच्याकडे आले तर दल लेकमधून गोल फिरून येण्यासाठी आम्ही ६०० रुपये घेतो [जो सरकार मान्य दर आहे]. पण याच फेरीसाठी मध्यस्थ मात्र आम्हाला २५० रुपये देतात. आणि सध्या अशी वेळ आहे की भाडं नाकारणंही शक्य नाही,” ४२ वर्षीय मेहराज-उद्-दिन पक्तू सांगतात. निम्मा नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजूनही ते पर्यटकांची वाट पाहतायत. येऊ घातलेल्या कडाक्याच्या थंडीत आपलं कुटुंब तगून राहील अशी आजही त्यांना आशा आहे.
स्वतः शिकाऱ्याचे मालक शिकारा चालवतात किंवा मग चालकांना हंगामाला अंदाजे ३०,००० रुपये भाड्यावर दिले जातात. पर्यटनाच्या सहा महिन्यांच्या हंगामात शिकारा चालक २ ते २.५ लाखाची कमाई करू शकतात. शिकाऱ्याचं भाडं आणि इतर खर्च वगळता त्यांच्या हातात साधारणपणे १,८०,००० रुपये येतात. हे उत्पन्न संपूर्ण १२ महिन्यांमध्ये विभागलं तर – महिन्याला केवळ १५,००० रुपये इतकंच भरतं. हंगाम नसतो तेव्हा शिकारावाल्यांकडे दुसरं कसलंही काम नसतं, किंवा ते पडेल ती कामं करतात. काही जण तलावात घरच्यापुरती किंवा विक्रीसाठी मासेमारी करतात.
काश्मीर खोऱ्यातला पर्यटनाचा हंगाम साधारणपणे मे ते ऑक्टोबर असा असतो. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा या वर्षीप्रमाणे जर बर्फ लवकर पडायला लागलं तर शिकाऱ्याची सफर करणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होऊ लागते. गेल्या वर्षी, जे मुळातच पर्यटनाच्या दृष्टीने फारसं चांगलं वर्ष नव्हतं, त्या वर्षी भारतीय आणि परदेशी अशा ८.५ लाख पर्यटकांनी काश्मीर खोऱ्याला भेट दिली. या वर्षी या संख्येला ग्रहण लागलंय आणि प्रत्यक्षातले आकडे अजूनही स्पष्ट नाहीत.
एक नक्की, काश्मीरच्या सगळ्या सरोवरांमध्ये, दल लेकसह, नौकाविहार करणाऱ्या ४,८०० शिकाऱ्यांचं ऑगस्टपासून फार मोठं नुकसान झालं आहे, असं ६० वर्षीय वली मोहम्मद भट सांगतात. ते अखिल जम्मू काश्मीर टॅक्सी शिकारा मालक संघटना आणि अखिल जम्मू काश्मीर शिकारा चालक संघटनेचे अध्यक्ष आहेत. सोबतच दल लेक, निगीन लेक, मानसबल लेक आणि झेलम नदीतल्या ९६० हाउसबोट मालकांचीही तीच गत आहे, काश्मीर हाउसबोट मालक संघटनेचे जनरल सेक्रेटरी अब्दुल रशीह कल्लू सांगतात.
“एकट्या दल लेकमधल्या [जिथे ३७ घाट किंवा छोटे धक्के आहेत] शिकारावाल्यांचंच ८ कोटींहून जास्त नुकसान झालंय,” भट अंदाज वर्तवतात. काहींनी शिकारा विकत घेण्यासाठी वेगवेगळीकडून कर्जं काढलीयेत. नव्या शिकाऱ्याची किंमत दीड लाखापर्यंत जाते. आता त्यांना हप्ते भरणं शक्य होत नाहीये. काहींनी देणेकऱ्यांचा तगादा सहन न होऊन कर्ज फेडण्यासाठी शिकारे विकून टाकलेत. ज्या कुटुंबाचं पोट केवळ शिकाऱ्यावर होतं अशा कुटुंबांसाठी सरकारची नुकसान भरपाईची कसलीही योजना नाहीये.

श्रीनगरमधील दल लेकच्या स्तब्ध, नितळ पाण्यात गिऱ्हाइकांच्या प्रतीक्षेत निश्चल उभा असलेला शिकारा

नोव्हेंबरमध्ये लवकरच सुरू झालेल्या हिमवृष्टीमध्ये पैसे देऊन नौका विहार करणाऱ्या तुरळक पर्यटकांना घेऊन जाणारे काही शिकारे

“मी माझ्या मित्रांकडून आणि सहकाऱ्यांकडून २०१७ साली माझ्या मुलीच्या लग्नासाठी ३ लाख रुपये उसने घेतले होते, त्यातले १ लाख परत देखील केले. उरलेली रक्कम या हंगामात फेडून टाकायचं मी ठरवलं होतं. पण ऑगस्टनंतरच्या धक्क्यातून मी सावरलो नाहीये. मला कळतच नाहीये मी कर्ज कसं फेडणारे ते,” ६० वर्षीय गुलाम अहमद मट्टू म्हणतात. त्यांनी आपला मुलगा झहूरला केरळच्या नौकानयनाच्या स्पर्धांना पाठवलंय. कुटुंबासाठी काही तरी कमाई होण्यासाठी ही धडपड

मेहराज-उद-दिन पक्तू गेल्या २० वर्षांपासून दल लेकमध्ये शिकारा चालवतायत. “ऑगस्ट महिन्यात सरकारने पर्यटकांना काश्मीर खोऱ्यातून जाण्याच्या सूचना दिल्यापासून मला एकाही फेरीचं भाडं मिळालेलं नाहीये. माझ्याकडे हा शिकाऱ्याचा व्यवसाय सोडून दुसरं काहीही नाहीये,” ते सांगतात. “आणि माझी तीन मुलं आहेत, त्यांची शिक्षणं आहेत. हा हिवाळा कसा काढायचा याचाच मला घोर लागलाय. आता जी काही कमाई होईल त्यावर आमचा हिवाळा तरून जातो”

“रोजच्या सारखा दिवस होता [जेव्हा सूचना जारी झाली], आम्ही दल लेकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांना घेऊन चाललो होतो. राज्यातून पर्यटकांनी निघून जावं ही सूचना म्हणजे अफवा असावी असं आम्हाला वाटत होतं. नक्की काय होणार आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती,” ५० वर्षीय अब्दुल रशीद शहा सांगतात. “गेल्या हंगामात मी थोडे पैसे मागे टाकले होते, ते देखील आता संपलेत. माझ्या घरच्यांना आता उपाशी रहायला लागणार बहुतेक...”

अखिल जम्मू काश्मीर टॅक्सी शिकारा मालक संघटना आणि अखिल जम्मू काश्मीर शिकारा चालक संघटनेचे अध्यक्ष वली मोहम्मद भट, पर्यटकांच्या प्रतीक्षेत

नोव्हेंबरच्या अकाली बर्फवृष्टीत श्रीनगरच्या दल लेकवरच्या एका हाउसबोटीतून १३ नं. घाटावर काही पर्यटकांना घेऊन जाणारा एक शिकारा चालक (नाव उघड करण्याची त्याची इच्छा नाही). ऑगस्ट महिन्यात काश्मीर खोऱ्यात पर्यटकांना बंदी घालण्याची सूचना जारी झाल्यानंतर आतापर्यंत त्यांची ही केवळ तिसरी फेरी असल्याचं ते सांगतात

शिकारा चालक गुलजार अहमद भट, वय ३२ (‘व्हॅली ऑफ सेन्ट्स’ या सुप्रसिद्ध फिल्ममध्ये त्याने अभिनय केला आहे) गेली १८ वर्षे या व्यवसायात आहे. “आमच्या पाहुणचारासाठी आम्ही प्रसिद्ध होतो. आमच्या पर्यटकांमध्ये आमची ही जी प्रतिमा होती तीच पुसली जाईल अशी आता भीती वाटू लागलीये,” तो म्हणतो. “पण ऑगस्टपासून सगळं काही बदलून गेलंय. संपूर्ण देशात आमची ओळखच पुसली गेलीये. पर्यटकांना काश्मीरमध्ये यायची भीती वाटू लागलीये.” या हंगामात तो कसा तगून राहणार आहे? “या सगळ्या संघर्षाने आम्हाला बरंच काही शिकवलंय,” तो उत्तरतो, “आणि त्यातला एक धडा म्हणजे बचत करत रहा, कारण काश्मीरमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. आता तर कळून चुकलंय की दर २-३ वर्षांनी आम्हाला काही तरी वाईटाचाच सामना करावा लागणार आहे”

४० वर्षीय इम्तियाझ जालांनी २०१९ मध्ये जुलैच्या आधीच शिकारा विकत घेतला होता. या वर्षी झालेल्या आगाऊ बुकिंगमुळे त्यांना यंदा बऱ्यापैकी नफा कमवण्याची आशा होती. पण आता पर्यटनाचा मोसम संपलाय आणि कर्जाची परतफेड करणं शक्य नसल्यामुळे त्यांनी त्यांचा शिकारा विकून टाकायचं ठरवलंय. त्यांच्या तीन मुली प्राथमिक शाळेत शिकतात. “मला त्यांचा निकालही पाहू दिला नाहीये [शाळेने निकाल राखून ठेवलाय] कारण शाळेतल्या लोकांनी आधी त्यांची तीन महिने थकलेली फी भरा असं सांगितलंय,” ते सांगतात

जिथे तिथे सैन्य असलेल्या ठिकाणी पर्यटक कसे येणार, उत्तर श्रीनगरच्या रैनवारी भागातले शिकारा चालक ५० वर्षीय मोहम्मद अब्दुल्ला विचारतात. “सरकारने पाठवलेल्या सैन्याच्या जास्तीच्या तुकड्या हटवल्या तर थोडे तरी पर्यटक येतील अशी आम्हाला आशा आहे,” ते म्हणतात. “९० च्या आधी जसं काश्मीर होतं ना तसं परत पहायचंय मला. त्या काळी कसलाही संघर्ष नव्हता”

गुलाम मोहम्मद सुतारकाम करतात आणि गेल्या ४० वर्षांपासून शिकारे बनवतायत. ही कला आणि व्यवसाय दोन्ही त्यांच्या वडलांकडून वारसा म्हणून त्यांना मिळालेत. “ऑगस्ट २०१९ आधी माझ्याकडे आठ शिकाऱ्यांची कामं होती, पण सरकारची सूचना आली या सगळ्या ऑर्डर रहित झाल्या,” ते सांगतात

त्यांच्याकडच्या सगळ्या ऑर्डर रहित झाल्या आहेत आणि त्या कामासाठी गुलाम मोहम्मद यांनी खरेदी केलेलं ३ लाखांचं लाकूड मात्र त्यांच्या कारखान्यात तसंच पडून आहे. ते म्हणतातः “माझ्यासारख्यासाठी या हंगामात तगून राहणं फार मुश्किल आहे”

नोव्हेंबरच्या सुरुवातीला दल लेकजवळच्या संघटनेच्या कचेरीजवळ शिकारावाले बसून आहेत

पर्यटनाशी संबंधित सगळ्या उद्योगांना फटका बसलाय – दल लेकमधील स्थानिक हातमागाचे दुकानदार पर्यटकांच्या प्रतीक्षेत, शिकारावालेच शक्यतो त्यांच्याकडे गिऱ्हाईक घेऊन येतात

पर्यटनाचा हंगाम संपल्यात जमा आहे आणि महिनोन महिने पर्यटकांची वाट पाहिल्यानंतर आता शिकारावाल्यांचा सामना प्रदीर्घ, खडतर आणि अनिश्चित अशा हिवाळ्याशी आहे
अनुवादः मेधा काळे