पेमा रिन्चेन ‘ताशी देलेक’ (तिबेटी भाषेत आशीर्वाद आणि शुभेच्छा) म्हणतात आणि पूर्व लडाखच्या, चीनी सीमेजवळच्या हान्ले खोऱ्यापलिकडे क्षितिजाच्या दिशेने चालू लागतात. त्यांच्यासोबत आहे पश्मीना बकऱ्यांचा मोठा कळप, दिवसभराच्या चारणीनंतर हे सगळेच आता आपल्या मुक्कामी निघाले आहेत.
समुदायाचे पुढारी असणाऱ्या करमा रिन्चेन यांची पेमा ही दुसरी मुलगी. त्या अंदाजे २८० चांगपा कुटुंबांसोबत हान्लेमध्ये राहतात. चांगपा हे भटकंती करणारे, याक आणि शेरडं-मेंढरं पाळणारे पशुपालक आहेत. नोव्हेंबर ते मे अशा मोठ्या हिवाळ्यात ते शक्यतो एका ठिकाणी मुक्काम करतात. उन्हाळ्यात ते उंचावरच्या कुरणांकडे जातात. मी काही काळापूर्वी त्यांना हान्ले खोऱ्यातल्या नालांग कुरणांजवळ भेटलो होतो. हे खोरं १४,००० फुटांहून जास्त उंचीवर असणाऱ्या चांगथांग पठारावर आहे. हा पठारी प्रदेश पूर्वेला तिबेट क्षेत्रात शेकडो किलोमीटर पसरला आहे आणि तिबेटी पठाराचा भाग आहे.
चारणीच्या काळात चांगपा स्त्रिया सगळ्या प्रकारची कामं करतात. तंबू उभारणं, जळण आणणं, प्राण्यांना बांधून घालणं, शेळ्यांचं दूध काढणं आणि इतरही किती तरी. आणि त्यातूनही त्या आपल्या मुलांसाठी आणि स्वयंपाकासाठी वेळ काढतात.
तिबेटच्या पठारावर अनेक भटक्या पशुपालक समुदायांचं वास्तव्य आहे. त्यात पश्चिमी हिमालयातले चांगपा (पहाः काश्मिरी लोकर विणणारे चांगपा ) आणि पर्वतांच्या पूर्वेकडच्या रांगामधले ब्रोकपा (पहाः ब्रोकपाः ‘द जंगल इझ अवर मदर’ ). पर्वतरांगा आणि दऱ्यांनी या समुदायांमध्ये अंतर पाडलं असलं तरी ते सांस्कृतिक, वांशिक आणि अध्यात्मिक दुव्यांनी एकमेकांशी जोडले गेलेले आहेत.
अशाच एका दुसऱ्या भटकंतीत मी पूर्व हिमालयातल्या वनाच्छादित रांगांमध्ये भटकंती करणाऱ्या मोन्पा जमातीच्या ब्रोकपांना भेटायला गेलो होतो. ते बहुतकरून अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिम केमांग आणि तवांग जिल्ह्यांमध्ये राहतात. तेही उन्हाळ्याचा काळ उंचावरच्या कुरणांमध्ये घालवतात. हिवाळा सुरू झाला की आपल्या याक प्राण्यांच्या कळपांबरोबर ते पश्चिम केमांग जिल्ह्यातल्या लागम सारख्या कायमस्वरुपी वस्तीत मुक्कामी येतात.
त्या पिटुकल्या वस्तीवर पोचण्यासाठी मला आठ तास पायपीट करावी लागली. वाटेत मला ७० वर्षांच्या यामा त्सेरिंग भेटल्या. त्या म्हणाल्या, “माझं वय झालंय आणि आता मला तितकं [चढणीवर] चालवत नाही. म्हणून मग मी घरातली कामं पाहते, चुरपी [याकच्या दुधाचं चीज] करणं आणि नातवंडांवर लक्ष ठेवणं. लागलंच तर मग मी उन्हाळ्यात बाहेर पडते.”
गेल्या वर्षी मे महिन्यात मी परत अरुणाचलला गेलो, ११,१५२ फूट उंचीवरच्या चांदर या वस्तीवर. या वेळी मी लेकी सुझुक यांच्या घरी राहिलो. लेकी यांना दोन मुलं आहेत आणि त्यांच्याकडे ३० याक आहेत. ब्रोकपा स्त्रियाही चांगपा समुदायाच्या स्त्रियांसारखीच विविध कामं करत असतात. त्यांच्या सामुदायिक जीवनाच्या सगळ्या अंगांमध्ये त्यांचा दृश्य सहभाग असतो आणि त्यांची मुलं आणि त्याचं जितराब याबद्दल त्या स्वतंत्रपणे निर्णय घेतात. मला आठवतंय, चांदरमध्ये सगळ्या ब्रोकपा स्त्रियांनी एकत्र येऊन गोम्फा (लहान बौद्ध प्रार्थनास्थळ) बांधला होता.
मग काही काळाने मी थंडगार पर्वतराजींमधून कच्छच्या रणरणत्या उष्म्यामध्ये गेलो, आणखी एका पशुपालक समुदायाला भेटायला. फकिरानी जाट (पहाः चराऊ कुरणांचा अंतहीन शोध ). ते कच्छी आणि खराई उंट पाळतात. त्यांच्या भटकंतीचं स्वरुप आणखीनच गुंतागुंतीचं आहे, त्यांच्याकडचे प्राणी आणि पाण्याची उपलब्धता यावर ते अवलंबून असतं. अनेकदा भेटल्यानंतर मला त्यांचा विश्वास प्राप्त करून घेता आला. या काळात मी अनेकांना भेटलो. त्यात होत्या जाट हसीना. त्या आणि त्यांचे पती जाट अयूब ८० उंट पाळतात आणि वर्षभर भचाऊ तालुक्यात भटकंती करत असतात. हा समुदाय कर्मठ आहे आणि बाया बाहेरच्यांशी फारसं बोलत नाहीत. मात्र त्यांचा वावर सगळीकडे असतो. मी लखपत तालुक्याच्या ध्रांगावांध पाड्यावर अत्यंत तडफदार अशा नसिबीबाई शेरमामाद जाट यांना भेटलो. त्या छान हिंदी बोलतात. “आमची कुरणं आधीच आक्रसत चाललीयेत. आता आमचं पूर्वापारचं आयुष्य सोडून द्यावं लागणार अशी वेळ आलीये. आम्हाला काही तरी मदत हवीये... बघू या, आमचं म्हणणं कुणी तरी ऐकेल कदाचित.”

लेकी सुझुक, ब्रोकपा पशुपालक, चांदर गावातल्या आपल्या हिवाळी वस्तीवर एका अनाथ याक पिलाची प्रेमाने काळजी घेतायत

पश्चिम केमांग जिल्ह्यात सुमारे ११,२५० फुटावरच्या दिरांग खोऱ्यामधल्या वस्तीवर जळणासाठी मुळं आणि वनस्पती गोळा करणारी तरूण ब्रोकपा स्त्री

यामा त्सेरिंग लागामच्या वस्तीवर वर्षभर मुक्कामी असतात. उंचावरच्या मागोला दर हंगामात चालत जाणं आता त्यांना जड जातं. त्यांच्यासारख्या वयस्क स्त्रिया लहान मुलांची काळजी घेतात आणि चुरपी बनवून पश्चिम केमांग जिल्ह्यातल्या इतर मोन्पा गावांमध्ये विकतात. चुरपी हे याक प्राण्याच्या दुधापासून बनवलेलं चीज आहे अजून ब्रोकपा समुदायाची महत्त्वाची उपजीविका आहे.

दिरांग खोऱ्यामधल्या एका स्तूपामध्ये प्रार्थनेसाठी जाणारा ब्रोकपा स्त्रियांचा गट

दिवसभर बाहेर काम केल्यानंतर घरी येऊन आपल्या मुलीचे, रिन्झेन चे केस विंचरणारी पेमा ग्युरमे

लडाखच्या हान्ले रांगांमध्ये आपल्या कुटुंबाचा तंबू ठोकणारी दोहना. जड वजनं उचलायला लागणारं हे काम तेही १३,००० फुटावर बिलकुल सोपं नाही

हानले रांगांमध्ये १३,२४५ फुट उंचीवर आपली पश्मिना शेळ्या चारणारी यम-चेन-मो

पेमा नुकतीच सरपण गोळा करून परतलीये. ऑगस्टपर्यंत खरं तर उन्हाळा असतो मात्र या गवताळ प्रदेशात आताच बर्फाचा थर दिसायला लागलाय. गोळा केलेल्या जळणामुळे आता तिच्या तंबूतली छोटीशी चूल सतत पेटती राहील याची निश्चिंती आहे.

तात्पुरत्या मुक्कामात सोनम वांगे पारंपरिक लोण्याचा चहा, पो चा बनवतायत. चांगपांच्या आहारतला हा नेहमीचा घटक.

दुपार टळून गेलीये, २८ वर्षांची देन्चेन दोर्जे आपल्या छोट्या डोटेबरोबर खेळतीये. चांगपांची सकाळ आणि संध्याकाळ धामधुमीची असते, त्या मानाने दुपारी जर निवांत असतात

गुजरातच्या कच्छच्या फकिरानी जाट उन्हाळ्याची उष्ण दुपार असली तरीही त्यांचा पारंपरिक पेहराव परिधान करतात. स्त्रिया परिधान करत असलेले, स्वतः हाताने बनवलेले हे कपडे फारच क्वचित विकले जातात.

लखपत तालुक्याच्या ध्रांगावांध वस्तीवरच्या नसिबीबाई शरमामाद जाट यांना भूजच्या एका सामाजिक संस्थेकडून त्यांच्या ६० उंटांच्या कबिल्यासाठी एक वैद्यकीय संच मिळाला आहे

पाण्याच्या शोधात जाट हसीना त्यांचा खराई उंटांचा कबिला घेऊन चालली आहे. उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढते तेव्हा चारा आणि पाण्याची टंचाई इतकी तीव्र असते की या कुटुंबांना अगदी एका आड एक दिवस आपला मुक्काम हलवावा लागतो

लखपत तालुक्याच्या गुगारियाना गावात, गवत आणि तागाचा वापर करून नव्याने बांधलेल्या आपल्या घरात लहानगी भाग्यानी जाट. आई, आयेशा जाट हिला घर बांधायला मदत केल्याचं ती सांगते

लखपत तालुक्याच्या मोरी गावात शमानी जाट आपले चार लेक आणि पती करीम जाट यांच्यासाठी जेवण बवनतायत
अनुवादः मेधा काळे