जयपूरचा राजस्थान पोलो क्लब. फेब्रुवारी महिन्यातली दुपार. घड्याळात चार वाजले आहेत.
चार चार खेळाडूंचे दोन संघ सज्ज आहेत.
पीडीकेएफ संघातील भारतीय महिला पोलोफॅक्टरी इंटरनॅशनल संघाविरुद्ध प्रदर्शन सामना खेळतायत – हा भारतातील पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय महिला पोलो सामना आहे.
प्रत्येक खेळाडूच्या हाती एक लाकडी मॅलेट आहे. अशोक शर्मा यांचा हा या हंगामातील पहिला सामना आहे. पण त्यांना हा खेळ नवीन नाही.
कारागिरांच्या तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशोक यांना मॅलेट तयार करण्यात ५५ वर्षांचा अनुभव आहे. या वेताच्या छड्या कोणाही पोलो खेळाडूसाठी महत्त्वाच्या असतात. "माझा जन्मच मॅलेट तयार करणाऱ्या घरात झाला," ते आपल्या कुटुंबाच्या १०० वर्षांच्या वारशाबद्दल अभिमानानं म्हणतात. पोलो हा जगातील प्राचीन घोडेस्वार खेळांपैकी एक आहे.


अशोक शर्मा (डावीकडे) जयपूर पोलो हाऊसच्या बाहेर उभे आहेत जिथे ते व त्यांचं कुटुंब – पत्नी मीना आणि त्यांचे भाचे जितेंद्र जांगिड (उजवीकडे) विविध प्रकारच्या पोलो मॅलेट तयार करतात
ते या शहरातील सर्वांत जुना व प्रसिद्ध असा जयपूर पोलो हाऊस हा कारखाना चालवतात. त्यांचं घरही तिथेच असून ते आपली पत्नी मीना व भाचे जितेंद्र जांगिड, ३७, उर्फ 'जितू' यांच्यासह विविध प्रकारच्या पोलो मॅलेट तयार करतात. हे कुटुंब राजस्थानच्या जांगिड या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाचं आहे.
अंपायर एका रेषेच्या दुतर्फा उभ्या असलेल्या संघांमध्ये
चेंडू फिरवतात; आणि सामना
सुरू होताच ७२ वर्षीय अशोक आठवणीत रमून जातात. "मी सायकलने मैदानावर यायचो आणि
मग मी स्कूटर विकत घेतली." पण २०१८ मध्ये त्यांना आलेल्या किरकोळ मेंदूच्या धक्क्यापासून
त्यांचं मैदानावर येणं कमी झालं.
"नमस्ते पॉली जी," दोन पुरुष खेळाडू येऊन म्हणतात. हे नाव त्यांना त्यांच्या नानी (आजी) ने दिलं
होतं, जे अजून जयपूरच्या पोलो
वर्तुळात टिकून आहे. "आजकाल मला इथे जास्त यावं वाटतं, जेणेकरून आणखी खेळाडूंना कळेल की मी अजून काम करतोय
आणि ते आपल्या छड्या दुरुस्तीला देतील," ते म्हणतात.
साधारण वीसेक वर्षांपूर्वी अशोक यांच्या कारखान्याला
भेट दिली असता भिंतीभर उलट्या टांगलेल्या पोलो मॅलेट दिसायच्या. ते म्हणतात की भिंतीचा
पांढुरका रंग दिसणारही नाही इतक्या छड्या टांगलेल्या असायच्या आणि "मोठे मोठे
खेळाडू यायचे, आपली आवडती
छडी निवडून माझ्याशी गप्पा मारायचे, मग चहापाणी घेऊन निघायचे."
खेळ सुरू झाला असून आम्ही राजस्थान पोलो क्लबचे माजी सचिव वेद आहुजा यांच्या शेजारी बसलो आहोत. "प्रत्येकाकडे पॉलीने तयार केलेल्या मॅलेट असायच्या," ते हसून म्हणतात. "पॉली क्लबला बांबूच्या मुळापासून तयार केलेले चेंडूदेखील पुरवायचे," आहुजा यांना आठवतं.


डावीकडे: अशोक (मध्यभागी) आंतरराष्ट्रीय पोलो खेळाडूंसोबत बसले आहेत, जे ९०च्या दशकात छड्यांची डागडुजी, खरेदी करण्यासाठी त्यांना भेट द्यायचे. उजवीकडे: एकेकाळी मॅलेटने गच्च भरलेली काचेची दालनं आता रिकामी आहेत
पोलो खेळणं गर्भश्रीमंत किंवा सैन्यातील लोकांनाच परवडतं, असं अशोक म्हणतात. २०२३ मध्ये इंडियन पोलो असोसिएशनमध्ये (आयपीए) केवळ ३८६ खेळाडू नोंदणीकृत होते. "एक सामना खेळण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचे किमान पाच ते सहा घोडे असावे लागतात," ते म्हणतात. कारण प्रत्येक सामना चार ते सहा फेऱ्यांमध्ये विभागला असतो, आणि प्रत्येक खेळाडूला दर फेरीत नवीन घोडा आणावा लागतो.
जुन्या, खासकरून राजस्थानमधील राजघरण्यांनी या खेळाला राजाश्रय
दिला होता. "माझे काका केशु राम जोधपूर व जयपूरच्या राजांसाठी पोलो मॅलेट बनवायचे," ते म्हणतात.
गेल्या तीसेक वर्षांत अर्जेंटिनाने पोलोच्या विश्वात
खेळ, उत्पादन व नियंत्रण या सर्वच
बाबतीत राज्य केलंय. "त्यांचे पोलोचे घोडे भारतात सुपरहिट आहेत, शिवाय पोलो मॅलेट व फायबर ग्लासचे चेंडूसुद्धा.
खेळाडू प्रशिक्षणासाठी देखील अर्जेंटिनाला जातात," अशोक सांगतात.
“अर्जेंटिनाच्या छड्यांमुळे माझं काम बंद व्हायची
वेळ आली होती, पण नशीब
मी तीस-चाळीस वर्षांपूर्वी सायकल पोलो मॅलेट तयार करू लागलो, म्हणून माझ्याकडे अजून काम आहे,” ते म्हणतात.
सायकल पोलो हा कुठल्याही प्रकारच्या आणि आकाराच्या सायकलवर खेळता येण्यासारखा खेळ आहे. घोडेस्वार प्रकाराच्या तुलनेत “हा साध्या माणसाचा खेळ आहे,” अशोक म्हणतात. सायकल पोलो मॅलेट तयार करण्याच्या कामातून त्यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास रु. २.५ लाख एवढं आहे.


डावीकडे: अशोक म्हणतात की अनेक वर्षं स्थानिक बाजारातील लाकूड वापरून चांगला अनुभव न आल्यामुळे ते मॅलेटच्या टोकासाठी आयात केलेल्या स्टीम बीच आणि मॅपल लाकडावर अवलंबून असतात. उजवीकडे: जितू या वेताची मॅलेट बनवायला सुरुवात करतात. ते हॉर्सबॅक पोलोसाठी ५० ते ५३ इंची लांबी आणि सायकल पोलोसाठी ३२ ते ३६ इंची लांबी चिन्हांकित करतात
अशोक यांना केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील नागरी व सैनिक खेळाडूंकडून वर्षभरात जवळपास १०० सायकल पोलो मॅलेटच्या ऑर्डर मिळतात. प्रत्येक छडीवर त्यांना अंदाजे १०० रुपयांचाच नफा होतो. याचं कारण देताना ते म्हणतात की, “हे खेळाडू सहसा गरीब असतात, म्हणून मला तेवढ्यात निभावून घ्यावं लागतं.” त्यांना अधूनमधून कॅमेल पोलो (उंटस्वार) आणि एलिफंट पोलो (हत्तीस्वार) मॅलेटच्या, तसेच मिनिएचर गिफ्ट सेटच्या ऑर्डरही मिळतात.
“आजकाल सामने बघायला कोणीच नसतं,” आम्ही मैदानातून बाहेर पडताना
अशोक म्हणतात.
एकदा या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना झाला होता, तेंव्हा जवळपास ४०,००० लोक पाहायला होते आणि काही जण तर झाडावरही चढून बसले होते. अशा आठवणी त्यांना बदलत्या काळाशी जुळवून घेण्यात मदत करतात, आणि मॅलेट तयार करण्याचा त्यांचा पिढीजात वारसा कायम आहे.
*****
“लोक मला विचारतात, या कामात कसली कारागिरी? ही तर फक्त एक छडी आहे.”
मात्र, मॅलेट तयार करणं म्हणजे “वेगवेगळे प्राकृतिक घटक वापरून
खेळाचा एकसंध अनुभव देणं आहे. संतुलन, लवचिकता यासोबतच छडीत ताकत तरीही हलकेपणा असावा लागतो.
तिने फार हिसका देताही कामा नये.”
आम्ही अंधारलेल्या जिन्यावर एकेक पायरी चढत त्यांच्या
घराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कारखान्यात शिरतो. मेंदूच्या धक्क्यानंतर त्यांना
चढणं कठीण जात असलं, तरी त्यांचा निर्धार आहे. हॉर्सबॅक पोलो मॅलेट दुरुस्तीचं काम वर्षभर सुरू असतं, मात्र सायकल पोलो मॅलेट बनवण्याचं काम सप्टेंबर
ते मार्च या हंगामातच होतं.


मीना (डावीकडे) छडीला भक्कम बनवणे आणि पकड मजबूत करणे ही मॅलेट तयार करण्यातील सर्वात वेळखाऊ कामं करतात. शिवाय, त्यांचा उरलेला वेळ घरकामात आणि त्यांच्या सात वर्षांच्या नातीची, नैना (उजवीकडे) काळजी घेण्यात जातो
“जितू वर सगळी पूर्वतयारी करतो,” अशोक म्हणतात, “मॅडम आणि मी बाकीची कामं खाली आमच्या खोलीत करतो.” ते आपल्या बाजूला बसलेल्या आपल्या पत्नी मीना यांचा ‘मॅडम’ म्हणून उल्लेख करतात. साठीत असलेल्या मीना अधूनमधून आमचं संभाषण ऐकून हसत होत्या आणि सोबत आपल्या एका भावी ग्राहकाला फोनमधून मिनीएचर मॅलेटचे फोटो पाठवत होत्या.
ते काम झाल्यावर त्या स्वयंपाकघरात जाऊन आम्हाला
खायला कचोऱ्या तळू लागल्या. “मी गेली १५ वर्षं पोलोचं काम करतेय,” मीना म्हणतात.
भिंतीवरून एक जुनी मॅलेट काढून अशोक तिचे तीन भाग
दाखवतात: वेताची छडी, लाकडी टोक आणि सुती आवरण असलेली रबर किंवा रेक्झिनची पकड. यातला प्रत्येक भाग
कुटुंबातील एकेक जण तयार करतो.
घरच्या तिसऱ्या मजल्यावर जितू काम करायला सुरुवात
करतात. त्यांनी स्वतः तयार केलेलं यांत्रिक कटर वापरून ते वेताला कापू लागतात. हा वेत
निमुळता करण्यासाठी ते एक रंदा वापरतात ज्यामुळे छडी लवचिक होते आणि खेळताना मॅलेट
वाकण्यास मदत होते.
“आम्ही वेताच्या खाली खिळे ठोकत नाही, नाहीतर घोड्यांना जखम होऊ शकते,” अशोक म्हणतात. “मानो अगर
घोडा लंगडा हो गया तो आपके लाखो रुपये बेकार [समजा घोडा लंगडा झाला तर तुमचे लाखो रुपये
पाण्यात].”


वेत वाकल्या जावा म्हणून जितू त्याला निमुळत्या छडीचा आकार देतात. ते या छडीच्या शेवटी एक छिद्र पाडून (डावीकडे) त्याला मॅलेटच्या टोकात अडकवतात (उजवीकडे)
“माझं काम कायम ठोकपिटीचं राहिलंय,” जितू म्हणतात. ते अगोदर फर्निचर बनवायचे आणि आता राजस्थान शासनाच्या सवाई मान सिंह हॉस्पिटलमध्ये ‘ जयपूर फूट’ विभागात कामाला आहे, जिथे त्यांच्यासारख्या कारागिरांची स्वस्त दरात प्रॉस्थेटिक अवयव तयार करण्यासाठी मागणी असते.
जितू मॅलेटच्या टोकाकडे बोट दाखवून त्यात वेताची छडी अडकवण्याठी ते कसं छिद्र पाडतात ते दाखवतात. मग ती छडी मीना यांना सुपूर्त करतात.
तळमजल्यावर स्वयंपाकघर आणि दोन बेडरूम आहेत. मीना या खोल्यांमध्ये गरज पडेल तशा मोकळेपणाने वावरतात. स्वयंपाक करण्याअगोदर व नंतर, अर्थात दुपारी १२ ते ५ दरम्यानची वेळ त्यांनी मॅलेट बनवण्यासाठी राखून ठेवलीय, पण अखेरच्या क्षणी एखादी ऑर्डर आली, तर त्यांचा दिवस लांबतो.
मीना छडी मजबूत करणे व पकड घट्ट करणे ही मॅलेट तयार करण्यातील सर्वात वेळखाऊ कामं करतात. त्यात छडीच्या अरुंद भागावर काळजीपूर्वक फेविकॉलमध्ये बुडवलेल्या कॉटनच्या पट्ट्या गुंडाळल्या जातात. एकदा ते झालं की छडीला जमिनीवर ठेवून २४ तास वाळू द्यावं लागतं, जेणेकरून तिचा आकार शाबूत राहील.
नंतर त्या गोंद व खिळ्यांच्या मदतीने जाड टोकाला रबर किंवा रेक्झिनची पकड बसवतात. ही पकड दिसायला सुबक असायला हवी आणि पिशवी पक्की असावी जेणेकरून खेळाडूच्या मुठीतून छडी निसटायला नको.


मीना गोंद व खिळ्यांच्या मदतीने जाड टोकाला रबर किंवा रेक्झिनची पकड बसवतात. ही पकड दिसायला सुबक असायला हवी आणि पट्ट्या पक्क्या असाव्या जेणेकरून खेळाडूच्या मुठीतून छडी निसटायला नको
या दाम्पत्याचा ३६ वर्षीय मुलगा, सत्यम, अगोदर ही कामं वाटून घ्यायचा पण एका रोड अपघातानंतर पायावर तीन शस्त्रक्रिया झाल्यापासून त्यांना खाली बसता येत नाही. बरेचदा ते संध्याकाळी स्वयंपाकघरात भाजी बनवण्यात मदत करतात किंवा वरणाला ढाबा स्टाईल फोडणी देतात.
त्यांच्या पत्नी राखी आठवड्याचे सातही दिवस सकाळी ९:०० ते रात्री ९:०० पिझ्झा हटमध्ये काम करतात, जे घरापासून पायी अंतरावर आहे. घरी फावल्या वेळात त्या ब्लाऊज व कुर्ती शिवायची कामं करतात, आणि आपली मुलगी नैना हिच्याकडे लक्ष देतात. सात वर्षांची नैना बहुदा सत्यमच्या नजरेखाली आपला गृहपाठ पूर्ण करते.
नैना ९ इंची मॅलेट सोबत खेळत होती तोच तिच्या हातून ती काढून घेण्यात आली, कारण ती नाजूक वस्तू आहे. एका लाकडी फळीवर दोन काड्या आणि बॉलच्या रूपात कृत्रिम मोती अशा मिनीएचर सेटची किंमत रु. ६०० आहे. मीना म्हणतात की भेट म्हणून देण्यात येणाऱ्या या मिनीएचर मॅलेट तयार करण्यात खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या मॅलेटपेक्षा जास्त मेहनत लागते. “त्यांचं काम जास्त किचकट आहे.”
मॅलेट तयार करण्यात दोन भिन्न भाग – टोक आणि वेताची छडी – एकत्र जोडणे हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. या प्रक्रियेत मॅलेटचा समतोल निश्चित होतो. “ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला जमत नाही,” मीना म्हणतात. “ते अनुभवातूनच जमतं आणि मी तेच करतो”, अशोक सहज म्हणून जातात.
फरशीवर लाल गादी टाकून त्यावर पाय लांबवून बसलेले अशोक आपल्या पायाच्या दोन बोटांमध्ये वेताची छडी पकडून टोकाला केलेल्या छिद्राच्या सर्व बाजूंनी गोंद लावत होते. मागील ५५ वर्षांत त्यांनी हे काम कितीदा केलं असेल असं मी त्यांना विचारलं असता हलकंच हसून ते म्हणाले, “काही अंदाज नाही.”


१९८५ मध्ये घेतलेल्या या फोटोत (डावीकडे) अशोक मॅलेटचं संतुलन पाहतायत, जे काम ते एकटेच करतात. वेताचा तुकडा घेऊन तो छडीवर अलगद ठोकावा लागतो, जेणेकरून छडी पूर्णपणे तुटणार नाही. मो. हमद शफी (उजवीकडे) वॉर्निश आणि सुलेखन करतात
“यह चुडी हो जाएगी, फिक्स हो जाएगी फिर यह बाहर नही निकलेगी [ही बांगडी सारखी दिसेल आणि घट्ट बसेल, मग ती निघणार नाही],” जितू सांगतो. बॉलचा वारंवार आघात सहन करण्यासाठी वेता आणि लाकूड एकसंध ठेवतात.
महिनाभरात साधारण १०० मॅलेट तयार होतात. त्यांना
मोहम्मद शफी, अशोक यांचे
४० वर्षांपासूनचे साथीदार, वॉर्निश लावतात. त्यामुळे त्यांना एक चमक येते आणि धूळ व ओलाव्यापासून संरक्षण
होतं. शफी मॅलेटच्या एका बाजूला सुलेखन करतात. नंतर, अशोक, मीना आणि जितू मॅलेटच्या मुठीखाली ‘जयपूर पोलो हाऊस’
हे लेबल लावतात.
एका मॅलेटलाला लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत
रु. १,००० असून अशोक म्हणतात की
त्यांना त्याच्या अर्धी रक्कमही विक्रीतून कमावता येत नाही. ते रु. १,६०० ला मॅलेट विकायचा प्रयत्न करतात, पण सहसा अपयशी ठरतात. “खेळाडू नीट पैसे देत नाहीत.
एक हजार, बाराशे [रुपये] एवढेच पैसे
देतात,” ते म्हणतात.
मॅलेट तयार करताना प्रत्येक भागाची किती काळजी
घ्यावी लागते हे सांगत ते आपल्या उत्पन्नाबद्दल तक्रार करतात. “वेत [केवळ] आसाम आणि
रंगूनहून कलकत्त्याला येतो,” अशोक म्हणतात. त्यात योग्य प्रमाणात ओलावा, लवचिकता, घनत्व आणि जाडी असावी लागते.
“कलकत्त्याच्या व्यापाऱ्यांकडे पोलिसांच्या बॅटन
आणि म्हाताऱ्यांच्या काठ्या बनवायला योग्य असा जाड वेत असतो. असे हजारातून शंभर वेतच
माझ्या कामी येतात,” अशोक म्हणतात. व्यापारी जो वेत पाठवतात तो बहुतेक करून फार जाड असतो, म्हणून महामारीपूर्वी अशोक स्वतः दरवर्षी कोलकात्याला
जाऊन आपल्याला हवा तसा वेत निवडून आणत असत. “आता माझ्या खिशात लाख रुपये असेल तरच कलकत्त्याला
जाऊ शकतो.”


डावीकडे: वेगवेगळ्या पोलो खेळांसाठी वेगवेगळ्या आकाराच्या मॅलेट उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाला लागणारं लाकडाचं प्रमाणही वेगळं आहे. हॉर्सबॅक पोलो मॅलेटचं (सर्वांत उजवीकडे) टोक तयार करण्यासाठी २०० ग्रॅम वजनाचं आणि ९.२५ इंची लाकूड लागतं. उजवीकडे: या कलेसाठी लागणारी उपकरणं, डावीकडून उजवीकडे: जमुरा (पकड), चोरसी (छिन्नी), भसोला (तासणे), कात्र्या, हातोडा, तीन छिद्र स्वच्छ करणारे यंत्र, दोन रेत्ती (सपाट व गोलाकार कानस) आणि दोन आऱ्या
अशोक म्हणतात की अनेक वर्षं स्थानिक बाजारातील लाकूड वापरून चांगला परिणाम न आल्यामुळे ते मॅलेटच्या टोकासाठी आयात केलेल्या स्टीम बीच आणि मॅपल लाकडावर अवलंबून असतात.
त्यांनी आजवर लाकूड विक्रेत्यांना आपण या लाकडाचं
काय तयार करतो ते सांगितलं नाही, हे ते कबूल करतात. “ते भाव वाढवतील, म्हणतील ‘तुम बडा काम कर रहे!’” त्याउलट ते विक्रेत्यांना
म्हणतात की ते लाकडापासून टेबलचे पाय तयार करतात. “जर कोणी विचारलं तुम्ही लाटणी बनवता
का, तर मी त्यालाही हो म्हणून
सांगेन!” ते हसून म्हणतात.
“माझ्याकडे १५-२० लाख रुपये असतील तर मला कोणीच
अडवणार नाही,” ते म्हणतात.
त्यांच्या मते अर्जेंटिनात मॅलेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं स्थानिक टिपूआना
टिपू या झाडाचं टिपा लाकूड उत्तम गुणवत्तेचं आहे. “ते फार हलकं असतं आणि मोडत नाही, त्याचं केवळ साल निघतं,” ते म्हणतात.
अर्जेंटिनाहून आलेल्या मॅलेटची किंमत किमान रु.
१०,००० ते १२,००० एवढी असते आणि “मोठे खेळाडू अर्जेंटिनाहून
ऑर्डर देतात.”


अशोक यांचे काका केशू राम (डावीकडे) आणि वडील कल्याण (उजवीकडे) १९३० ते १९५० दरम्यान इंग्लंडला सामने खेळायला गेलेल्या जयपूर संघासोबत मॅलेट घेऊन उभे आहेत
आजकाल अशोक ऑर्डरीप्रमाणे हॉर्सबॅक पोलो मॅलेट तयार करतात आणि विदेशी मॅलेट दुरुस्त करतात. जयपूर जिल्ह्यात देशातील सर्वाधिक पोलो क्लब असूनसुद्धा शहरातील खेळाची दुकानं मॅलेट विकायला ठेवत नाहीत.
“जर कोणी पोलो स्टिक शोधत आलं तर आम्ही त्यांना
कायम पोलो व्हिक्टरीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या जयपूर पोलो हाऊसमध्ये पाठवतो,” लिबर्टी स्पोर्ट्सचे (१९५७)
अनिल छाबरिया मला अशोक यांचं बिझनेस कार्ड दाखवत म्हणतात.
पोलो व्हिक्टरी सिनेमा (आता एक हॉटेल) अशोक यांचे
काका केशू राम यांनी १९३३ मध्ये जयपूर संघाच्या इंग्लंड दौऱ्यावर सलग विजयी घोडदौडीच्या
स्मरणार्थ बांधलं होतं. केशू राम त्या संघासोबत दौऱ्यावर जाणारे एकमेव पोलो मॅलेट कारागीर
होते.
सध्या या ऐतिहासिक जयपूर संघाच्या तीन सदस्यांच्या
नावाने जयपूर व दिल्ली येथे वार्षिक पोलो सामने आयोजित करण्यात येतात: मान सिंह २, हनुत सिंह आणि प्रीथि सिंह. मात्र, अशोक व त्यांच्या कुटुंबाचं या देशातील पोलोच्या
इतिहासात असलेल्या योगदानाची साधी दखलही नाही.
“जब तक केन की स्टिक्स से खेलेंगे, तब तक प्लेअर्स को मेरे पास
आना ही पडेगा [जोपर्यंत वेताच्या छड्यांनी खेळतील, तोपर्यंत खेळाडूंना माझ्याकडे
यावंच लागेल],” ते म्हणतात.
या वार्तांकनासाठी मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे सहाय्य लाभले आहे.