घणाच्या घावाचा नाद मोहनलाल लोहारांच्या कानात कायम रुंजी घालत आला आहे. त्यांना आठवतंय, अगदी तेव्हापासून. अगदी तालात पडणारे ठोके आयुष्यभर आपल्या सोबत असणार आहेत हे त्यांना लहानपणीच समजलं होतं.
राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातल्या
नंद गावी एका लोहार कुटुंबात मोहनलाल यांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षीच
त्यांनी आपले वडील भवराराम लोहार यांना मदत करायला सुरुवात केली. हातोडी आणि इतर
लागतील ती अवजारं त्यांना द्यायचं काम असायचं. “मी शाळा पाहिलीच नाहीये. ही
हत्यारंच माझी खेळणी होती,” ते सांगतात.
गडुलिया लोहार समाजाचे मोहनलाल
मारवाडी आणि हिंदी बोलतात. राजस्थानात त्यांची नोंद इतर मागासवर्गीय प्रवर्गात
केली जाते. १९७० च्या दशकात, अधिकच्या कामाच्या शोधात किशोरवयातले मोहनलाल
जैसलमेरला आले. आणि तेव्हापासून त्यांनी हरतऱ्हेच्या धातूपासून मोरचांग बनवले आहेत.
अल्युमिनियम, चांदी, स्टील आणि अगदी पितळसुद्धा.
“लोहाला नुसता स्पर्श केल्या केल्या
कळतं की हे चांगलं वाजणार का नाही ते,” मोहनलाल सांगतात. जैसलमेरच्या वाळवंटात
दूरवर वाजणारं मोरचांग हे वाद्य बनवण्यात आजवर त्यांनी २०,००० तास हातोड्याचे घण
घातले आहेत.
“मोरचांग बनवणं अवघड असतं,” ६५
वर्षीय मोहनलाल सांगतात. आजवर आपण या वाद्याचे किती नग बनवलेत याची मोजदाद करणं
त्यांच्यासाठी अशक्य आहे. “गिनती से बाहर है वो.”
मोरचांग १० इंचाचं असतं. शंकराच्या पिंडीसारखा थोडाफार याचा आकार असतो. दोन्ही
टोकांच्या मधोमध एक धातूची ‘जीभ’ असते. एका बाजूला पक्की बसवलेली ही जीभ वादक समोर
दातात धरतो आणि त्यात हवा फुंकतो. एका हाताच्या बोटाने जिभेचं टोक तारेसारखं वाजवत
त्यातून वेगवेगळे स्वर काढले जातात. दुसऱ्या हाताने मोरचांगची दोन्ही टोकं घट्ट
धरून ठेवली जातात.


मोहनलाल लोहार मोरचांग बनवणारे आणि वाजवणारे अत्यंत निष्णात आणि विख्यात कारागीर आहेत. जैसलमेरच्या वाळवंटांमध्ये मोरचांगचे स्वर तुम्हाला ऐकायला मिळतील
हे वाद्य किमान १,५०० वर्षं जुनं आहे, “जनावरं चरायला नेली की मेंढपाळ मोरचांग वाजवायचे,” मोहनलाल सांगतात. या मेंढपाळांसोबत हे वाद्य आणि त्याचे सूर फिरत, प्रवास करत राहिले. राजस्थानाच्या विविध भागांत, खास करून जैसलमेर आणि जोधपूर जिल्ह्यांमध्ये त्याची लोकप्रियता वाढू लागली.
साठी पार
केलेले मोहनलाल एक मोरचांग आठ तासात बनवतात. पूर्वी मात्र ते एका दिवसात दोन बनवत
असत. “आता मात्र मी दिवसाला एकच बनवतोय. जे करायचं ते चांगलंच व्हायला पाहिजे ना,”
ते म्हणतात. “माझे मोरचांग आता जगभरात प्रसिद्ध झालेत.” आजकाल त्यांनी मोरचांगची
गळ्यात घालता येतील अशी छोटी लॉकेटसुद्धा तयार केली आहेत. पर्यटकांना ती जाम आवडतात.
मोरचांगसाठी एकदम योग्य दर्जाचं
लोखंड शोधणं हे कळीचं काम आहे. “सगळ्याच लोखंडातून उत्तम मोरचांग बनत नाही,” ते
म्हणतात. दहा वर्षं काम केल्यानंतर त्यांना असं उत्तम दर्जाचं लोखंड कसं निवडायचं
ते कळू लागलं. ते जैसलमेरहून लोखंड आणतात – १०० रु. किलो. एका मोरचांगचं वजन
जास्तीत जास्त १५० ग्रॅम असतं. आणि वादकांना वाद्य हलकंच हवं असतं.
मोहनलाल पूर्वापारपासून
लोहार वापरत आलेत त्या धमण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भट्टीचा वापर करतात. “तुम्हाला
असली भट्टी अख्ख्या जैसलमेरमध्ये कुठेच सापडायची नाही,” ते म्हणतात. “किमान १००
वर्षं जुनी आहे आणि आजही अगदी उत्तम काम करते.”


मोहनलाल यांच्या घरी धातू तापवायची पारंपरिक भट्टी
आहे जिला धमण म्हणतात. ही ‘किमान १०० वर्षं जुनी आहे आणि एकदम नीट काम करते,’ ते
म्हणतात. भट्टीतलं तापमान वाढायला लागलं की खूप सारा धूर होतो (उजवीकडे) ज्याचा
डोळ्यांची आग होते आणि खोकल्याचाही त्रास होतो, मोहनलाल सांगतात


लोखंडी भट्टी तापवणं सोपं नाही, भाजल्याच्या गंभीर जखमा होऊ शकतात, मोहनलाल सांगतात. मोहनलाल यांचे जावई काळूजी (उजवीकडे) तापलेल्या लोखंडावर हातोड्याने घण घालतायत
भट्टी तापवण्यासाठी ते बकऱ्याच्या कातड्याच्या दोन पखालींसारख्या पिशव्या वापरतात. आतलं लाकूड रोहिड्याच्या झाडाचं असतं. भट्टी रसरशीत तापण्यासाठी किमान तीन तास भात्याने हवी भरावी लागते. हे फार कष्टाचं काम आहे कारण न थांबता भात्यात हवा भरावी लागते. खांदे आणि पाठ भरून येते. खोलीत हवा खेळती नसल्याने श्वास पुरत नाही आणि घामही प्रचंड येतो.
मोहनलाल यांच्या पत्नी गीगीदेवी
त्यांना या कामात कायम मदत करायच्या. मात्र वय झाल्यामुळे त्या आजकाल हे काम करत नाहीत.
“मोरचांग तयार करण्याच्या अखख्य़ा प्रक्रियेतलं एवढं एकच काम बाया करतात. बाकी सगळं
आजवर कायम पुरुषच करत आलेत,” ६० वर्षांच्या गीगीदेवी म्हणतात. त्यांची मुलं रणमल
आणि आणि हरिशंकरसुद्धा लोहारकाम करतात. ही त्यांची सहावी पिढी. हे दोघंही मोरचांग
बनवतात.
भात्याने
हवा भरायला सुरुवात झाल्यावर मोहनलाल सांडशीने रसरशीत तापलेला लोखंडाचा एक तुकडा
उचलतात आणि आरण म्हणजेच ऐरणीवर ठेवतात. त्यानंतर डाव्या हातातल्या सांडशीने
लोखंडाचा तुकडा पकडून उजव्या हातात एक हातोडी घेतात. त्यांच्या सोबत काम करणारा
दुसरा लोहार पाच किलोच्या हातोड्याने लोखंडाच्या तुकड्यावर घण घालायला लागतो.
मोहनलाल आणि तो असं दोघेही तालात काम करत राहतात.
दोन्ही लोहारांचं तालात असं घण घालणं
“ढोलकीच्या आवाजासारखं वाटलं आणि म्हणूनच मी मोरचांग तयार करण्याच्या या कलेच्या
प्रेमात पडलो,” मोहनलाल सांगतात.
![Some of the tools Mohanlal uses to make a morchang: ( from left to right) ghan, hathoda, sandasi, chini, loriya, and khurpi . 'It is tough to make a morchang ,' says the 65-year-old and adds that he can’t recall how many morchangs he’s made to date: ' g inti se bahar hain woh [there is no count to it]'](/media/images/05a-IMG_3435-SJ-A_lifetime_of_handcrafting.max-1400x1120.jpg)
![Some of the tools Mohanlal uses to make a morchang: ( from left to right) ghan, hathoda, sandasi, chini, loriya, and khurpi . 'It is tough to make a morchang ,' says the 65-year-old and adds that he can’t recall how many morchangs he’s made to date: ' g inti se bahar hain woh [there is no count to it]'](/media/images/05b-IMG_3436-SJ-A_lifetime_of_handcrafting.max-1400x1120.jpg)
मोरचांग तयार करण्यासाठी लागणारी काही अवजारं – (डावीकडून उजवीकडे) घण, हातोडा, सांडशी, छिन्नी, लोरिया आणि खुरपी. ‘मोरचांग बनवणं अवघड काम आहे,’ ६५ वर्षीय मोहनलाल म्हणतात. आजवर आपण किती मोरचांग बनवलेत याची मोजदादच नसल्याचंही सांगतात. ‘गिनती से बाहर हे वो’


डावीकडेः मोहनलाल यांचे थोरले पुत्र रणमल म्हणजे लोहारकाम करणारी सहावी पिढी. ‘किती तरी जण आता हातोड्याऐवजी घण घालायला यंत्रांचा वापर करतायत पण आम्ही मात्र सगळं आजही हातानेच करतो,’ ते सांगतात. उजवीकडेः मोहनलाल मोरचांग आणि इतरही काही वाद्यं बनवतात. अलगूज, सनई, मुरली, सारंगी, संवादिनी आणि बासरी
हातोडीचं हे सुरेल ‘संगीत’ तीन तास चालतं. दोघांचेही हात नंतर सुजून येतात. तीन तासात या कारागिरांना किमान १०,००० वेळेला हात उचलावा लागतो. जराशी जरी चूक झाली तरी बोटाला इजा होऊ शकते. “पूर्वी तर माझी नखंही निघाली आहेत. या असल्या कामात दुखापत होणारच की,” मोहनलाल म्हणतात. आणि हसून वेदना उडवून लावतात. जखमा होतात आणि पोळणं आणि भाजणंही नित्याचंच असतं. “किती तरी जण आता हातोड्याऐवजी घण घालायला यंत्रांचा वापर करतायत पण आम्ही मात्र सगळं आजही हातानेच करतो,” मोहनलाल यांचे पुत्र रणमल सांगतात.
हातोड्याने घण घातल्यानंतर मोरचांग तयार
करण्यातला सगळ्यात अवघड भाग सुरू होतो. तापलेल्या लोखंडाला हवा तसा आकार आता
द्यायचा असतो. याला पुढचे दोन तास लागतात. अगदी कुशलपणे लोखंडातून मोरचांग कोरून
घेतलं जातं. त्यानंतर दोन तास थंड करण्यासाठी ठेवून दिलं जातं. यानंतर घासून सगळ्या
बाजू आणि गुळगुळीत केल्या जातात. “या घासण्याच्या कामाची जादू म्हणजे अगदी
आरशासारखं हे वाद्य चमकायला लागतं,” रणमल सांगतात.
दर महिन्याला मोहनलाल यांच्या
कुटुंबाकडे किमान १० मोरचांग बनवण्याची मागणी येते. यांची किंमत नगाला १,२०० ते १,५००
रुपये असते. हिवाळ्यात पर्यटक अवतरतात आणि मग या वाद्याची किंमत दुपटीहून जास्त
होते. “किती तरी पर्यटक ईमेलवरच ऑर्डर पाठवतात,” रणमल सांगतात. फ्रान्स, जर्मनी, जपान,
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली आणि इतरही देशांतून ऑर्डर येतात. मोहनलाल आणि त्यांची
मुलं राजस्थानातल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक महोत्सवांना जाऊन आपली कला सादर करतात
आणि वाद्यंही विकतात.
‘दिवसभराच्या कामानंतर कुणी गिऱ्हाईक मिळालंच तर ३००-४०० रुपये हातात येतात. हे असलं काम टिकून राहणं अवघड आहे’
आपल्या मुलांनी ही कला शिकून घेतली आहे याचं मोहनलाल यांना कौतुक असलं तरी जैसलमेरमध्ये हाताने मोरचांग बनवणाऱ्या कारागिरांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत चालली आहे. “अशा [चांगल्या] दर्जाच्या मोरचांगसाठी लोक १,००० रुपये द्यायला देखील तयार नाहीत,” ते म्हणतात. मोरचांग बनवण्यासाठी लागणारे कष्ट आणि चिकाटीची अनेकांची तयारी नाही. “दिवसभराच्या कामानंतर कुणी गिऱ्हाईक मिळालंच तर ३००-४०० रुपये हातात येतात. हे काही टिकून राहणार नाही,” ते म्हणतात.
अनेक लोहारांची अशी तक्रार असते की
धुरामुळे दृष्टी अधू होते. “भट्टीतून खूप धूर होतो जो थेट नाकात आणि डोळ्यात जातो.
खोकल्याची उबळ येते,” रणमल सांगतात. “भयंकर उष्णतेत आम्हाला भट्टीपाशी बसून रहावं
लागतं, त्यानेही श्वास कोंडल्यासारखा होतो.” हे ऐकताच मोहनलाल आपल्या मुलाला जरासं
रागावतात. “काय त्रास होतोय याचाच विचार करत बसलं तर शिकायचं कसं?”
मोरचांगसोबतच मोहनलाल इतरही अनेक
वाद्यं स्वतःच तयार करायला शिकले आहेत. अलगुजा म्हणजेच अलगूज (दुहेरी बासरीसारखं
ध्वनीवाद्य), सनई, मुरली, सारंगी, संवादिनी आणि बासरी. “मला वाद्यं वाजवायला आवडतं
त्यामुळे मी सतत एखादं नवीन वाद्य शिकण्याचा प्रयत्न करत असतो,” ते म्हणतात. एका
ट्रंकेत त्यांनी ही सगळी अगदी निगुतीने जपून ठेवून दिली आहेत. “ये मेरा खजाना है,”
ते हसत हसत सांगतात.
ग्रामीण कारागिरांवरील या लेखमालेला मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.