२०२१ चा जुलै महिना होता. सकाळ धुक्यात हरवली होती. भीमाशंकर अभयारण्याला लागून असलेल्या आपल्या वावरात शिवराम गवारींनी पाय ठेवला आणि पाहतात तर काय पाच गुंठ्यातली भाताची रोपं अर्धवट खाल्ल्यासारखी आणि बाकी जमीनदोस्त झाली होती.
“जनावरांमुळे पिकांचं इतकं नुकसान मी पहिल्यांदाच पाहिलं,” आजही तेव्हाचा धक्का त्यांच्या मनातून गेलेला नाही. जनावराच्या पावलाच्या ठशांचा माग काढत ते जंगलात गेले आणि अचानक गवाच त्यांच्या समोर आला. गुरांमधला हा सर्वात मोठा प्राणी. नर अगदी सहा फुटांहून उंच असतात आणि वजन ५ ते १० टन असतं.
अशा गबरू गव्यांचा कळप जेव्हा रानात येतो तेव्हा त्यांच्या चालण्याने शेतात चंद्रावरची विवरं वाटावीत असे खड्डे पडतात. मग त्यात कुठलीच रोपं, पिकं तगू शकत नाहीत. “गव्यांनी तीन वर्षं लगातार माझ पीक तुडवलंय. शेती टाकून देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये,” घरच्या अंगणात बसलेले शिवराम काका सांगतात. त्यांच्या डोण गावात २०२१ सालापासून गवे यायला लागले आहेत.


डावीकडेः पुणे जिल्ह्याच्या डोण गावात गव्याच्या हल्ल्यामुळे शेतमालाचं नुकसान झालेले शिवराम गवारी हे अगद पहिलेच. उजवीकडेः प्रचंड वजनी गवे शेतात येतात आणि चंद्रावरच्या विवरांसारखे खड्डे तयार करतात. त्यामध्ये कसलंच पीक किंवा रोप तगू शकत नाही


डावीकडेः पिकं हातीच येत नसल्याने अनेक शेतकरी आता जंगलातून आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जाणारा हिरडा गोळा करू लागले आहेत. उजवीकडेः सरपण आणून विकायचं हाही त्यांचा उत्पन्नाचा स्रोत आहे
महाराष्ट्राच्या भीमाशंकर अभयारण्याला लागूनच डोण आणि इतर काही वाड्या वस्त्या वसलेल्या आहेत. जंगलात हरणं, रानडुकरं, सांबर, बिबटे आणि क्वचित कधी पट्टेरी वाघ दिसतो. साठीचे शिवराम आयुष्यभर आंबेगावात राहिलेत. जंगलातून बाहेर पडून वन्यप्राणी शेतात येतात. त्यांच्यामुळे आजवर इतकं मोठं नुकसान मात्र कधी पहायला मिळालं नसल्याचं ते सांगतात. “या जनावरांना पकडून न्यायला पाहिजे,” ते म्हणतात.
सलग तीन वर्षं पिकं हातची गेल्यामुळे त्यांनी वर्षभरापूर्वी काही पेरायचंच बंद केलंय. त्यांच्याप्रमाणे इतर काही शेतकऱ्यांनी सुद्धा आपली रानं तशीच पडक ठेवलीयेत. कमाईसाठी आता ते जंगलातून हिरडा आणि सरपण आणून विकतायत. हाच त्यांचा उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत झालाय. २०२३ साली शासनाने प्रकाशित केलेल्या ह्यूमन गौर कॉन्फ्लिक्ट मिटिगेशन (मानव-गवा संघर्षावर उपाय) अहवालानुसार जंगलं आकसत गेल्याने आणि वातावरण बदलांमुळे गव्यांचा अधिवास आणि अन्नाची उपलब्धता कमी होत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून ते शेतात येऊन पिकं फस्त करतायत.
*****
२०२१ साली डोण गावाजवळ फिरत असलेल्या गव्यांच्या कळपात केवळ ३-४ जनावरं होती. २०२४ येईपर्यंत त्यांची संख्या दुप्पट झालीये आणि त्यांचे हल्लेही. रानं रिकामी दिसली की ते गावात येतात. लोकांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतली आहे.
गावातले बहुतेक शेतकरी पोटापुरती शेती करतात. डोंगराच्या पायथ्याशी असलेली एकरभर नाही तर दोन-तीन एकराची शेती. काहींनी विहिरी खोदल्या आहेत, मोजक्या लोकांकडे बोअरवेल आहेत. पण शेती पावसावरची, कोरडवाहू. गव्यांच्या हल्ल्यांनी त्यांच्या शेतीचा आणि त्यातून येणाऱ्या अन्न सुरक्षेचा कणाच मोडला आहे.
बुधा गवारी घराला लागून असलेल्या तीन गुंठ्यात शेती करतात. खरिपाला रायभोग आणि मसूर आणि रब्बीला हरभरा अशी पारंपरिक पिकं ते घेतात. गावात बहुतेकांची शेती अशीच आहे. “एका वावरातलं रोप मी सगळ्या शेतात लावत असतो. रोपच गव्यांनी खाऊन टाकल्यावर माझं पूर्ण पीकच गेलं. भातावर आमचं वर्ष भागायचं. भातावरच आमचं पोट आहे. भात नाही झाला तर आमचं वर्ष खूप अवघड जातं,” ५४ वर्षीय बुधा मामा सांगतात.


डावीकडेः बुधा गवारींची भाताची रोपं लावणीआधीच गव्यांनी खाऊन टाकली. ‘ रोपच गव्यांनी खाऊन टाकल्यावर माझं पूर्ण पीकच गेलं’, ते सांगतात. उजवीकडेः त्यांचा मुलगा बाळकृष्ण म्हणतो की उत्पन्नाचा अधिकचा मार्ग म्हणून रोजगार हमीचा आम्हाला फार फायदा झाला असता. विहिरीसारखी कामं करून आम्ही पाण्याचा साठा वाढवू शकलो असतो’


डावीकडेः बुधा गवारींची तीन गुंठा शेतजमीन. उजवीकडेः गव्यांची धाड आली की शेतात असे खड्डे पडतात
बुधा महादेव कोळी आहेत. राज्यात त्यांची गणना अनुसूचित जमातींमध्ये म्हणजेच आदिवासी म्हणून होते. “मी कुठलंच पीक विकत नाही. विकण्यापुरतं पिकतच नाही,” ते म्हणतात. वर्षाला ३० ते ४० हजाराचा माल होत असेल असा त्यांचा अंदाज आहे. त्यात १०-१५ हजार तर लागवडीचा खर्च होतो. तो वगळून मागे जे काही राहील त्यात पाच जणांच्या कुटुंबाने वर्ष कसं काढायचं? गव्यांच्या धाडीत भात गेला. त्यावर कुटुंबाचं वर्षभर पोट तरी भरलं असतं.
शेतातल्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर शिवराम आणि बुधा या दोघांनी पंचनामा करून वनखात्याशी संपर्क साधला. सहा महिने उलटल्यानंतर शिवराम काकांना ५,००० रुपये आणि बुधा मामांना ३,००० रुपये नुकसान भरपाई मिळाली. त्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या अगदी १० टक्के. “नुकसानभरपाई म्हणून मला ३००० रुपये भेटले ते भी ६ महिन्यांनी. ते पैशे मिळवायला मला इकड तिकड हिंडाव लागल. त्यातच माझे १५०० रुपय गेले,” बुधा मामा सांगतात. उपसरपंच असलेलेल सीताराम गवारी सांगतात की कृषी मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालनच केलं जात नाहीये.
बुधा मामांचा मुलगा बाळकृष्ण म्हणतो, “मनरेगाचं काम जर आमच्या गावात असतं, तर मजुरी काम कमी शोधावं लागलं असतं. आणि पैशे पण भेटले असते. आमच्याकडे खूप दिवस पाणी टिकत नाही. पाणी साठवायला आम्ही मनरेगातून विहिरी केल्या असत्या.” पण मनरेगाची कामंच निघत नसल्याने डोणच्या शेतकऱ्यांना मंचर आणि घोडेगावला दुसऱ्याच्या रानात मजुरीसाठी जावं लागतंय. हा भाग खालच्या बाजूला असल्याने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून वाहत आलेल्या नद्यांचं पाणी या भागात मुबलक आहे. जमिनी भारी आहेत. वरई किंवा सावासारखी पारंपरिक पिकं घेतली जातात. फारसं लक्ष दिलं नाही तर पुरेसं पीक येतं.
*****
जंगलं कमी होत चाललीयेत, प्राण्यांची संख्या वाढलीये आणि वातावरणातले अनैसर्गिक बदल या सगळ्यामुळे प्राण्यांना अन्न कमी पडायला लागलंय असं डॉ. अमोल वाघमारे सांगतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते या भागात काम करत आहेत आणि अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत. “हे प्राणी खाणं आणि पाण्याच्या शोधात जंगलाच्या दुसऱ्या कुठल्या तरी भागातून इथे आले असणार,” ते सांगतात. डोणमध्ये २०२१ साली पहिल्यांदा गवे दिसले होते. उन्हाळा नुकताच सुरू झाला होता आणि तेव्हा जंगलात प्राण्यांना खायला फारसं काहीच नसतं.


डोणचे उप सरपंच सीताराम गवारी (डावीकडे) सांगतात की त्यांनी अनेक वेळा वन खात्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. गव्यांची ये-जा थांबावी यासाठी गावाच्या सभोवताली कुंपण घालावं असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. ‘गावाला कुंपण आम्हाला मान्यच नव्हतं कारण आमचा उदरनिर्वाह जंगलामुळे होतो’ ते सांगतात


डावीकडेः गव्यांच्या धाडीपासून संरक्षण व्हावं म्हणून काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतालाच कुंपण केलंय. उजवीकडेः ज्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केला त्यांना केवळ १० टक्के भरपाई मिळालीये
डॉ. वाघमारे पुढे म्हणतात, “घोडेगावपासून वर डोणपर्यंत आणि डोणच्या आसपासच्या परिसरात फॉरेस्टच्या चौक्या खूप कमी आहेत. आणि त्यांचे वरिष्ट अधिकारीसुद्धा तालुक्याचा ठिकाणी राहतात. ६० -७० किलोमीटर दूर.” वन खात्याने या संघर्षावर काय उपाय योजना कराव्यात या संदर्भात ते सांगतात. “जेव्हा काही इमर्जन्सी असते, जसं की बिबट्या शिरलेला असतो घरांमध्ये, तेव्हा फॉरेस्टच्या लोकांना यायला खूप वेळ लागलेला आहे. रात्रीच्या वेळी तर ते यायला पण कुरकुर करतात,” ते सांगतात.
गावचे उपसरपंच सीताराम गवारी यांनाही पिकाच्या नुकसानीचा फटका बसला आहे. आपण या संदर्भात अनेकदा वनखात्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं ते सांगतात. गव्यांची ये-जा थांबावी यासाठी गावाच्या सभोवताली कुंपण घालावं असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. “गावाजवळ कुंपण आम्हाला मान्यच नाही कारण लोकांचा उदरनिर्वाह जंगलामुळेच होतो,” ते म्हणतात.
गव्यांचा कळप आजही अन्नाच्या शोधात डोणच्या आसपास फिरतोय. त्यामुळे यंदाच्या खरिपाला सुद्धा शिवराम काका आणि इतरही शेतकरी रानं तयार करण्याच्या फंदात पडणार नाहीत. “सारखा एकच त्रास काय सहन करायचा? म्हनून मी शेती टाकून दिली. मी आधीच खूप त्रास सहन केलाय,” ते म्हणतात.