अगदी यंत्रासारख्या अचूकतेने महम्मद असगर यांचे हात चालत असतात आणि बोलत असतानाही ते थांबत नाहीत.
“कुछ पल के लिए भी हाथ रुक गया तो काम खराब हो जाएगा (अगदी काही क्षण जरी माझे हात थांबले ना तर सगळं काम वाया जाईल),’’ तीन शतकांपासून चालत आलेली ही कला पुढे नेणारे ४० वर्षीय महम्मद सांगतात.
असगर छापा कारागीर (ब्लॉक प्रिंटिंग करणारे कारागीर) आहे. जवळपास गेल्या दशकभरापासून ते हे काम करतायत.
ब्लॉक प्रिंटिंग करणारे काही कारागीर नक्षी कोरलेले लाकडी साचे रंगामध्ये बुडवून ती नक्षी कापडावर उमटवतात. पण मोहम्मद असगर या कारागिरांपेक्षा वेगळे आहेत. अत्यंत पातळ ॲल्युमिनियम वर्ख वापरुन ते कपड्यांवर धातूची फुलं आणि विविध प्रकारची नक्षी छापतात.
या अत्यंत पातळ ॲल्युमिनियम वर्खाला म्हणतात ‘तबक’. हे तबक जेव्हा छापलं जातं तेव्हा साड्या, शरारा, लेहंगा आणि महिलांचे इतर कपडे एकदम दिमाखदार दिसायला लागतात... अगदी सणासुदीला साजेसे! नेहमीच्या साध्यासुध्या कपड्यांना सणासुदीचा दिमाख देऊ करणारे कोरीव नक्षीकामाचे डझनभर लाकडी साचे त्याच्या मागे असलेल्या शेल्फात नीट मांडून ठेवलेले आहेत.


डावीकडे : मोहम्मद असगर लग्न सराईच्या दिवसात छा पा कारागीर असतात . उरलेलं वर्षभर या कामाला फारशी मागणी नसते तेव्हा ते बांधकामा वर मजुरीला जातात . उजवीकडे : खासकरून बिहारच्या मगध भागात ल्या मुस्लिम लग्नसमारंभात आणि सणासुदीच्या दिव सात परिधान केल्या जाणाऱ्या कपड्यांवर आकर्षक नक्षीकाम करण्यासाठी मोहम्मद लाकडी साचे वापर तात
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफ शहरात छापाची जवळपास अर्धा डझन दुकानं आहेत. आपल्या ग्राहकांसारखेच हे छापा कारागीरही प्रामुख्याने मुस्लीम आहेत. जातीने ते रंगरेज (रंगारी) आहेत. ही जात बिहारमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईबीसी) येते.
बिहार सरकारने नुकत्याच केलेल्या जातीय सर्वेक्षणानुसार यांची संख्या अंदाजे ४३,३४७ इतकी आहे.
“तीस वर्षांपूर्वी हाताला दुसरं काही काम नव्हतं. म्हणून मी यात आलो,’’ पप्पू सांगतात. “माझ्या आईचे वडील छापाकाम करायचे. त्यांच्याकडून हे काम मला वारशाने मिळालंय. त्यांनी यात वेळ घालवला आणि मीही घालवतोय,’’ बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यातील अत्यंत घाईगर्दीच्या, गजबजलेल्या सब्जीबाग भागात गेल्या ३० वर्षांपासून छापा कपड्यांचं दुकान चालवणारे ५५ वर्षीय पप्पू सांगतात.
ते सांगतात की या कलेला असलेली मागणी कमी होत चाललीय : “पूर्वी पाटण्यात ३०० दुकानं होती, आता फक्त १०० दुकानं सुरू आहेत,’’ आणि आता चांदी नि सोन्याच्या वर्खाची छपाई वापरली जात नाही – त्याऐवजी सर्रास ॲल्युमिनियम वापरलं जातं.
सब्जीबागमधल्याच एका लहानशा वर्कशॉपमध्ये काम करणारे मोहम्मद सांगतात की २० वर्षांपूर्वी तबक बिहारशरीफ शहरातच बनायचं. “पूर्वी शहरातच तबक तयार होत होतं. पण मजुरांच्या कमतरतेमुळे आता ती इथे बनवली जात नाहीत. ती पाटण्याहून येतात,’’ ते म्हणतात.


डावीकडे : पप्पू यांना त्यांच्या आईच्या वडिलांकडून परंपरेने छा पा कौशल्याचा वारसा मिळाला आहे . परंतु ते म्हणतात की हा पिढीजात वारसा त े आपल्या मुलांना देणार नाहीत . उजवीकडे: बिहारच्या पाटण्यातील सब्जी बाग भागात ल्या पप्पू यांच्या वर्कशॉपम धले छा पा कपडे. गों दा ला दुर्गंधी येते आणि काही धु ण्यां नंतर वर्ख उडून जातो. त्यामुळे हे कपडे फार दिवस घालता येत नाहीत
तबक हे छापा प्रक्रियेतलं खरं वैशिष्ट्य! ते इतकं नाजूक आणि हलकं असतं की वाऱ्याची झुळुक आली तरी उडू लागतं. त्यातलं काही मोहम्मद यांच्या चेहऱ्याला आणि कपड्यांना येऊन चिकटतं. दिवसअखेर ते सगळं निगुतीने झटकून काढावं लागतं, आणि तळहातावरचा गोंदाचा जाडच्या जाड थर धुवावा लागतो. “माझ्या हातावरचा गोंद काढायला दोन तास लागतात. त्यासाठी मी गरम पाणी वापरतो,’’ मोहम्मद सांगतात.
“गोंद लवकर सुकतो, त्यामुळे सगळ्या प्रक्रिया झटपट कराव्या लागतात,’’ टिनच्या भांड्यात ठेवलेला गोंद डाव्या तळहातावर चोळत चोळत आम्हाला या प्रक्रियेचे टप्पे समजून सांगताना मोहम्मद म्हणतात.
एकदा का त्याचा तळहात गोंदाने पूर्णपणे झाकला गेला की फुलाचा लाकडी साचा तो तळहातावर फिरवतो, साचा गोंदात व्यवस्थित भिजला की मग तो चिकट साचा कापडावर उमटवतो.
ते अगदी चपळाईने पण काळजीपूर्वक पातळ पापुद्र्यासारखा वर्ख पेपरवेटच्या खालून काढत जातात. मग तो छापा उमटवलेल्या भागावर ठेवतात आणि गोंदामुळे तो वर्ख त्या छापाच्या आकारावर चिकटत जातो.
एकदा वर्ख कापडावर लागला की तो नीट चिकटावा म्हणून पुन्हा भरीव जाडजूड कापडाने त्यावर दाब दिला जातो. “तबक गोंदाला नीट चिकटून राहावं यासाठी हे असं करावंच लागतं.’’
ही नाजूक प्रक्रिया अत्यंत चपळाईने केली जाते आणि क्षणार्धात कापडावर चमचमणारा वर्तुळाकार दिसू लागतो. गोंद व्यवस्थित सुकावा आणि वर्ख त्यावर कायमस्वरूपी चिकटून राहावा यासाठी हे नवं छापाचं कापड कमीत कमी एक तास उन्हात ठेवलं जातं.
छापा कारागीर अथकपणे हीच प्रक्रिया न थांबता पुन्हा पुन्हा करत राहतो. सध्या ज्या लाल कापडावर तो छापाकाम करतोय; ते आहे डालढक्कन. हे कापड बांबूच्या टोपल्या झाकण्यासाठी वापरलं जातं.


डावीकडे : मोहम्मद असगर टिनच्या भांड्यात ठेवलेला गोंद डाव्या तळहातावर चोळतात. सतत लावल्यामुळे तळहातावर गोंदाचा जाड थर तयार होतो आणि तो स्वच्छ करण्यात त्यांचे दोन तास जा तात. उजवीकडे : गों दात व्यवस्थित भिजावा म्हणून फुलाचा लाकडी साचा तो तळहातावर फिरवत ात


डावीकडे: असगर कापडावर चिकट साच्या चा शिक्का मारतात. मग छापा उमटव लेल्या भागावर काळजीपूर्वक वर्ख चिकटवतात आणि वर्ख व्यवस्थित चिकटावा म्हणून कपड्याच्या जाडजूड घडीने त्यावर दाब देतात. उजवीकडे : ही नाजूक प्रक्रिया चपळाईने पार पाडली जाते आणि चकाकणारी नक्षी एकदा कापडावर उमटली की वाळण्यासाठी उन्हात ठेवा वी लाग ते
वर्खाचा प्रत्येक तुकडा १०-१२ चौरस सेंटीमीटर आकाराचा. अशा ४०० तुकड्यांच्या ॲल्युमिनियम शीटची किंमत ४०० रुपये आहे, एक किलो गोंद १०० ते १५० रुपयाला पडतो.
“छाप्यामुळे किंमत ७००-८०० रुपयांनी वाढते,’’ छापा कपड्यांचे दुकानमालक पप्पू (त्यांना हेच नाव वापरायला आवडतं) सांगतात. “ग्राहक इतके सारे पैसे देऊ मागत नाहीत.’’
बिहारमधल्या मुस्लीम समुदायाच्या; विशेषत: राज्याच्या दक्षिणेकडील मगध भागातल्या मुस्लिम लग्नांमध्ये पारंपरिकरित्या छापा कपडे वापरले जातात.
असे छापा कपडे परिधान करणं हा काही रूढींचा अविभाज्य भाग आहे - सामाजिक दर्जा कोणताही असो; वधू आणि तिच्या कुटुंबियांनी छापा साडी किंवा तसा लग्नपोशाख परिधान करावाच लागतो.
सांस्कृतिक महत्त्व असूनही छापा कपडे फार काळ परिधान केले जात नाहीत. “या छापाकामात वापरल्या जाणाऱ्या गोंदाला एकप्रकारचा दुर्गंध येतो. शिवाय छपाई इतकी कमकुवत असते की एक-दोन धुण्यातच सगळा वर्ख सुटून येतो,’’ पप्पू सांगतात.
लग्नसराईचा तीन-चार महिन्याचा हंगाम संपल्यानंतर छापाकाम ठप्प पडतं आणि कारागिरांना पोटापाण्यासाठी इतर काहीतरी शोधावं लागतं.


मोहम्मद रियाज (चष्मा लाव लेला) पप्पू यां च्या दुकानात छा पा कारागीर म्हणून काम करतात. ते प्लंबर आहेत आणि संगीतकारही! छा पाकाम नसत ं तेव्हा ते या कौशल्यांचा वापर करत ात
असगर सांगतात, “मी दुकानात आठ ते दहा तास काम करतो आणि तीन साड्यांवरच्या छापाचं काम पूर्ण करतो. या कामातून दिवसाला मला साधारण ५०० रुपये मिळतात, पण फक्त तीन-चार महिनेच! छापाकाम नसतं तेव्हा मी बांधकामावर मजुरीला जातो.’’
असगर एका वर्कशॉपमधे सकाळी १० ते रात्री ८ एवढा वेळ काम करतात. ते बिहारशरीफ शहरात राहतात; वर्कशॉपपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर. “माझा मुलगा दुपारच्या जेवणाचा डबा घरून घेऊन येतो. तेवढेच पैसे वाचतात,’’ ते सांगतात.
पाच वर्षं ते कामासाठी दिल्लीला गेले होते. बांधकामावर मजुरी करायचे. पण आता ते पत्नी आणि दोन मुलांसह इथेच राहतात. थोरला १६ आणि धाकटा १४ वर्षांचा असून दोघं शाळेत जातात.
असगर यांच्या म्हणण्यानुसार बिहारशरीफमध्ये होत असलेल्या कमाईवर ते समाधानी आहेत आणि कुटुंबाबरोबर राहाता येतंय हा त्यांच्यासाठी बोनस आहे. “यहां भी काम होइये रहा है तो काहे ला बाहर जाएंगे (मला इथे काम मिळतंय, मग कशाला इतर कुठं स्थलांतर करू?)’’ ते म्हणतात.
मोहम्मद रियाज पप्पू यांच्या दुकानात छापा कारागीर म्हणून काम करतात. वर्षभर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी इतर कौशल्यंही आत्मसात केली आहेत : “जेव्हा छापाकाम नसतं, तेव्हा मी (संगीत) बँडसोबत जातो. शिवाय मला प्लंबिंगही येतं. यामुळे वर्षभर हाताला काही ना काही मिळत रहातं.’’
पप्पू यांच्या म्हणण्यानुसार छापा कामातून मिळणारं उत्पन्न अपुरं असतं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं कठीण होऊन बसतं. पत्नी आणि तीन मुलं असा त्यांचा परिवार.
“यात फारशी कमाई होत नाही. छापाच्या कापडावर मला नेमके किती पैसे सुटतात हे आजतागायत मला समजू शकलेलं नाही. कसंबसं मी माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतोय,’’ ते सांगतात.
ही अशाश्वत कला आपल्या मुलांनी पुढे न्यावी अशी त्यांची अजिबात इच्छा नाही. “हम पागल नहीं है जो चाहेंगे की मेरे बेटे इस लाइन में आये (माझ्या मुलांनीही या व्यवसायात यावं असा विचार करायला मी काही वेडा नाही).”

तबक हे छापा प्रक्रियेतलं खरं वैशिष्ट्य! ते इतकं नाजूक आणि हलकं असतं की वाऱ्याची झुळुक आली तरी उडू लागतं. त्यातलं काही कारागिराच्या चेहऱ्याला आणि कपड्यांना येऊन चिकटतं
*****
छापाची उत्पत्ती कशी झाली आणि बिहारी मुसलमानांच्या संस्कृतीत त्याला इतकं महत्त्वाचं स्थान कसं मिळालं याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. बिहारमध्ये ब्लॉक प्रिंटिंग करणाऱ्या हस्तकलाकारांसाठी ब्रिटीशकालीन भारतातले सर्जन आणि सर्वेक्षक फ्रान्सिस ब्युकॅनन हे ‘छापागर’ हा शब्द वापरतात.
“मुस्लीम लग्नात छापाकाम केलेले कपडे परिधान करण्याची परंपरा बिहारमध्ये कशी आली, याचा शोध घेणं अवघड आहे. पण बिहारच्या मगध भागातल्या मुस्लिमांमध्ये ही संस्कृती मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे तिची सुरुवात या प्रदेशातून झाली असं मानलं जातं,’’ पाटण्यातील इतिहासप्रेमी उमर अशरफ सांगतात.
ते ‘हेरिटेज टाइम्स’ नावाचं वेब पोर्टल आणि एक फेसबुक पेज चालवतात. त्या माध्यमातून बिहारमधील मुस्लिमांची हरवलेली संस्कृती आणि वारसा नोंदवून ठेवण्याचं काम ते करतात.
मगध प्रदेशात १२ व्या शतकात झालेलं मुस्लिमांचं स्थलांतर हे या प्रदेशातील या कलेच्या उत्क्रांतीला कारणीभूत आहे. अशरफ पुढे सांगतात, “कदाचित लग्नसमारंभात छापा कपडे घालण्याची संस्कृती त्यांनी सोबत आणली असावी आणि मगधमध्ये आल्यावरही ती तशीच पुढे चालत राहिली असावी.’’
युरोप, अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये स्थायिक झालेले बिहारी मुसलमान भारतातून छापाचे कपडे घेऊन जातात आणि तिथल्या लग्नसमारंभात घालतात, अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत,’’ ते सांगतात.
राज्यात ल्या उपेक्षि तांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या बिहारमधल्या एका कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या फेलोशिप अंतर्गत हा लेख लिहिला आहे.