"मिर्ची, लसूण, आलं... दुधी-भोपळा, कारलं आणि गूळ."
ही काही मिरची, लसूण, आले, वापरून केल्या जणाऱ्या पदार्थाची रेसिपी नव्हे, तर सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या गुलाबरानी यांच्या गुणकारी सेंद्रिय खत आणि कीटकनाशक बनवण्यासाठी वापरण्यात येणारे घटक पदार्थांची नावं आहेत. या खताची निर्मिती त्या पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या काठावर असलेल्या त्यांच्या चुंगुना गावात तयार करतात.
५३ वर्षे वयाच्या गुलाबरानी पहिल्यांदा यादी ऐकली हे आठवून जोरात हसतात. “मी विचार करायचे की हे सगळं कुठून मिळणार? पण तेव्हा माझ्याकडे जंगलात आलेले भोपळे होते.” त्या पुढे सांगतात. आणि खतासाठी लागणाऱ्या गूळ किंवा इतर गोष्टी त्यांनी बाजारातून विकत घेतल्या.
त्या नक्की काय बनवत आहेत याबद्दल उत्सुकता असणाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना तरी काय म्हणणार? पण इतर लोकांच्या मते गुलाबरानी यांनी लोक काय म्हणतील याकडे कधीच लक्ष दिलं नाही आणि म्हणूनच सुमारे 500 लोकसंख्या असलेल्या गावात सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
“आपण बाजारातून जे काही विकत घेतो त्यात औषधं आणि विविध प्रकारची रसायनं टाकली जातात, त्यामुळे ते का खायचं, याचा आम्ही एक कुटुंब म्हणून विचार केला,” चार वर्षांपूर्वी घरात झालेल्या संभाषणाचा संदर्भ देऊन त्या सांगतात.
“मग आमच्या घरच्यांना वाटलं की सेंद्रिय खत वापरून शेती करणं ही निश्चितच चांगली कल्पना आहे. आम्ही सगळ्यांनी विचार केला की जैविक [सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले] अन्न खाल्लं तर आपल्या आरोग्याला फायदाच होईल. जैविक खतांनी, कीटकांचं आरोग्य [आरोग्य] धोक्यात येतं पण आपल्या आरोग्याची भरभराट होते!” त्या आनंदाने हसत हसत सांगतात.


डावीकडे: पन्ना जिल्ह्यातील चुंगुना गावात घरातील साठवणुकीच्या खोलीबाहेर बसलेल्या गुलाबरानी. उजवीकडे: पती उजियान सिंग आणि कारल्याची पानं, गोमूत्र आणि असे इतर बरेच घटक वापरून बनवलेल्या जैविक खताचं मडकं


‘आमच्या घरच्यांना वाटलं की सेंद्रिय खत वापरून शेती करणं ही निश्चितच चांगली कल्पना आहे. आम्ही सगळ्यांनी विचार केला की जैविक [सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले] अन्न खा ल्लं तर आपल्या आरोग्याला फायदा च होईल ,’ गुलाबरानी म्हणतात
सेंद्रिय शेती सुरू केली त्याचं हे आता तिसरं वर्ष. आपल्या २.५ एकर जमिनीत त्या भात, मका, वाटाणा, तीळ यासारखी खरिपाची पिकं आणि गहू, हरभरा आणि मोहरी ही रब्बीची पिकं घेतात; त्याचबरोबर टोमॅटो, वांगी, मिरची, गाजर, मुळा, बीट, भेंडी, पालेभाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे, शेंगा करवंद अशा इतर बऱ्याच भाज्याही त्या वर्षभर पिकतात. “आम्हाला आता बाजारातून जास्त काही खरेदी करण्याची गरजच पडत नाही,” गुलाबरानी अगदी खुशीत सांगतात.
चुंगुना हे गाव मध्य प्रदेशातील पूर्व भागात असलेल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या वेशीवर आहे. इथली बहुसंख्य कुटुंबं राजगोंड आदिवासी आहेत. पावसावर आणि जवळच असलेल्या नदीच्या कालव्यावर आपल्या छोट्या तुकड्यांमध्ये शेती करतात. त्यातील बरीच कुटुंबं हंगामी कामासाठी कटनीसारख्या जवळच्या शहरांमध्ये आणि उत्तर प्रदेशातही स्थलांतर करतात.
“सुरुवातीला आम्ही फक्त एक किंवा दोन शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. मग आणखी ८-९ जण त्यात सामील झाले,” गुलाबरानी सांगतात. त्यांच्या अंदाजानुसार त्यांच्या समुदायातील लोकांनी लागवड केलेली जवळपास २०० एकर शेतजमीन आता सेंद्रिय आहे.
सामाजिक कार्यकर्ते शरद यादव यांच्या मते, "[चुंगुनामध्ये] इथे आता स्थलांतर कमी झालंय, आणि जंगलाचा उपयोग हा केवळ इंधनासाठी सरपण म्हणून वापरला जातो." शरद यादव हे स्वतः शेतकरी आहेत आणि त्याचबरोबर पीपल्स सायन्स इन्स्टिट्यूट (PSI) चे क्लस्टर समन्वयक देखील आहेत.
पीएसआयच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गुलाबरानी या सडेतोड स्वभावाच्या आहेत. प्रश्न विचारण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे इतरांवर त्यांची चांगलीच छाप पडली. पीएसआय कर्मचाऱ्यांनी सुचविलेल्या पद्धती वापरून मक्याचे पीक करून पाहणाऱ्या त्या पहिल्या होत्या आणि त्यात गुलाबरानी यांनी चांगलंच यश मिळवलं. त्यांना मिळालेल्या यशाने त्यांनी इतरांना देखील प्रयत्न करण्यास प्रेरित केलं आहे.


डावीकडे: गुलाबरानी आपल्या २.५ एकर शेतात सेंद्रिय ख तं आणि कीटकनाश कं वापरून पीक घेतात. उजवीकडे: अन्नाच्या सर्व गरजा हे कुटुंब स्वतःच्याच जमिनीतून पूर्ण करतं
*****
“आम्ही युरिया आणि डीएपी सारख्या खत आणि कीटकनाशकांवर महिन्याला 5,000/- रुपये खर्च करत होतो,” उजियान सिंग सांगतात. त्यांची जमीन पूर्णपणे रासायनिक खतांवर अवलंबून होती किंवा ज्याला स्थानिक भाषेत ‘छीडका खेती’ (फवारणी शेती) म्हणतात, शरद यादव सांगतात.
“पण आता मात्र आम्ही ‘मटका खाद’ [मडक्यातलं खत] बनवतो,” गुलाबरानी घरामागील अंगणात पडलेल्या एका मोठ्या मडक्याकडे बोट दाखवत सांगतात. “मला घरच्या कामांमधून वेळ काढावा लागतो,” त्या पुढे सांगतात. शेतीसोबतच त्यांच्या कुटुंबाकडे १० गायी-गुरं आहेत. त्यातून मिळणारं दूध ते कुठेही विकत नाहीत. उलट हे घरीच वापरलं जातं. दोन मुली आणि एक विवाहित मुलगा असं त्यांचं लहानसं कुटुंब आहे.
मिरची, आलं, गोमूत्र, सोबत कारलं, दुधी आणि कडुलिंबाची पाने आवश्यक आहेत. “हे सगळं चांगलं तासभर उकळावं लागतं. २.५ ते ३ दिवस तसंच ठेवायचं आणि मग वापरायचं. रांजणात तसंच राहू दिलं तरी हरकत नाही. “काही जण ते मिश्रण तसंच १५ दिवसांपर्यंत ठेवतात जेणेकरून वो अच्छे से गल जाता है [चांगलं आंबतं].” सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे इतर काही जण त्यांचा अनुभव सांगतात,
गुलाबरानी एका वेळी पाच ते दहा लिटर खत बनवतात. “एक एकरासाठी त्यातलं एक लिटर पुरेसं होतं. तयार झालेलं एक लिटर मिश्रण १० लिटर पाणी घालून पातळ करावं लागतं. खत जास्त झालं तर फुलं मरून पीक खराब होऊ शकतं,” त्या पुढे सांगतात. सुरुवातीला शेजारपाजारचे फक्त एक बाटली वापरून पहायचे.


डावीकडे: गुलाबरानी आणि त्यांची नात अनामिका , स्वयंपाकघरात. उजवीकडे: शेताला पाणी देत असलेले उजियान सिंग आणि काही अंतरावर पंप चालवण्यासाठी सौरऊर्जेसाठीचे पॅनेल


डावीकडे: राजिंदर सिंग तंत्रज्ञान संसाधन कें द्राचं (TRC) काम पाहतात . हे केंद्र शेती अवजारांसाठीची कर्ज दे तं . उजवीकडे: सिहवन गावातील एक शेत जिथे भाताच्या चार वेगवेगळ्या परंपरागत जाती शेजारी शेजारी लावल्या गेल्या आहेत
“आम्हाला पोट भरण्यासाठी वर्षभर पुरेल इतकं पुरेसं धान्य मिळतं. आम्ही वर्षाकाठी सुमारे १५,००० रुपयांचा माल विकू शकतोय,” उजियान सिंग सांगतात. या भागात वन्यप्राण्यांकडून पिकाची नासाडी होत असल्याच्या बऱ्यात घटना घडत आहेत. मध्य भारतात इतरत्रही शेतकरी या संकटाचा सामना करत आहेत. “आम्ही त्यांना पकडू किंवा मारू शकत नाही कारण सरकारने नवीन कायदा आणला आहे. नीलगाय गहू आणि मका फस्त करतात, पीक पूर्णपणे नष्ट करतात,” गुलाबरानी सांगतात. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये रानडुक्कर मारण्यास सक्त मनाई आहे.
जवळच्या ओढ्यातनं सोलर पंपचा उपयोग करून शेताला पाणी दिलं जातं. उजियान सिंग म्हणतात, “बरेच शेतकरी आता वर्षातून तीन पिके घेऊ शकतायत.” ते त्यांच्या शेताच्या कडेला असलेल्या सोलर पॅनल्सकडे बोट दाखवत सांगतात.
पीपल्स सायन्स इन्स्टिट्यूट (PSI) ने एक तंत्रज्ञान सेवा केंद्र (TRC) देखील स्थापन केलं आहे. बिलपुरा पंचायतीच्या आसपासच्या ४० गावांना या केंद्रातर्फे सेवा पुरवल्या जातात. “ते TRC मध्ये तांदूळाच्या १५ आणि गव्हाच्या ११ जातींचं बियाणं ठेवतात. हे बी पारंपारिक, कमी पावसात, कडाक्याच्या थंडीत वाढू शकणा आणि कीटक व तणही कमी प्रमाणात असणाऱ्या आहेत,” असे TRC चे व्यवस्थापन करणारे राजिंदर सिंग सांगतात.


तंत्रज्ञान सेवा केंद्रात ठेवले लं तांदूळ (डावीकडे) आणि डाळीचे (उजवीकडे) देशी वाण. हे केंद्र ४० गावांना सेवा पुरव तं, यात बिलपुरा पंचायतीमधील चुंगुना गाव ही समाविष्ट आहे


चुंगुना येथील महिला नदीवर अंघोळ करण्यासाठी निघाल्या आहेत. आज दुपारनंतर होणाऱ्या हलछट पूजेसाठी त्यांची तयारी सुरू आहे
“आम्ही आमच्या शेतकरी सभासदांना दोन किलो बियाणे देतो आणि पीक निघालं की त्यांनी त्याचा दुप्पट परतावा द्यावा अशी अपेक्षा आहे,” ते सांगतात. तिथून थोड्याच अंतरावरची एक एकरातला भात आम्हाला दाखवला - चार वेगवेगळ्या वाणाचा तांदूळ एकमेकांच्या शेजारी लावलेल्या होता. चारही भात कधी तयार होतील त्याची माहिती त्यांना तोंडपाठ आहे.
या परिसरातील शेतकरी भाजीपाला मार्केटिंगसाठी सहकारी तत्वावर एक गट सुरू करण्याचा विचार करत आहेत. सेंद्रिय शेतीच्या जोरावर त्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे.
आम्ही निघत असताना, गुलाबरानी गावातील इतर महिलांसोबत उपवास सोडण्यापूर्वी आंघोळ करण्यासाठी आणि हलछट पूजा करण्यासाठी नदीवर निघाल्या होत्या. भादो किंवा भाद्रपदात आपल्या मुलांसाठी ही पूजा घातली जाते. गुलाबरानी म्हणतात, “आम्ही ताकात महुआ शिजवतो आणि ते खाऊन आमचा उपवास सोडतो.” सोबत शेतातला सेंद्रिय हरभरासुद्धा भाजून खातील.