सकाळी ७ वाजता डाल्टनगंजच्या सादिक मंझिल चौकात नुसती लगबग सुरू असते. ट्रकची ये-जा, दुकानदार आपल्या दुकानांची शटर खोलत असतात आणि जवळच्याच एखाद्या मंदिरात कुठे तरी टेपवर हनुमान चालिसा लावल्याचा हलकासा आवाज येत असतो.
एका दुकानाच्या पायऱ्यांवर बसून ऋषी
मिश्रा सिगरेट ओढता ओढता त्याच्या भोवती गोळा झालेल्या लोकांशी मोठ्याने काही तरी
बोलत होता. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका आणि नवीन सरकार हा त्यांच्या बोलण्याचा
विषय. सगळ्यांचं म्हणणं आणि वादावादी ऐकत तंबाखू चोळत असलेले नजरुद्दिन अहमद अखेर
मध्ये पडतात आणि म्हणतात, “तुम्ही कशासाठी वाद घालताय? कुणाचं का सरकार येईना,
आपल्याला पोटासाठी पैसे कमवावेच लागणारेत ना?”
ऋषी आणि नजरुद्दिन रोज सकाळी ‘लेबर
चौक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मजूर अड्ड्यावर येतात. पलामूच्या आसपासच्या
गावांमध्ये काहीही काम मिळत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. इथे सादिक मंजिलच्या
मजूर अड्ड्यावर किमान २५-३० जण रोजंदारीवर काही तरी काम मिळेल या आशेत ताटकळत उभे
आहेत. डाल्टनगंज शहरात असे पाच चौक आहेत जिथे झारखंडच्या छोट्या गावांमधून आलेले
मजूर कामाच्या आशेने गोळा होतात.


पलामू जिल्ह्यातल्या सिंग्राहा कलां गावातला ऋषी मिश्रा (डावीकडे) आणि नेउरा गावाचे नजरुद्दिन (उजवीकडे) यांच्यासारखे अनेक कामगार रोज सकाळी डाल्टनगंजच्या सादिक मंजिल चौकातल्या मजूर अड्ड्यावर गोळा होतात. गावात कसलंच काम मिळत नसल्याने कामाच्या शोधात इथे येत असल्याचं हे मजूर सांगतात


सादिक मंजिल ‘लेबर चौक’ म्हणून ओळखला जाणारा भाग आहे डाल्टनगंज शहरात असे इतर पाच मजूर अड्डे आहेत. ‘दररोज इथे ५०० लोक येतात. फक्त १० लोकांना काम मिळेल, बाकीचे हात हलवत तसेच माघारी जातील,’ नजरुद्दिन सांगतात
“आठ वाजेपर्यंत थांबा. इतक्या लोकांची गर्दी होते की पाय ठेवायला पण जागा राहणार नाही,” ऋषी सांगतो. आपल्या फोनमध्ये किती वाजलेत त्यावर त्याचं लक्ष असतं.
२०१४ साली ऋषीने आयटीआयमधून
प्रशिक्षण पूर्ण केलं. त्याला ड्रिलिंग मशीन चालवता येतं आणि आज तेच काम मिळावं
अशी त्याची इच्छा आहे. “आम्ही काम मिळेल या आशेने सरकारला मत दिलंय. मोदी गेली १०
वर्षं सत्तेत आहेत. किती भरत्या जाहीर झाल्या आहेत किंवा किती नोकऱ्या दिल्या आहेत,
सांगा?” सिंग्राहा कलां गावचा हा २८ वर्षीय रहिवासी विचारतो. “हे सरकार आणखी पाच
वर्षं राहिलं तर आमच्या तर सगळ्याच आशा धुळीला मिळतील.”
पंचेचाळीस वर्षीय नजरुद्दिन यांनाही
असंच वाटतंय. नेउरा गावचे रहिवासी असलेले नजरुद्दिन गवंडीकाम करतात. सात जणांच्या कुटुंबातले
ते एकटे कमावते सदस्य आहेत. “गरीब आणि शेतकऱ्यांचं कुणाला काय पडलंय?” ते
विचारतात. “दररोज इथे ५०० लोक येतात. फक्त १० लोकांना काम मिळेल, बाकीचे हात हलवत
तसेच माघारी जातील.”


मजूर बाया आणि गडी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे आहेत. कुणीही बाहेरून आलं की दिवसभराचं काम मिळेल या आशेने सगळे त्याच्याभोवती गराडा घालतात
आमच्या गप्पा मध्येच थांबतात कारण मोटरसायकलवर कुणी तरी एक जण येतो. सगळे पुरुष त्याच्या भोवती गराडा घालतात. मजुरीवर घासाघीस होते आणि शेवटी एका तरुण मजुराची निवड होते. तो माणूस दुचाकीवर त्याला मागे बसवून वेगात निघूनही जातो.
ऋषी आणि त्याच्या सोबतचे बाकी मजूर
पुन्हा आपापल्या जागी येऊन थांबतात. “पाहिलात ना तमाशा? एक जण येतो आणि सगळ्यांच्या
उड्या पडतात,” ऋषी म्हणतो आणि कसनुसं हसतो.
पुन्हा एकदा पायरीवर बसत म्हणतो, “कुणाचंही
सरकार येऊ दे, गरिबाला त्याचा फायदा व्हावा. मेहेंगाई कमी व्हायला पाहिजे. मंदीर बांधून
गरिबांची पोटं भरणारेत का, सांगा?”