तीसेक वर्षांपूर्वी संजय कांबळेंना बांबूचं काम शिकायचं होतं पण शिकवायला कुणीच तयार नव्हतं. आणि आज अस्ताला चाललेली ही कला सगळ्यांनी शिकवायची त्यांची इच्छा आहे तर शिकायलाच कुणी पुढे येत नाही. “काळाचा महिमा आहे, दुसरं काय?” पन्नाशीचे संजय दादा सांगतात.
आपल्या एक एकर रानातल्या बांबूपासून
ते प्रामुख्याने इरली तयार करतात. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात भातशेती करणारे
शेतकरी बांबूपासून तयार झालेलं इरलं पावसापासून संरक्षण म्हणून वापरतात. “वीसेक वर्षांपूर्वी
शेतात काम करताना प्रत्येक शेतकरी इरलं वापरत होता कारण शाहूवाडी तालुक्यात पाऊस
लई होता,” केरले गावचे संजय दादा सांगतात. ते स्वतः देखील शेतात काम करत असताना
इरलं वापरायचे. हा एक प्रकारचा रेनकोट किमान सात वर्षं टिकतो आणि त्यानंतरही, “अगदी
सहज दुरुस्त करता येतो हो,” ते म्हणतात.
पण काळ बदलला.
गेल्या २० वर्षांत म्हणजे २००३ ते
२०२३ या काळात कोल्हापूर जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणाऱ्या पावसाचं
प्रमाणच कमी होत गेलंय. १३०८ मिमी पडणारा पाऊस आता ९७३ मिमीवर आला आहे.
“पाऊस इतका कमी होईल आणि माझी ही
कलाच पडद्याआड जाईल, कुणाला वाटलं होतं?” संजय दादा विचारतात.
“जून ते सप्टेंबर हा आमचा शेतीचा
हंगाम कारण इथली शेती आजही पावसावर अवलंबून आहे,” दादा सांगतात. पण गेल्या काही
वर्षांमध्ये पाऊस लहरी झाला असल्यामुळे अनेक जण शेती सोडून पुण्या-मुंबईला
कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. तिथे कुठे हॉटेलमध्ये, खाजगी बस कंपन्यांमध्ये,
गवंडी म्हणून, रोजंदारीवर तर कुठे पथारी टाकून काही विक्री करणं अशी कामं ते
करतायत. किंवा राज्यभरात इतर ठिकाणी शेतात मजुरीला देखील जातायत.


डावीकडेः महाराष्ट्राच्या केरले गावचे संजय कांबळे पावसापासून रक्षण म्हणून शेतात काम करताना वापरली जाणारी इरली तयार करतात. उजवीकडेः ‘चांगलं इरलं बनवायचं असेल तर चांगला बांबू तुम्हाला हुडकता आला पाहिजे,’ आपल्या रानातले बांबू पाहता पाहता संजय कांबळे सांगतात
पाऊस कमी झाल्यामुळे शेती करणाऱ्या अनेकांनी साळी सोडून आता ऊस लावायला सुरुवात केली आहे. “ज्यांच्याकडे बोअरवेल आहेत ते आता फार मोठ्या प्रमाणावर उसाकडे वळलेत आणि त्याला फार काही कष्टच पडत नाहीत.” अंदाजे सात वर्षांपूर्वी हा बदल सुरू झाल्याचं ते सांगतात.
जर पाऊस व्यवस्थित झाला तर संजय दादा
एका पावसाळ्यात १० इरली विकायचे. पण २०२३ साली त्यांना फक्त तीन इरल्यांची मागणी आली.
“मागल्या वर्षी फारच कमी पाऊस झाला. मग इरलं कोण घेईल हो?” जवळच्या अंबा, मसणोली,
तळवडे आणि चांदोलीतले शेतकरी हे त्यांचं मुख्य गिऱ्हाईक.
लोक उसाकडे वळल्यामुळे आणखी एक
समस्या निर्माण झाली आहे. “रानात बुटकी पिकं असली तर इरल्याचा वापर होतो. तुम्ही
इरलं घालून उसाच्या फडात जाऊच शकत नाही कारण ते रोपाला अडतं,” संजय दादा सांगतात.
इरल्याचा आकार आणि उंची शेतकऱ्याकडे पाहून ठरवली जाते. “लहानसं घरच असतं म्हणा की,”
दादा म्हणतात.
आता गावा-गावातून प्लास्टिकचे स्वस्त
रेनकोट मिळू लागले आणि इरल्याचा सगळ्यांना विसरच पडल्यासारखं झालंय. वीस वर्षांपूर्वी
दादा एक इरलं २००-३०० रुपयांना विकत होते पण आता सगळंच महाग झालंय त्यामुळे
त्यांनी इरल्याची किंमत ६०० रुपये इतकी केली आहे.
*****
दादांचे वडील चंद्रप्पा शेतकरी होते आणि एका कारखान्यात काम करायचे. आणि आजोबा, ज्योतिबा इरलं बनवायचे. दादांचा जन्म होण्याआधीच ते वारले होते. पण तेव्हा गावात हा अगदी नेमाने केला जाणारा व्यवसाय होता.
तेव्हाच काय अगदी तीस वर्षांपूर्वी
सुद्धा इरल्याला इतकी मागणी होती की शेतीला जोड म्हणून संजय दादांनी हे काम शिकून
घ्यायचं ठरवलं. “दुसरा काही पर्यायही नव्हता,” ते सांगतात. “घर चालवायला चार पैसे
कमवायची गरज होती.”


बांबूची मापं घ्यायला संजय दादा कसलीही टेप किंवा पट्टी वापरत नाहीत. परली (डावीकडे)ने झटक्यात बांबूचे दोन भाग करतात


डावीकडेः परली फार धारदार असते आणि अनेकदा बांबूकाम करणाऱ्यांना इजाही होऊ शकते. उजवीकडेः संजय दादा बांबूच्या फाका करतायत
इरलं बनवायला शिकायचं नक्की झाल्यावर संजय दादा केरल्याच्या कांबळेवाडी वसतीत एक अनुभवी बुरुड आहेत त्यांच्याकडे गेले. “मला हे काम शिकवा म्हणून मी त्यांच्या विनवण्या केल्या पण ते कामात इतके दंग होते की त्यांनी माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही,” दादा सांगतात. पण मी त्यांची पाठ सोडली नाही. ते रोज तिथे जायचे आणि ते कसं काय करतायत ते पाहत राहायचे. कालांतराने त्यांनी दादांना ही कला शिकवली.
दादांनी सुरुवातीला बांबूपासून
टोपल्या बनवायला सुरुवात केली. ते काम त्यांना अगदी आठवड्यात जमलं. मग काय ते
दिवसभर बांबूशीच खेळत असायचे. हळू हळू त्यांचा हात या कामात पक्का बसला.
“सध्या माझ्या शेतात १,००० बांबू आहे,”
दादा सांगतात. “या सगळ्या वस्तू बनवण्यासाठी आणि द्राक्षाच्या मळ्यांना मी बांबू
पुरवतो.” बाजारात चिवा विकत घ्यायचा तर एका नगाला ५० रुपये मोजावे लागतात.
इरलं बनवणं तसं कष्टाचं काम आहे. एक
वर्षभर मेहनत घेतल्यावर दादांना ते जमायला लागलं.
सुरुवात होते ते अगदी योग्य बांबूचा
शोध घेण्यापासून. इथे लोक चिव्यापासून इरलं तयार करतात कारण तो मजबूत असतो आणि टिकाऊ
सुद्धा. आपल्या रानातला बांबू नीट पाहत पाहत ते एक २१ फुटी बांबू निवडतात. पुढच्या
पाचच मिनिटात खालून दुसऱ्या पेरावर घाव घालत ते तो बांबू काढतात आणि खांद्यावर
टाकून घरी घेऊन येतात.


बांबूच्या पातळ पट्ट्या (डावीकडे). आडव्या विणत विणत यांच्या पासूनच इरलं तयार केलं जाणार आहे (उजवीकडे)


डावीकडेः बांबूच्या पट्ट्या वाकवून त्यापासून इरल्याचा सांगाडा तयार करायला फार मेहनत घ्यावी लागते. उजवीकडेः जरा जरी कुठे चूक झाली तर सगळंच बिघडून जातं त्यामुळे त्यांना फार काळजीपूर्वक काम करावं लागतं.
रानातून बांबू घेऊन दादा आपल्या घरी येतात आणि अंगणात बांबू ठेवतात. त्यांचं घरं चिऱ्याचं आहे. एक खोली आणि स्वयंपाकघर. अंगणातल्या बांबूचे परलीने शेंडा आणि बुडखा तोडून टाकतात. आणि त्यानंतर मधे घाव घालून आधी बांबूचे दोन समान आकाराचे तुकडे करतात आणि त्यानंतर त्या दोन्ही तुकड्याच्या दोन फाका करतात.
बांबूची हिरवी साल परलीने सोलून
त्याच्या पातळ पट्ट्या काढल्या जातात. पुढचे तीन तास ते अशा बारीक पट्ट्या काढतात.
याच पट्ट्या विणून इरलं तयार केलं जातं.
“इरलं किती मोठं हवं त्याप्रमाणे पट्ट्या
काढायच्या,” ते सांगतात. अंदाज काढला तर एक इरलं बनवायला २० फुटी तीन मोठे बांबू
पाहिजेत.
मग दादा वीस पट्ट्या जमिनीवर आडव्या ठेवतात.
प्रत्येक दोन पट्ट्यांमध्ये सहा सेंटीमीटर जागा ठेवतात. त्यानंतर त्या पट्ट्यांवर
काही उभ्या ठेवून ते या पट्ट्या विणायला सुरुवात करतात. चटई विणतात, तसंच.
या पट्ट्या काढत असताना दादांना कुठलीच
पट्टी किंवा टेप वगैरे काहीही लागत नाहीत. ते त्यांच्या कामात अगदी निष्णात आहेत. आपला
हाताचा पंजा इतकंच माप त्यांच्यासाठी पुरेसं असतं. “माप इतकं अचूक असतं की पट्टी
जास्त कमी उरतच नाही,” हे सांगत असताना दादांचा चेहरा अगदी खुलून येतो.


डावीकडेः इरल्याचा एक लहानसा सांगाडा दादा दाखवतायत. उजवीकडेः पूर्ण झाल्यावर इरल्यावर ताडपत्री टाकली जाते. २०२३ साली या भागात पावसाचं प्रमाण इतकं कमी होतं की संजय दादांना इरलं बनवण्याचं कामच आलं नाही
“हा सांगाडा तयार झाला की दोन्ही बाजूंनी टोकं आत मुडपून घ्यावी लागतात, आणि याला फार ताकद लागते,” ते सांगतात. सांगाडा तयार झाल्यावर पुढचा तासभर पट्ट्यांची टोकं मुडपण्यात जातो. इरलं तयार करण्याच्या सगळ्या कामाला एकूण आठ तास लागतात.
इरलं तयार झालं की त्यावर ताडपत्री
बसवली जाते. त्यामुळे पावसाचं पाणी आत येत नाही. जवळच्या अंबा किंवा मलकापूरहून ५०
रुपये नगाप्रमाणे दादा ताडपत्री घेऊन येतात. डोक्यावर ठेवलं की हलू नये म्हणून
प्लास्टिकच्या दोरीने ते बांधून घेतलं जातं. दोरीला अनेक गाठी मारलेल्या असतात
जेणेकरून ते घट्ट बांधता यावं.
*****
इरलं तयार करण्याच्या कामासोबत दादा आपल्या रानात भात घेतात. घरी खाण्यापुरताच खरं तर भात होतो. त्यांच्या पत्नी चाळिशीच्या मालाबाई आपल्या रानात काम करून दुसऱ्याच्यात मजुरीला जातात. खुरपायला, भाताची, उसाची लावण असते तेव्हा किंवा पिकाच्या काढणीवेळी मजुरीला जातात.
“इरल्याच्या आता फारशा ऑर्डर येत नाहीत आणि भातशेती पोटाला पुरत नाही त्यामुळे मी आता शेतात मजुरीला जायला लागलेय,” मालाबाई सांगतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. करुणा, कांचन आणि शुभांगी. तिघी विशीच्या पुढे आहेत आणि लग्न होऊन आपापल्या सासरी नांदतायत. स्वप्नील शिकायला मुंबईला गेलाय. त्याने इरलं कसं करायचं, कधीही शिकून घेतलं नाही. “तो शहरात गेला कारण इथे पोटापाण्यासाठी काहीही नाही,” संजय दादा म्हणतात.


डावीकडेः चार पैसे अधिकचे मिळावेत म्हणून दादा आता बांबूच्या इतर वस्तूसुद्धा बनवतात. मासे धरायचा करंडासुद्धा. उजवीकडेः डावीकडे दिसणारं कोंबड्यांचं खुराडं आणि उजवीकडची टोपली दादांनीच बनवली आहे


डावीकडेः विणताना दोन्ही बाजू अगदी समांतर आणि एकसारख्या असतील याची काळजी घ्यावी लागते. उजवीकडेः गेल्या तीस वर्षांत ही कला शिकून घेण्यासाठी आपल्याकडे कुणीही आलं नसल्याचं संजय दादा सांगतात
चार पैसे जादा मिळावे म्हणून दादांनी आता कोंबड्यांचं खुरुड किंवा खुराडं बनवायसा सुरुवात केली आहे. शिवाय मासे ठेवण्यासाठीचा करंडाही ते बनवतात. ज्याला हवं त्याच्यासाठी बनवायचं. गिऱ्हाईक घरी येऊन या वस्तू घेऊन जातात. दहा वर्षांपूर्वी ते टोपली आणि कणग्या बनवत असत. पण पत्र्याचे डबे आणि कोठ्या मिळायला लागल्यावर कणग्यांची मागणी घटत गेली. आता फक्त घरच्यासाठी ते या वस्तू बनवतात.
“ही कला कोणाला शिकावीशी वाटेल?” दादा विचारतात आणि आपण बनवलेल्या वस्तूंचे फोनवर काढलेले फोटो दाखवू लागतात. “मागणीच नाही, त्यातनं काहीही कमाई होत नाही. थोड्या वर्षात बघायला पण मिळणार नाही हे काम.”
संकेत जैन लिखित ग्रामीण कारागिरांवरील या लेखमालेसाठी मृणालिनी मुखर्जी फाउंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.