“दारू प्यायली की किती तरी गोष्टींचा विसर पडतो. भुकेचाही,” शिंगोधुई गावाचे रहिवासी रोबींद्र भुइया म्हणतात.
पन्नाशीचे भुइया शबर आदिवासी आहेत (पश्चिम बंगालमध्ये सवर म्हणून नोंद). मुंडा जमातीचे शबर भारताच्या पूर्वकडच्या प्रदेशात राहतात आणि शाओरा, शोरा, शबर आणि शुरी म्हणूनही ओळखले जातात. लोधा शबर प्रामुख्याने पश्चिम मेदिनीपूर (अखंड) आणि खाडिया शबर जास्त करुन पुरुलिया, बांकुडा आणि पश्चिम मेदिनीपूर (अखंड) या जिल्ह्यांमध्ये राहतात.
महाश्वेता देवींनी द बुक ऑफ द हंटर (मूळ बंगालीमध्ये प्रकाशित, ब्याधखंड, १९९४) या आपल्या पुस्तकामध्ये या समुदायाचं अठरा विश्वं दारिद्र्य आणि वंचन वर्णन केलं आहे. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. २०२० साली आलेल्या पश्चिम बंगालच्या आदिवासींचं जगणं या अहवालातील माहितीनुसार, “सर्वेक्षण केलेल्या ६७ टक्के गावांनी उपासमार होत असल्याचं सांगितलं आहे.”
इंग्रजांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ही जमात ‘गुन्हेगार जमात’ असल्याचं जाहीर केलं. १९५२ साली त्यांना या कलंकातून मुक्त करण्यात आलं. पूर्वी शिकार करून जगणारी ही माणसं फळं, कंदमुळं, पानं गोळा करण्यात आणि अर्थातच जंगलात शिकार करण्यात तरबेज आहेत. स्वातंत्र्यानंतर काही लोकांना कसण्यासाठी जमीन देण्यात आली. पण यातली बहुतेक जमीन खडकाळ आणि नापीक होती. त्यामुळे अखेर कामासाठी त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ आली. गुन्हेगार जमात असल्याचा ठपका जरी काढून टाकला असला तरी तो पुरता पुसला गेलेला नाही. त्यामुळे आजही त्यांच्या येण्या-जाण्यावर बंधनं घालणाऱ्या स्थानिक पोलिस आणि वनखात्याच्या मेहेरबानीवर ते जगत आहेत.
कसल्याच फारशा संधी उपलब्ध नसल्याने शबर आदिवासींमध्ये भुकेचं आणि उपासमारीचं प्रमाण फार जास्त आहे. खास करून पश्चिम मेदिनीपूर आणि झरग्राम या दोन जिल्ह्यांमध्ये. भुइयांसारखे अनेक जण दारू पिऊन भूक मारतात किंवा “दिवसातून तीनदा आम्ही पांता भात [आंबवलेला भात] खाऊन जगतोय,” बोंकिम मोल्लिक सांगतात. पंचावन्न वर्षीय मलिक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला महिन्याला पाच किलो रेशनचा तांदूळ मिळतो त्याबद्दल बोलतात. “मीठ किंवा तेल म्हणजे चैन आहे हो,” ते म्हणतात. आपल्या अगदी मोडकळीला आलेल्या घरासमोर बसून ते पांता भात खातायत.


शबर बहुल झरग्राम जिल्ह्यातील शिंगधुई गावातले रोबींद्र भुइया (डावीकडे)


तोपोबन गावात बोंकिम मोल्लिक (डावीकडे) पांता भात खातायत कारण खायला काहीही विकत घेणं न परवडणाऱ्या या लोकांचं रोजचं खाणं फक्त इतकंच आहे. जंगल हे अन्नाचा मोलाचा स्रोत असलं तरी वन्य प्राण्यांच्या भीतीने तिथे जाणं आताशा मुश्किल झालं आहे. कुपोषणाच्या खुणा स्पष्टपणे दिसत असलेलं एक लहान मूल
रेशनवर मिळणाऱ्य तुटपुंज्या धान्यावर पोट कसं भरणार? त्यामुळे जंगलातून मिळणाऱ्या अनेक गोष्टींवरच त्यांची भिस्त असते. वैशाख, ज्येष्ठ आणि त्यानंतर पावसाळ्यात, आषाढ महिन्यात हे लोक जंगलातून फळं गोळा करतात. पक्ष्यांची पिल्लं, साप, गोसाप म्हणजेच घोरपड, बेडूक आणि गोगलगायींची शिकार करतात. शिवाय शेतातले बेडुक, मोठ्या गोगलगायी, मासे आणि खेकडेही धरतात.
त्यानंतर श्रावण, भाद्रपद आणि आश्विन महिन्यात नदीतले मासे, कार्तिक, अग्रहायण (मार्गशीर्ष) आणि पौष या महिन्यांमध्ये उंदरांनी बिळात दडवलेल्या साळी गोळा करतात. माघाच्या थंडीत आणि फाल्गुन आणि चैत्रात छोट्या प्राण्यांची शिकार करायची, झाडाची फळं आणि चाक म्हणजेच मधाची पोळी गोळा करायची.
मात्र इतर आदिवासींप्रमाणे त्यांना देखील जंगलात जाणं आता अवघड होत चाललंय. जंगलातले प्राणी अन्नाच्या शोधात हिंस्त्र होत असल्याने आपल्या जिवावर बेतेल की काय अशी भीती वाढत चाललीये.
“सांज झाल्यावर आम्ही गाव सोडून जात नाही. कुणी आजारी पडलं तरी नाही. हत्तींचे काही काही कळप जागचे हलत नाहीत. इथलं आधार कार्ड काढलंय वाटतं,” ५२ वर्षीय जोगा मोल्लिक म्हणतात. आवाजाला कडवट किनार.
शुक्रा नायक तपोवन गावचे शबर. आता साठी पार केलेले. त्यांच्या म्हणण्यानुसार हत्तींमुळे “इथे फार भयंकर झालंय. पहावं तिथे हत्ती. तेसुद्धा फार आक्रमक झालेत आजकाल. माणसांवर हल्ला करतातच, वर भाताची शेतं उद्ध्वस्त करतात. केळीची झाडं आणि आमची घरं देखील.”
त्यांचेच शेजारी बेनासुली गावचे जोतिन भोक्ता मात्र विचारतात, “आम्ही जंगलातच गेलो नाही, तर खाऊ काय? कधी कधी तर अख्खा दिवस फक्त एकदा पांता भात खाऊन काढलाय आम्ही.”


तपोबन गावातले शबर आदिवासी असलेले जोगा मोल्लिक (डावीकडे) मधुमेहासह अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. ‘जंगलातच जायचं नाही तर आम्ही खायचं काय?’ बेनाशुली गावचे जोतिन भोक्ता (उजवीकडे) विचारतात


बेनाशुलीचे शुक्रा नायक (डावीकडे) म्हणतात, ‘हत्तींची ये-जा सुरू असते त्यामुळे रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. माझं घर गावाच्या टोकाला आहे. खूपच धोका आहे.’ खाण्याच्या शोधात हत्ती गावात घुसतात. हत्तींच्या हल्ल्यात नासधूस झालेली केळ्याची बाग (उजवीकडे)
खाण्याचे इतके हाल होत असल्यामुळे सबर लोकांना क्षयाची बाधा होण्याची शक्यता वाढते. शारोथी मोल्लिक यांना क्षय झालाय, त्या काही आरोग्य शिबिरांना जाऊनही आलेत पण आता मात्र त्यांना कुठेच उपचारासाठी जायचं नाहीये. ३० वर्षीय शारोथी सांगतात, “आमच्या कुटुंबात मी एकटीच बाई. मीच दवाखान्यात गेले, तर घरचं काम कोण करणार? माझ्या नवऱ्याबरोबर जंगलात पानं तोडायला कोण जाणार?” तपासणीसाठी सारखं दवाखान्यात चकरा मारायच्या तर पैसा लागतो. “एका खेपेला ५० ते ८० रुपये लागतात. आम्हाला काही परवडत नाही.”
शबर कुटुंबांसाठी कमाईचं मुख्य साधन म्हणजे सालवृक्षाची पानं गोळा करणं आणि ती विकणं. आणि हे काही सोपं काम नाही. साल वृक्षाचं लाकूड टणक असतं आणि त्याला मोठी मागणी असते. साल वृक्षाची पानं विकत घेणारे ओडिशाचे दिलिप मोहंती म्हणतात, “या वर्षी पानांचा पुरवठा खूपच कमी झाला आहे. हत्तींच्या भयाने सबर लोक आजकाल जंगलात कमीच जातायत.”
जोतिन यांचे शेजारी, कोंदा भोक्ता दुजोरा देतात आणि सांगतात की जंगलात जाणं आता धोक्याचं झालं हे. “आम्ही शक्यतो घोळका करून जातो. प्रचंड धोका असतो. साप असतात आणि हत्ती. आम्ही सकाळी ६ वाजता जातो आणि दुपारपर्यंत परततो.”
पानं गोळा करून सुकवली जातात. “आम्ही दर शनिवारी जवळच्या आठवडी बाजारात सायकलवर ही पानं घेऊन जातो. ओडिशातनं लोक येतात आणि १,००० पानांना ६० रुपये मिळतात. आठवड्यात चार गठ्ठे विकले तर २४० रुपये मिळतात,” जोतिन भोक्ता सांगतात. “बहुतेक लोकांची कमाई इतकीच आहे.”


डावीकडेः बेनाशुलीच्या शारोथी मलिक यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये क्षयाचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या जास्त काम करू शकत नाहीत. उजवीकडेः शिंगधुईचे रहिवासी शोबोर मलिक यांचा कुष्ठरोग बळावला आहे. शासनाकडून आपल्याला कोणताही उपचार मिळाल नसल्याचं ते सांगतात


डावीकडेः बेनाशुलीच्या चोंपा मोल्लिक आपल्या घरी. त्यांनी आठवडी बाजारात विक्रीसाठी जंगलातून साल वृक्षाची पानं तोडून आणली आहेत. उजवीकडेः याच गावचे रहिवासी शुबेन भोक्ता सालवृक्षाची पानं बाजारात घेऊन येतायत
शासनाने या समुदायासाठी प्रधान मंत्री आवास योजनेखाली घरकुल योजना सुरू केली आहे. पण चाळिशीच्या शाबित्री मोल्लिक म्हणतात, “आम्ही तिथे राहूच शकत नाही.” साधारणपणे ४३ अंश सेल्सियसपर्यंत पारा चढतो तेव्हा छताला सिमेंटचे पत्रे असलेल्या या घरांमध्ये राहणं असह्य होतं. “मार्च ते जून इतकी गरमी असते, तेव्हा त्या घरांमध्ये आम्ही कसं काय रहायचं, सांगा?”
बेनाशिली आणि तोपोबनसारख्या गावांमध्ये काजला जनकल्याण समितीसारख्या काही सामाजिक संस्थांना प्राथमिक शाळा सुरू केल्या आहेत. साक्षरतेचं प्रमाण राज्य आणि देशाच्या तुलनेच खूपच कमी, ४० टक्के आहे. या भागातली तब्बल एक तृतीयांश आदिवासी मुलांची [माध्यमिक आणि उच्च माध्यमिक] शाळेत नोंदच नसल्याचं २०२० साली प्रसिद्ध झालेला एक अहवाल सांगतो. जातीआधारित मारहाण, हल्ले होतात, घरापासून शाळा लांब आहेत, शिक्षणाचा खर्च परवडत नाही आणि काम करावंच लागतं अशा सगळ्या कारणांचाही या अहवालात उल्लेख येतो.
“जेव्हा चार पैसे कमवण्यासाठी झगडावं लागतं, तेव्हा मुलांना शाळेत पाठवणं म्हणजे चैन असते,” केजेएसचे श्वोपोन जाना म्हणतात.
आरोग्यसेवेबाबतही तीच स्थिती आहे, पल्लवी सेनगुप्तो सांगतात. “जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्रंच नाहीत त्यामुळे एक्सरे वगैरे काढणं त्यांच्यासाठी फार अवघड आहे. आणि म्हणून ते गावातल्या भगत-वैदूंवर निर्भर असतात,” सेनगुप्तो सांगतात. त्या आदिवासी भागात आरोग्यसेवा देणाऱ्या जर्मन डॉक्टर्स या एका सेवाभावी संस्थेसोबत काम करतात. या भागात साप चावण्याच्या घटनाही सतत होत असतात आणि तेव्हा देखील पुरेशा आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने लोक भगत-वैदूंवरच अवलंबून असतात.


तोपोबन गावात शबर आदिवासी मुलांसाठी काजला जनकल्याण समितीने सुरू केलेली शाळा. उजवीकडेः बेहुला नायक यांना आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड झाला आहे. बेनाशुलीच्या शबर आदिवासी महिलांमध्ये हा आजार सर्रास आढळून येतो


कोनोक कोटाल यांच्या हाताचं हाड मोडलं तेव्हा त्यांना कसलेच उपचार मिळाले नाहीत. आज तो हात कायमचा वाकडा झाला आहे. शिंगोधुई या त्यांच्या गावात डॉक्टर किंवा वैद्यकीय सुविधा फारच अपुऱ्या आहेत. बेनाशुलीच्या कुनी भोक्ता (उजवीकडे) यांचा पाय मोडलाय. आपण पुन्हा चालू शकू का नाही याची त्यांना खात्री वाटत नाही. त्यांचे पती शुबेन भोक्ता सांगतात की त्यांच्या उपचारावर त्यांनी ८,००० रुपये खर्च केलेत
पश्चिम बंगालमध्ये शबर आदिवासींची संख्या ४०,००० हून थोडी जास्त असून ( भारतातील अनुसूचित जमातींची सांख्यिकी ) आजही हा समुदाय उपासमारीचं जिणं जगत आहे.
२००४ साली मेदिनीपूर जिल्ह्यातले पाच शबर आदिवासी अनेक महिन्यांच्या उपासमारीनंतर मरण पावले. तेव्हा माध्यमांमध्ये, अगदी राष्ट्रीय स्तरावर याबद्दल मोठा वादंग उसळला होता. आज जवळपास वीस वर्षं उलटली तरी चित्र फारसं बदललेलं नाही. भुकेचा आगडोंब तसाच आहे. शिक्षण, आरोग्य आजही दूरच आहे. आणि घनदाट जंगलात राहणाऱ्या या समाजासाठी वन्यजिवांचे हल्ले नेहमीचेच.
अशा सगळ्या परिस्थितीत जेव्हा इथले लोक अन्नाची जागा दारू घेते असं म्हणतात, तेव्हा ते मजेत केलेलं विधान नसतं. रोबींद्र भुइया मला म्हणतात, “माझ्या श्वासाला दारूचा भपकारा असला, तर तू मला रागावणार काय?”

शिंगधुईचे परमेश्वर बेसरा आणि महेश्वर बेसरा दोघंही चाकाच्या खुर्चीला खिळून आहेत. दोघं जन्मतः एकदम धडधाकट होते पण हळूहळू त्यांच्या पायातली शक्ती गेली. आरोग्यसेवा खूपच दूर असल्याने त्यांना उपचार मिळाले नाहीत आणि घरची परिस्थिती इतकी हलाखीची होती की उपचार घेणंही दुरापास्त होतं

तपोबनच्या मदन भोक्ता यांना डोळ्याचा दुर्मिळ आजार झाला होता. परवाना नसलेल्या एका डॉक्टरने त्यांच्यावर चुकीचे उपचार केले आणि भोक्ता यांची दृष्टी गेली

तोपोबन गावातले कोंदा भोक्ता आपल्या डोक्यामध्ये आलेल्या गाठी दाखवतात. ‘सुरुवातीला छोटी गाठ होती. मी काही लक्ष दिलं नाही. त्यानंतर ती वाढतच गेली. मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण ते पडलं पार झरग्राम शहरात. माझ्यापाशी फार पैसे नाहीत, त्यामुळे चांगले उपचार कधी मिळालेच नाहीत’

बेनाशुली गावचे कोर्मू नायक म्हणतात की जंगलात जाऊन पानं गोळा करायची, ती विकून खायला काही आणायचं याकरता लागणारी ताकत आता त्यांच्यात राहिली नाही

बहुतेक शबर आदिवासी झरग्राम, पश्चिम मेदिनीपूर, पुरुलिया आणि बांकुडा या जिल्ह्यांमध्ये राहतात.