देवेंदर सिंग भांगू हा सोशिओलॉजीचा विद्यार्थी पंजाबचा रहिवासी आहे. १३ फेब्रुवारीला तो आपल्या मित्रांबरोबर शंभू बॉर्डरवर गेला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाग घ्यायला. दुपारी दोन वाजता जेव्हा ते सगळे तिथे पोहोचले तेव्हा हरयाणा पोलीस आणि शीघ्र कृती दलाने कारवाईला सुरुवात केली होती.
देवेंदरचा मित्र तरणवीर सिंग सांगतो, “आम्ही एका गटात शांतपणे उभे असताना एक रबरी बुलेट येऊन त्याच्या डाव्या डोळ्याला लागली. देवेंदर लगेच खाली कोसळला. आम्ही त्याला उचलायला जात होतो, तेवढ्यात पोलिसांनी आमच्यावर तीन ते चार अश्रुधुराची नळकांडी फोडली.” हे सगळं आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्यावर अर्ध्या तासातच, तीन वाजताच्या सुमाराला ही घटना घडली.
१३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी शेतकऱ्यांनी शांतपणे मोर्चा करून दिल्लीकडे जायला सुरवात केली. पिकाच्या किमान आधारभूत किमतीची (मिनिमम सपोर्ट प्राईस) कायदेशीर हमी ही त्यांची एक मागणी होती. पोलीस आणि शीघ्र कृती दलाने त्यांना पंजाब आणि हरयाणामधल्या शंभू सीमेवर अडवलं. त्यांनी पुढे जाऊ नये म्हणून वाटेत बॅरिकेड उभे केले होते. जेव्हा शेतकऱ्यांनी पुढे कूच करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबरी छर्ऱ्यांचा मारा करण्यात आला. (वाचा ‘शंभू सीमेवर मला कैदेत टाकल्यासारखं वाटतंय’ )
अश्रुधुराचा भयानक वास येत असूनही देवेंदरचे मित्र
त्याला उचलायला वेगाने पुढे झाले. त्याच्या डोळ्यातून खूप रक्त वहात होतं. त्यांनी
त्या बाविशीच्या तरुणाला तिथून २० किलोमीटर वर असलेल्या बाणूर इथल्या सरकारी इस्पितळात
अँब्युलन्समधून नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला चंदीगडच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि
हॉस्पिटलमधे पाठवलं. १५ फेब्रुवारीला त्याच्या डोळ्याचं ऑपेरेशन झालं. त्याच्या डाव्या
डोळ्याला दृष्टी येण्याची शक्यता फारच कमी आहे असे डॉक्टर म्हणाले.
देवेंदरचे वडील मनजित सिंग म्हणतात की त्यांच्या
मुलाने परदेशी जाण्याची संधी आली असूनही तिथे न जायचे ठरवलं होतं. इथे राहून तो पोलिसात
भरती होण्याची तयारी करत होता.


डावीकडेः देवेंदर सिंग भांगू शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी शंभू बॉर्डरवर गेला होता. तिथे पोहोचल्याच्या अर्ध्या तासातच पोलिसांनी आंदोलकांवर झाडलेली रबरी बुलेट त्याच्या डाव्या डोळ्यावर लागली आणि त्याला धावत हॉस्पिटलमधे न्यावं लागलं. उजवीकडेः त्याचे वडील मनजित सिंग म्हणाले की परदेशी जाण्याची आलेली संधी नाकारून तो पोलीस भरतीची तयारी करत होता


शंभू इथल्या ट्रॅक्टरवर उभारलेल्या तात्पुरत्या स्टेजकडे जाणारे शेतकरी. उजवीकडेः शेतकऱ्यांनी लावलेल्या एका पोस्टरवरचा संदेश – ‘आम्ही शेतकरी आहोत, आतंकवादी नाही’
पतियाळा जिल्ह्यातल्या शेभुपूर गावात देवेंदर सिंगच्या कुटुंबाची आठ एकर जमीन आहे. २०२०-२१ मधे दिल्लीच्या सीमेवर तीन अन्यायकारक शेती कायद्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात ते सहभागी होते. (वाचा - कृषी कायद्यांविरोधी आंदोलन - पूर्ण रिपोर्ट )
पंजाबच्या हद्दीत हरयाणा पोलीस रबरी छर्ऱे आणि अश्रूधूर कसा काय सोडू शकतात हे या शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे. “आम्ही स्वतःच्या राज्यात सुरक्षित नसलो तर कुठे सुरक्षित रहाणार?” ते विचारतात आणि सांगतात की शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी हल्ला केला. ते म्हणतात, “पंजाब सरकारने काहीतरी केले पाहिजे.”
गुरमीत सिंग हे एक शेतकरी नेते आहेत. ते म्हणतात की हा विषय त्यांनी पंजाब पोलीस आणि डेप्युटी कमिशनर यांच्या पुढेही मांडला होता. पंजाब पोलीस अंबाला पोलिसांशी बोलले आहेत असं त्यांना सांगण्यात आलं. पण अजूनही अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणं थांबलेलं नाही.
पाण्याचे जोरदार फवारे, अश्रूधूर आणि रबरी गोळ्यांमुळे आतापर्यंत आंदोलन करणारे
१०० शेतकरी जखमी झाले आहेत. तीन जणांना डोळे गमवावे लागले आहेत. आरोग्य मंत्र्यांनी
तर पोलिसांची ही कृती आंदोलकांवरचा “चिथावणी नसताना केलेला हल्ला” असल्याची टीका केली
आहे.
जरनेल सिंग हे तरन तारन जिल्ह्यातल्या धारीवाल
गावचे शेतकरी. १३ फेब्रुवारीला झालेल्या लाठी हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मार लागला.
पाच टाके पडले, तरीही ४४
वर्षीय जरनेल सिंग घरी परत जायला तयार नाहीत. ते म्हणतात, “ इथे असलेले सगळेच जण आंदोलन करत आहेत. मी माझ्या गावाला
घरी का जाऊ?”
डॉ मनदीप
सिंग हे आंदोलनाच्या ठिकाणी कॅम्प उभारून जखमींवर इलाज करत आहेत. ते सांगतात की आंदोलन
सुरु झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी निदान ४०० जणांना मलमपट्टी आणि दुखण्यावर इलाज
केले आहेत.


डावीकडेः आंदोलन करणारे शेतकरी त्यांची ट्रॉलीवरची घरे घेऊन आले आहेत. उजवीकडेः जरनेल सिंग यांना लाठीहल्ल्यामुळे डोक्यावर पाच टाके पडले. डॉ मनदीप सिंग त्यावर इलाज करत आहेत


डावीकडेः शेतकरी संघटनांनी वार्ताहरांना ओळखपत्र द्यायला सुरवात केली. समाजकंटक पत्रकारांना अडथळा आणत आहेत आणि हल्लेही करत आहेत. मध्यभागीः शेतकरी नेते रणजित सिंग राजू पत्रकारांच्या माहितीची नोंद करत आहेत आणि मदतीसाठी स्वयंसेवकांची माहिती देत आहेत. उजवीकडेः संघटनेने नेमलेले स्वयंसेवक पहारेकरी होऊन घातपातापासून पत्रकारांचे रक्षण करत आहेत
बलबीर सिंग हे पंजाबचे आरोग्य मंत्री डोळ्याचे डॉक्टर आहेत आणि प्रॅक्टिस करतात. आंदोलनाच्या ठिकाणी डोळ्यांना इजा झालेल्या शेतकऱ्यांवर इलाज करायला ते जातात. १४ फेब्रुवारीला त्यांनी जाहीर केलं की आंदोलन करताना ज्या शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले त्याचा सगळा खर्च पंजाब सरकार करेल
या ठिकाणी अनेक माध्यमांमधले पत्रकार इथे आंदोलनाची
माहिती घ्यायला आले आहेत. समाजकंटकांनी त्यातल्या बऱ्याच जणांवर हल्ले केल्यामुळे ते
जखमी झाले. पत्रकारांचे रक्षण व्हावे म्हणून शेतकरी युनियनने पहारेकरी म्हणून अनेक
स्वयंसेवक नेमले आहेत.
आंदोलनाची नोंद घ्यायला आलेल्या पत्रकारांना युनियन
मीडिया कार्डचे ओळखपत्र देत आहेत. शेतकरी नेते रणजित सिंग राजू म्हणतात की हे त्यांच्या
सुरक्षेसाठी केलं जातंय. या कार्डवर त्या पत्रकाराची माहिती नोंदवलेली असते आणि एखादा
शेतकरी नेता त्याची नोंद ठेवतो आणि त्याच्यावर सही करतो.
*****
शंभू बॉर्डरवर असलेले बहुतेक जण देविंदरसारखे २०२१-२२ च्या आंदोलनातही सहभागी झाले होते.
बाबा लाभ सिंग हे कारसेवा गटामधे आहेत. पूर्वी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु असताना त्यांनी
आपला भाऊ गमावला आहे. “माझा भाऊ अजिब सिंग तिथे न्यूमोनिया होऊन गेला. त्याची बायको
आधीच वारली होती. आता त्याची दोन्ही मुले अनाथ झाली आहेत.” १८ फेब्रुवारीला बॉर्डरवर
जमलेल्या आंदोलकांपुढे बोलताना ते सांगतात.
“निवडणुकीच्या वेळी हेच लोक आमच्यापुढे हात जोडून
येतात, आणि आम्ही आमच्या मागण्या
सांगायला येतो तेव्हा यांना ते ऐकायचे नसते.” ते पुढे असेही सांगतात की सरकारं येतात
आणि जातात पण लोकांना मात्र आपल्या मागण्यांसाठी भांडावं लागतं.


(डावीकडे) दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु असताना आपला भाऊ गमावलेले बाबा लाभ सिंग सभेत बोलताना. (उजवीकडे) हरभजन कौर (उजवीकडच्या) यांनी दोन दिवस प्रवास करून शंभू गाठलं. त्या म्हणतात, “माझा मुलगा मला इथे येऊ देत नव्हता, पण मी आग्रहच केला”

![Right: Like many of the protestors, the vehicles at Shambhu border were also a part of the 2020-21 protests. The quote on this tractor reads: 'Haar paawange, haar puaawange...Sun Dilliye, par haar ke nahi jawange' [Will honour you and will be honoured...Listen Delhi, but we will not return defeated/dishonoured]](/media/images/07b-IMG_2634-AA-If_we_are_not_safe_in_our_.max-1400x1120.jpg)
डावीकडेः पंजाबच्या हद्दीत हरयाणा सरकार गोळ्या आणि अश्रूधूर
कसा काय वापरू शकतं हे शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे आहे. ते विचारतात ‘आम्ही जर आमच्या
राज्यातही सुरक्षित नसू तर कुठे सुरक्षित असणार?’ शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस हल्ला करत आहेत असे
ते सांगतात. उजवीकडेः अनेक आंदोलकांप्रमाणे
त्यांचे ट्रॅक्टरसुद्धा २०२०-२१ च्या आंदोलनात सामील होते. या ट्रॅक्टरवर लिहिले आहे - (पंजाबीमध्ये)
हार पावांगे, हार पुवांगे... सुन दिल्ली, पर हार
कर नही जावांगे [आम्ही तुम्हाला मान देतोय, पण आम्हालाही
मान मिळाला पाहिजे, ऐक दिल्ली, आम्ही अपमान होऊन किंवा पराभूत
होऊन माघारी जाणार नाही]
दुर्गी ते हरदासपूर असा प्रवास करून आलेल्या बायकांच्या गटात हरभजन कौर आहेत. शंभू बॉर्डरला पोचण्यासाठी त्यांना दोन दिवस प्रवास करायला लागला. ७८ वर्षांच्या हरभजन बीबी सांगतात, “माझा मुलगा मला येऊ देत नव्हता. मी म्हणाले मी एकटी गावात राहून काय करू? काही वाईट झालंच तर सर्वात आधी मीच मरेन.”
२०२०-२१ च्या आंदोलनाच्या वेळी त्या दिल्ली बॉर्डरवर काही बायकांबरोबर राहिल्या होत्या.
आधीच्या आंदोलनातले लोकच नाहीतर वाहनेसुद्धा इथे दिसतात. शंभू बॉर्डरवरच्या एका ट्रॅक्टरवर लिहिले आहे - (पंजाबीमध्ये) हार पावांगे, हार पुवांगे . . सुन दिल्ली , पर हार कर नही जावांगे [आम्ही तुम्हाला मान देतोय, पण आम्हालाही मान मिळाला पाहिजे, ऐक दिल्ली आम्ही अपमान होऊन किंवा पराभाव होऊन माघारी जाणार नाही.]
एका गाडीवर लिहिलंय “जादो पता होवे सिने या च चहक होंगे, ओडो दो जंग जानेवाले बंदे आम नही यो होंदे [छातीत गोळीने भोक पडणार आहे हे जेव्हा माहित असतं, तेव्हा लढाईवर जाणारे कोणी सामान्य नसतात.]
१८ फेब्रुवारी रविवार या दिवशी शेतकरी नेत्यांनी ‘दिल्ली चलो मोर्चा’ तात्पुरता थांबवला. या दिवशी संध्याकाळी केंद्रीय मंत्र्यांनी किमान हमीभावाचा एक नवीन प्रस्ताव समोर ठेवला. शेतकऱ्यांनी त्यावर विचार केला, तो प्रस्ताव फेटाळून लावला आणि २१ फेब्रुवारी पासून आंदोलन पुढे नेण्याचं ठरवलं.

कॉंक्रिटच्या बॅरिकेडवर हरयाणाकडे तोंड करून आंदोलक बसले
आहेत

बॉर्डरपासून १०० मित्र अंतरावर एक शेतकरी गुरुबानी (शीख
लोकांचे भजन) म्हणताना

बॅरिकेडच्या समोर आंदोलक ‘सतनाम वाहे गुरु’ चा जप करताना

एक वयस्कर शेतकरी आंदोलक त्यांच्या संघटनेचा झेंडा घेऊन बसले आहेत

दोन वयस्कर शेतकरी सभेतली भाषणे ऐकताना झेंड्याच्या काठ्यांचा
आधार घेत आहेत

घग्गर नदीच्या तीरावर आंदोलक आणि फोर्सचे लोक एकमेकांच्या
समोर बसले आहेत

शंभू बॉर्डरवर हरयाणा पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या हल्ल्याला सामोरे जाताना शेतकरी आंदोलक

बॅरिकेडसमोर पडलेले दगड आणि विटांचे तुकडे