दररोज सकाळी आकिफ एस के हॅस्टिंग्जमधल्या पुलाखालच्या आपल्या तात्पुरत्या झोपडीवजा घरातून निघतो आणि कोलकात्यातल्या पर्यटकांची वर्दळ असलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियलला जातो.
वाटेत तो राणी आणि बिजलीला सोबत
घेतो. या दोन पांढऱ्या शुभ्र घोड्या म्हणजे त्याच्या पोटापाण्याचा आधार. “आमि
गाड़ी चालाई [मी टांगा चालवतो],” आकिफ म्हणतो. हॅस्टिंग्जमध्ये या दोघींना एका
तबेल्यात ठेवतो आणि सकाळी १० च्या सुमारास त्यांना व्हिक्टोरियाला घेऊन येतो.
कोलकात्याच्या मध्यवर्ती भागातली ही संगमरवरी इमारत आणि खुल्या मैदानांचा भाग याच
नावाने ओळखला जातो. इंग्रज सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ उभारलेली
ही इमारत १९२१ साली सामान्यांसाठी खुली करण्यात आली.
आकिफ हा टांगा भाड्याने चालवतो.
व्हिक्टोरिया मेमोरियलजवळच्या क्वीन्स वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर तो
टांगा उभा करतो. दहा टांग्यांमधल्या आपल्या टांग्याकडे बोट दाखवत तो म्हणतो, “तो
सोनेरीवाला माझा.” खरं तर इथल्या जवळपास सगळ्याच टांग्यांचा रंग एकसारखा आहे.
त्यावरची फुला-फुलांची नक्षी आणि पक्षी देखील सारखेच. सगळे टांगे
राजेरजवाड्यांच्या मेण्यांसारखे दिसतात. पण आकिफचा टांगा त्यातही उठून दिसतो. रोज
सकाळी दोन तास तो टांगा साफ करतो, त्याला चकाचक पॉलिश करतो. लोकांना इंग्रज
राजवटीतल्या राजेशाही आयुष्याची झलक मिळायला पाहिजे ना.
तिथे रस्त्याच्या पलिकडे
व्हिक्टोरिया मेमोरियलच्या प्रवेशद्वारापाशी लोकांची गर्दी गोळा व्हायला लागलीये.
“पूर्वीच्या काळी इथे राजेरजवाडे रहायचे आणि ते आपापल्या टांग्यांमधून,
बग्ग्यांमधून फिरायचे. आता इथे व्हिक्टोरिया पहायला पर्यटक येतात आणि त्या काळाचा
अनुभव घेऊ पाहतात,” आकिफ सांगतो. २०१७ सालापासून तो टांगा चालवतोय. तो पुढे
म्हणतो, “जोपर्यंत व्हिक्टोरिया [स्मारक] आहे तोपर्यंत इथले घोड्याचे टांगे कुठे
जात नाहीत.” आणि त्याच्यासारख्या टांगाचालकांचं कामही. या भागात सध्या किमान ५०
टांगे फिरत असतात.


डावीकडेः आकिफचा मदतनीस साहिल घोड्यांना खाऊ घालतोय. उजवीकडेः आकिफनेच या घोड्यांची नावं राणी आणि बिजली ठेवली असून त्या टांगा ओढतात
सध्या हिवाळा आहे पण कोलकात्याची हवा ऊबदार व्हायला लागली की इथले रहिवासी आता पर्यटनासाठी बाहेर पडू लागतील. खास करून संध्याकाळी आकिफची चांगलीच लगबग असते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हाच खरा पर्यटनाचा हंगाम असतो त्यानंतर हवा तापायला लागते आणि फारच कमी लोक घराबाहेर पडतात. स्मारकासमोरच्या बाजूस असलेल्या चहा आणि खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांजवळ आम्ही बसलो होतो. अनेक पर्यटक आणि टांगाचालक सुद्धा इथे पटकन काही तरी खायला येतात.
राणी आणि बिजली आमच्यापासून थोड्या
अंतरावर उभ्या आहेत. त्याही त्यांचा नाश्ता करतायत आणि अधून मधून मानेवरचे केस
थिरकवतात. गोमेर भुशी [गव्हाचा भुस्सा], बिचली, दाना [धान्य] आणि घाश [गवत] हा
त्यांचा आवडता खाऊ. त्यांचं पोट भरलं आणि हा आधुनिक रथ सज्ज झाला की त्यांचं काम
सुरू होणार. घोड्यांचा खरारा आणि टांग्याची साफसफाई हे टांगाचालकाच्या कामाचा कणा
आहे. “एक घोडा पाळायचा तर दररोज ५०० रुपयांचा खर्च येतो,” आकिफ सांगतो. धान्य आणि
चारा तर असतोच पण बिचली म्हणजे भाताचा पेंढाही खाऊ घालतात. किद्दरपोरजवळच्या
वाटगुंगे इथल्या दुकानातून पेंढा आणला जातो.
आकिफचा स्वतःचा डबा दुपारी येतो.
त्याची बहीण त्याच्यासाठी स्वयंपाक करून डबा भरून पाठवते.
आम्ही आकिफला सकाळी भेटलो तेव्हा
लोकांची वर्दळ सुरू व्हायची होती. मधूनच पर्यटकांचा एखादा गट टांग्यांपाशी येतो
आणि मग सगळे टांगेवाले घोळका करतात. प्रत्येकालाच बोहनी करायची असते.


डावीकडेः व्हिक्टोरिया मेमोरियलसमोरच्या टपऱ्यांवरच्या एकीवर कॉफीसाठी थांबलेला आकिफ. उजवीकडेः पर्यटकांच्या प्रतीक्षेत उभा असलेला टांगा
“कधी कधी दिवसातून तीन-चार फेऱ्या मिळतात. तो दिवस चांगला म्हणायचा,” आकिफ सांगतो. तो रात्री ९ वाजेपर्यंत काम करतो. एक रपेट १०-१५ मिनिटांची असते. व्हिक्टोरिया स्मारकाच्या प्रवेशद्वारापासून सुरू होऊन रेस कोर्स पार करून फोर्ट विल्यमच्या दक्षिणेकडच्या दरवाजापासून वळतात. एक रपेट म्हणजे ५०० रुपये.
“शेकड्यातले पंचवीस रुपये मला
मिळतात,” आकिफ सांगतो. बाकी पैसा घोड्यांच्या मालकाचा. नशीब चांगलं असेल तर
एखाद्या दिवशी टांग्याची २,००० -३,००० रुपयांची कमाई होते.
अर्थात टांग्यातून इतर कमाई पण होते.
“लग्नाच्या वरातीत जर टांगा लावला” तर मग जास्तीचे चार पैसे मिळतात. वरात किती
लांब जाणार त्यावर नवऱ्याच्या टांग्याचा दर ठरतो. शहरातल्या शहरात ५,००० ते ६,०००
आकारले जातात.
“आमचं काम म्हणजे नवरदेवाला
लग्नाच्या ठिकाणी घेऊन जाणे. एकदा त्याला सोडलं की आम्ही घोडा आणि टांगा घेऊन परत
येतो,” आकिफ सांगतो. कधी कधी ते टांगा घेऊन कोलकात्याच्या बाहेरही जातात त्यामुळे
आकिफ आपला टांगा घेऊन मेदिनीपूर आणि खरगपूरला जाऊन आला आहे. “मी हायवेवर सलग
दोन-तीन तास माझा टांगा चालवत होतो,” तो म्हणतो. “थकायला झालं की जरा थांबायचं. ”
“सिनेमाच्या शूटिंगसाठी सुद्धा टांगे भाड्यावर घेतात,” आकिफ सांगतो. काही वर्षांपूर्वी तो एका बंगाली मालिकेच्या शूटिंगसाठी १६० किलोमीटर प्रवास करत बोलपूरला गेला होता. पण लग्नाची वरात असो किंवा सिनेमाचं शूटिंग हे काही नियमित कमाईचे स्रोत नाहीत. जेव्हा टांग्याचं काम नरम असतं तेव्हा त्याला पोटापाण्यासाठी दुसरी कामं शोधावीच लागतात.


डावीकडेः ‘एका घोड्याची काळजी घ्यायची तर ५०० रुपये खर्च येतो,’ आकिफ सांगतो. उजवीकडेः घोड्यांना खाऊ घालणं आणि त्यांचा खरारा हा त्याच्या कामाचा कणा आहे

आकिफ इथे आल्यावर टांग्याची साफसफाई करून तो चकाचक करतो. टांग्याची एक रपेट म्हणजे ५०० रुपयांची कमाई
आकिफकडे ऑक्टोबर महिन्यापासून या दोन घोड्या आहेत. “मी हे काम सुरू केलं तेव्हा मी माझ्या मेहुण्याचे घोडे घेऊन अर्धा वेळ काम करायचो,” २२ वर्षांचा आकिफ सांगतो. मग काही काळ आकिफने दुसऱ्या कुणासोबत तरी काम केलं आणि आता परत तो त्याच्या बहिणीच्या मालकीच्या टांग्यावर काम करतोय.
इथल्या अनेक कामगारांसाठी घोड्यांची
काळजी किंवा टांगा चालवणं हे पूर्ण वेळाचं काम नाही. आकिफसाठीही.
“मी घराचं रंगकाम कसं करायचो ते
शिकलोय आणि बडाबझारमधे एका मित्राच्या कपड्याच्या दुकानातही काम करतो,” आकिफ
सांगतो. “माझे वडील रोंग-मिस्त्री [घराला रंग देणारे] होते. ते १९९८ साली
कोलकात्याला आले. माझा जन्मही झाला नव्हता.” त्या आधी ते बरसातमध्ये रहायचे. तिथे
ते भाजी विकायचे. शहरात
गेल्यावर जरा बरे दिवस येतील या आशेने आकिफचे आईवडील गाव सोडून इथे आले. त्याची
आत्या लग्न होऊन कोलकात्याला रहायला आली होती. “माझ्या आत्यानेच मला लहानाचं मोठं
केलं कारण तिला मूलबाळ नव्हतं,” आकिफ सांगतो. त्याचे वडील अलाउद्दिन शेख आणि आई
सईदा आता परत नॉर्थ परगणा जिल्ह्यातल्या बरसातला आपल्या पिढीजात घरी रहायला गेले
आहेत. अलाउद्दिन तिथे सौंदर्यप्रसाधनं इत्यादींचं एक छोटं दुकान चालवतात.
आकिफ सध्या एकटाच राहतो. त्याचा धाकटा भाऊ त्यांच्या बहिणीसोबत राहतो आणि
तिच्या सासरच्यांचा टांगा कधी कधी चालवतो.


‘पूर्वीच्या काळी इथे राजेरजवाडे रहायचे आणि ते आपापल्या टांग्यांमधून, बग्ग्यांमधून फिरायचे. आता इथे व्हिक्टोरिया पहायला पर्यटक येतात आणि त्या काळाचा अनुभव घेऊ पाहतात,’ आकिफ सांगतो
टांगाचालकांच्या अनेक समस्या आहेत. पुरेसं कामच नाही ही त्यातली फक्त एक. त्याला अनेकांचे हात ओले करावे लागतात. “दररोज ५० रुपये तर द्यावेच लागतात,” आकिफ सांगतो. घोड्यांच्या टांग्यांवर बंदी आणण्यासाठी पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेबद्दल त्याचं काय मत आहे असं विचारताच तो म्हणतो, “दर महिन्यात कुणी ना कुणी येतं आणि आम्हाला घोड्यांचं काम बंद करायचे सल्ले देतं. ‘तुम्हीच सगळे टांगे विकत घेऊन टाका आणि आम्हाला पैसे द्या, कसं?’ आम्ही त्यांना विचारतो. या घोड्यांच्या जिवावर आमचा प्रपंच सुरू आहे.”
पेटाच्या याचिकेमध्ये घोड्यांच्या
जागी विजेवर चालणारे टांगे वापरले जावेत अशीही मागणी केलेली आहे. “घोडेच नसतील तर तुम्ही
तिला घोडागाडी कसं काय म्हणणार?” हसत हसत आकिफ खासा सवाल करतो.
“आता काही जण आहेत जे त्यांच्या
घोड्यांची काळजी घेत नाहीत,” आकिफ मान्य करतो. “पण मी घेतो. नुसतं पाहिलंत तर
तुम्हाला दिसेल की त्यांची एकदम नीट बडदास्त ठेवली जातीये!”