“या ओटीपीची लई भीती वाटते बघा! सहा आकडे आणि पैसा गायब,” एसटी स्टँडच्या गोंगाटात अनिल ठोंबरे मला सांगतात. येणाऱ्या जाणाऱ्या बसचे आवाज, पाणी आणि खायचे पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांचे आवाज, कंट्रोल रुमचे पुकारे अशा सगळ्या आवाजात ठोंबरे काकांच्या फोनवर ओटीपी आला आणि त्यासाठी त्यांनी माझी मदत मागितली.
त्यांनी बजेटबद्दल थोडं काही तरी ऐकलंय. अर्थसंकल्प हा शब्द त्यांच्या परिचयाचा आहे. “३१ जानेवारीला रेडिओवर काही तरी बातमी होती. कसंय, सरकार प्रत्येक विभागासाठी काही तरी तरतूद करतं. मला माहीत आहे. सगळं नाही तरी रुपयात दहा पैसे तर नक्कीच!” अडकित्त्याने सुपारी कातरत ठोंबरे काका मला सांगतात.
या गोंगाटापासून दूर शांत ठिकाण म्हणजे एसटी कँटीन. तिथे जाण्यासाठी ते, खरं तर त्यांच्या हातातली लाल पांढरी काठी वाट काढत पुढे जाते. ठोंबरे काका दृष्टीहीन आहेत. पण या एसटीस्टँडवरचे सगळे फलाट, इथली गर्दी, कँटीनचा काउंटर आणि आतल्या पायऱ्या असं सगळं काही त्यांच्या चांगलंच परिचयाचं आहे. “मी एक महिन्याचा असताना गोवर फुटला आणि त्यात माझे डोळे गेले असं सांगतात,” काका सांगतात.

बजेटमध्ये अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींकडे थोडं जास्त लक्ष दिलं जावं अशी बारुळ गावचे रहिवासी असलेल्या अनिल ठोंबरे यांची अपेक्षा आहे
तुळजापूरहून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बारुळमध्ये काका राहतात. एका भजनी मंडळात ५५ वर्षांचे ठोंबरे काका तबला, पखवाज आणि पेटी वाजवतात. त्यातनं काही पैसे मिळतात आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींना मिळणारा १००० रुपये पगार त्यांना मिळतो. “कधीही वेळवर होत नाहीत पगारी.” तो काढण्यासाठी त्यांना तुळजापूरला बँकेत यावं लागतं. अलिकडेच त्यांना पंचायतीने प्रधानमंत्री आवास योजनेखाली घरकुल मंजूर केलंय. “त्यासाठी सुद्धा पहिला हप्ता बँकेत पडावा लागतो ना. आणि त्यासाठी पण केवायसी का काय करावी लागते,” काका सांगतात.
आज ते तुळजापुरात धुलाई केंद्रात टाकलेले कपडे घ्यायला आले आहेत. बारुळच्या त्यांचा एका मित्र ही सेवा देतो. “मी एकटा माणूस. घरचं सगळं काम मीच करतो. पाणी भरतो. डाळ भात करून खातो. पण कपडे धुवायची लई परेशानी व्हायला लागलीये. कंटाळून गेलो,” काका अगदी हसत हसत सांगतात.
“माय-बाप सरकार आहे. त्यांनी सगळ्यांचाच विचार करावा. पण मला विचाराल तर आमच्यासारख्या अपंगांकडे सरकारने थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे.”
केंद्र सरकारच्या २०२५ इंग्रजी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘डिसेबिलिटी’, ‘दिव्यांगजन’ किंवा ‘पर्सन विथ डिसेबिलिटी’ यातला एकही शब्द, एकदाही आलेला नाही हे ठोंबरे काकांना कुठे माहीत आहे?