तिला पळता येतं आणि त्यांना पळायला शिकवता येतं.
मग काय? जयंत तांडेकरांनी आठ वर्षांच्या ऊर्वशीला पळण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी चक्क आपल्या घरी ठेवून घेतलं.
आपलं स्वप्न आता आपल्या या शिष्येच्या पावलांमधून साकार व्हावं यासाठीच त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत.
तर अगदी दुर्गम गावातली एक छोटीशी मुलगी, तिचे आईवडील आणि खिसा छोटा पण मोठी स्वप्नं डोळ्यात असणारा एक प्रशिक्षक यांची ही गोष्ट.
दोन वर्षांपूर्वी, वयाच्या आठव्या वर्षी ऊर्वशी तांडेकर सरांच्या घरी रहायला आली. भंडारा शहराच्या वेशीवरच त्यांचं दोन खोल्यांचं भाड्याचं घर आहे. आपलं थोडं फार सामान घेऊन ही चिमुकली सरांकडे आली. ऊर्वशीच्या आई-वडलांकडे पैसा नाहीच. भंडारा शहरापासून २५ किलोमीटरवर असलेल्या दव्वा गावी ते राहतात. ऊर्वशीच्या स्वप्नांना काही आकार यायचा असेल तर तांडेकर सरांवर आणि ऊर्वशीसाठी ते बघत असलेल्या स्वप्नांवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे असं तिच्या आईने, माधुरी ताईने मनाशी ठरवलं.


डावीकडेः जयंत तांडेकर आणि ऊर्वशी. उजवीकडेः ऊर्वशीचे आई-वडील माधुरी आणि अजय निंबार्ते भंडारा शहराजवळच्या दव्वा गावी असलेल्या आपल्या घरी
माधुरी ताई बारीक चणीच्या. आपल्या मुलांनी आयुष्यात चांगलं काही तरी करावं हे त्यांनी ठामपणे ठरवलंय. ऊर्वशीचे वडील अजय शेती करतात आणि जवळच्याच कुठल्या तरी कारखान्यात मजुरीला जातात.
“ती आमच्याजवळ राहिली ना, दहा वर्षांत तिची हालत माझ्यासारखी होऊन जाईल – लग्न करायचं, पोराबाळांचं बघायचं, शेतात राबायचं आणि एक दिवस मरून जायचं,” माधुरीताई मला सांगतात. गावातल्या आपल्या घरी त्या माझ्याशी बोलत होत्या. सोबत त्यांचे पती आणि सासरे होते. “माझ्या लेकीसोबत हेच सगळं व्हावं हा विचार काही मला सहनन होत नव्हता,” त्या म्हणतात.
ऊर्वशी तांडेकर सरांना मामा म्हणते. ऊर्वशीला ते प्रशिक्षणासाठी आपल्यासोबत घेऊन गेले तेव्हा त्यांचं वय होतं ३५ वर्षं. लग्न व्हायचं होतं.
तांडेकर दलित आहेत. जातीने चांभार. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातनं उत्तमोत्तम खेळाडू, धावपटू तयार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. इथल्या तरुण मुला-मुलींसाठी त्यांना एक गोष्ट करायचीये. जी त्यांना स्वतःला कधीच करता आली नाही. मैदानातल्या ट्रॅकवर सुसाट धावण्याची संधी.
ऊर्वशी जातीने कुणबी (इतर मागासवर्गीय). पण तिच्या आई-वडलांनी समाजाने लादलेल्या जातीच्या आणि पितृसत्तेच्या भिंती भेदण्याचा निश्चय केला होता. आणि मग ऊर्वशी तांडेकर सरांसोबत भंडाऱ्याला आली.
२०२४ च्या उन्हाळ्यात भंडाऱ्याच्या शिवाजी स्टेडियममध्ये माझी तांडेकर सरांशी भेट झाली. “ऊर्वशी एकदम स्पेशल आहे,” ते म्हणाले होते. भंडाऱ्यात ते चालवत असलेल्या प्रशिक्षण अकादमीचं नाव आहे अनाथ पिंडक – अनाथांचा आश्रयदाता. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या जवळपास ५० आबालवृद्ध विद्यार्थ्यांचा खर्च उचलण्यासाठी ते लोकांकडून मिळेल तशी देणगी घेतात. तरीही कसाबसाच खर्च भागतो. लहान चणीचे, गोल चेहरा आणि भेदक डोळे असणारे तांडेकर सर आपल्या विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाण्याचा सल्ला देत असतात.


डावीकडेः ऊर्वशी भंडाऱ्याच्या शिवाजी स्टेडियममध्ये. उजवीकडेः तांडेकर सरांच्या अनाथ पिंडक अकादमीतल्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा ऊर्वशी जास्त मेहनत घेते


डावीकडेः ऊर्वशीला उत्तम प्रशिक्षण मिळावं यासाठी तांडेकर सर तिला भंडाऱ्याला आपल्या घरी रहायला घेऊन आले. उजवीकडेः भंडाऱ्याच्या शिवाजी स्टेडियममध्ये सरावाचा भाग म्हणून तरुण धावपटू अनवाणी धावतात
दररोज सकाळी, ते ऊर्वशीला अगदी पहाटे मैदानात घेऊन येतात आणि इतर मुलं येण्याआधी तिचा जादा सराव करून घेतात. बाकीच्या मुलांबरोबर ती नियमित सराव करतेच.
ट्रॅकसूटमध्ये ऊर्वशीचं एकदम वेगळंच रुप आपल्याला दिसतं. धावण्यासाठी अगदी आतुर, खडतर सरावासाठी सज्ज आणि उत्साहाने ओसंडून वाहणारी छोटी धावपटू होऊन जाते ती. आणि तिला मार्गदर्शन करणारे सर आणि मामा तिच्या सदैव पाठीशी असतातच. अजून तिला पुढचा फार मोठा पल्ला गाठायचाय. आता कुठे ती शालेय स्पर्धांमध्ये उतरायला लागलीये. त्यानंतर तांडेकर सर तिला जिल्हास्तरावरच्या स्पर्धांमध्ये पाठवतील आणि त्यानंतर राज्य आणि मग राष्ट्रीय पातळीवर.
ग्रामीण भागातल्या मुलांनी काहीही होवो, स्पर्धेत उतरायलाच पाहिजे असं तांडेकरांचं अगदी ठाम मत आहे. पी टी उषासारख्या इतर अनेक धावपटूंची उदाहरणं देऊन ते मुलांना प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे आपण सराव केला, कष्ट घेतले आणि मोठी स्वप्नं पाहिली तर आपणही मोठं काही करू शकतो हा विश्वास त्यांच्या विद्यार्थ्यांमध्येही दिसून येतो.
तांडेकर सर आपल्या स्वतःचा सगळा प्रवास आठवतात आणि त्यातून धडे घेऊन ऊर्वशीचा आहार आणि पोषणाकडे विशेष लक्ष देतात. त्यांना स्वतःला दूध आणि अंडीसुद्धा नियमित खायला मिळाली नाहीत. पण ऊर्वशीसाठी ते सगळं करतात. योग्य प्रमाणात प्रथिनं, कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ तिच्या आहारात असतील याची काळजी घेतात. त्यांची बहीण भंडाऱ्यातच राहते आणि हंगामात जे मासे मिळतील ते घेऊन येते. ऊर्वशीची आईसुद्धा येऊन जाऊन आपल्या लेकीचं सगळं नीट आहे ना ते पाहून जाते. तिची शाळा आणि इतर नियमित जे काही कामं असतात त्यासाठी तिला मदत करते.
आपल्या या विद्यार्थीनीला चांगले बूट मिळावेत यासाठीही तांडेकर सर प्रयत्नशील असतात. त्यांचे वडील भूमीहीन मजूर होते. त्यामुळे सगळ्याच गरजा कशाबशा भागवल्या जायच्या. त्यात त्यांना दारूचं प्रचंड व्यसन होतं. त्यामुळे जे काही चार पैसे हातात यायचे तेही बाटलीत बुडून जायचे. अनेकदा ते आणि त्यांची बहीण उपाशी पोटी झोपी जायची.
“ट्रॅकवर धावण्याचं माझंही स्वप्न होतं.” त्यांच्या हसण्यातला खेद लपत नाही. “पण शक्यच नव्हतं.”


ऊर्वशीचे प्रशिक्षक तांडेकर सर तिचा आहार आणि पोषण यावर विशेष भर देतात. तिच्या आहारात दूध, अंडी असतील आणि आवश्यक ती प्रथिनं, कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ तिच्या जेवणात असतील याकडे त्यांचं लक्ष असतं
ऊर्वशी आणि तिच्यासारख्या कुणालाही जर हे शक्य करून दाखवायचं असेल तर आपल्याला जे काही शक्य आहे ते सगळं करावं लागणार हे तांडेकर सरांना माहीत आहे. सकस आहार, चांगल्या दर्जाचे बूट आणि मोठ्या लोकांच्या ओळखी गरजे
आणि हे करायचं असेल तर चांगल्या शाळांमध्ये शिकायला पाहिजे आणि तगडी स्पर्धाही द्यायला पाहिजे.
आणि अर्थातच काही इजा किंवा दुखापती झाल्या तर त्यासाठी आवश्यक उपचारही लागतात. कधी पाय मुरगळतो, एखादा स्नायू ताठतो आणि वाढत्या वयाची मुलं असल्यामुळे त्यांच्या वाढीच्या वयात होणारे बदल आणि अंगदुखीही त्यात आली.
“कठीण आहेच, पण किमान माझ्या विद्यार्थ्यांनी मी मोठी स्वप्नं तरी पहायला शिकवीन ना!” तांडेकर म्हणतात.