जूनचा महिना आणि त्यानंतरचे पावसाळ्याचे महिने म्हणजे सुनंदा सुपेंच्या पोटात गोळा येतो. याच काळात मोठ्या शंखांसारख्या दिसणाऱ्या मोठ्या गोगलगायी दारकवाडीतल्या त्यांच्या एकरभर शेतात नुसता उच्छाद मांडतात.
“काही पण पेरा, त्या खातात – साळी, सोयाबीन, भुईमूग, काळा घेवडा, राजमा, काही पण,” त्या सांगतात. फळं पण सोडत नाहीत. आंबा, चिक्कू, पपई आणि पेरूसुद्धा त्यांच्या तडाख्यातून वाचत नाहीत. “हजाराच्या संख्येत दिसतात त्या गोगलगायी,” ४२ वर्षीय सुनंदाताई सांगतात. त्या शेती करतात.
सुनंदाताई महादेव कोळी आहेत आणि या समाजाची नोंद महाराष्ट्रात आदिवासी म्हणून केली आहे. त्या चासकमान धरणाशेजारीच आपली आई आणि भावासोबत राहतात. त्यांचं घर धरणाच्या अल्याड तर शेत पल्याड आहे. त्यामुळे त्यांना शेतात जायचं तर नावेने जायला लागतं. यायला-जायला प्रत्येकी अर्धा तास लागतो.
या गोगलगायींना इंग्रजीत जायंट आफ्रिकन स्नेल ( Achatina fulica ) असं म्हणतात. भारतात त्यांचा समावेश आक्रमक प्रजातींमध्ये केला जातो असं ग्लोबल इनव्हेजिव्ह स्पीशीज डेटाबेस नमूद करतो. ते विविध प्रकारच्या पिकांचा फडशा पाडतात. पावसाळ्यामध्ये जून ते सप्टेंबर या काळात या मोठ्या गोगलगायी तिवई डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेतांवर हल्ला करतात. त्या कधी कधी सप्टेंबरनंतरसुद्धा शेतात राहतात. २०२२ साली सुनंदाताईंची भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की गेल्या तीन वर्षांपासून त्यांना गोगलगायींचा त्रास सहन करावा लागतोय.


पुणे जिल्ह्यातल्या दारकवाडीमध्ये शेती करणाऱ्या सुनंदा सुपे (डावीकडे) सांगतात की त्यांच्या शेतात (उजवीकडे) मोठ्या गोगलगायींनी उच्छाद मांडलाय


सुनंदा सुपेंच्या शेतात पपईच्या खोडावर चढलेल्या मोठ्या गोगलगायी (डावीकडे) आणि आंब्याच्या कोवळ्या रोपावर (उजवीकडे). त्या म्हणतात, ‘गोगलगायींनी सगळं खाऊन टाकलं’
“त्या इथे यायची सुरुवात कशी झाली ते काही मला सांगता येणार नाही,” नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. राहुल घाडगे म्हणतात. “एक गोगलगाय दिवसभरात एक किलोमीटर अंतर पार करते आणि अंड्यांमधून त्यांचं प्रजनन होतं,” ते सांगतात. त्यांच्या निरीक्षणानुसार त्या जानेवारी महिन्यात निद्रावस्थेत जातात आणि हवेत ऊब यायला लागली की आपल्या कवचातून बाहेर येतात. कारण ऊब मिळाली की “शरीराचं तापमान जिवंत राहण्यासाठी आवश्यक पातळीला येतं,” ते सांगतात.
“मी या वेळी काळा घेवडा आणि राजमा लावला होता. गोगलगायींनी सगळं खाऊन टाकलं,” सुनंदाताई सांगतात. “५० किलो तरी माल झाला असता. फक्त एक किलो हाती लागलाय.” राजम्याला १०० रु. किलो भाव आहे. काळा घेवडाही गेला आणि भुईमूगही. नुसत्या भुईमुगाचंच १०,००० रुपयांचं नुकसान झाल्याचं सुनंदाताई सांगतात.
“आम्ही दोन पिकं घेतो. पावसाळ्यात खरीप आणि हिवाळ्यात रबी,” त्या सांगतात. गेल्या वर्षी इतक्या प्रचंड संख्येने गोगलगायी आल्या की पावसाळ्यात त्यांना दोन महिने रान पडीक ठेवावं लागलं होतं. “शेवटी डिसेंबरमध्ये आम्ही गहू, हरबरं, भुईमूग आणि कांदा लावला,” त्या सांगतात.
डॉ. घाडगेंच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातल्या पाच ते दहा टक्के शेतीक्षेत्रावर गोगलगायींनी उच्छाद मांडला आहे. “त्यांना रोपाची कोवळी देठं खायला आवडतं आणि नुकसानही जास्त होतं. शेतकऱ्यांना यामुळे फार मोठा तोटा सहन करावा लागतोय.”


नीतीन लगड दारकवाडीतल्या आपल्या साडेपाच एकर रानात. गोगलगायींच्या त्रासामुळे त्यांना चार महिने आपलं राम पडक ठेवावं लागलं आहे


डावीकडेः नीतीन यांना कांदा लावलाय पण गोगलगायींचा त्रास सुरूच आहे. उजवीकडेः गोगलगायीची अंडी
३५ वर्षीय नीतीन लगड दारकवाडीत शेती करतात. त्यांनाही दर वर्षी अशाच संकटाला सामोरं जावं लागतं. “या वर्षी ७०-८० कट्टे सोयाबीन होईल असं वाटलं होतं पण फक्त ४० कट्टे माल झाला.”
ते त्यांच्या साडेपाच एकर रानात तिबार पिकं घेतात. या वेळी गोगलगायींचा त्रास इतका जास्त होता की त्यांना दुसरं पीक घेताच आलं नाही. “चार महिने आम्ही रान पडक ठेवलं. आता कांदा लावलाय पण सगळा जुगार आहे,” ते म्हणतात.
गोगलगायींना मारणारी कृषी रसायनं फार प्रभावी ठरत नाहीत. “आम्ही मातीत औषध टाकून पाहिलं पण गोगलगायी जमिनीच्या खाली राहतात त्यामुळे औषधं वाया जातात. त्यांना पकडून त्यांच्या अंगावर औषध मारलं तर ते कवचाच्या आत जातं,” नीतीनभाऊ सांगतात. “औषधाचा काहीही फायदा नाही.”


डावीकडेः सुनंदा सुपेंच्या शेताजवळच्या गोगलगायी. उजवीकडेः गोगलगायी मराव्यात यासाठी त्या गोळा करून ड्रममध्ये मिठाच्या पाण्यात टाकतात, मेलेल्या गोगलगायींचे शंख
नाइलाज म्हणून दारकवाडीतले शेतकरी हातानेच या गोगलगायी गोळी करतात. हातमोज्यासारख्या प्लास्टिकच्या पिशव्या घालून ते गोगलगायी धरतात आणि मिठाच्या पाण्यात टाकतात. त्यात त्या मरतात.
“आत टाकलं तरी त्या बाहेर येतात. त्यांना आत ढकलावं लागतं. पाच पाच वेळा आत ढकलल्यावर त्या मेल्या,” सुनंदाताई सांगतात.
नीतीन यांनी आपल्या मित्रांबरोबर साडेपाच एकर रानातून ४००-५०० गोगलगायी पकडल्या. कांद्याची लागवड करण्याआधी त्यांनी सगळं रान साफ केलं, गोगलगायींचं नामोनिशाण राहू नये म्हणून सगळ्या गोगलगायी वेचून काढून टाकल्या. तरीही त्या दिसायला लागल्या आहेत. नीतीन यांच्या मते त्यांच्या रानातला ५० टक्के माल गोगलगायींनी खाऊन टाकला आहे.
“आम्ही एका दिवसात शेकड्याने गोगलगायी पकडतो. रान साफ करतो. पण दुसऱ्या दिवशी तिथे गोगलगायी पुन्हा हजर,” सुनंदाताई सांगतात.
“जून महिन्यात गोगलगायी यायला लागतील,” त्या म्हणतात. त्यांच्या आवाजातली भीती लपत नाही.