बांधकामावर काम करणारे तीन कामगार मारीला आपल्या घरी परतत होते. “पंधरा वर्षं झाली,” त्यांच्यातला एक, अजय पासवान सांगतो. “वाटेत एक सुनसान मस्जिद होती. वाटलं, आत जाऊन पहायला पाहिजे. खूप उत्सुकता होती.”
जमिनीवर शेवाळं चढलं होतं आणि सगळीकडे
झाडोरा वाढला होता.
“अंदर गये तो हम लोगों का मन बदल
गया,” रोजंदारीवर काम करणारा ३३ वर्षीय अजय सांगतो. “कुणास ठाऊक, अल्लाचीच इच्छा
असेल आम्ही आत जावं.”
मग त्या तिघांनी, अजय पासवान, बाखोरी
बिंद आणि गौतम प्रसाद साफसफाई करण्याचं ठरवलं. “आम्ही जंगल काढून टाकलं आणि
मशिदीला रंग दिला. समोर एक मोठा चबुतरा बांधला,” अजय सांगतो. रोज संध्याकाळी त्यांनी
तिथे दिवा लावायलाही सुरुवात केली.
मग या तिघांनी एक साउंड सिस्टिम आणली
आणि मशिदीवर भोंगा लावला. “त्या साउंड सिस्टिमवर आम्ही अझान लावायची असं ठरवलं,”
अजय सांगतो. आणि मग काय, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या मारी गावात दिवसातून पाच
वेळा मशिदीत अझान सुरू झाली.


अजय पासवान (डावीकडे) आणि त्याच्या दोन मित्रांनी बिहारच्या नालंदा जिल्ह्याच्या मारी गावातल्या मशिदीची सगळी व्यवस्था लावायचं ठरवलं. गावातले बडे बुजुर्ग (उजवीकडे) सांगतात की शेकडो वर्षांपासूनची प्रथा आहे की गावात कुठलाही सण असला, हिंदूंचा सुद्धा, तरी सुरुवात मशिदीत आणि मझारीवर दिवा लावून होते
मारी गावात कुणीच मुस्लिम नाहीत. पण मस्जिद आणि मझार आता अजय, बाखोरी आणि गौतम या तिघा हिंदूंची जबाबदारी आहे.
“मस्जिद
आणि मझार आमच्या श्रद्धेचा भाग आहेत आणि म्हणून आम्ही ती जपतोय. ६५ वर्षांपूर्वी
माझं लग्न झालं, तेव्हाही सगळ्यात आधी मस्जिदीत माथा टेकवला आणि मग आमच्या
देवांसमोर,” जानकी पंडित सांगतात.
पांढऱ्या आणि हिरव्या रंगात रंगवलेली
मस्जिद मुख्य रस्त्यावरून दिसते. दर पावसाळ्यात रंग उडतो. मशिदीभोवती चार फूट
उंचीची भिंत आहे. इथल्या जुन्या, मोठाल्या लाकडी दरवाज्यातून आत आलं की आपण
मशिदीच्या अंगणात येतो. आतमध्ये कुराणाची हिंदी आवृत्ती आणि सच्ची नमाझ नावाचं एक
पुस्तक आहे. यात नमाज कशी अदा करायची त्याची पद्धत सांगण्यात आलीये.
“गावातला नवरा मुलगा आधी मशिदीत आणि मझारीवर डोकं टेकवतो आणि त्यानंतर हिंदू
देवतांची पूजा करतो,” पंडित गुरुजी सांगतात. ते सरकारी शाळेतील निवृत्त शिक्षक
आहेत. बाहेरगावाहून जरी वरात आली तरी “नवऱ्या मुलाला आधी मस्जिदीत नेलं जातं, तिथे
डोकं टेकल्यानंतर आम्ही त्याला देवळात घेऊन जातो. प्रथाच आहे तशी.” गावकरीही
मझारीवर येऊन प्रार्थना करतात. मनातली इच्छा पूर्ण झाली तर चादर चढवतात.


पंधरा वर्षांपूर्वी अजय पासवान, बाखोरी बिंद आणि गौतम प्रसाद या तीन तरुणांनी मारीच्या या मशिदीचा जीर्णोद्धार केला. झाडझाडोरा काढून टाकला, मशिदीला रंग दिला, समोर मोठा चबुतरा बांधला आणि रोज संध्याकाळी इथे दिवा लावायला सुरुवात केली. मशिदीच्या आत कुराणाची हिंदी आवृत्ती आणि नमाज कशी अदा करायची हे सांगणारं सच्ची नमाज हे पुस्तक आहे (उजवीकडे)


(डावीकडे) किमान तीनशे वर्षांपूर्वी अरेबियातून इथे सूफी संत हज़रत इस्माईल इथे आले. त्यांची ही मझार असल्याचं सांगतात. (उजवीकडे) सरकारी शाळेतील निवृत्त शिक्षक जानकी पंडित म्हणतात, ‘मस्जिद आणि मझार आमच्या श्रद्धेचा भाग आहेत आणि म्हणून आम्ही ती जपतोय’
पन्नासेक वर्षांपूर्वी मारीमध्ये काही मुसलमान कुटुंबं राहत होती. १९८१ मध्ये बिहार शरीफमध्ये झालेल्या कुप्रसिद्ध धार्मिक हिंसाचारानंतर ते तडकाफडकी गाव सोडून निघून गेले. त्या वर्षी एप्रिल महिन्यात दंगल सुरू झाली आणि त्यात ८० जणं मारली गेली. निमित्त ठरलं ताडीच्या दुकानात झालेला हिंदू आणि मुसलमानांमधला किरकोळ वाद.
मारीमध्ये हिंसेचं लोण पोचलं नसलं
तरी इथल्या मुसलमानांमध्ये भीती पसरली आणि मन साशंकही झालं. हळू हळू ते मुस्लिमबहुल
गावांमध्ये किंवा शहरांमध्ये राहू लागले.
दंगली झाल्या तेव्हा अजयचा जन्मही
झाला नव्हता. “लोक सांगतात मुस्लिम लोक तेव्हा गाव सोडून निघून गेले. पण ते का
गेले, इथे काही झालं होतं का असं काहीही त्यांनी मला सांगितलं नव्हतं. पण जे काही
झालं ते चांगलं नक्कीच नव्हतं,” गावात एकही मुसलमान राहिला नाही याबद्दल तो
म्हणतो.
पूर्वी इथे राहणारे शहाबुद्दिन
अन्सारींना हे पटतं. “वह एक आंधड था, जिसने हमेशा के लिये सब कुछ बदल दिया.”
१९८१ साली मारीतून निघून गेलेल्या २०
कुटुंबांपैकी एक म्हणजे अन्सारी. “माझे वडील, मुस्लिम अन्सारी तेव्हा विड्या
वळायचे. ज्या दिवशी दंगे झाले त्या दिवशी ते विड्यांचं सगळं सामान आणायला बिहार
शरीफला गेले होते. परतल्यावर त्यांनी मारीतल्या मुस्लिम कुटुंबांना सगळं काही
सांगितलं,” शहाबुद्दिन सांगतात.


मारीमध्ये अजय (डावीकडे) आणि शहाबुद्दिन अन्सारी (उजवीकडे). आपल्याला पोस्टमनची नोकरी मिळवून देण्यासाठी एका हिंदू मित्राने कशी मदत केली ते अन्सारी सांगतात. १९८१ च्या दंग्यानंतर मुसलमानांनी तडकाफडकी गाव सोडलं त्याबद्दल ते म्हणतात, ‘मी मारी गावात पोस्टमनचं काम करत होतो त्यामुळे मी इथल्या एका हिंदू कुटुंबासोबत रहायला सुरुवात केली. पण माझे वडील आणि आईला मात्र मी बिहार शरीफला हलवलं. एक वादळ होतं, त्यात सगळं होत्याचं नव्हतं झालं’
तेव्हा विशीत असलेले शहाबुद्दिन गावात पोस्टमन होते. त्यांचं अख्खं कुटुंब गाव स्थलांतरित झाल्यावर त्यांनी बिहार शरीफ शहरात एक किराणा मालाचं दुकान टाकलं. इतक्या तडकाफडकी गाव सोडल्यानंतरही, “गावात कुणीच ताही भेदभाव केला नाही. किती मोठा काळ आम्ही एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहिलोय. कुणाला काहीच अडचण नव्हती.”
मारीमध्ये हिंदू आणि मुसलमानांमध्ये
कसलंही वैर नव्हतं. “मी मारीला जातो तेव्हा किती तरी हिंदू कुटुंबं त्यांच्यासोबत जेवणाचा
आग्रह करतात. एकही असं घर नसेल जिथे माझ्यासाठी खाणं बनत नाही,” ६२ वर्षीय अन्सारी
सांगतात. मस्जिद आणि मझारीची देखभाल ठेवली जातीये हे पाहून त्यांना फार आनंद होतो.
बेन तालुक्यात येणाऱ्या मारी गावाची
लोकसंख्या मागच्या जनगणनेवेळी ३,३०७ (२०११) होती. इथले बहुतेक रहिवासी मागासवर्गीय
किंवा दलित आहेत. मशिदीची देखभाल करणाऱ्या तिघांपैकी अजय दलित आहे, बाखोरी बिंद ईबीसी
किंवा अतिमागासवर्गीय आणि गौतम प्रसाद इतर मागासवर्गीयांमध्ये येतो.
“गंगा-जमुनी
तहजीब काय असते याचं हे उत्तम उदाहरण आहे,” मोहम्मद खालिद आलम भुट्टो म्हणतात. पूर्वी
या गावी राहणारे ६० वर्षीय भुट्टो त्या वेळी बिहार शरीफला रहायला गेले. “ही मस्जिद
२०० वर्षांहून जुनी आहे. आणि सोबतची मझार तर त्याही आधी बांधलेली आहे,” ते सांगतात.
“मझार हज़रत इस्माईल या सूफी संताची
आहे. ते अरेबियाहून इथे आल्याचं सांगितलं जातं. ते इथे आले त्या आधी पूर आणि आग अशा
आपत्तीत हे गाव सतत बेचिराख झाल्याचं लोक सांगतात. पण ते इथे राहू लागले आणि
तेव्हापासून या गावावर कोणतंच नैसर्गिक संकट आलं नाही. त्यांचं निधन झाल्यानंतर ही
मझार बांधण्यात आली आणि इथले हिंदू देखील इथे पूजा करू लागले,” ते सांगतात. “तीच
परंपरा आजही इथे सुरू आहे.”


अजय (डावीकडे) आणि त्याच्या मित्रांनी अझान म्हणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. सगळे मिळून त्यांना महिन्याला ८,००० रुपये पगार देतात तोही आपल्या रोजंदारीच्या कमाईतून. उजवीकडेः ‘गंगा-जमुनी तहजीब काय असते याचं हे उत्तम उदाहरण आहे,” पूर्वी मारीमध्ये राहणारे मोहम्मद खालिद आलम भुट्टो म्हणतात
तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोविड-१९ च्या महासाथीत आणि त्यानंतरच्या टाळेबंदीमध्ये अजय, बाखोरी आणि गौतम यांना मारीमध्ये काम मिळणं मुश्किल झालं त्यामुळे ते कामासाठी वेगवेगळीकडे गेले – गौतम इथून ३५ किमीवर असलेल्या इस्लामपूरमध्ये कोचिंग सेंटर चालवतो आणि बाखोरी चेन्नईमध्ये गवंडीकाम करतो. अजय बिहार शरीफला गेला.
तिघंही गावात नसल्यामुळे मशिदीच्या
देखभालीचा प्रश्न निर्माण झाला. २०२४ मध्ये फेब्रुवारीमध्ये इथली अझान थांबली होती
असं लक्षात आल्यावर त्यांनी अझान म्हणण्यासाठी एका मुएझिनची नेमणूक करण्याचं ठरवलं.
“त्यांचं कामच दिवसातून पाच वेळा अझान म्हणण्याचं असतं. आम्ही [तिघं] त्यांनां
महिन्याला ८,००० रुपये पगार देतो आणि गावात त्यांना राहण्यासाठी एका खोलीची सोय
केली आहे,” अजय सांगतो.
जिवात जीव आहे तोपर्यंत ही मस्जिद
आणि मझारीचं रक्षण करण्याचं अजयने ठरवलं आहे. “मरला के बादे कोई कुछ कर सकता है.
जब तक जिंदा हैस मस्जिद को किसी को कुछ करने नही देंगे.”
बिहारमधल्या शोषितांच्या मुद्द्यांवर संघर्षरत असलेल्या एका दिवंगत कामगार नेत्याच्या स्मृतीत सुरू केलेल्या फेलोशिपमधून हा वृत्तांत तयार झाला आहे.