पारी वाचनालयासाठी २०२४ हे वर्ष अगदी विशेष होतं. या वर्षी आमच्या वाचनालयामध्ये आजवरच्या तुलनेत सर्वाधिक पुस्तकं आणि इतर अहवाल दाखल झाले. यामध्ये कायदे, नवी-जुनी पुस्तकं, जाहीरनामे, विवेचनात्मक निबंध, लेखसंग्रह, संदर्भसूची, शासकीय अहवाल, पत्रकं, सर्वेक्षण अहवाल आणि लेख अशा विविध संसाधनांचा समावेश होता.
आमच्या उच्चांकापलिकडे इतर काही उच्चांक मोडले जात होते. २०२४ हे आजवरचं सर्वाधिक तापमान असलेलं वर्ष म्हणून नोंदवलं गेलं आहे. याआधी २०२३ या वर्षाने हा ‘मान’ पटकावला होता. बदलत्या वातावरणामुळे स्थलांतरित पक्ष्यांवर विपरित परिणाम व्हायला लागले आहेत. या प्रजातींमधली दर पाचातली एक विलुप्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पक्ष्यांप्रमाणेच भारतातल्या स्पांग, झील, सरोवर, तलाव, ताल, कोला, बिल आणि चेवुरु अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पाणथळ जागा ही आता धोक्यात आल्या आहेत.
प्रदूषण आणि उष्णतेचा जवळचा संबंध आहे हे आता सिद्ध झालं आहे. संपूर्ण दक्षिण आशियामध्ये कणद्रव्य किंवा धूलिकण, धूरकणांमुळे झालेलं हवेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं होतं. भारतात या कणद्रव्यांचं प्रमाण सुरक्षित पातळीपेक्षा ११ पट जास्त म्हणजे घनमीटरमागे ५४.४ मायक्रोग्राम इतकं नोंदवलं गेलं. नवी दिल्ली मध्ये तर हे प्रमाण १०२.१ मायक्रोग्राम इतकं वाईट झालं आणि त्यातून एक हास्यफीत तयार झाली. ॲपआधारित सेवा पुरवणाऱ्या एका कामगाराचे अनुभव आपण त्यात वाचू-पाहू शकतो.

सलग दोन वर्षं तापमानाचे उच्चांक मोडले गेले आणि तितक्याच वेगाने पॅरिस कराराचं उल्लंघन जवळ येऊन ठेपलं. पण तापमान फक्त निसर्गाचंच वाढलं नाही. देशातलं राजकीय तापमानही असेच उच्चांक गाठत होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुका झाल्या आणि १८ वी लोकसभा अस्तित्वात आली.
२०१८ साली भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने आणलेले निवडणूक रोखे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले. त्यानंतर एका महिन्याने भारतीय स्टेट बँक आणि निवडणूक आयोगाने निवडणूक रोखे कुणी खरेदी केले आणि त्याचा पैसा कोणाला मिळाला याचे तपशील जाहीर केले.
फ्यूचर गेमिंग अँड होटेल सर्विसेस (पीआर आणि प्रायवेट लिमिटेड), मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्टर्स लिमिटेड आणि क्विक सप्लाय चेन प्रायवेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी सर्वात जास्त रोखे खरेदी करून राजकीय पक्षांना देणग्या दिल्याचं सिद्ध झालं. आणि या रोख्यांमधून पैसे मिळणाऱ्या पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष (रु. ६,०६० कोटी), अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (रु. १,६०९ कोटी) आणि अखिल भारतीय काँग्रेस (रु. १,४२२ कोटी) या तीन पक्षांना सर्वात जास्त पैसा मिळाला .

१९२२ आणि २०२२ या वर्षांमध्ये भारतात नक्की कुणाकडे किती संपत्ती होती याची तुलना करता असं दिसून आलं की भारतातल्या सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांकडे १९२२ च्या तुलनेत २०२२ मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अधिक वाटा होता. २०२२ साली राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाच्या ६० टक्के वाटा देशातल्या १० टक्के श्रीमंतांकडे होता.
आणि या उलट २०२२-२३ च्या कौटुंबिक खर्चाच्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातली एक व्यक्ती वस्तू आणि सुविधांवर दर महिन्याला सरासरी केवळ रु. ३,७७३ खर्च करते. २०१९ ते २०२२ या काळात मजुरांच्या हातात पडणाऱ्या सरासरी कमाईत काहीही वाढ झालेली नाही .
२०२४ हे वर्ष डिजिटल इंडिया कार्यक्रमाचं दहावं वर्ष. या उपक्रमाचं उद्दिष्ट होतं, “भारताचं रुपांतर डिजिटल स्तरावर सशक्त असलेला समाज आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये करणे.” विरोधाभास असा की २०२४ मध्ये भारत सलग सहाव्या वर्षी जगभरातल्या सर्व देशांमध्ये सर्वाधिक इंटरनेट बंद करणारा देश ठरला.

ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट (जागतिक लिंगाधारित तफावत अहवाल) नुसार भारतामध्ये लिंगाधारित अन्याय आणि विषमतेमध्ये तसूभरही बदल झालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भारत दोन घरं खाली घसरून १२९ क्रमांकावर गेला. शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात भारतीय स्त्रियांचं स्थान अधिकाधिक वाईट होत चालल्याचं हा अहवाल नोंदवतो. शाश्वत विकास ध्येयांमध्ये लिंगभाव निर्देशांकामध्येही १३९ देशांमध्ये आपण ९१ क्रमांकावर आलो.
लिंगभावाबद्दल बोलताना एका गोष्टीची नोंद घ्यायलाच हवी. सध्या निवडून आलेल्या १३५ आमदारांवर स्त्रियांवरील अन्यायाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विनयभंग, लग्नासाठी अपहरण, बलात्कार, सातत्याने बलात्कार, कौटुंबिक छळ, वेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची खरेदी आणि लैंगिक शोषण या गुन्ह्यांचा समावेश आहे.
कायद्याविषयी आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी कसलीही वाट पाहण्याची गरज नाही. लॉ अँड एव्हरीडे लाइफ हे जस्टिस अड्डा ने प्रकाशित केलेलं पुस्तक लोकांनी कायद्यांची अधिकाधिक ओळख करून घ्यावी यासाठीच आहे.

या सगळ्या संसाधनांसोबत आम्ही आमच्या वाचनालयात अनेक संसाधनं समाविष्ट केली आहेत. आरोग्य, भाषा, लिंगभाव, साहित्य आणि इतरही विषयांवरच्या या संसाधनांचा गोषवारा आणि ठळक मुद्दे तुम्हाला वाचायला मिळतील. पारीवर प्रकाशित झालेल्या विशिष्ट विषयांवरच्या लेखांचा आणि वाचनालयातील संसाधनांचा मागोवा घेणाऱ्या लायब्ररी बुलेटिनचे काही अंक आम्ही या वर्षी प्रकाशित केले. पुढच्या वर्षी देखील आम्ही आमच्या वाचनालयाचा गाभा असलेल्या अशाच काही विषयांचा मागोवा घेणार आहोत आणि आमच्या कामाची व्याप्ती वाढवणार आहोत. तेव्हा नवीन काय आलंय ते पाहत रहा, आमच्या लायब्ररीत येत रहा!

तुम्हाला पारीसाठी स्वेच्छेने काही काम करायचं असेल तर contact@ruralindiaonline.org वर संपर्क साधा.
आमचं काम तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला त्यात काही योगदान द्यायचं असेल तरी contact@ruralindiaonline.org शी संपर्क साधा. स्वतंत्र पत्रकार, छायाचित्रकार, वार्ताहर, चित्रकर्ते, अनुवादक, संपादक, चित्रकार, संशोधक, विद्यार्थी असं कुणीही आमच्यासोबत काम करू शकतं. तुमचं स्वागत आहे.
शीर्षक चित्रः स्वदेशा शर्मा