जलाल अली माशांसाठी जाळ्या बनवायला शिकले. कारण? पोटातली भूक.
जलाल अली रोजंदारीवर काम करून पोट भरायचे.
पावसाळ्यात कामंच नसायची. “पावसाळ्यात भातलावणीचं काम असायचं काही दिवस. ते सोडलं
तर दुसरं कुठलंच काम नसायचं,” ते सांगतात.
पण पावसाळ्यात ते राहात त्या दरांग
जिल्ह्यातल्या मौसिता-बालाबारी मधल्या दलदलींमध्ये, ओढे-नाल्यांमध्ये माशांची ही
गर्दी व्हायला लागायची. आणि मग ते धरण्यासाठी बांबूच्या जाळ्या आणि सापळ्यांना
मोठी मागणी असायची. “मी या जाळ्या बनवायला शिकलो कारण त्यातून घरच्यांचं पोट भरता
येणार होतं. भूक असते ना पोटात तेव्हा तुम्ही लवकरात लवकर चार घास कसे मिळवता
येतील याचाच विचार करता,” ६० वर्षीय जलाल हसत हसत सांगतात.
आज सेप्पा, बोस्ना आणि बैर या नावांनी
ओळखले जाणारे मासे धरायचे बांबूचे सापळे तयार करणारे एक निष्णात कारागीर म्हणून
जलाल प्रसिद्ध आहेत. आसाममधल्या मौसिता-बालाबारी या पाणथळ परिसराजवळच्या आपल्या
पुब-पोडोखात या गावी घरीच ते या वस्तू तयार करतात.
“अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत माझ्या
आणि आसपासच्या गावातले लोक मासे धरण्यासाठी बांबूच्या जाळ्या आणि सापळेच वापरत
होते. बांबूची जाळी किंवा मद शिव जाल.” गावात याला टोंगी जाल किंवा झेटका जाल
असंही म्हणतात. चौकोनी आकाराच्या जाळ्याची चार टोकं बांबूच्या काठ्यांना किंवा
दोऱ्यांना बांधून हे जाळं तयार केलं जातं.
या सापळ्यांची नावं त्यांच्या आकारावरून पडली आहेत. “सेप्पा एखाद्या ढोलासारखा
अंडाकृती असतो. बैर पण तसाच पण उंची आणि रुंदीला जास्त मोठा असतो. दरकी एखाद्या
पेटीसारखा,” जलाल सांगतात. दुयेर, दियार आणि बोइष्नो ही जाळी वाहत्या पाण्यात
लावतात. पाणी भरलेली भाताची, तागाची खाचरं, दलदलीकडे जाणारे ओढे आणि नद्यांच्या
मुखापाशी ही जाळी लावून मासे धरतात.


डावीकडेः आसामच्या मौसिता-बालाबारी पाणथळ क्षेत्राच्या जवळ पुब-पाडोखात नावाच्या गावी जलाल अली राहतात. आपल्या घरच्या अंगणात मासे धरायचे बांबूचे सापळे नीट निरखून पाहतायत. ढोलाच्या आकाराचा उभा सापळा म्हणजे सेप्पा. उजवीकडेः त्यांच्या हातात असलेल्या सापळ्याचं नाव आहे बैर. मासा सापळ्याच्या आत जावा यासाठी गाठी बांधून तयार केलेलं तोंड. या सापळ्यांच्या तोंडाला पारा किंवा फारा म्हणतात.
आसाममधलं ब्रह्मपुत्राचं खोरं म्हणजे अनेक नद्या, ओढे आणि खाड्या आणि त्यांना जोडलेल्या पाणथळ जागा, आणि पूरक्षेत्र. अनेक नैसर्गिक तळी या भागात आहेत. आणि यामुळे इथली लोक जगण्यासाठी मासेमारीवर अवलंबून आहेत आणि त्यांचं पोट याच पाण्यावर भरतंय. आसाममध्ये ३५ लाखांहून जास्त लोक मासेमारीत काम करत असल्याचं मत्स्यव्यवसायासंबंधी आकडेवारीः २०२२ या अहवालात म्हटलं आहे.
मोसुरी जाल (बारीक जाळी) आणि तळ ओढून
मासे धरणारी यांत्रिक जाळी महागही आहेत आणि जलचरांसाठी धोक्याची देखील. कारण या
जाळ्यांमध्ये अगदी बारके मासेही पकडले जातात आणि त्यांच्या वापरातून पाण्यामध्ये
प्लास्टिकच्या कचऱ्याची भर पडते. मात्र पूर्वापारपासून या भागात बनवली जाणारी
बांबू, वेत आणि तागाची जाळी आणि सापळे टिकाऊ, शाश्वत आणि इथल्या परिसंस्थांना साजेसे
असतात. या जाळ्यांमध्ये फक्त ठराविक आकाराचे मासे धरले जातात आणि अतिरिक्त मासळी
येत नसल्याने वायाही जात नाही.
व्यावसायिक वापराच्या जाळ्यांमुळे
अतिरिक्त मासे धरले जातात आणि माशांच्या वाढीला, प्रजननालाही खीळ बसते असं आसीएआर-सेंट्रल
इनलँड फिशरीज रीसर्च इन्सिट्यूट इथे काम करणारे एक तज्ज्ञ ओळख उघड न करण्याच्या
अटीवर सांगतात.
ते सांगतात पुराच्या गाळामुळे दलदलीच्या
आणि पाणथळ जागांची खोली कमी झालीये, त्यामुळे पाणी कमी होतं आणि माशांची संख्याही
घटते. मुक्सद अली मासे धरतात आणि त्यांनी हे जवळून अनुभवलंय. “माझ्या घरापासून
ब्रह्मपुत्रा चार किलोमीटरवर वाहते. पूर्वी नदीला मिळणारं पाणी दिसायचं. मग आम्ही
शेतातच थोडा भराव घालून बांध तयार करायचो आणि तिथे माशाचे सापळे लावायचो.” आधुनिक
जाळी परवडत नसल्याने आपण बैरच वापरत असल्याचं साठीचे अली सांगतात.
“सहा-सात वर्षांपूर्वी आम्हाला भरपूर मच्छी मिळायची. पण आता माझ्या चार
बैरमध्ये मिळून अर्धा किलोसुद्धा भरत नाही,” मुक्सद अली सांगतात. ते आणि त्यांच्या
पत्नी दरांग जिल्ह्याच्या नंबर ४ अरिमारी गावात राहतात.


डावीकडेः नंबर ४ अरिमारी गावामधल्या आपल्या घरी मुक्सद अली डारकी दाखवतायत. त्यांच्या पत्नी जवळच्याच शाळेत सफाई कामगार आहेत. अली मासे विकून त्यांना हातभार लावतात. उजवीकडेः आदल्या दिवशी रात्री लावलेली माशाची एक जाळी मुक्सद अली तपासतयात. गेल्या तीन वर्षांमध्ये माशांची संख्या घटली आहे आणि कधी कधी चार सापळ्यांमध्ये मिळून अर्धा किलो देखील मासळी भरत नाही
*****
आसाममध्ये भरपूर पाऊस पडतो – ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात १६६ सेंमी आणि बराक खोऱ्यामध्ये १८३ सेंमी. नैऋत्य मोसमी वारे एप्रिलमध्येच पाऊस घेऊन येतात आणि तो ऑक्टोबरपर्यंत सुरू असतो. जलाल यांचं कामही या ऋतुचक्राप्रमाणे सुरू असतं. “पूर्वी मी जोष्टी माश (ज्येष्ठ, मे महिन्याच्या मध्यावर) मध्ये जाळी बनवायला सुरुवात करायचो आणि लोक साधारणपणे आषाढ माश (आषाढ, जूनच्या मध्यावर) मध्ये बैर विकत घ्यायचे. पण गेल्या तीन वर्षांपासून लोक नेहमीच्या वेळी जाळी घेतच नाहीयेत कारण पाऊस कमी झालाय.”
२०२३ साली प्रकाशित झालेल्या जागतिक
बँकेच्या एका
अहवालानुसार
आसाममध्ये तापमानात वाढ होईल, पाऊस कमी होईल आणि
त्यामुळे महापुरासारख्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वातावरणातल्या बदलांमुळे
जलस्रोतांमध्ये गाळ वाढेल आणि त्यामुळे तिथलं पाणी कमी होऊन माशांची संख्यासुद्धा
घटू शकते.
१९०९-२०१९ या काळात सरासरी वार्षिक कमाल
आणि किमान तापमानामध्ये अनुक्रमे ०.०४९ आणि ०.०१३ अंश सेल्सियसची वाढ झाली
असल्याचं राज्याच्या विधानसभेत सरकारने सादर केलेल्या
माहितीवरून
दिसतं. रोजच्या
तापमानात सरासरी ०.०३७ अंश सेल्सियसची वाढ झाली आणि याच काळात दर वर्षी पाऊसमान १०
मिमीने कमी झालं.
“पाऊस कधी येणार हे पूर्वी आम्हाला
माहीत असायचं. आता मात्र सगळंच बदलून गेलंय. कधी कधी थोडाच वेळ पण प्रचंड पाऊस
पडतो आणि कधी कधी पाऊस गायबच होतो,” जलाल सांगतात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यासारख्या
कारागिराची पावसाळ्यामध्ये २०,००० ते ३०,००० रुपये इतकी कमाई होत होती.
गेल्या वर्षी त्यांनी १५ बैर विकले. यंदा मात्र जूनच्या मध्यापासून एक महिन्यात त्यांनी फक्त पाच बैर बनवले आहेत. खरं तर याच काळात या सापळ्यांना सर्वात जास्त मागणी असल्याचं जलाल अली सांगतात.
त्यांच्याप्रमाणे इतरांनाही कमाई घटल्याचा
अनुभव येतोय. उदलगुडी जिल्ह्यातले ७९ वर्षीय जोबला डायमारी सेप्पा सापळे तयार करतात.
ते सांगतात, “आजकाल झाडाला फणस कमी लागतायत, गरमी प्रचंड आहे आणि अजूनसुद्धा पाऊस
झालेला नाही. या वर्षी काहीच सांगता येत नाही. त्यामुळे कुणाची मागणी आली तरच मी
सेप्पा बनवणार आहे.” एक सेप्पा तयार करता करता ते आमच्याशी बोलतात. मे महिन्यात मी
त्यांना भेटलो तेव्हा हवेत उकाडा होता. या वर्षी सेप्पा घ्यायला कुणीच घरी आलं नसल्याचं
ते सांगतात.
बालूगाव आठवडी बाजार आसाममधला मोठा
बाजार आहे. इथे सुभान अली बांबूच्या वस्तूंचा व्यापार करतात. “जुलैचा पहिला आठवडा
आलाय आणि अजून एकही बैर विकलेला नाही,” ते सांगतात.
आपल्याकडची ही कला हळू हळू लोप पावत
असल्याचं जलाल पाहतायत. “हे शिकून घ्यायलाही माझ्याकडे कुणी येत नाहीये. मासेच
नसतील तर ते जाळी आणि सापळे बनवायला शिकतील तरी का?” आपल्या घराच्या परसात ते
डारकी बनवत बसले होते. मौसिता-बालाबारी च्या बील या एका दलदल क्षेत्राकडे जाणारा
हा कच्चा रस्ता आहे.


डावीकडेः जोबला डायमारी आपल्या घराच्या अंगणात सेप्पा बनवतायत. उदलगुडी जिल्ह्यातले ७९ वर्षीय डायमारी सांगतात. ‘गरमा प्रचंड आहे आणि अजूनही पाऊस आलेला नाही. या वर्षी काही सांगता येत नाही, त्यामुळे मागणी आली तरच मी सेप्पा बनवणार आहे’


डावीकडेः सुरहाब अली बालुगावच्या आठवडी बाजारात बांबूच्या वस्तू विकतात. ते सांगतात की त्यांच्याकडे गिऱ्हाईकच नाहीये. सुरहाब अलींच्या दुकानात ठेवलेला मासेमारीचा पारंपरिक सापळा. सापळ्यात आलेले मासे बाहेर काढण्यासाठीची जागा इथे दिसते
*****
“हे सापळे बनवायचे असतील ना, तर कंटाळा येऊन चालत नाही. आणि सगळं लक्ष एकवटून काम करावं लागतं,” जलाल सांगतात. “गप्पा टप्पा चालल्या असतील तर त्या तुम्ही ऐकू शकता पण त्यात भाग घ्यायचा असेल तर मग बैरच्या गाठी मारण्याचं काम थांबवलेलंच बरं.” सलग काम केलं तर दोन दिवसांत एक सापळा तयार होतो. “मध्ये मध्ये थांबलं तर मात्र चार ते पाच दिवस लागतात,” ते सांगतात.
या कामाची सुरुवात बांबू
निवडण्यापासून होते. हे सापळे बनवण्यासाठी इथेच मिळणारा, मोठ्या कांड्या असलेला
बांबू वापरतात. बैर तीन फूट तर सेप्पा साडेतीव फूट लांब असतो. एक विशिष्ट प्रकारचा
बांबू यासाठी वापरतात. त्याला बंगालीत तोल्ला बाश म्हणतात आणि आसामीमध्ये जती बाह.
“तीन ते चार वर्षांचा, पूर्ण वाढ
झालेला बांबू पाहिजे नाही तर मग सापळा फार काळ टिकायचा नाही. कांड्या १८ चे २७
इंची असाव्यात. डोळ्याने नुसतं बघून मी बरोबर बांबू निवडू शकतो,” जलाल सांगतात. “मग
दोन डोळ्यांच्या मधली कांडं कापायाची,” ते सांगतात. आपल्या हातानेच कामट्यांचं माप
घेत असल्याचंही ते सांगतात.
बांबूचे तुकडे कापून घेतले की जलाल
त्याच्या कामट्या काढतात. माशाच्या सापळ्यांची कडेची जाळी या कामट्यांची असते. “पूर्वी
मी काठी म्हणजेच कामट्या विणायला तागाच्या दोऱ्या वापरायचो. पण आता मात्र
प्लास्टिक वापरतोय कारण आजकाल आमच्या भागामध्ये तागाची लागवडच बंद झालीये.”


डावीकडेः बांबू घरी आणला की ठराविक आकाराच्या - १८ ते २७ इंच - कांड्या निवडायच्या. त्याच्या बारीक कामट्या काढून त्या तासून घ्यायच्या. असं केल्याने त्याची जाळी विणणं सोपं होतं. तसंच सापळा दिसायला पण अगदी एकसारखा दिसतो. उजवीकडेः ‘मी बोटानेच एकेक कामटी मोजून घेतो. लांबट बाजूसाठी २८० कामट्या लागतात. डारकी अर्धा हातभर लांब असतो त्यासाठी मी थोड्या आडव्या कामट्या वापरतो, जेणेकरून मातीचा भार पेलता यावा,’ जलाल सांगतात


डावीकडेः ‘कडेच्या जाळ्या टोलीने बांधून झाल्यावर मी या जाळ्यांना चाल जोडायचं काम करणार,’ जलाल सांगतात. त्यानंतर मासे सापळ्यात आत जावेत यासाठीचा पारा बनवणार. डरकीला तीन तोंडं असतात आणि सेप्पाला दोन. उजवीकडेः डरकी लांबीला ३६ इंच, रुंदीला ९ आणि उंचीला १८ इंच असतो. सेप्पाचा मधला भाग १२ ते १८ इंच उंच असतो
१८ इंची आणि २७ इंची अशा मिळून जलाल यांना एकूण ४८० कामट्या काढाव्या लागतात. “हे काम फार किचकट असतं,” ते सांगतात. “काठी म्हणजेच कामट्या अगदी एका आकाराच्या, दिसायला एकसारख्या आणि गुळगुळीत हव्यात. नाही तर कडेच्या जाळ्या एकसारख्या दिसणार नाहीत.” या कामालाच त्यांचा अर्धा दिवस जातो.
सापळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम
म्हणजे मासे आत येण्यासाठीचं तोंड तयार करणे. “एका बांबूत चार बैर बनतात. बांबूला
८० रुपये आणि प्लास्टिकच्या दोरीला ३० रुपये पडतात,” जलाल सांगतात. डरकीच्या
वरच्या बाजूच्या काठ्या विणण्याचं काम सुरू असतं आणि त्यासाठी त्यांच्या हातात
अल्युमिनियमची एक तार दिसते.
कामट्या विणणं आणि दोरीच्या गाठी मारण्याचं
कष्टाचं काम पूर्ण चार दिवस चालतं. “सगळं लक्ष दोरी आणि बांबूच्या कामट्यांवर पाहिजे.
जर लक्ष नसलं तर एकाऐवजी दोन कामच्या एका गाठीत येणार आणि मग सगळं उसवून पुन्हा
विणावं लागणार,” ते सांगतात. “याला शक्ती लागत नाही, पण अगदी नाजूक वीण आणि ठराविक
ठिकाणी गाठी मारण्याची कला आहे ही. इतकं लक्ष देऊन काम करावं लागतं की कधी कधी
डोक्यापासून तळपायापर्यंत घामाच्या धारा लागतात.”
पाऊसमान कमी आणि मासेही कमी होत
चालल्याने या कलेचं भविष्य काय अशी चिंता जलाल यांना लागून राहते. “इतक्या
चिकाटीने आणि शांतपणे काम करावं लागतं, ते आता कोण पाहणार आणि शिकणार?” ते
विचारतात.
हे वार्तांकन मुणालिनी मुखर्जी फौंडेशनच्या
सहाय्याने करण्यात आलं आहे.