“किती तरी वेळा हत्तींनी माझा पाठलाग केलाय, पण मला कधीही त्यांनी दुखापत केली नाहीये,” रवी कुमार नेताम हसत हसत सांगतो.

छत्तीसगडच्या उदंती सीतानदी व्याघ्र प्रकल्पात २५ वर्षीय रवी हत्तींचा माग काढण्याचं काम करतो. गोंड आदिवासी असणारा रवी आणि मी अरसीकन्हार रांगामधल्या जंगलवाटेवरून चालत होतो. हत्तीची लीद आणि पायाच्या ठशांवरून रवी हत्तींचा माग काढतो.

“माझा जन्म जंगलात झालाय. मी इथेच लहानाचा मोठा झालोय. या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी मला शाळेत जायची गरज नाही,” रवी सांगतो. धमतरी जिल्ह्याच्या थेनही गावच्या रवीने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर वन खात्यात फायर गार्ड म्हणून काम करायला लागला. चार वर्षं हे काम केल्यानंतर तो सध्याचं काम करी लागला.

हत्तीचा माग काढत आम्ही जंगलात शिरलो आणि तिथे भरून राहिलेले सगळे आवाज आम्हाला ऐकू यायला लागले. किड्यांची किरकिर, साल आणि साग वृक्षांमधून वाहत जाणाऱ्या वाऱ्याची शीळ, मधूनच पक्ष्याची हूल आणि एखाद्या प्राण्याच्या पावलाखाली मोडणारी फांदी. हत्तीच्या मागावर असाल तर फक्त डोळे नाही तर कान पण उघडे असायला लागतात.

PHOTO • Prajjwal Thakur
PHOTO • Prajjwal Thakur

डावीकडेः माझा जन्म जंगलात झालाय. मी इथेच लहानाचा मोठा झालोय. या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी मला शाळेत जायची गरज नाही,’ हत्तींचा माग काढणारा रवी कुमार नेताम सांगतो. उजवीकडेः अरसीकन्हार जंगलपट्ट्यातला हत्तींच्या मागावर असणाऱ्यांचा तळ. इथून ३०० मीटर अंतरावर हत्ती आहेत

हे हत्ती या जंगलातले नवीन पाहुणे आहेत. तीन वर्षांपूर्वी ओडिशातून ते इथे आले. वन खात्यात त्यांना सगळे सिकसर कळप म्हणतात. आल्यानंतर आता त्यांचे २०-२० हत्तींचे दोन कळप तयार झाले आहेत. एक कळप गरियाबादला गेला आणि दुसरा इथेच आहे आणि गावातले लोक त्यांच्या मागावर आहेत असं देवदत्त तारम सांगतात. पंचावन्न वर्षीय तारम वनरक्षक म्हणून वनखात्यात रुजू झाले आणि आता ते फॉरेस्ट रेंजर या पदावर कार्यरत आहेत. गेली ३५ वर्षं या खात्यात काम केल्यामुळे जणू काही हे अख्खं जंगलच त्यांना पाठ आहे.

“इथे पुष्कळ पाणी आहे. जंगलात तळी आहेत आणि या भागात काही धरणंसुद्धा आहेत,” तारम सांगतात. मोठ्या प्राण्यांना इथे रहायला का आवडतं याचं हे मुख्य कारण. आणि हत्तींना खायला आवडणाऱ्या अनेक गोष्टी इथे मुबलक प्रमाणात आहेत. मोहाची फळं त्यांना फार आवडतात. आणि इथे माणसाचा फार काही वावर नाही. “घनदाट जंगल आहे, खाणीबिणी नाहीत. त्यामुळे हत्तींसाठी हे जंगल एकदम योग्य आहे,” तारम सांगतात.

हत्तींचा माग काढणारे लोक दिवस आणि रात्र पाळीत काम करतात. कुठलाही ऋतू असो, पायी पायी जंगलात हिंडत ते हत्तींचा शोध घेत असतात. आसपासच्या गावांमध्ये जाऊनही ते हत्तींच्या काही खाणाखुणा दिसतात का ते पाहत असतात. त्यांचे निष्कर्ष ते एलिफंट ट्रॅकर या ॲपवर अपलोड करतात.

PHOTO • Prajjwal Thakur
PHOTO • Prajjwal Thakur

डावीकडेः फॉरेस्ट रेंजर असलेले देवदत्त तारम हत्तींच्या पायांच्या ठशांवरून त्यांचा माग कसा काढला जातो ते दाखवतायत. उजवीकडेः नथुराम नेताम हत्तीची लीद पाहतायत

PHOTO • Prajjwal Thakur
PHOTO • Prajjwal Thakur

डावीकडेः हत्तींच्या मागावर असणाऱ्यांचा पहारा. उजवीकडेः या सगळ्यांना मिळालेली माहिती एका पवर पाठवावी लागते, लोकांना सतर्क करावं लागतं आणि सगळ्याचा अहवाल व्हॉट्स पवर पाठवावा लागतो

“हे ॲप एफएमआयएस आणि पर्यावरण, वन व वातावरण बदल खात्याने संयुक्तरित्या तयार केलं आहे. हत्ती आढळल्यावर भोवतीच्या १० किलोमीटर परिसरातल्या नागरिकांना सतर्क करण्यासाठी याचा वापर केला जातो,” उदंती सीतानदी व्याघ्र प्रकल्पाचे उप संचालक वरुण कुमार सांगतात.

हत्तींचा माग काढणाऱ्या चमूचे कामाचे तास काही नक्की नसतात. महिन्याला १,५०० रुपये मानधनावर कंत्राटी कामगार म्हणून ते काम करतात. इजा-दुखापती वगैरेंसाठी कसलंही विमा संरक्षण त्यांना उपलब्ध नाही. “हत्ती जर रात्री आले तर मला पण रात्री यावं लागतं कारण मी रात्रपाळीचा राखणदार आहे,” नारायण सिंग ध्रुव म्हणतात. चाळिशीचे ध्रुव गोंड आदिवासी आहेत.

“हत्ती दुपारी १२ ते ३ झोप काढतात. आणि त्यानंतर त्यांच्यातला जो मुख्य हत्ती आहे तो सोंडेचा चित्कार करतो. त्यानंतर सगळा कळप चालायला लागतो,” ध्रुव सांगतात. “हत्तींना वाटेत कुणीही अगदी माणूस जरी दिसला तरी ते एकमेकांना ओरडून इशारा करतात.” या आवाजामुळे हत्ती जवळच कुठे तरी आहेत हे त्यांचा माग काढणाऱ्यांना पण कळतं. मी हत्तींबद्दल आजवर जे काही शिकलोय ते त्यांचा माग काढण्याचं काम करता करताच शिकलोय असंही ध्रुव सांगतात.

“एखादा हत्ती जर दिवसाला २५-३० किलोमीटर चालला तर मग आम्हाला शिक्षाच असते,” नथुराम म्हणतात. जंगलातल्या एका पाड्यावर दोन खोल्यांच्या साध्या घरामध्ये नथुराम राहतात. त्यांना तीन मुलं आहेत. पूर्वी ते जंगलातल्या आगींवर लक्ष ठेवण्याचं काम करायचे आणि आता गेली दोन वर्षं ते हत्तींचा माग काढतायत.

PHOTO • Prajjwal Thakur
PHOTO • Prajjwal Thakur

डावीकडेः वनरक्षक आणि हत्तींचा माग काढणारे नारायण सिंग ध्रुव म्हणतात, ‘हत्ती जर रात्री आले तर मला पण रात्री यावं लागतं.’ उजवीकडेः पंचायत कचेरीजवळ जमा झालेले थेनही गावाचे रहिवासी. हत्तींनी त्यांच्या पिकाची नासधूस केली आहे

*****

हत्ती जवळ असल्याचं कळालं की गावातले सगळे खडबडून जागे होतात. आपल्या रानातलं पीक हत्ती फस्त करताना पाहत राहतात. बॅटरीच्या उजेडात हे धूड तरुण आणि लहानगी पोरं पाहतात.

हत्ती शेतात येऊ नयेत म्हणून गावाचे रहिवासी शक्यतो रात्रभर शेतात आगटी पेटवून ठेवतात. कारण खाण्याच्या शोधात हे प्राणी रात्रीत रानात येतात. काही जण तर रात्रभर जागलीला थांबतात पण अनेकदा हत्तींचा कळप आला तर हतबलपणे त्यांचा गोंधळ पाहत राहतात.

“हत्ती सगळ्यात पहिल्यांदा इथे आले तेव्हा वनखात्याला इतका आनंद झाला होता की त्यांनी हत्तींना ऊस, केळी, कोबी अशी मेजवानी दिली होती,” थेनाहीचे रहिवासी नोहर लाल नाग सांगतात. गावकऱ्यांच्या मनात मात्र हत्तींच्या येण्याचा आनंद कमी आणि पिकाच्या नुकसानीची चिंता जास्त आहे.

PHOTO • Prajjwal Thakur
PHOTO • Prajjwal Thakur

थेनहीमध्ये हत्तींनी केलेली पिकाची नासधूस

आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गावाला भेट दिली तेव्हा आम्हाला हत्ती येऊन गेल्याच्या खुणा आणि त्यांनी केलेल्या नुकसानीची निशाणी पहायला मिळाली. अख्ख्या कळपाने नुकत्याच पेरणी केलेल्या पिकाचं पूर्ण नुकसान केलं होतं आणि त्यांनी पाठ खाजवली तिथे झाडांवर चिखल दिसत होता.

उदंती सीतानदी व्याघ्र प्रकल्पाचे उप संचालक वरुण कुमार सांगतात की वन्यप्राण्यांकडून पिकांचं नुकसान झाल्यास एकरी रु. २२,२४९ इतकी नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र हा पैसा सरकारी कामाची प्रक्रिया पाहता त्यांच्यापर्यंत पैसे पोचतील का नाही याची गावकऱ्यांना मनात शंकाच आहे. “आम्ही आणखी काय करणार? आता जे काही करायचं ते वनखात्याच्या अधिकाऱ्यांना करायचंय. आम्हाला इतकंच कळतं – आम्हाला इथे हत्ती नकोत.”

Prajjwal Thakur

Prajjwal Thakur is an undergraduate student at Azim Premji University.

Other stories by Prajjwal Thakur
Editor : Sarbajaya Bhattacharya
sarbajaya.b@gmail.com

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

Other stories by Sarbajaya Bhattacharya
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale