“आम्ही दिल्लीहून परत गेलो त्याला दोन वर्षं झाली. सरकारने सांगितलं होतं की आमच्या मागण्या मान्य होतील. पण त्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना कुणी बोलावलंही नाही,” पंजाबच्या संगरूर जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या ६० वर्षीय चरणजीत कौर सांगतात. आपल्या दोन एकर जमिनीत घरच्यापुरता गहू, तांदूळ आणि भाजीपाला पिकवतात. “आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढतोय,” त्या म्हणतात.
पतियाळाच्या शंभू सीमेवर चरणजीत जी
आपली मैत्रीण गुरमीत कौर यांच्यासोबत बसल्या आहेत. त्याही शेतकरी आहेत. दुपार आहे,
ऊन आहे पण चटका नाही. “त्यांनी आम्हाला दिल्लीला जाऊही दिलं नाही,” गुरमीत
सांगतात. हरियाणा-पंजाब आणि दिल्ली हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी टाकलेले
अडथळे, बॅरिकेड, काँक्रीटच्या भिंती, रस्त्यात ठोकलेले खिळे आणि काटेरी तारांचा
उल्लेख करत त्या म्हणतात. वाचाः
‘शंभू
सीमेवर मला कैदेत टाकल्यासारखं वाटतंय’
इथे जमलेल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे
की सरकारने त्यांची अनेक बाबतीत फसवणूक केली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या
अहवालानुसार किमान हमीभाव, शेतकरी आणि शेतमजुरांना कर्जमाफी, लखीमपूर-खेरी हत्याकांडामध्ये
मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय आणि दोषींना अटक, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी
पेन्शन योजना आणि २०२०-२१ च्या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना
भरपाई अशा त्यांच्या मागण्या आहेत.
१३ फेब्रुवारी रोजी या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी शांततेच्या
मार्गाने दिल्लीकडे प्रयाण केलं. मात्र त्यांना अश्रुधूर, रबरी गोळ्या आणि पेलेट
गनचा सामना करावा लागला. त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी
अशा प्रकारे बळाचा वापर केला.


डावीकडेः शेजारणी आणि सख्ख्या मैत्रिणी गुरमीत कौर (पिवळी ओढणी) आणि चरणजीत कौर पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातल्या खुराणा गावाहून इथे शंभू सीमेवर आल्या आहेत. उजवीकडेः सुरिंदर कौर म्हणतात, ‘आम्ही आमच्या हक्कांसाठी लढतोय, ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही’


डावीकडेः सुरिंदर कौर आणि सोबतच्या अनेक स्त्रिया आंदोलन सुरू ठेवण्यासाठी बळ मिळावं म्हणून प्रार्थना करत आहेत. उजवीकडेः शंभू सीमेपाशी उभारण्यात आलेल्या मंचापाशी बसलेल्या स्त्रिया
सुरिंदर कौर यांचा मुलगा शंभू सीमेवर आंदोलनात सामील आहे. “साडे ते मोबाइल, टैलीविज़न बंद ही नहीं हुंदे। असीं देखदे हाँ ना सारा दिन गोले वजदे, तद मन विच्च हौल जेहा पैंदा है कि साडे बच्चे ते वज्जे ना।” त्या म्हणतात.
सुरिंदर कौर खोजे माजरा गावच्या रहिवासी
आहेत आणि त्या २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी इथे पोचल्या आहेत. हरियाणा-पंजाब
सीमेवर खनौरीमध्ये सुरक्षा रक्षक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्या झालेल्या झटापटीत २२
वर्षीय शुभकरण सिंग मरण पावला. त्याच्या स्मृतीत आयोजित केलेल्या मेणबत्ती मोर्चामध्ये
सहभागी होण्यासाठी त्या इथे आल्या आहेत.
“आम्ही आमच्या हक्कांसाठी आंदोलन करत
आहोत आणि आमचे हक्क मिळाल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही,” त्या ठामपणे सांगतात. ६४
वर्षीय सुरिंदर यांच्यासोबत त्यांची सून आणि नातवंडं आली आहेत.
सुरिंदर कौर यांच्या कुटुंबाची फतेहगड
साहिब जिल्ह्यामध्ये आपल्या गावी दोन एकर जमीन आहे. ते गहू आणि तांदूळ पिकवतात. फक्त
पाच पिकांसाठी हमीभाव अजिबात पुरेसा नाही. “मिट्टी दे भा लैंदे ने साडी फसल,” आपल्या आसपास मोहरीसारखी पिकं कवडीमोल भावात
विकली जात असल्याचं त्या सांगतात.
“आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. मग
पोलिसांनी असा अतिरेक का करावा?” देविंदर कौर विचारतात. त्यांची मुलं
सुरुवातीपासूनच आंदोलनामध्ये सामील आहेत. पंजाबच्या साहिबजादा अजित सिंग नगर
जिल्ह्यातल्या लांड्रा गावी राहणाऱ्या देविंदर देखील आपल्या सुना आणि नातवंडांसोबत
इथे आल्या आहेत. सगळ्यात धाकटा २ वर्षांचा आणि मोठा ११ वर्षांचा आहे.
“सरकार आधी दोन पिकांना हमीभाव देतं –
गहू आणि तांदूळ. त्यानंतर म्हणतं, तुम्ही वेगवेगळी पिकं घ्या. अशी स्थिती असेल तर
आम्ही इतर पिकं कशी घेणार?” देविंदर विचारतात. “आम्ही मका पिकवली तर क्विंटलला
८००-९०० रुपये भाव मिळतोय. २०२२-२३ साठी राष्ट्रीय खाद्य महामंडळाने १,९६२ रु.
हमीभाव जाहीर केला असला तरी.”


डावीकडेः देविंदर कौर आपल्या कुटुंबासह साहिबजादा अजित सिंग नगर जिल्ह्यातल्या लांड्रा गावाहून इथे आल्या आहेत. ‘आमच्या मुलांवर किती अन्याय होतोय ते सगळेच पाहतायत,’ त्या म्हणतात. उजवीकडेः हरियाणा पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात मारल्या गेलेल्या २२ वर्षीय शुभकरण सिंगच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला


शुभकरण सिंगच्या स्मृतीत निघालेला मोर्चा. जमलेल्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं होतं की सरकारने शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फसवलं आहे
बॅरिकेड्सपासून अंदाजे २०० मीटर अंतरावर एका ट्रॉलीवर तात्पुरता मंच उभा केला आहे. आणि शेतकरी नेते त्यावर उभं राहून आंदोलक शेतकऱ्यांना संबोधत आहेत. आगामी काळातले ठरलेले कार्यक्रम सांगत आहेत. महामार्गावर सतरंज्या टाकून त्यावर शेतकऱ्यांनी ठाण मांडलं आहे. पंजाबच्या दिशेने किमान चार किलोमीटर ट्रॅक्टरची रांग लागलेली आहे.
पंजाबच्या राजपुराहून आलेल्या परमजीत
कौर, वय ४४ २४ फेब्रुवारीपासून शंभूमध्ये आहेत. अमृतसर आणि पठाणकोटच्या गावांमधून
आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये किमान ४-५ महिला तरी आहेतच. त्या दिवसभर इथे
थांबतात आणि दुसऱ्या दिवशी गावातल्या इतर बायका येतात. आंदोलनस्थळी संडासची सोय नसल्याने
रात्रभर मुक्काम करणं अवघड होत असल्याचं त्या सांगतात. “मला फार वाटलं की घरचं
कुणी तरी इथे यायला पाहिजे,” परमजीत सांगतात. त्यांचा २१ वर्षांचा मुलगा आजारी
असल्याने येऊ शकला नाही म्हणून त्या त्यांच्या नातेवाइकांबरोबर इथे आल्या आहेत.
त्यांच्या कुटुंबाची २० एकर जमीन आहे आणि त्या गहू आणि तांदळाचं पीक घेतात. २०२१
साली त्यांच्या पतीला पक्षाघाताचा झटका आला तेव्हापासून शेतीत काहीच पिकलं नाहीये.
“आमची शेती खंडाने कसायला कुणीच तयार
नाही. जवळच्याच एका कारखान्याच्या रसायनांमुळे जमिनीतलं पाणी दूषित झालंय, हेही एक
कारण,” त्या सांगतात.
अमनदीप कौर आणि त्यांच्या कुटुंबाची
पतियाळाच्या भटेहरी गावामध्ये २१ एकर जमीन आहे. तेही गहू आणि तांदूळ पिकवतात. “आमच्या
शेतात असतात तोपर्यंत या पिकांना बिलकुल भाव नसतो. एकदा का आमच्या ताब्यातनं गेली
की बाजारात दुप्पट भावात ती विकली जातात.”
आंदोलनांबद्दल बोलताना त्या म्हणतात,
“आंदोलक निःशस्त्र आहेत तरी हे सरकार आपल्याच नागरिकांवर शस्त्रं चालवतंय. भारतात
रहायचं तरी कशासाठी? तरुण मुलं देश सोडून जातायत, त्यात काही वावगं नाही. इथे नोकऱ्याही
नाहीत आणि आम्ही आमचे हक्क मागायला आलो तर आम्हाला ही अशी वागणूक मिळतीये.”