उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये लडाखच्या सुरू खोऱ्यात चैतन्य निर्माण होतं. हिरव्याकंच रानांमधून ओढे खळखळत वाहत असतात, हिमाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर रानफुलं डुलत असतात. आकाश निरभ्र आणि निळंभोर असतं. रात्रीच्या अंधारात दूधगंगासुद्धा डोळ्याला दिसू शकते.
या खोऱ्यातल्या कारगिल जिल्ह्यातली मुलं इथल्या पर्यावरणाशी अगदी एकरुप झालेली आहेत. २०२१ साली ताइ सुरू गावात मी हे फोटो काढले. इथल्या मुली कातळांवर चढतात, उन्हाळ्यात फुलं गोळा करतात, किंवा हिवाळ्यात बर्फाचे गोळे. आणि ओढ्यांमध्ये उड्या मारतात. जवाच्या शेतात खेळणं हा उन्हाळ्यातला त्यांचा सगळ्यात आवडता खेळ.
पर्यटकांची गर्दी असलेल्या लेहपासून कारगिल खूप दूर आहे आणि दुर्गम. लडाख जिल्ह्याचे हे दोनच जिल्हे आहेत.
अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की कारगिल काश्मीर खोऱ्यात आहे, पण मुळीच नाही. काश्मीरमध्ये सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे पण कारगिलमध्ये मात्र शिया इस्लामचा प्रभाव जास्त दिसून येतो.
सुरू खोऱ्यातल्या मुसलमानांसाठी कारगिल शहराच्या दक्षिणेकडे ७० किलोमीटरवर असलेल्या ताइ सुरू गावाचं धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. इथले लोक इस्लामी नववर्षाचा पहिला महिना मुहर्रम म्हणजे पैगंबराच्या नातवासाठी इमाम हुसैनसाठी शोक करण्याचा काळ असल्याचं मानतात.
मुहर्रममध्ये पाळण्यात येणाऱ्या अनेक विधींमध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघंही सहभागी होतात. वेगवेगळ्या दिवशी जुलुस किंवा दस्ता काढतात. यातल्या सर्वात मोठा जुलूस अशुरा म्हणजेच मुहर्रमच्या दहाव्या दिवशी निघतो. याच दिवशी हुसैन आणि त्याच्या सैन्याचं करबलामध्ये शिरकाण करण्यात आलं असं मानलं जातं. काही तरुण स्वतःला साखळी आणि पात्यांनी वार करून घेतात (कमा जानी) आणि सगळेच आपला ऊर बडवतात (सीना जानी).

सुरु खोऱ्यात कारगिल शहराच्या दक्षिणेला ७० किलोमीटरवर असणाऱ्या ताइ सुरू गावात ६०० लोक राहतात. कारगिल जिल्ह्याच्या ताइफुसुरू तालुक्याचं हे प्रशासकीय ठिकाण आहे
अशुराच्या आदल्या दिवशी स्त्रिया मस्जिदीपासून इमामबाड्यापर्यंत जुलूस काढतात आणि पूर्ण वाटेत मरसिया आणि नोहा (आक्रोश आणि विलाप) म्हणतात. या वर्षी अशुरा ७-८ ऑगस्ट रोजी येत आहे.
मुहर्रमदरम्यान इमामबाड्यात दिवसातून दोनदा मजलिस (धार्मिक संमेलन) होते. त्यामध्ये हुसैन आणि सोबत असणाऱ्यांचा संघर्ष आणि त्यागाच्या स्मृती जागवल्या जातात. इमामबाड्यात स्त्रिया आणि पुरुषांसाठी बसायला वेगवेगळ्या जागा असतात. पुरुष (आणि मुलगे) आणि स्त्रिया करबलाच्या युद्धाची आणि संबंधित संघर्षाची कथा आगाच्या तोंडून ऐकत असतात.
पण याच सभागृहाच्या वरच्या मजल्यावर जाळीच्या खिडक्या असणारा एक छज्जा आहे आणि तिथे मुलींनी ठाण मांडलंय. खाली काय चाललंय ते इथून अगदी छान दिसतं. याला म्हणतात, ‘पिंजरा’. बंदिस्त, घुसमट होणारी जागा असा जरी यातून अर्थ निघत असला तरी मुलींना मात्र ही जागी मजा करण्याची मोकळीक देते.
एक क्षण असा येतो की इमामबाड्यात विलाप अगदी टोकाला पोचतो, सगळं वातावरण एकदम गंभीर होतं. आणि मग या मुली देखील माना झुकवून रडू लागतात. पण काहीच क्षण. जास्त नाही.
मुहर्रम हा शोक व्यक्त करण्याचा महिना जरी असला तरी मुलांच्या जगात मात्र हा महिना म्हणजे त्यांच्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा काळ असतो. अगदी रात्री उशीरापर्यंत. काही तरुण मुलं स्वतःवर वार करू घेत असले तरी मुलींना मात्र यामध्ये भाग घ्यायला मनाई आहे. मुलींचं काम म्हणजे बाकी लोक काय करतात हे पाहणं.
बहुतेक वेळा काय होतं, लोकांना वाटतं मुहर्रम म्हणजे स्वतःवर वार करू रक्त काढत जाणाऱ्या तरुणांचे जुलूस. पण शोक किंवा विलाप करण्याची बायांची वेगळी रीत आहे – शांत पण दुःखावेगाने भरलेली.

जन्नत जवाच्या शेतात खेळतीये. ताइ सुरूतल्या मुलांचा हा आवडता खेळ आहे

जन्नत (डावीकडे) आणि आरचो फातिमा शेतातल्या रानफुलांच्या ताटव्यात बसल्या आहेत

सकाळी शाळा, संध्याकाळी मस्ती आणि अभ्यास. शनिवार-रविवारी मात्र छोट्या छोट्या सहली. इथे ११ वर्षांची मोहदिस्सा अशाच एका सहलीत ओढ्यात खेळतीये

लडाखच्या ताइ सुरू गावात दोघी मुली हा कातळ चढून जातयात. इथल्या मुलांचं त्यांच्या पर्यावरणाशी अगदी जवळचं नातं आहे

२०२१ साली मुहर्रमच्या महिन्यात १० वर्षांची हाजिरा आणि ११ वर्षांची झारा बतुल हाजिराच्या घरी एकत्र अभ्यास करतायत. अभ्यास झाला की त्या इमामबाड्याच्या दिशेने निघतील

१६ ऑगस्ट २०२१ रोजी गावातल्या इमामबाड्यात पुरुष सीना झानी म्हणजेच ऊर बडवून घेतायत. इमामबाड्यात एक काळं कापड बांधून स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळी जागा तयार केलीये

मुली वरच्या छज्ज्यावरच्या पिंजऱ्यातून खाली काय चाललंय ते पाहतायत. एका बाजूला खाली विधी सुरू आहेत पण या मुलींना मात्र वरती खेळण्याची मोकळीक मिळालीये

ञगास्ट २०२१ मध्ये मुहर्रमसाठी सगळे गोळा झालेत आणि या मैत्रिणी पिंजऱ्यामध्ये गप्पा मारतायत

या तिघी मैत्रिणी एकमेकींसोबत तोंडातून फुगे फुगवतायत

१२ आणि १० वर्षं वय असलेल्या दोघी मुली व्हिडिओ गेम खेळण्यात मग्न आहेत. बाकीच्या मुलांसारखं ताइ सुरीमधल्या मुलांना सुद्धा टीव्ही आणि समाजमाध्यमांचं वेड आहे. या गावात काहीच ठिकाणी इंटरनेट चालतं, तरीही

इमामबाड्याच्या भिंती चढण्याचा उद्योग सुरू आहे. कुणी पकडलं तर ओरडा बसणार

इमामबाड्याबाहेर एक मुलगी मोठ्या कुणाचं लक्ष नाही हे पाहून खेळतीये आणि व्हिक्टरीची व्ही ही खूण करतीये

अशुराच्या रात्री स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळे जुलूस काढतात. त्यानंतर स्त्रिया नोहा म्हणतात ते मुलं पाहतायत. मुहर्रमच्या १० व्या दिवशी हा विधी केला जातो, करबलाच्या युद्धात इमाम हुसैनचं शिरकाण करण्यात आलं त्याबद्दल अनुयायी विलाप करतात

१९ ऑगस्ट २०२१ रोजी अशुराच्या दिवशी प्रांती गावातल्या स्त्रिया जुलूस काढून ताइ सुरूच्या दिशेने निघाल्या आहेत

ऑगस्ट २०२१ मधील अशुराच्या दिवशी पुरुषांचा जुलूस

पुरुषांचा जुलूस निघालाय आणि मुली पटपट पाय उचलत त्यांच्या वेगाने जाण्याचा प्रयत्न करतायत

ताइ सुरूतल्या काही मुली मरसिया म्हणतायत आणि अशुराच्या दिवशी सीना झानी म्हणजेच ऊर बडवून घेतायत

अशुराचा शेवट झामपानने होतो. गावातल्या खुल्या मैदानात मेणा नेला जातो, अशाच मेण्यात बसून इमाम हुसैन यांची बहीण झैनब करबलाला गेली अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मैदान म्हणजे उमय्यद खलिफ, याझिदच्या सत्तेविरोधातील युद्ध जिथे झालं ती युद्धभूमी, कत्ल-इ-गाह असल्याचं मानलं जातं

मुली कत्ल-इ-गाहपाशी खेळतायत

अशुराच्या दिवशी सगळं गाव कत्ल-इ-गाहमध्ये झालेल्या करबलाच्या युद्धाचा प्रसंग उभा करतं

ऑगस्ट २०२१ मध्ये अशुरानंतर दोन दिवसांनी ताइ सुरूमध्ये निघालेला जुलूस

अशुरानंतर दोन-तीन दिवसांनी इमाम हुसैनच्या कबरीचं प्रतीक असणारा ताबूत गावातून जात असताना ताइ सुरूतल्या स्त्रिया शोक करतायत

सप्टेंबर २०२१ मध्ये जुलूस निघाला त्यानंतर ताइ सुरू गावातले रहिवासी एकत्र प्रार्थना करतायत. मुहर्रमनंतर येणाऱ्या सफर या महिन्यापर्यंत करबलामध्ये मारल्या गेलेल्या योद्ध्यांच्या मृत्यूचा शोक केला जातो.
अनुवादः मेधा काळे