“एवढ्यान संतापलेली नदी मी माज्या जन्मात नाय पायली,” ५५ वर्षांच्या सकुबाई वाघ सांगतात. त्या दिवशी, ४ ऑगस्टला, सकाळी १० वाजताच्या दरम्यान, त्या आणि त्यांचा २० वर्षांचा मुलगा मनोज घरातच होते. “बायर लयच पाऊस व्हता,” त्या आठवून सांगतात. “यकदमच पान्याची मोट्टी लाट आत आली. मानंपरत पान्यात व्हतो बराच वेल, एकमेकांचा हात धरून. थोड्या वेलान, सगलं वाहून गेलं, राबून कमावलेलं, सांभाललेलं, सगलंच.”
हादरवून सोडणाऱ्या अंदाजे २० मिनिटांनंतर, सकुबाई आणि मनोज पाण्यात हात-पाय मारत थोड्या उंच ठिकाणी येऊन पोहचले, तिथून त्यांना पुरामुळे झालेला विध्वंस दिसत होता. त्या सकाळी, महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील गातेस खुर्द गावात वैतरणा नदीच्या पाण्यानं, सुकुबाई आणि इतर २४ जणांच्या झोपड्या जमीनदोस्त केल्या. संध्याकाळी पाणी हळुहळु ओसरू लागलं.
“बघा, माझा संसार,” नदीकाठी कोसळून पडलेलं त्यांचं झोपडं दाखवत सकुबाई म्हणाल्या. चिखलाने माखलेल्या जमिनीवर तुटलेल्या खापऱ्या एकावर एक रचून ठेवल्यात, छप्पर आणि भिंतीचा बांबूचा सांगडा आणि फाटून पडलेली ताडपत्री आहे. बरेच दिवस चिखलात पडलेला तांदूळ, कांदा आणि बटाट्याचा कुजकट वास हवेत भरून राहिला आहे. “वास सहन नाय व्हत, लय मलमलून आजारीसारखं वाटतं,” सकुबाई सांगतात.


मनोज वाघ आपल्या कोसळलेल्या घराच्या मध्यात उभा आहे. उजवीकडे : त्याचे वडील परशुराम कुटुंबाचं पोट भरणारा, आता पाण्यानी सडलेला तांदूळ दाखवत आहेत
पुराच्या दहा दिवसांनंतर, १३ ऑगस्ट रोजी, सकुबाईंचे पती परशुराम, ५८, यांनी ॲल्युमिनिअमच्या डब्यात शिल्लक राहिलेला सडलेला तांदूळ मला दाखवला. “माज्या परिवाराचा येका महिन्याचा रासन व्हता हा. आमचं मतदान कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, भांडी, कपडे – सगलाच गेला,” ते सांगतात. “ह्या तीन गोधड्या रायल्यात.” त्या गोधड्या आता त्यांनी दोरीवर वाळण्यासाठी ठेवल्या आहेत.
“आमी काय नदीजवलच राहतो, वरसाला पावसाळ्यात पानी वाडतं,” परशुराम सांगतात. “दारापतर येतं, पन आत शिरत नाय आणि परत कमी व्हतं तासानं. फक्त २००५ मदी, पानी आत शिरलं व्हतं, गुडघ्यापर्यंत. झोपडं नाय तुटलं. या वरीस बेकार झाला.”
परशुराम आणि सकुबाई कातकरी आदिवासी आहेत - महाराष्ट्रात या समाजाची विशेषत: बिकट आदिवासी गट म्हणून नोंद आहे. शेतमजुरी करून ते दिवसाला १५० रुपये कमवतात. त्यांचं झोपडं कोसळल्यानंतर, ते सर्व जण सकुबाईंच्या भावाकडे राहायला गेले, जे याच गावाच्या पलिकडच्या बाजूला राहतात. गातेस खुर्द गावाच्या मधूनच वैतरणा नदी वाहते, बहुतेक पक्की घरं नदीच्या पूर्वेकडे आहेत, तिथे पुराचा फारसा परिणाम दिसत नाही. गावाची लोकसंख्या ८८१ असून त्यातील २२७ जण अनुसूचित जमातीत मोडतात (जनगणना, २०११).


कविता भोईर यांनी पुरातून वाचलेली उरली-सुरली भांडी घेऊन स्वयंपाकघर लावून घेतलं आहे. उजवीकडे : त्यांना आता संपत चाललेल्या राशनचा घोर लागला आहे
“आमच्याकडं तर काय जमीन नाय. जे काय कमावतो ते मजुरीतूनच,” ३५ वर्षांच्या कविता भोईर सांगतात, त्यांचं झोपडं जवळच आहे. “जून-जुलायमदे २०,००० कमवले दोघांनी मिलून [त्या आणि त्यांचे पतींनी मिळून, दिवसाला २००रुपये मजुरीने ५० दिवस शेतात काम केलं]. पेरणी संपल्यावर यवढी मजुरी नाय ना देत कोनी. १०,००० जपून डालीच्या डब्यात ठेवलो होतो. गरजेच्या वेलेस वापरायला. आता कायच नाय...”
कविता आणि केशव तिच्या भावाच्या गावात त्याला रानात मदत करायला गेले होते. “आमाला ते दिवस फोन आला की पूर आलाय,” त्या म्हणाल्या. “दुसरे दिवस आलो तर कुडाची एक भित कोसलून पली व्हती. खुट्ट्यापतर चिकल व्हता.” भोईर यांना दोन दिवस लागले संपूर्ण चिखल बादलीतून घराबाहेर टाकायला आणि घरात उरल्या सुरल्या वस्तूंनी घर पुन्हा लावायला. कपड्यांची एक पिशवी, प्लॉस्टिकचे डब्बे, स्टीलचा डबा, २-३ ताटं, काही चादरी – असं सगळंच चिखलानं माखलेलं होतं. “ज्ये मागं राहिलं त्येच धून वापरायला सुरूवात केली. माज्या मुलाचं पुस्तक पन भिजलं व्हतं, त्ये चुलीवर सुकवलं मी,” पुरात सगळीच भांडी वाहून गेल्यानं कविता त्यांच्या रिकाम्या झालेल्या मांडणीकडे पाहत सांगतात.
“पंचायतच्या लोकांनी आनी कायी समाज सेवकांनी रासन दिलं. पण तालुका आफिसातून अजून काय कोनी आलेलं नाय पंचनाम्याला आणि काय पैसे पन नाय मिळालेत,” केशव सांगतात. “आमची लोकं इते पिढ्यांपासून राहतात,” कविता म्हणते. “सरकारनं आमाला सुरक्षित जागा दिली पाहिजे. परत पूर आला तर काय करायचं?”
५ ऑगस्टला, पुर ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी, गातेस खुर्द गावातल्या पंचायतीनं पाच किलो तांदूळ, पाच किलो गव्हाचं पीठ, दोन किलो डाळ, दोन किलो साखर, २५० ग्राम चहा पावडर, अर्धा किलोच्या गोड तेलाच्या दोन पिशव्या, मिठाचा एक पुडा आणि थोडं लाल तिखट-हळद असं प्रत्येकी बाधित झालेल्या २५ कुटुंबांमध्ये वाटप केलं. “दिलेला सगला रासन संपत आलाय,” कविता सांगतात.


पुरानंतर गातेस खुर्द गावाला लागून वाहणारी वैतरणा नदी. उजवीकडे : तीच वैतरणा नदी, ऑगस्ट महिन्यात – पुराच्या दिवशी
४-५ ऑगस्टला पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका वाडा तालुक्यातल्या ५७ गावांना बसला, तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे माहिती देतात. ते सांगतात, यापैकी गातेस खुर्द, बोरांडे, कारंजे, नाने आणि गोऱ्हे ही वैतरणा नदीकिनारी वसलेली गावं सर्वाधिक बाधित झाली. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान पालघर जिल्ह्यात ७२९.५ मिलीमीटर इतका पाऊस पडला – या आठवड्यात सामान्यपणे पर्जन्यमान २०४ मिलीमीटर असतं.
गातेस खुर्द गावापासून जवळजवळ ७ किलोमीटर अंतरावर असणारं बोरांडे, हे १२६ कुटुंबाचं आणि ४९९ रहिवाशांचं गावसुद्धा (२०११ च्या जनगणनेनुसार) ४ ऑगस्टला संपूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं. गावातल्या घरांची फक्त छप्परं आणि विजेचे खांब दिसत होते. इथल्या प्रत्येक सिमेंटच्या घराच्या भिंतींवर पुराच्या पाण्याच्या पातळीची निशाणी दिसते, तर कुडाचे छप्पर असलेली कच्ची घर कोसळून पडून गेलीत.
“सकाली ६ ची वेल होती. आमी झोपलेलो, अंथरुणाखाली पाणी लागलं. डोलं उघडले तर घरात सगलीकडं पानी. बायका पोरांना लगेच उटवलं आन् जीव वाचवून पलालो. मग मोठी लाटच शिरली घरात. सगलाच वाहून गेला, काय वाचवायला जमला नाय,” ४५ वर्षांचे अनिल राजकवर सांगतात. “सगलीकडे पानीच पानी, सगले घरातून बाहेर आले होते, कंबरेपर्यंत पानी व्हतं. सगले ओरडत व्हते, रडत व्हते...”
अनिल, त्यांची ३२ वर्षीय पत्नी पार्वती आणि त्यांची दोन मुलं किमान अर्धा तास इतर गावकऱ्यांसह गावाबाहेरच्या मोकळ्या जागेच्या दिशेने चालत राहिली. बहुतेक जण गावाबाहेरच्या पत्र्याच्या गोदामात दोन दिवस राहिले, पाणी कमी व्हायची वाट पाहत. अनिल आणि पार्वती वर्षाचे आठ महिने १५० रुपये रोजाने शेतमजुरी करतात. गावातल्या १०२ बाधित कुटुंबांना मदत दिली असल्याचं तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी सांगितलं, तरी अनिल सारखी काही कुटुंबं अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.


मयुरी हिलम आणि तिचा भाऊ त्यांच्या घरासमोर उभे आहेत, जिथे घराची भिंत कोसळली आहे. उजवीकडे : अनिल राजकवर त्यांच्या कोसळलेल्या झोपड्यापाशी उभे आहेत
“सुदैवानं, बोरांडे गावातले सगले सुरक्षित होते. त्या गोदामात दोन दिवस रायलो. काही समाजसेवकांनी जेवन-पानी दिलं. पाणी ओसरायला लागल्यावर, आमी परत आलो आपल्या-आपल्या घरी. सगला चिखल होता. घराची एक भिंत कोसलली होती,” ३२ वर्षांच्या मयुरी हिलम सांगतात. त्या जून-सप्टेंबर दरम्यान १५० दरदिवस मजुरीवर शेतात काम करतात मग त्या त्यांच्या कुटुंबासहित गावापासून ७० किलोमीटर लांब डहाणू तालुक्याला, कामासाठी वीट भट्टीवर जातात.
“३ ऑगस्ट आणि ४ ऑगस्टला, वाडा तालुक्यात दोन दिवस ४०० मिलीमीटर पाऊस पडला. परिणामी वैतरणा नदीला पूर आला. ४ ऑगस्टला समुद्रात भरती होती, यामुळे नदीचं अतिरिक्त पाणी समुद्र घेत नव्हता, मग हे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरलं,” तहसीलदार दिनेश कुऱ्हाडेंनी सांगितलं. “तालुक्यात पुरामुळे या दोन दिवसांत नागरिक आणि प्राण्यांची कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बाधित गावांमध्ये मदत पोहचवण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे.”
वैतरणा नदीतलं पाणी आता शांत वाहतंय. पण सकुबाईंना अजूनही एकच चिंता सतावतेय. “नदी पुन्हा संतापली तर?” त्या विचारतात.

गातेस खुर्द गावातील कातकरी आदिवासी, पुरात त्यांची घरं आणि संसार सगळंच वाहून गेलं
अनुवादः ज्योती शिनोळी