“हे घोडे आमच्यासाठी घरातल्यांसारखेच आहेत. गरज पडेल तेव्हा मीच त्यांचा डॉक्टर होतो आणि मुंबईहून त्यांची औषधं मागवून घेतो. ते आजारी असले की मीच त्यांना इंजेक्शन देतो. त्यांना आंघोळ घालणं, त्यांची स्वच्छता ठेवणं सगळं मी करतो.” मनोज कासुंडेंचं त्यांच्या घोड्यांवर फार प्रेम आहे. माथेरानमध्ये घोड्यावर पर्यटकांची ने आण करणाऱ्या परवानाधारक घोडवाल्यांपैकी ते एक. पर्यटकांना घोड्यावर बसवून त्यांच्या बरोबर हे घोडेवालेदेखील रोज माथेरानच्या या घाटवाटा चढत-उतरत असतात.
या जगात असे अनेक कासुंडे आहेत, जे कुणाच्याही गणतीत नाहीत - ज्यांच्याबद्दल आपल्याला क्वचितच काही माहित असतं. कारण आपण काही विचारतच नाही. मुंबईपासून ९० किलोमीटरवर असलेलं रायगड जिल्ह्यातलं हे पर्यटकांचं आवडतं थंड हवेचं ठिकाण, माथेरान. इथे तब्बल ४६० घोडे काम करतात. त्यांचे चालक (सगळे काही मालक नाहीत) आम्हाला सांगतात की “त्यांना रोज जवळ जवळ २०-२५ किलोमीटरची चढण चढावी लागते.” ओझ्याखाली नक्की घोडा आहे, घोडावाला आहे की दोघं हाच खरं तर प्रश्न पडावा.

‘हे घोडे आमच्यासाठी घरातल्यांसारखेच आहेत’, इति मनोज कासुंडे
माथेरानच्या आतल्या भागात वाहनांना प्रवेश नाही – जिथे वाहनतळ आहे त्या दस्तुरीपासून माथेरानचा मुख्य बाजार तीन किलोमीटरवर आहे. ११ किलोमीटरवर असलेल्या नेरळपासून एक फुलराणी (नॅरो गेज रुळांवर धावणारी गाडी) माथेरानपर्यंत धावत असे. मात्र दोनदा ही गाडी रुळांवरून घसरली आणि २०१६ च्या मेपासून ती थांबवण्यात आली. त्यामुळे दस्तुरीपासून तुम्हाला माथेरानला एक तर चालत जावं लागतं, हातरिक्षांमध्ये बसून जावं लागतं किंवा घोडा करावा लागतो. म्हणूनच इथे हा घोड्यांचा, घोडेवाल्यांचा, रिक्षांचा आणि हमालांचा ताफा कायम सज्ज असतो.
शिवाजी कोकरेंच्या घोड्यांच्या नावाचे – राजा, जयपाल आणि चेतक – स्वतःचे परवाने आहेत. त्यांच्या मालकाच्या परवान्यावर त्यांचे फोटो आहेत. स्थानिक पोलिस मालकांना हे परवाने देतात. परवान्याच्या मागच्या बाजूला नोंद केलेल्या घोड्याचा फोटो असतो. ज्याच्याकडे तीन घोडे आहेत, त्याच्या परवान्यावर तीन घोड्यांचे फोटो आहेत.
“हा व्यवसाय आमच्या घरातच आहे,” शिवाजी कोकरे सांगतो. राजा,
जयपाल आणि चेतक माझ्या भावाच्या, गणेशच्या मालकीचे आहेत. तो माथेरानला राहतो.

राजा, जयपाल आणि चेतकबरोबर शिवाजी कोकरे
विशीतला असणारा शिवाजी पर्यटकांना घोड्याची सफर व्हावी यासाठी जवळ जवळ रोज नेरळच्या धनगरवाड्यापासून दस्तुरीला येतो. गेले पाच वर्षं तो हे करतोय असं त्यानं सांगितलं. पर्यटकांच्या संख्येप्रमाणे शिवाजी हे तिन्ही किंवा त्यातला एखादा घोडा घेऊन माथेरानच्या घाटवाटांवरून पर्यटकांची ने आण करतो. कधी कधी तो पर्यटकांना घोड्यावर बसवून माथेरानच्या वेगवेगळ्या भागात घोड्यांसोबत सगळा चढ अक्षरशः पळून काढतो. त्याचा अख्खा दिवस या गावाच्या लाल मातीने भरलेल्या रस्त्यांवर जातो. पावसाळ्यात हेच रस्ते लाल चिखलाने माखलेले असतात.
भर हंगामात किंवा शनिवार-रविवारी कोकरेंच्या किमान ३-४ खेपा होतात. एरवी जरा कमी काम मिळतं. दस्तुरीला एक दर पत्रक लावलेलं आहे. किती अंतर जायचंय, किती ठिकाणी थांबायचंय आणि किती वेळ घोडा करायचाय यावर घोड्याच्या सफरीचे दर अवलंबून असतात. गर्दी असेल त्या दिवशी एका घोड्याचा दीड हजाराचा किंवा जास्तही धंदा होतो. अर्थात यात घोडा मालक, चालक आणि घोड्याच्या देखभालीवर होणारा खर्च असे वाटे असतात.
मनोज कासुंडे आता ४६ वर्षांचे आहेत. गेली ३० वर्षं ते घोडे चालवतायत. त्यांचे दोन घोडे आहेत – एकदम पांढरा शुभ्र असणारा स्नोबॉय आणि विटकरी रंगाचा फ्लफी. पूर्ण ढवळ्या रंगाचे घोडे महाग असतात आणि “त्यांची किंमत एक ते सव्वा लाख पडते,” ते सांगतात. प्रत्येक घोड्यामागे कासुंडेंची दिवसाला १००० रुपयांची कमाई होते. पण जर का स्नोबॉय किंवा फ्लफी आजारी असतील, त्यांना काम होणार नसेल तर त्यांच्या देखभालीवर, उपचारांवर त्यांना रु. ५००० ते रु. १५,००० इतका खर्च करावा लागतो. दोन्ही घोड्यांचा महिन्याचा देखभालीचा खर्चच १२,००० ते १५,००० पर्यंत येतो.
कासुंडे माथेरानच्या पंचवटी नगरमध्ये राहतात. ४०-५० घरांची ही छोटीशी वस्ती आहे. त्यांच्या घरी त्यांची पत्नी, आई-वडील, २१ वर्षांची मुलगी, तिचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं आहे आणि १९ वर्षांचा मुगला जो सध्या १२ वीत आहे, असा सगळा परिवार आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत ते स्नोबॉय आणि फ्लफीला मुख्य बाजारात घेऊन येतात. त्या आधी त्यांना गवत आणि बाजरीचे रोट किंवा गव्हाचा कोंडा असा खुराक दिला जातो. संध्याकाळी ७ नंतर ते घोडे तबेल्यात नेऊन बांधतात. “संध्याकाळचं त्यांचं खाणं म्हणजे रोट्या किंवा बिस्किटं किंवा गाजरं. खाणं झालं की ते झोप काढतात.”
घोड्यांना लागणारा खुराक विकत घ्यायची जागा म्हणजे माथेरानचा रविवारचा बाजार. आसपासचे आदिवासी बाजारात वेगवेगळ्या गोष्टी विकायला आणतात. त्यात जवळच्या डोंगरातनं आणलेलं हिरवं गवतही असतं. नेरळचे दुकानदार घोड्यांसाठीचा खुराकही बाजारात विक्रीसाठी पाठवतात.
“पंधरा वर्षांआधी माथेरान याहून फारच सुंदर होतं,” कासुंडे सांगतात. “त्या काळात घोड्याच्या एका सफरीचे आम्हाला जास्तीत जास्त १०० रुपये मिळायचे, तरी ते दिवस आतापेक्षा बरे होते.”
माथेरानच्या हॉटेल्सचा चेक आउट टाइम सकाळी ९ ते दुपारी १२ असा वेगवेगळा असतो. त्यावर घोडेवाले आणि सोबतच हमाल आणि हातरिक्षाचालकांच्या कामाच्या वेळा अवलंबून असतात. हॉटेलच्या चेक आउट टाइमच्या आधीच बराच वेळ ते दरवाजापाशी थांबून राहतात, दस्तुरीला जाणारं कुणी भाडं मिळतंय का ते पाहत.

शांताराम कावळे राजासोबतः ‘घरबसल्या नुसतं खाटेवर बसून कुणालाही पैसा कमवता येत नाही,’ ते म्हणतात. खालीः त्यांचं ओळखपत्र आणि मागच्या बाजूला राजाचं

यातलेच एक ३८ वर्षांचे शांताराम कावळे. पुणे जिल्ह्याच्या कळकराई गावचे रहिवासी, आणि त्यांचा घोडा, राजा. कावळे पहाटे ३.३० ला उठतात, राजाला खाऊ घालतात. जर लवकरचं भाडं असेल तर ते पहाटे ५.३० लाच हॉटेलपाशी येऊन थांबतात. एरवी ते राजाला घेऊन ७ वाजेपर्यंत बाजारात पोचतात. पुढचे १२ तास दोघांनाही काम असतं. “घरबसल्या नुसतं खाटेवर बसून कुणालाही पैसा कमवता येत नाही,” ते म्हणतात. “तुम्ही घर सोडलंत तरच तुमचा धंदा होणार ना...”