टक्-टक्-टक्!
हा लयबद्ध आवाज कोडावटीपुडी येथील ताडपत्री झाकलेल्या एका झोपडीतून येत आहे. मुलमपका भद्रराजू चेक्का सुट्टी, म्हणजेच एक लहान पॅडल सारख्या लाकडी हातोडीचा वापर करून एका माठाला गोल आकार देत आहेत.
“जाड चेक्का सुट्टी भांड्याचं बूड बंद करण्यासाठी. ही नेहमीच्या वापरातली
हातोडी माठाचं बूड अधिक गुळगुळीत करण्यासाठी वापरली जाते. सर्वांत बारीक चेक्का
सुट्टी सगळा माठ वरून गुळगुळीत करण्यासाठी असते,” ७० वर्षीय भद्रराजू स्पष्ट करून सांगतात.
गरजेप्रमाणे ते हवी ती चेक्का सुट्टी वापरतात.
ते सांगतात की नेहमीच्या वापरातली आणि बारीक
चेक्का सुट्टी ताडाच्या झाडाच्या (बोरासस फ्लेबेलिफर) फांद्यांपासून आणि सर्वात
जाड चेक्का सुट्टी अर्जुनाच्या लाकडापासून (टर्मिनालिया अर्जुना) बनवली जाते. ते
सर्वात बारीक चेक्का सुट्टीने माठावर थापटायला लागल्यावर लय आणि आवाज मंदावतो.
२० इंच व्यासाच्या माठाला आकार देण्यासाठी त्यांना सुमारे १५ मिनिटे लागतात. एखादी बाजू चुकून तुटली किंवा फुटली, तर ते चिकणमाती घालून आणि थापटून ती बाजू जुळवून सारखी करून घेतात.


मुलामपाका भद्रराजू (डावीकडे) चेक्का सुट्टी वापरून माठ बाहेरून गुळगुळीत करत आहेत. राखेच्या वाडग्याचा (उजवीकडे) वापर त्यांचा हात ओल्या भांड्याला चिकटू नये यासाठी होतो
१५ वर्षांचे असल्यापासून भद्रराजू कुंभारकाम करत आहेत. ते अनकापल्ली जिल्ह्यातील कोडावटीपुडी या गावात राहतात आणि तिथेच काम करतात. आंध्रप्रदेशातील इतर मागासवर्गीय जातीमध्ये (OBC) समाविष्ट असलेल्या कुंभार समाजाचा ते भाग आहेत.
वयाच्या सत्तरीतल्या या कुंभाराने १५ वर्षांपूर्वी १,५०,००० रुपये देऊन दीड एकर जमिन विकत घेतली होती. त्यांच्या कुंभारकामासाठी लागणारी माती त्यांना या जमिनीवरील तलावातून मिळते. दरवर्षी ते १,००० रु. देऊन शेजारील कटौरतला गावच्या वाळू, माती आणि खडी पुरवठादाराकडून ४०० किलोग्राम इरा माती (लाल चिकणमाती) त्यांच्या प्लॉटमध्ये वितरित करून घेतात.
त्यांनी नारळ व ताडाच्या झाडाच्या पानांचा आणि ताडपत्रीचा छपरासाठी वापर करून त्यांच्या जमिनीवर दोन झोपड्या बांधल्या आहेत. ही जागा झाकलेली असल्याने पावसाळ्याच्या दिवसांतही त्यांना कामात व्यत्यय न आणता वर्षभर काम करता येते.
एका झोपडीत ते माठ तयार करतात आणि त्यांना आकार देतात; छोट्या झोपडीत ते त्या मडक्यांना भाजतात. "जेव्हा आमच्याकडे २०० ते ३०० मडकी असतात, तेव्हा आम्ही ते कोरड्या लाकडाच्या पलंगावर भाजतो," जी लाकडं ते जवळच्या मोकळ्या मैदानातून गोळा करतात. “ते माठ झोपडीतच सुकतात,” ते पुढे सांगतात.
या जमिनीचे पैसे त्यांनी आपल्या साठवलेल्या पैशांतून दिले आहेत. “स्थानिक बँकांनी मला कर्ज दिले नाही. मी त्यांना यापूर्वी अनेकदा विचारले आहे, पण मला कोणीही कर्ज दिले नाही.”
त्यांना सावकारांसोबत व्यवहार करणे पसंत नाही कारण त्यांच्या कामाचे उत्पादन अनिश्चित असते. प्रत्येक १० भांडी बनवताना १ ते २ भांडी तर तुटून जातात. झोपडीच्या कोपऱ्यात भेगा पडलेल्या डझनभर भांड्यांकडे बोट दाखवत ते म्हणाले, "सर्व भांडी नीट सुकत नाहीत, वाळवताना भांड्यांचा काही भाग तुटतोच."


हे कुशल कुंभार दिवसाला सुमारे २० ते ३० भांडी घडवू शकतात
एक संपूर्ण माठ बनविण्यास त्यांना साधारणतः एक महिना लागतो. दिवसाचे ते जवळपास १० तास काम करतात. “माझ्या पत्नीने मदत केली तर आम्ही दिवसाला २०-३० माठ देखील घडवू शकतो,” ते म्हणतात आणि त्यांचे थापटणे सुरु ठेवतात. महिन्याच्या शेवटी एकूण अंदाजे २०० ते ३०० माठ तयार होतात.
तीन मुली, एक मुलगा आणि पत्नी असे सहा जणांचे त्यांचे
कुटुंब आहे आणि सर्वांचे हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. "यातूनच" ते
ठामपणे सांगतात, घरखर्च आणि त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी पैसे उभे केले आहेत.
भद्रराजू आपले माठ विशाखापट्टणम आणि राजमुंद्री येथील घाऊक विक्रेत्यांना विकतात, ते दर आठवड्याला येतात आणि गावातील अंदाजे ३० कुंभारांकडून माठ घेऊन जातात. विविध कारणांसाठी माठ बाजारात विकले जातात: “जसे स्वयंपाकासाठी, वासरांना पाणी पाजण्यासाठी, इतर गरजा भागवण्यासाठी,” कुंभार म्हणतात.
"विशाखापट्टणमचे घाऊक विक्रेते एक मडके १०० रुपये प्रति नग
या दराने विकत घेतात, तर राजमुंद्रीचे विक्रेते तेच १२० रुपये प्रति नगने विकत
घेतात," भद्रराजू म्हणतात आणि "जर सर्व काही ठीक झाले तर मला एका महिन्याला ३०,००० रुपये मिळू शकतात" ते पुढे म्हणतात.
भद्रराजू, दहा वर्षांपूर्वी गोव्यातील एका हस्तकलेच्या दुकानात कुंभार म्हणून काम करत होते. "इतर अनेक राज्यांतील लोक तिथे वेगवेगळ्या कलांमध्ये कामाला होते," ते म्हणतात. त्यांना प्रत्येक मडक्यासाठी रु. २०० - २५० मिळायचे. "पण तिथले जेवण मला काही योग्य वाटले नाही म्हणून मी सहा महिन्यांतच तेथून निघून आलो" ते पुढे म्हणतात.

मानेपल्ली यांनी पाच वर्षांपासून विजेवर चालणारे चाक वापरण्यास सुरुवात केली आहे
मानेपल्ली म्हणतात, "मला पोटात गेल्या ६- ७ वर्षांपासून अल्सर आहे." मानवी चाक फिरवताना त्याला वेदना होतात आणि स्वयंचलित विजेवर चालणारे चाक हे वेदनामुक्त असते. कुंभार समाजातील ४६ वर्षीय युवक तो किशोरवयीन असल्यापासून हे कुंभारकाम करत आहे.
काही मीटर अंतरावरच कामेश्वरराव मानेपल्ली
यांचे घर आहे, तेही कुंभार. येथे चेक्का सुट्टीच्या धडधडत्या आवाजाची जागा विजेवर चालणाऱ्या
चाकाच्या मंद चक्राकार आवाजाने घेतली आहे, ज्यामुळे चाकावरच मडक्याला आकार देता येतो.
गावातील सर्व कुंभार विजेवर चालणाऱ्या चाकांकडे
वळलेले आहेत. भद्रराजू हे एकमेव असे कुंभार आहेत जे अजूनही हाताने फिरणारे चाक
वापरतात आणि त्यांना विजेवर चालणाऱ्या चाकावर बदल करण्यात अजिबात रस नाही. ते
म्हणतात, “मी १५ वर्षांचा
असल्यापासून हे काम करत आहे,” ते पुढे म्हणतात की, त्यांना जास्त तास काम करण्याची सवय आहे.
मानेपल्ली, गावातील अनेक वृद्ध कुंभारांप्रमाणे, पाच वर्षांपूर्वी प्रकृती अस्वस्थ्य असल्यामुळे
आणि शस्त्रक्रियेमुळे विजेवर चालणाऱ्या चाकाकडे वळले, “माझ्या पोटात गेल्या ६-७ वर्षांपासून अल्सर आहे''. मानवी चाक फिरवताना
त्याला वेदना होतात आणि स्वयंचलित विजेवर चालणारे चाक हे वेदनामुक्त असते.
“मी १२,००० रुपयांना विजेवर चालणारे चाक विकत घेतले. ते खराब झाल्यानंतर, मला खादी ग्रामीण सोसायटीकडून आणखी एक चाक विनामूल्य मिळाले. मी आता त्यापासूनच मडकी बनवतो.”


डावीकडे: मानेपल्लीची मडकी भाजली जात आहेत. उजवीकडे: त्याने नुकतीच भाजून पूर्ण झालेली मातीची बाटली हातात धरली आहे
“लहान माठाची किंमत ५ रुपये आहे. जर त्यावर एखादे चित्र किंवा रंगरंगोटी रेखाटली तर त्याची किंमत २० आहे,” ते सांगतात, आणि ते फक्त सजावटीसाठी वापरले जातात. कुंभार समाजातील, 46 वर्षीय तरुण हे कुंभारकाम वडिलांसोबत किशोरवयापासून करत आहे. १५ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी एकट्यानेच काम सुरू ठेवले आहे.
मानेपल्ली हे सहा जणांच्या कुटुंबाचे एकमेव
कमावते आहेत, तीन मुलं, पत्नी आणि आई असे त्यांचे कुटुंब. “मी जर दररोज काम केले तर मी १०,००० रुपये महिन्याला कमावतो. मडकी जाळण्यासाठी
लागणाऱ्या कोळशाची किंमत सुमारे २,००० रुपये आहे. त्यानंतर माझ्याकडे फक्त ८,००० रुपये उरतात."
हा अनुभवी कुंभार त्याच्या अस्वस्थ प्रकृतीमुळे अनियमित तास काम करतो, अनेकदा पूर्ण दिवस काम बंद ठेवतो. "मी आणखी काय करू शकतो?" इतर काही काम करतो का असे विचारल्यावर तो म्हणतो, "माझ्याकडे हे एकमेव काम आहे."