मुलगा म्हणून मोठ्या होत असलेल्या रम्याला पाचवीत असताना आपण मुलगी आहोत हे ठळकपणे जाणवायला लागलं.
“शाळेत असताना अर्धी चड्डी घालायला लागायची आणि मांड्या दिसायच्या,” ती सांगते. “मुलांच्या मधोमध बसायचं, फार लाज वाटायची.” आज तिशी पार केलेली रम्या साडी नेसते, लांब केस ठेवते आणि एक स्त्री म्हणून असलेली आपली ओळख अगदी प्रेमाने जपते.
चेंगलपट्टु जिल्ह्यातल्या तिरुपोरुर गावी रम्या अम्मन म्हणजेच देवीच्या एका देवळाचं सगळं काम पाहते. आम्ही भेटलो तेव्हा तिची आई वेंगम्मा तिच्याशेजारी जमिनीवर बसलेली होती. “मोठा होत होता तेव्हा त्याला [रम्याकडे बोट दाखवत] चुडीदार, दवणी [अर्धी साडी] आणि कम्मल [कानातले] असं सगळं काही ल्यायला आवडायचं. आम्ही सारखं सांगायचो, जरा मुलग्यासारखा वाग. पण त्याची हीच इच्छा होती,” ५६ वर्षीय वेंगम्मा सांगतात.
कन्नीअम्माचं मंदीर भाविकांसाठी बंद झालंय त्यामुळे आम्हाला निवांत बोलता येतंय. रम्या आणि वेंगम्मासारखेच इरुलार समाजाचे भाविक दिवसभर कन्नीअम्माच्या पाया पडायला येत असतात.
रम्या चार भावंडांमधली एक. इरुलार वस्तीत लहानाची मोठी झाली. तमिळ नाडूमध्ये या समुदायाची नोंद पीव्हीटीजी म्हणजेच विशेष बिकट स्थितीतील आदिवासी समूह अशी करण्यात येते. तिचे आई-वडील इतरांप्रमाणेच मिळेल तशी मजुरी करायचे. शेतात, मनरेगावर, बांधकामावर काम करत दिवसाला २५०-३०० रुपये कमवायचे.
“त्या काळात कुणाला ‘तिरुनंगईं’बद्दल म्हणजेच पारलिंगी स्त्रियांबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. त्यामुळे घराबाहेर पडले की पाठीमागे लोक माझ्याबद्दल काही ना काही बोलायचे,” रम्या सांगते. “म्हणायचे, ‘हा पोराचे कपडे घालतो पण पोरीसारखा वागतो. हा नक्की पोरगा आहे का पोरगी?’ मला हे ऐकून त्रास व्हायचा.”


डावीकडेः तिरुपोरुर गावातल्या या मंदिराचं काम रम्या पाहते. उजवीकडेः आपली आई (काळ्या साडीत) आणि शेजारणीसोबत विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटायला निघालेली रम्या


डावीकडेः रम्या आणि तिची एक मोठी बहीण दीपा. उजवीकडेः एका फळबागेत मनरेगाच्या कामावर मजुरी करणारी रम्या
नववीत असताना रम्याने शाळा सोडली आणि आपल्या आई-वडलांसोबत ती मजुरीला जायला लागली. आपण मुलगी आहोत हे ती ठामपणे सांगायला लागली. त्या काळात आपण रम्याला सतत “मुलासारखं वाग” अशा विनवण्या करत असल्याचं वेंगम्मा सांगतात. समाजाचे लोक काय म्हणतील याची काळजी वाटायची.
विशी पार केली आणि मग मात्र रम्याने आपल्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे राहता यावं यासाठी घर सोडून जाण्याचा विचार बोलून दाखवला. तेव्हा मात्र तिची आई आणि दिवंगत वडील रामचंद्रन यांनी तिचं म्हणणं जरा गांभीर्याने ऐकायला सुरुवात केली. “आम्हाला चार मुलगे. मुलगी नव्हतीच. हिलाच मुलगी होऊ दे असा आम्ही विचार केला,” वेंगम्मा सांगतात. “मुलगा काय किंवा मुलगी, आपलंच लेकरु आहे ना. त्याला घर सोडून कसं जाऊ देणार?”
मग घरी असताना रम्याला स्त्रियांचे कपडे घालायला परवानगी मिळाली. मात्र पारलिंगी स्त्रियांबद्दलच्या पूर्वग्रहांमुळे वेंगम्मांनी रम्याला सांगून टाकलं, “नी कडई इरकूददु.” म्हणजे रम्याने पोटापाण्यासाठी बाजार मागायचा नाही.
“मी स्त्री आहे हे मला अगदी आतून वाटत असलं तरी बाहेरून सगळ्यांना मी एक पुरुषच दिसायचे. दाढी-मिशा आणि बाकी ठेवण पुरुषाचीच होती,” रम्या सांगते. २०१५ साली तिने लिंगनिश्चिती शस्त्रक्रिया करून घेतली, लेझर उपचारांद्वारे केस काढून टाकले. त्यासाठी आजवर साठवलेली सगळी गंगाजळी तिने खर्च केली.
तिरुपोरूरहून १२० किलोमीटर दूर असलेल्या पुडुचेरीमध्ये महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्थेत तिची शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी ५०,००० रुपये खर्च आला. हॉस्पिटल लांब होतं, मोफतही नव्हतं पण तिथला हा विभाग चांगला असल्याचं तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं. चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्यासाठी सहा लेझर उपचार सत्रं घ्यायला लागली. ५० किलोमीटरवर चेन्नईमध्ये घेतलेल्या या उपचारांवर ३०,००० रुपये खर्च झाले.
इरुलार समाजाची वलरमती हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत होती. ती देखील पारलिंगी आहे. शस्त्रक्रियेच्या अगदी काही क्षण आधी आपण किती मोठं पाऊल उचलत आहोत याची जाणीव रम्याला झाली होती. तिच्या माहितीच्या काही पारलिंगी स्त्रियांच्या शस्त्रक्रिया नीट पार पडल्या नसल्याचं तिनं ऐकलं होतं. “पूर्ण अवयव काढलाच नव्हता किंवा मग लघवी करताना त्यांना त्रास होत होता.”


डावीकडेः रम्या, आई वेंगम्मासोबत. उजवीकडेः वलरमती आपल्या घरी
शस्त्रक्रिया यशस्वी झाली. “असं वाटलं पुनर्जन्म झाला,” रम्या सांगते. “हे ऑपरेशन झाल्यानंतरच माझे आई-वडील मला रम्या म्हणायला लागले. तोपर्यंत ते मला माझ्या पंती [मृतवत] नावाने हाक मारायचे.”
भोवतालच्या बायांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही ऑपरेशननंतर बदलला असं रम्याला वाटतं. आता त्यांना ती त्यांच्यातलीच एक वाटू लागली. “बाहेर कधी गेलो तर त्या माझ्या बरोबर संडासला सुद्धा येतात,” रम्या हसत हसत सांगते. काट्टुमल्ली इरुलार पेंगल कुळु या महिला बचत गटाची रम्या अध्यक्ष आहेत. गटात १४ सदस्य आहेत.
रम्याकडे साप पकडण्याचा परवाना आहे. इरुलार स्नेक कॅचर्स इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी सर्पविषावर उतारा तयार करते आणि त्यांना रम्या आणि तिचे भाऊ साप पकडून देतात. पावसाळा वगळता सहा महिन्यांमध्ये दर महिन्याला या कामातून त्यांना ३,००० रुपये मिळतात. ती आजही रोजंदारीच्या कामाला जाते.
गेल्या वर्षी रम्या राहते त्या इरुलार वस्तीतली ५६ कुटुंबं तिरुपोरुरहून पाच किलोमीटरवर असलेल्या सेम्बक्कम सुन्नम्बू कळवइ या नव्या शासकीय वसाहतीत रहायला गेली. रम्याने शासकीय अधिकाऱ्यांना भेटून नव्या वीज जोडण्या मिळवायला तसंच ओळखपत्रांसाठी अर्ज करायलाही मदत केली.
ती करत असलेलं नागरी आणि राजकीय काम अधिकाधिक बळकट होतंय. गेल्या पंचायत निवडणुकांमध्ये, २०२२ साली तिने आपल्या समाजाच्या मतदानाच्या हक्कांसाठी एक मोर्चा काढला होता. सेम्बक्कम पंचायतीच्या बिगर इरुलार सदस्यांनी त्यांच्या मतदानाला आक्षेप घेतला होता. “आमच्या वस्तीला स्पेशल वॉर्डचा दर्जा मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत,” रम्या सांगते. पंचायतीची निवडणूक लढवावी आणि आपल्या समाजाची सेवा करावी अशी तिची इच्छा आहे. “आपल्याला आवडतं तसं जगता आलं पाहिजे. मी खोटं आयुष्य नाही जगू शकत.”


डावीकडेः वीज जोडणी फोन नंबरला जोडण्यासाठी आवश्यक मीटरवरच्या नोंदी आणि इतर तपशील रम्या नोंदवून घेत आहे. उजवीकडेः नव्या घरांच्या वीज जोडण्या त्या त्या फोन नंबरला जोडल्या जात आहेत का नाही हे अधिकाऱ्यांसोबत तपासण्याचं काम रम्या करते


डावीकडेः आपल्या बचत गटाच्या सदस्यांसोबत (डावीकडे मलार, उजवीकडे लक्ष्मी). उजवीकडेः सेम्बक्कम सुन्नम्बु कळवइमधल्या आपल्या नव्या घराच्या पायरीवर
तमिळ नाडूमध्ये इरुलार समाजाची लोकसंख्या सुमारे दोन लाख इतकी आहे (जनगणना, २०११). “आमच्यासाठी आमचं मूल कुणीही असो, मुलगा मुलगी किंवा तिरुनंगई आम्ही त्याची काळजी घेतो. त्याला मोठं करतो. अर्थात प्रत्येक घराची गोष्ट वेगळी असते,” ती सांगते. तिची मैत्रीण सत्यवाणी आणि सुरेश दोघंही इरुलार आहेत. तिशीला पोचलेल्या दोघांच्या लग्नाला आता १० वर्षं होतील. २०१३ सालापासून ते तिरुपोरुरपासून १२ किलोमीटरवर असलेल्या कुन्नपट्टु या इरुलार वस्तीत राहतात. ताडपत्रीचं छत असलेलं छोटं घर आहे त्यांचं.
पारलिंगी म्हणून मोठं होणं आपल्या इरुलार समाजामुळे आणि वलरमतीसारख्या मैत्रिणींमुळे सोपं झाल्याचं रम्या सांगते. रम्याच्या घराबाहेर गप्पा मारत बसलेल्या दोघी जणी सांगतात की आदि आणि मासी मागम या दोन तमिळ महिन्यांमध्ये आदि तिरुविळा हा सण साजरा केला जातो. मम्मलपुरमच्या (महाबलिपुरम म्हणून प्रसिद्ध) किनाऱ्यावर इरुलार समाजाचे लोक जमतात. या सगळ्या जागा आपल्या आणि आपल्यासाठी असल्याची भावना या दोघी बोलून दाखवतात.
वलरमती सांगते की तिथल्या नाचात त्या भाग घ्यायच्या कारण मग “मुलींसारखे कपडे घालता यायचे.” आदि सणाची ती अगदी आतुरतेने वाट पहायची. असे कपडे रोजच का घालता येत नाहीत असा प्रश्नही तिला पडायचा.
“आम्ही लंगोटयार आहोत,” रम्या सांगते. सहावीत असताना त्यांची ओळख झाली. वलरमतीची आई वारली होती. तिचे वडील तिघा लेकरांना घेऊन कांचीपुरमहून एडयनकुप्पम या इरुलार वस्तीवर रहायला आले होते. ही वस्ती तिरुपोरुरच्या जवळच होती. त्या दोघी आपल्या मनातलं सगळं एकमेकींना सांगायच्या. अगदी लहान वयातच आपल्याला सारख्याच गोष्टीची आस लागलीये हे दोघींच्या लक्षात आलं.


डावीकडेः रम्या आणि वलरमती. उजवीकडेः किशोरवयातला, स्त्रिया नेसतात तशी ‘दवनी’ नेसलेला आपला फोटो वलरमती दाखवतीये. जत्रेतल्या एका कार्यक्रमासाठी ती हे कपडे ल्यायली होती कारण तेव्हाच तशी परवानगी मिळायची


डावीकडेः सत्यवाणी आणि वलरमती. उजवीकडेः सत्यवाणी आणि सुरेश तिरुपोरुर जवळच्या कुन्नपट्टु या इरुलार वस्तीवरच्या आपल्या छोट्याशा घरात. इरुलार समाजात लग्न करण्याची इच्छा एकमेकांवर हळदीचं पाणी ओतून करतात. या दोघांनी तसं केलंय
*****
वलरमती पहिला मुलगा असल्याने तिच्या लैंगिक ओळखीमुळे तिच्यामध्ये आणि तिच्या वडलांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. किशोरवयातच तिने शाळा सोडली आणि ती ३५ किलोमीटरवर राहणाऱ्या एका तिरुनंगई कुटुंबासोबत राहण्यासाठी घर सोडून निघून गेली. “मी इतर तिरुनंगईंबरोबर एका घरात राहिलीये. आम्हाला गुरू किंवा वृद्ध पारलिंगी अम्माने दत्तक घेतलं.”
तीन वर्षं वलरमती आसपासच्या दुकानात जाऊन बाजार मागायची. “मी अगदी रोज जायचे. शाळेत गेल्यासारखं,” ती म्हणते. आपली सगळी, तिच्या मते काही लाखात असलेली कमाई गुरूला देऊन टाकावी लागायची. याच काळात तिच्या गुरूने तिच्या नावावर घेतलेलं एक लाखाचं कर्ज देखील तिला फेडावं लागलं होतं. तिची लिंग निश्चिती शस्त्रक्रिया आणि त्यानंतर ती साजरी करण्यासाठीचा मोठा विधी पार पाडण्यासाठी हे कर्ज घेतलं गेलं होतं.
घरी पैसे पाठवता येत नव्हते, कुणाची भेट घेता येत नव्हती अशी परिस्थिती झाल्यानंतर वलरमतीने दुसऱ्या एका गुरूच्या मदतीने घर सोडलं. ज्या गुरूचं तिरुनंगई कुटुंब तिने सोडलं तिथे तिने दंड म्हणून ५०,००० रुपये दिले आणि चेन्नईमधल्या एका नव्या कुटुंबात ती रहायला गेली.
“मी माझ्या वडलांना शब्द दिला होता की घरी पैसे पाठवीन आणि माझ्या भावंडांना मदत करेन,” ती सांगते. शिक्षण फारसं नाही, कामाच्या संधीही फारशा नाहीत त्यामुळे तिच्यासारख्या अगदी तरुण पारलिंगी व्यक्तींना धंदा करण्याशिवाय पर्याय नसतो. तसंच लोकल गाड्यांमध्ये पैसे मागण्याचं कामही आलंच. अशाच एका प्रवासात तिला राकेश भेटला. तिशीचा राकेश तेव्हा एका शिपिंग यार्डमध्ये काम करत होता.

वलरमती थोरला मुलगा असल्याने तिच्या लैंगिक ओळखीमुळे तिच्यामध्ये आणि तिच्या वडलांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. अगदी तरुण वयातच ती घर सोडून एका तिरुनंगई कुटुंबासोबत राहू लागली


डावीकडेः इरुला समुदायाच्या वलरमतीच्या मानेवर गोंदलेला साप. तिरुपोरुरजवळचे इरुलार साप पकडण्यात तरबेज आहेत. वसरमती सांगते की तिला साप फार आवडतात. उजवीकडेः राकेशच्या छातीवर गोंदलेलं वलरमतीचं नाव
हे दोघं प्रेमात पडले, लग्नाचे विधी करून २०२१ पासून त्यांचा संसार सुरू झाला. तिरुपोरुरमध्ये त्यांना साजेसं घर मिळालं नाही आणि त्यांना मानाने वागवणारे घरमालकही फारसे नसल्याने सुरुवातीला ते एडयनकुप्पममध्ये वलरमतीच्या वडलांच्या घरी, नागप्पन यांच्याकडे राहायला आले. नागप्पन यांनी घराची दारं उघडली मात्र पूर्णपणे त्यांनी हे नातं स्वीकारलं नव्हतं त्यामुळे मग त्यांच्या घराशेजारीच एक झोपडी या दोघांनी भाड्याने घेतली आणि तिथे त्यांनी आपला संसार थाटला.
“मी वसूल म्हणजेच बाजार मागणं बंद केलं. खरं तर बाजारात जाऊन टाळ्या वाजवून काही हजार रुपये मिळवून यावे असं मनात यायचं पण राकेशला ते आवडायचं नाही,” वलरमती सांगते. मग तिने आपल्या वडलांसोबत मंगल कार्यालयांमध्ये काम करायला सुरुवात केली. भांडी, केरफरशीचे दिवसाला ३०० रुपये मिळायचे.
“तिने मला स्वतःबद्दल सगळं काही सांगितलं. आणि मली तिची तीच गोष्ट सगळ्यात आवडली,” डिसेंबर २०२२ मध्ये मी राकेशशी बोलत होते. आधीच्या ऑपरेशननंतर वलरमतीला स्तनांच्या वाढीसाठी उपचार घ्यायचे होते. राकेशने तिला मानसिक आणि आर्थिक सगळी मदत केली. शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या सगळ्या उपचारांवर लाखभराहून जास्त खर्च झाला. “सगळ्याच ऑपरेशनचा निर्णय माझा होता. इतरांनी केलं म्हणून मी पण, असं नव्हतं. मी फक्त माझा विचार करत होते आणि मला खरंच तसंच व्हायचं होतं,” ती सांगते.
लग्नानंतर वलरमतीचा पहिला वाढदिवस होता. ती आणि राकेश तिच्यासाठी केक आणायला गेले होते तेव्हा तिथल्या दुकानदाराला वाटलं ती वसूल मागायला आलीये आणि त्याने काही नाणी देऊ केली. ते पाहून दोघेही खजील झाले. पण त्यांनी दुकानदाराला तिथे येण्याचं कारण सांगितलं तेव्हा त्या दुकानदाराने माफी मागितली. त्या रात्री वलरमतीने आपला वाढदिवस फार छान रित्या साजरा केला. राकेश, आपली भावंडं, केक, गोडधोड आणि हसत-खेळत. त्या दोघांनी जाऊन आजोबांचे आशीर्वादही घेतले.
असंच एकदा ते दोघं रात्री उशीरा मोटरसायकलवर फिरायला गेले होते. पोलिसांनी त्यांना अडवलं. तिने गळ्यातली ताली (लग्नामध्ये बांधला जाणारा मंगळसूत्रासारखा धागा) सुद्धा दाखवली. या दोघांना वाटलं तसं काहीच झालं नाही. पोलिसांना खरंच आश्चर्य वाटलं, त्यांनी दोघांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि सोडून दिलं.


डावीकडेः वलरमतीच्या हातात पळ विधीच्या फोटोंचा अल्बम - लिंगनिश्चिती शस्त्रक्रियेनंतर ४८ दिवसांनी हा मोठा सोहळा केला जातो. उजवीकडेः तमिळ नाडूमध्ये पारलिंगी व्यक्तींना देण्यात येणारं टीजी कार्ड. या कार्डच्या आधारे राज्यशासनाच्या विविध योजना मिळतात


डावीकडेः वलरमती दुकानात जाऊन दुआ देते. उजवीकडेः तिरुपोरुरपासून २५ किलोमीटरवर असलेल्या गुडुवंचेरी गावातल्या एका भाजीविक्रेत्या जोडप्याला आशीर्वाद देतीये. वलरमती दर महिन्याला इथे येते आणि तिच्या येण्याची हे सगळे वाट पाहत असतात. तिरुनंगईच्या आशीर्वादाने वाईट नजर लागत नाही अशी सगळ्यांची श्रद्धा आहे
२०२४ च्या ऑगस्टमध्ये सरकारी नोकरी मिळाली आणि राकेश चेन्नईला गेला. “त्यानंतर त्याने माझे फोन घेणं बंद केलं आणि मग तो परतच आला नाही,” वलरमती सांगते. वडलांच्या सांगण्यावरून ती चेन्नईलाही जाऊन आली.
“राकेशच्या आई-वडलांनी मला अगदी नम्रपणे त्याच्या मार्गातून दूर व्हायला सांगितलं. जेणेकरून तो दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करू शकेल, त्याची पोरं बाळं होतील. आपल्या विवाहाची नोंदणी करायला पाहिजे होती हे कधी माझ्या मनातही आलं नव्हतं. तो सोडून जाणार नाही असा ठाम विश्वास होता मला,” ती सांगते. आता मात्र राकेशची वाट पहायची नाही असं तिने ठरवलंय. आता ती चेन्नईतल्या आपल्या तिरुनंगई कुटुंबाकडे परत आलीये.
असं सगळं होऊनही ती सध्या दोन तरुण पारलिंगी मुलींना मार्गदर्शन करतीये. आपल्या तिरुनंगई कुटुंबामध्ये तिने त्यांना घेतलंय. त्यातल्या एकीला पोलिस अधिकारी व्हायचंय. तिचं स्वप्न पूर्ण करण्यात आपला हातभार लागावा अशीच वलरमतीची इच्छा आहे.