रुबेल शेख आणि अनिल खान गाडी चालवतायत... पण त्यांची गाडी आणि ते जमिनीवर नाहीत बरं. जमिनीपासून २० फुटांवर आणि तेही जवळपास ८० अंशाच्या कोनात त्यांची गाडी आणि ते वेगात चाललेत. वरतून लोक त्यांना टाळ्या वाजवत, ओरडत प्रोत्साहन देतायत. रुबेल आणि अनिल देखील आपल्या गाडीच्या खिडकीतून अर्धं अंग बाहेर काढून सगळ्यांना हात हलवून अभिवादन करतायत.
अगरताळ्याच्या जत्रेतला हा आहे मौत का कुआँ. रुबेल आणि अनिल चारचाकी आणि दुचाकीवर या मृत्यूच्या विहिरीत कितीतरी धाडसी कृत्यं करतायत.
दहा मिनिटांचा एक खेळ असं किती तरी तास ते या विहिरीत आपला जीव पणाला लावून गाडी चालवत असतात. हा मौत का कुआँ उभा करण्यासाठी किती तरी दिवस लागतात. लाकडी फळ्या एकमेकीत बसवून जमिनीवरची ही ‘उंच’ विहीर तयार केली जाते. गाडी चालवणारे बहुतेक जण विहिरीच्या उभारणीत स्वतः सामील असतात कारण त्यांच्या धाडसी खेळांसाठी विहिरीचं सगळं तंत्र आणि उभारणी कळीची असते.
मौत का कुआँ या नावातच या खेळाचं सगळं आलं. दुर्गा पूजेच्या आसपास ऑक्टोबर महिन्यात त्रिपुऱ्याच्या अगरताळ्यामध्ये जत्रा भरतात. आकाशपाळणे, गोल फिरणाऱ्या गाड्या, खेळातल्या आगगाड्या या सगळ्यांसोबत मोठं आकर्षण असतं मौत का कुआँ.

मौत का कुआँ उभारत असताना गाडी चालवणारे त्यात सामील असतात. पंकज कुमार (डावीकडे) आणि रुबेल शेख (उजवीकडे) २०२३ साली ऑक्टोबर महिन्यात दुर्गा पूजेनिमित्त भरणाऱ्या जत्रेमध्ये मौत का कुआँ उभारतायत. अगरताळा, त्रिपुरा

जत्रेला सुरुवात होणार आहे. शेवटच्या काही दुरुस्त्या सुरू आहेत
“आम्ही कोणत्याही भिंतीवरती, कोणतीही गाडी चालवू शकतो. पण आम्हाला सगळ्यात जास्त पसंत आहे मारुती ८००. तिच्या खिडक्या मोठ्या असतात त्यामुळे [काही अपघात झालाच तर] त्यातनं पडकन बाहेर पडता येऊ शकतं,” रुबेल सांगतो. तो यामाहा आरएक्स १३५ या मॉडेलच्या चार दुचाकीसुद्धा वापरतो. “आम्ही जुन्याच गाड्या वापरतो पण त्याची नीट देखभाल ठेवलेली असते.”
पश्चिम बंगालच्या माल्दाचा रहिवासी
असलेला रुबेल वाहनचालकांचा प्रमुख आहे आणि या गाड्या त्याच्याच मालकीच्या आहेत.
गेली १० वर्षं आपण याच दुचाकी वापरल्याचं तो सांगतो. “त्यांचं सर्विसिंग वगैरे
एकदम वेळेवर केलेलं असतं.”
ग्रामीण भागातली बरीच तरुण मुलं या
जत्रांचा भाग बनतात. झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातला मोहम्मद जग्गा अन्सारी म्हणतो,
“लहानपणी आमच्या गावात जत्रा यायची आणि मला ती खूप आवडायची सुद्धा,” तो लहान
असतानाच सर्कशीत काम करायला लागला. आधी काय पडेल ती छोटीमोठी कामं असायची. “हळूहळू
मी दुचाकी चालवायला शिकलो,” २९ वर्षीय मोहम्मद सांगतो. आणि पुढे म्हणतो, “या
कामामुळे मला इतक्या सगळ्या ठिकाणी जाता येतं, तेच मला सगळ्यात जास्त आवडतं.”
बिहारच्या नावदा जिल्ह्याच्या
वारिसअलीगंज या गावाचा रहिवासी असलेला पंकजकुमार देखील अगदी लहानपणी हे काम करायला
लागला. “मी दहावीनंतर शाळा सोडली आणि वाहन चालवायला लागलो.”
जत्रेतलं स्टेज आणि इतर भागाची
उभारणी करणारी मंडळी आणि अन्सारी आणि पंकज यांच्यासारखे कलाकार भारतभरातल्या
वेगवेगळ्य भागातून आले आहेत आणि सगळे एकत्र वेगवेगळ्या जत्रांना जात असतात. ते
शक्यतो जत्रा भरते तिथेच जवळ एक तंबू ठोकून मुक्काम करतात. रुबेल आणि अन्सारीसोबत
त्यांचं कुटुंब देखील असतं. पंकज मात्र काम नसेल तेव्हा आपल्या गावी परततो.

मूळचा झारखंडच्या गोड्डा जिल्ह्याचा असणारा २९ वर्षीय मोहम्मद अन्सारी गाडी चालवत असतानाच एका प्रेक्षकाच्या हातून पैसे घेतोय. काही नोटा तोंडात पकडलेल्या दिसतायत. तो म्हणतो, ‘या खेळात लोक आम्हाला जे काही पैसे देतात तीच आमची खरी कमाई’
मौत का कुआँ खेळाचं काम सुरू होतं विहिरीच्या उभारणीपासून. “सगळ्या कामाला ३ ते ६ दिवस लागतात. पण यंदा आमच्याकडे वेळच नव्हता त्यामुळे आम्ही तीनच दिवसात सगळा सांगाडा उभा केलाय,” रुबेल सांगतो. आणि असंही म्हणतो की हातात वेळ असेल तर ते हे काम जरा निवांतपणे करतात.
तर, खेळ सुरू व्हायची वेळ आलीये.
संध्याकाळचे सात वाजलेत आणि अगरताळ्यातल्या जत्रेत तिकिटांसाठी रांगा लागल्या
आहेत. तिकिट ७० रुपये आहे. मुलांसाठी मोफत. दोन चारचाकी आणि दोन दुचाकी असे चार जण
एका वेळी मौत का कुआँमध्ये गाड्या चालवत असतात. प्रत्येक खेळ १० मिनिटांचा असतो.
एका रात्रीत ते किमान ३० खेळ करतात. दोन खेळांमध्ये फक्त १५-२० मिनिटांची सुट्टी
असते.
अगरताळ्याच्या या जत्रेत त्यांच्या
खेळांना एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की त्यांनी पाच दिवसांनंतर आणखी दोन दिवस
त्यांचे खेळ सादर केले.
“आमची रोजची मजुरी ६००-७०० रुपये
असते. खेळ सुरू असताना लोक आम्हाला जे काही पैसे देतात तीच आमची मुख्य कमाई,” मोहम्मद
अन्सारी सांगतात. बरेच खेळ झाले तर एकेका महिन्यात ते २५,००० रुपयांची कमाई करतात.
रुबेल सांगतो की हे खेळ वर्षभर ठेवता
येत नाहीत. “पावसाळ्यात तर हे काम करणंच शक्य नाही.” त्यामुळे मग तेव्हा तो गावी
जाऊन शेती पाहतो.
या खेळातल्या जोखमीबद्दल बोलताना पंकज
कुमार मात्र हा धोका धुडकावून लावतो. “मला या जोखमीचं काहीही वाटत नाही. जर
तुमच्या मनात भीती नसेल तर तुम्हाला कशाचीच भीती वाटणार नाही.” सगळे जण सांगतात की
ते जेव्हापासून एकत्र खेळ सादर करतायत, तेव्हापासून एकही जीवघेणा अपघात झालेला
नाही.
“आमचा खेळ सुरू असताना लोकांमध्ये जो
काही आनंद असतो, तो मला आवडतो,” रुबेल सांगतो.

विहिरीच्या भिंती म्हणजेच लाकडी फळकुटं जत्रेच्या मैदानात ठेवलेली आहेत. २० फूट उंच अशा विहिरीच्या भिंती जवळजवळ काटकोनात, ८० अंशावर उभ्या केल्या जातात

जग्गा अन्सारी (उजवीकडे) पूजेच्या मंडपामागेच तंबू ठोकतोय. जत्रा सुरू असताना हे सगळे इथेच मुक्काम करतात

पंकज कुमार (काळ्या टीशर्टमध्ये) प्रेक्षकांचा सज्जा उभारतोय आणि रुबेल शेख त्याला मदत करतोय

सगळी रचना पूर्ण झाली की मधला खांब उभारला जातो ज्यावर कनात टाकली की मौत का कुआँ तयार

यामाहा आरएक्स-१३५ या प्रकारच्या चार दुचाकी या खेळात वापरल्या जातात. जत्रेत वाहनचालक राहतात तिथेच तात्पुरत्या तंबूत गाड्या ठेवल्या जातात. रुबेल शेख सांगतो की यातल्या काही गाड्या १० वर्षांपासून वापरात आहेत पण त्यांची नियमित देखभाल ठेवली जाते आणि ‘सर्विसिंग देखील वेळेवर केलं जातं’

जग्गा अन्सारी (डावीकडे) आणि पंकज कुमार (उजवीकडे) मौत का कुआँच्या आत खेळ दुचाकीवरचा खेळ सुरू होण्याआधी फोटोसाठी सज्ज

जत्रेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक टपऱ्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात

२०२३ साली ऑक्टोबर महिन्यात त्रिपुराच्या अगरताळ्यात दुर्गापूजेच्या वेळी भरलेल्या या जत्रेत मौत का कुआँ हे मोठं आकर्षण होतं. शिवाय आकाशपाळणा, गोल फिरणाऱ्या गाड्या आणि छोट्या आगगाडया सुद्धा होत्या

मौत का कुआँचं तिकीट ७०-८० रुपये ठेवलं जातं. किती गर्दी आहे त्यावर ते ठरतं. मुलांना प्रेवश मोफत असतो

मौत का कुआँच्या प्रेक्षकांच्या सज्जातून दिसणारं दृश्य
आणि खालची जमीन

दहा मिनिटांच्या प्रत्येक खेळात किमान दोन दुचाकी आणि
चारचाकी असतात, कधी कधी तीन दुचाकीसुद्धा चालवल्या जातात

प्रेक्षक आपल्या फोनमध्ये हा खेळ चित्रित करून घेतात. या जत्रेत हे खेळ इतके लोकप्रिय झाले की पाच दिवसांनंतर आणखी दोन दिवस खेळ लावण्यात आले

पंकज कुमार, जग्गा अन्सारी आणि अनिल खान यांच्यासोबत फोटो घेणारं एक कुटुंब

रुबेल शेख खेळ संपल्यानंतर आपल्या लहानग्याशी खेळतोय. दोन खेळांच्या मध्ये हे वाहनचालक १५-२० मिनिटांची सुटी घेतात. एका रात्रीत ते किमान ३० खेळ सादर करतात

पंकज कुमार गाडीवर. ‘मी दहावीनंतर शाळा सोडली आणि गाडी
चालवायला शिकलो,’ तो सांगतो

खेळ संपल्यानंतर एका छोट्या दारातून पंकज कुमार गाडी
बाहेर काढतोय

‘आमचा खेळ सुरू असताना लोकांमध्ये जो आनंद आणि उत्साह असतो, तो मला आवडतो,’ रुबल म्हणतो

हे खेळ वर्षभर ठेवता येत नाहीत. जेव्हा हे काम बंद असतं तेव्हा तो गावी जाऊन आपली शेती पाहतो