सप्टेंबर २०२३. बहरणाऱ्या फुलांचा हंगाम सुरू झाला होता. पश्चिम घाटातलं हे 'फुलांचं खोरं'. इथे गुलाबी आणि जांभळ्या फुलांच्या शेकडो मूळ जाती, इथल्या विशिष्ट जैवविविधतेत, दरवर्षी बहरत असतात.
मात्र वर्षागणिक फुलांचा हा बहर कोमेजू लागला आहे..
१२०० मीटर उंचीवर असलेलं कास पठार युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळ म्हणून २०१२ सालीच घोषित झालं आहे. तेव्हापासून, महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून कास पठाराची ओळख तयार झाली आहे. खासकरून ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात, जेव्हा फुलांचा हंगाम असतो. पण इथूनच खऱ्या अडचणी सुरू होतात.
“इथं कुनीच येत नव्हतं [पुर्वी]. आमच्यासाठी डोंगरच हा. गुरं चरायला आनायचो,” सुलाबाई बदापुरी सांगतात. “[सध्या] लोकं फुलांवर चालतात काय, फोटो काय काढतात, फुलं उपटतात काय!” सुलाबाई नाराजीच्या सुरातच बोलल्या, त्या ५७-वर्षांच्या आहेत, “ह्यी काय बाग हाय व्हय, दगडावर फुलं येत्यात ही.”
१६०० हेक्टरच्या परिसरात विस्तारलेला खडकाळ भूभाग सातारा जिल्ह्यातल्या सातारा तालुक्यात येतो.


सुलाबाई बदापुरी (डावीकडे) कास पठारावर कास वन व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत सुरक्षारक्षक, कचरावेचक, प्रवेशरक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या ३० व्यक्तींपैकी एक. फुलांच्या हंगामात पर्यटकांची (उजवीकडे)सरासरी दररोज २००० चा आकडा ओलांडते


२०१२ साली युनेस्कोने कास पठार जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. तेव्हापासून, महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पर्यटन स्थळ खासकरून ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान, म्हणून कास पठाराची ओळख तयार झाली आहे
“गर्दी आवरनं कठीन जातं,” सुलाबाई पठारावर सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत फुलांची रखवाली करत असतात. त्यांच्यासह अजून ३० जण पठारावर सुरक्षारक्षक, कचरावेचक, प्रवेशरक्षक आणि मार्गदर्शक म्हणून कास वन व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत जबाबदारी पार पाडतात.
साताऱ्याच्या संयुक्त व्यवस्थापन वन समितीच्या आकडेवारीनुसार फुलांच्या हंगामात पर्यटकांची सरासरी दररोज २००० चा आकडा ओलांडते. सुलाबाईंच्या विनंतीला मान देत , वर्दळ करू पाहणारे काही पर्यटक क्षणिक सावधान स्थितीत येतात, “अहो मॅडम ! फुलांवर नका उबं राहू. नाजूक असतात की ती, ऑक्टोबरला सगळी नाह्यशी व्हतात ओ,” वर-वरची माफी मागून, पर्यटक फोटो काढायला झुंबड करतात.
फुलांच्या हंगामात, या पठारावर ८५० वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात, त्यापैकी ६२४ रेड डेटा बुकमध्ये सूचीबद्ध आहेत - रेड डेटा म्हणजे, सर्व लुप्त होत चाललेल्या प्रजातींची नोंद करणारे दस्तऐवज - आणि ३९ प्रजाती ह्या फक्त कास पठारावरच पहायला मिळू शकतात. शिवाय इथे ४०० हून अधिक औषधी वनस्पती आहेत. “आता गावातल्या जुन्या मानसांस्नी ठाऊक व्हतं, कसलं पान कशावर, गुडघ्याचं दुखनं, सर्दी, ताप. सगळ्यास्नी काय झाडांची नाय माहिती तवा बी,” लक्ष्मण शिंदे सांगतात. ते ६२ वर्षांचे असून जवळच्या वांजोळवाडीत शेती करतात.
वनस्पती जीवनाव्यतिरिक्त, कास पठार म्हणजे उभयचरांच्या सुमारे १३९ प्रजातींचे निवासस्थान आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या बेडकांचा समावेश आहे, असे एक अहवाल सांगतो. येथे राहणारे सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि कीटक परिसंस्थेच्या चक्राला मदत करतात.
प्रेरणा अगरवाल एक स्वतंत्र संशोधक आहेत. पुणे स्थित प्रेरणा गेल्या पाच वर्षांपासून सामूहिक पर्यटनाचा कासच्या परिसंस्थेवर काय परिणाम होतोय याचा अभ्यास करत आहेत. “लोप पावणाऱ्या ह्या प्रजातींना लोकांची गर्दी, पायाखाली तुडवलं जाणे अशा स्वरुपाचे धोके आहेत. पर्पल ब्लॅडरवॉर्ट [Utricularia purpurascens] सारखी फुलं नाश पावतात. मलाबार हिल बोरेज [Adelocaryum malabaricum] सारख्या प्रजाती तर पठारावर दिसेनाशा होत आहेत,” त्या सांगतात.


पर्पल ब्लॅडरवॉर्ट (डावीकडे) आणि अपॉझिट लिव्हड बालसम (उजवीकडे) ह्या पठारावरील लोप पावत चाललेल्या फुलांच्या प्रजाती आहेत. लोकांची गर्दी, पायाखाली तुडवलं जाणे असे धोके आहेत
![The local jangli halad [Hitchenia caulina] found on the plateau is effective for knee and joint aches.](/media/images/05a-IMG_20230928_091734-JS-It_is_not_a_Kaa.max-1400x1120.jpg)

जंगली हळद (Hitchenia caulina) सारख्या औषधी वनस्पती गुडघेदुखी आणि सांधेदुखीसाठी प्रभावी आहेत. पठारावर वास्तव्य करणाऱ्या पक्षी आणि सस्तन प्राण्यांपैकी एक मलाबार क्रेस्टेड लार्क (उजवीकडे) पक्षी, जो परिसंस्थेच्या कामात मदत करतो
पण यातही पेच आहे. , या पर्यटनामुळे आजूबाजूच्या गावांतील रहिवाशांना ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. “मला एका दिवसाचे ३०० रुपये मिळतात. शेतमजुरीपेक्षा [ते] बरेच आहेत,” शेतमजुरीतून मिळणाऱ्या १५० रुपयांशी तुलना करत सुलाबाई म्हणतात. त्या आजुबाजुच्या कासाणी, एकीव आणि अटाळी गावात मजुरीला जात असतात.
बाकी वेळातत्या आपल्या घरच्या एक एकर जमिनीत भात घेतात. “श्येती सोडून काय काम-धंदा नाय इथे. तीन महिन्यांत थोडी चांगली कमाई व्हते,” पठारापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कासाणी गावात राहणाऱ्या सुलाबाई रोजगाराची व्यथा सांगत होत्या. त्या घरापासून पठारापर्यंतचा रस्ता पायीच पार करतात “एक तास जातो की पायी.”
दरवर्षी पठारावर खूप जास्त पाऊस पडतो, २००० - २,५०० मिमी दरम्यान. पावसाळ्यात या खडकांवरच्या अगदी तुटपुंज्या मातीत अद्वितीय वनस्पती आणि फक्त इथेच सापडणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती उगवू लागतात. “कासवरील लॅटराइट खडक स्पंजसारखं काम करतो, खडकाच्या सच्छिद्र संरचनेत पाणी साठवलं जातं आणि हळू हळू जवळच्या झऱ्यांमध्ये झिरपतं,” डॉ अपर्णा वाटवे स्पष्ट करतात. त्या पुणे स्थित वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संवर्धनक्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. "या पठारांना काहीहीनुकसान झालं तर या प्रदेशातील पाण्याच्या पातळीवर त्याचा परिणाम होऊन त्यात असंतुलन निर्माण होऊ शकतं."
डॉ. वाटवे यांनी महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचा उत्तरेकडचा भाग आणि कोकणातील ६७ पठारांवर क्षेत्रीय अभ्यास केला आहे. “हे [कास] एक नाजूक ठिकाण आहे. पायाभूत सुविधांसाठी केलं जाणारं बेसुमार बांधकाम [पर्यटनासाठी] परिसंस्थेच्या कार्यात अडथळा आणू शकतं,” त्या पठाराच्या १५ चौरस किमी परिसरात वाढत असलेल्या पर्यटन, माणसांचा वावर, यासह हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या बांधकामाचा संदर्भ देत त्या म्हणतात.


१६०० हेक्टरच्या परिसरात विस्तारलेला खडकाळ भूभागावर ८५० वनस्पती प्रजाती आढळतात. “कासवरील लॅटराइट खडक स्पंजसारखे काम करतो, खडकाच्या सच्छिद्र संरचनेत पाणी साठवलं जातं आणि आणि हळू हळू जवळच्या झऱ्यांमध्ये झिरपत जातं,” डॉ अपर्णा वाटवे स्पष्ट करतात. पठारावर सुरू असलेल्या बेसुमार बांधकामामुळे या प्रदेशातील पाणी पातळीचं संतुलन बिघडू शकतं


वांजोळवाडीतले लक्ष्मण शिंदे (डावीकडे) फुलांच्या हंगामादरम्यान प्लास्टिक आणि विल्हेवाट न लावता येण्याजोगा कचरा गोळा करतात. पेच असा की याच पर्यटनामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान लक्ष्मण, सुलाबाई (उजवीकडे) आणि इतर गावकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात
इथे राहणारे अनेक सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि कीटकांचं अन्न नष्ट होण्याचाहीधोका आहे कारण कीटक आणि फुले माणसाच्या हस्तक्षेपामुळेनाहीशी होत आहेत. “[जीवांचे] दस्तावेजीकरण आवश्यक आहे कारण ते अगदी मर्यादित क्षेत्रात राहणारे जीव आहेत, आणि ते दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जगू शकत नाहीत. जर तुम्ही असे अधिवास प्रदूषित केले किंवा खराब केले तर त्यांच्याकडे स्थलांतर करण्यासाठी दुसरी जागा नाही आहे. परिणामी ते नाहिसे होतील,” असे शास्त्रज्ञ समीर पाध्ये म्हणतात. कीटक आणि फुले संपुष्टात आले तर फुलांचा बहर कमी होऊ शकतो., यामुळे संपूर्ण परिसंस्था बिघडू शकते. पुढे जाऊन, स्थानिक प्रजातींना होणार्या हानीमुळे परागीकरण प्रक्रियेवर पठाराच्या काठावरील गावांच्या जलस्रोतांवरही परिणाम होऊ शकतात, पाध्ये नमूद करतात.
लक्ष्मणभाऊ आम्हाला जंगली हळद (Hitchenia caulina) दाखवतात. ती गुडघेदुखी आणि सांधेदुखीसाठी औषधी असल्याचं ते सांगतात. चार दशकांपूर्वीचा त्यांचा काळ आठवून ते म्हणतात, “त्या दिसात [कासवर] फुलं लय दाट व्हती.” फुलांच्या हंगामात, ते कासवर प्लास्टिक आणि विल्हेवाट न लावता येण्याजोगा कचरा गोळा करतात, त्यातून दिवसाला ३०० रुपये त्यांची कमाई होत असते आणि उरलेले वर्ष ते आपल्या दोन एकर जमिनीवर इतर शेतकऱ्यांप्रमाणेच भात पिकवतात.
“आमचा जनम इथलाच. कोपरान-कोपरा तुडवलाय,” सुलाबाई सांगतात. “आजपतुर, आमाला कोनी मानलं नाय, का तर आमी अंगठाबाज, पन ह्ये शिकलेलं लोक काय करत्यात निसर्गाचं?”
कास आज बदलेला दिसतो. “ह्ये लय ब्येकार झालंय. लहानपनचा कास नाय हा,” सुलाबाई अगदी कळवळून सांगतात.