कोलकात्याच्या उत्तरेकडच्या अगदी अरुंद बोळांमध्ये हातगाडीसुद्धा किंवा हाताने ओढायची रिक्षा कशीबशी जाते. ही आहे कुमारांची म्हणजे कुंभारांची गल्ली. या शहरातले मूर्तीकार इथे राहतात. कोलकात्यात दर वर्षी दुर्गापूजेसाठी तयार होणाऱ्या दुर्गेच्या मोठाल्या मूर्ती इथनंच अख्ख्या शहरभर पोचतात.
कार्तिक पॉल यांची कार्यशाळा इथेच आहे. कार्यशाळा म्हणजे खरं तर बांबू आणि
प्लास्टिकची शेडच म्हणा ना. तिचं नाव आहे ‘ब्रजेश्वर अँड सन्स’ (त्यांच्या
वडलांच्या नावे). एक मूर्ती बनवण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आणि त्यातले अनेक पदर
ते आम्हाला उलगडून दाखवतात. त्यासाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची माती, उदा. गंगा
माटी (नदीकाठची ओली माती), पाट माती (ताग आणि गंगा मातीचं मिश्रण) मूर्ती तयार करत
असताना वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरल्या जातात.

कार्तिक पॉल आपल्या मूर्तीशाळेत
आम्ही बोलत असतानाच कार्तिक दा कार्तिकदेवाचा मुखवटा तयार करतायत, ओल्या मातीचा. आणि त्यांचे निष्णात हात चियाडी म्हणजे बांबूपासून हाताने तयार केलेल्या एका अवजाराच्या मदतीने अगदी सफाईने त्याला आकार देतायत.
दुसऱ्या एका मूर्तीशाळेत गोपाल पॉल
यांनी एक खळ तयार केलीये. मूर्तीला त्वचेचा पोत यावा म्हणून पंचासारखं एक कापड चिकटवलं
जातं त्यासाठी ही खळ लागते. गोपाल कोलकात्यापासून १२० किमी दूर नडिया जिल्ह्यातल्या
कृष्णानगरचे आहेत. इथे काम करणारे सगळे पुरुष कारागीर नडियाचेच आहेत.
मूर्तीशाळेच्या जवळ मालकांनी दिलेल्या खोल्यांमध्ये ते एकत्र राहतात. उत्सव सुरू
होण्याच्या काही महिने आधी त्यांना कामावर बोलावलं जातं. आठ तासांच्या पाळीत ते
काम करतात. मात्र दुर्गापूजा सुरू होण्याआधी मात्र त्यांना अगदी दिवस रात्र काम
करावं लागतं. त्यासाठी त्यांना ओव्हरटाइमचे पैसेही दिले जातात.
असं सांगतात की कृष्णानगरहून सुमारे ३०० वर्षांपूर्वी अगदी पहिल्यांदा कुंभार
इथे कुमारटुलीमध्ये काम करण्यासाठी आले. बागबझार घाटजवळ तेव्हा कुमारटुली नुकतीच
वसवली जात होती, काही महिने त्यांनी तिथे काम केलं. इथून नदीकाठची माती आणणं सोपं
होतं. ते जमीनदारांच्या घरच्या ठाकूरदालोन म्हणजेच जमीनदारांच्या वाड्यातल्या देवघरांमध्ये
मूर्ती तयार करण्याचं कामही करत असत. दुर्गापूजेच्या काही आठवडे आधी हे काम
चालायचं.

मूर्तीकार हुगळीच्या इटेल माटीमध्ये ताग मिसळून त्याची पाट माटी तयार करतात


डावीकडेः मूर्ती तयार करण्याची सुरुवात बांबूचा सांगाडा म्हणजे काठमो तयार करण्यापासून होते. उजवीकडे या बांबूच्या सांगाड्यावर हव्या त्या आकारात पेंढा भरला जातो. हा सगळा कच्चा माल बागबझार मार्केटमधून येतो

पेंढा भरलेल्या मूर्तीच्या सांगाड्यावर काळ्या चिकण मातीचा थर दिला की मूर्तीला तिचा आकार मिळतो. त्यानंतर मातीची मूर्ती सुकण्यासाठी ३-४ दिवस उन्हात ठेवली जाते

चेहऱ्यावरचं कोरीव काम करण्यासाठी रंगाचा कुंचला आणि बांबूच्या एका अवजाराचा वापर केला जातो

शेजारच्याच एका मूर्तीशाळेच गोपाल पॉल मूर्तीवर त्वचेचा पोत यावा यासाठी पंचासारखं कापड वापरतो

महालयाच्या शुभदिनी दुर्गेचे डोळे रेखाटले जातात आणि त्यानंतर मूर्तीत प्राण फुंकला जातो
‘कुमारटुलीची सैर’ फोटो अल्बम पहा
हा व्हिडिओ आणि वृत्तांत सिंचिता माजी हिने आपल्या २०१५-१६ पारी फेलोशिपदरम्यान केला आहे.